घनचक्कर आणि पाबरगड

मिलिंद देशपांडे
सोमवार, 18 जानेवारी 2021

सह्यगिरी

महाराष्ट्राचा नगर जिल्हा हा सह्याद्रीची उंच गिरिशिखरे आणि किल्ले घेऊन ट्रेकर्स व पर्यटकांना कायमच साद घालत असतो. कळसूबाई, हरिश्चंद्रगड, अलंग, मदन, कुलंग आणि रतन गड ही खऱ्या अर्थाने राकट सह्याद्रीने आपल्या अंगाखांद्यावर मढवलेली कोंदणेच आहेत. मुळातच आपल्यामध्ये असलेल्या साहसी वृत्तीला ही ठिकाणे आव्हानच ठरतात. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी जरा आडवाटेवरचे किल्ले पाहावेत म्हणून या लेखातून आपण आज काही दुर्लक्षित किल्ल्यांची सफर अनुभवूया.

एक दिवस सकाळी अचानक माझ्या डोंगरमित्राचा म्हणजे उद्धव गोडबोलेचा फोन आला, ‘मित्रा तीन-चार दिवस जरा डोंगर भटकंती करू या.’ माझी एकच अट होती, न पाहिलेले किल्ले करायचे असतील तरच मी तयार आहे. थंडीचा ऋतू असल्यामुळे एक मताने आम्ही शिरपुंजाचा भैरव, घनचक्कर व पाबरगड ही रांग पाहण्यासाठी सज्ज झालो. दोघेच असल्याने गाडीने पुणे-नाशिक रस्त्याने बोटा, ब्राह्मणवाडामार्गे राजूर आणि तेथून शिरपुंजे गावी २०० किलोमीटर अंतर पार करून पाच तासांत पोहोचलो. शिरपुंजे गावाला चहुबाजूंनी डोंगरांनी आपल्या कवेत घेतले आहे. गावातल्या दोन छोट्या मुलांना सोबतीला घेऊन त्वरित भैरवगडाच्या दिशेने प्रस्थान ठेवले. गडावर जाणारी वाट एकदम धोपट आणि सोपी आहे. गावातूनच किल्यावर फडकणारे भगवे झेंडे व गुहा आपले लक्ष वेधून घेतात. ग्रामस्थांनी आणि वनखात्याने उभारलेल्या कमानीपासून तासाभरातच आपण रेलिंग लावलेल्या आडव्या वाटेपाशी पोहोचतो. पंचक्रोशीतल्या भक्तजनांचे हे श्रद्धास्थान असल्याने आणि तेथे आश्विन महिन्यात भरत असलेल्या यात्रेमुळे वनखात्याने ही सुरक्षा यंत्रणा तेथे उभी केली आहे. येथून किल्ला आणि शेजारचा डोंगर यामध्ये असलेल्या खिंडीत आपण पोहोचतो. खिंडीतून पलीकडे उतरणारी वाट तळातील आंबित या गावी जाते. इथून मात्र गडावर पोहोचविणाऱ्या पाषाणात कोरलेल्या एकसंध पायऱ्या बघून आपण अचंबित होतो. खड्या चढाईच्या आणि नजरेला जागे ठेवणाऱ्या या पायऱ्या गडाच्या सौंदर्यात भर तर घालतातच, पण उतरताना आपले काय होणार हा प्रश्नदेखील मनाला भेडसावत राहतो. 

महाराष्ट्रात एकूण पाच भैरवगड आहेत. त्यापैकी हा एक; तसेच कोथळ्याचा भैरव, कोयनेचा भैरव, मोरोशीचा भैरव आणि सिंधुदुर्गमधील कणकवलीजवळचा नरडव्याचा भैरव असे हे सर्व भैरव गड आपापल्या सौंदर्याने खुललेले आहेत. पायऱ्यांच्या निर्मात्यांना आणि तेथील स्थापत्यकलेला दाद देत आपण काही मिनिटांतच पडलेल्या दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश करतो. सपाटीवरून थोडे चालले की पाण्याची काही खोदीव टाकी व भग्न अवशेष पाहत आपण भैरवाच्या गुहेपाशी पोहोचतो. याच परिसरात काही वीरगळ आणि काही कोरडी टाकी, तसेच गुहेतील भैरव किंवा खंडोबाची उंच मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. गडाचा माथा अगदीच छोटा असल्याने पाऊण एक तासात डोळ्यात व कॅमेऱ्यात साठविता येतो. माथ्यावरून सभोवताल नजर फिरवली की उत्तुंग सह्याद्रीच्या गिरिशिखरांचा नजारा, विशेषतः घनचक्करची रांग ही केवळ अवर्णनीयच. हा लोभस सह्याद्री पाहून व जलकुंभातील पाणी पिऊन आमचा थकवा केव्हाच पळून गेला होता. आता आस लागली होती ती घनचक्करच्या माथ्यावर जाण्याची. भैरोबापुढे नतमस्तक होऊन व पोटपूजा उरकून आम्ही पाय वळवले ते फिरून फिरून चक्कर येणाऱ्या घनचक्करकडे. 

सोबतीच्या डोंगरपुत्र छोट्या वाटाड्यांनी आम्हाला खिंडीतूनच एक वाट घनचक्करच्या माथ्यावर घेऊन जाते, पण ती थोडी गचपणातून आहे आणि तो शॉर्टकट आहे, असे सांगितल्यावर त्या वाटेने जायला आम्ही लगेचच तयार झालो. अन्यथा पुन्हा गावात उतरून दुप्पट वेळ जाणार होता. ही थोडी अवघड वाट एका कातळाच्या पोटात असलेल्या कपारीपाशी घेऊन जाते. या कपारीत चक्क एक कुटुंब राहते. हे पाहिल्यावर आपण किती भौतिक सुखात रमतो हे डोळ्यापुढून सरकत नव्हते आणि स्वतःशी एक संवाद साधत आम्ही पुढे मार्गस्थ झालो. थोडी चढण, थोडी गर्द वनराई अशी वाट पायाखालून सरकवतच आम्ही घनचक्करच्या माथ्यावर दीड तासात पोचलो. नजरेच्या टप्प्यात मावणार नाही इतका अजस्र पसारा आहे या सह्याद्रीतील तिसऱ्या क्रमांकाच्या शिखराचा. अगदी शेवटाला जायचे म्हटले तर जाऊन येऊन किमान चार ते पाच तास हवेतच. आणि हो, काही ठिकाणी असलेल्या अरुंद आणि निसरड्या वाटा यांमुळे माहितगार वाटाड्या असल्याशिवाय या ठिकाणी न गेलेले बरे! घनचक्करचा एवढा मोठा पसारा आणि तो एक शिखरमाथा असल्याने यावर राहण्याची काहीच सोय नाही आणि पावसाळ्यानंतर काही काळ, काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे येथे मुक्काम करणे हे दुरापास्तच आहे. अगणित एकर जागेवर पसरलेले हे पठार पावसाळ्यानंतर मात्र विविधरंगी वनफुलांनी आणि पसरलेल्या लहान मोठ्या शिळांनी अत्यंत मनोहारी दिसते. माथ्यावरून रतनगड, मुडा, गवळदेव, कात्राबाई खिंड, भंडारदरा जलाशय आपल्याला खुणावत असतात. ही सगळी सह्याद्रीची कणखर रांग इतकी भन्नाट आहे आणि जैवविविधतेने नटलेली आहे, की नावीन्याचा शोध घेणाऱ्या ट्रेकर्सनी हा परिसर याची देही याची डोळा बघितलाच पाहिजे. पण या सर्व सह्यधारा भटकायच्या असतील आणि शहरी सुखापासून थोडे बाजूला यायचे असेल, तर घराचा उंबरठा ओलांडायलाच पाहिजे. उत्तम नियोजन तसेच सोबतीला स्थानिक माहितगार घेऊन या रानवाटा व आडवाटा पायाखाली घालण्यात एक वेगळीच मजा आहे हे मात्र नक्की.

घोंघावणारा वारा पिऊन आणि शरीरात नवचैतन्य भरून आमची पावले वळली ती परत शिरपुंजे गावाकडे मुक्काम करण्यासाठी. छोटेखानी आदिवासी असलेल्या या गावातील भारदस्त मंदिरात आणि निरव शांततेत स्वतः स्वयंपाक करून आणि त्यावर ताव मारून आम्ही बिछाने पसरले. उद्या पाबरगडाकडे पावले वळणार होती.

भल्या पहाटे उठून, भरपूर चहा पिऊन गावापासून दूर पोट मोकळे करून आल्यावर आता वेध लागले होते ते पाबरगडाकडे जाण्यासाठी. आज आमचा प्रवास शिरपुंजे गाव ते राजूर आणि तेथून भंडारदऱ्याकडे म्हणजेच शेंडी गावाकडे होता. वाटेतील गुहिरे गावातून बरीच मंडळी या किल्यावर जातात. पण हा झाला धोपट मार्ग. आम्ही मात्र रतनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुतखेल गावातून वर जाणाऱ्या जरा वेगळ्या वाटेने जायचा मानस ठेवला होता. मुतखेल गावातून कोणी वाट दाखवायला येणार का असा आवाज देताक्षणीच एक युवक लगोलग धावत येऊन म्हणाला, ‘पावणं मी हाय ना.’ या धट्ट्याकट्या जवानाला घेऊन आम्ही त्वरित मार्गस्थ झालो. त्याने दिलेल्या माहितीनुसार येथूनही दोन वाटा आहेत. पण एक वाट जरा छातीवरच्या चढाची व अवघड आहे आणि त्या बाजूने गेल्यावर वेळ वाचेल. तसेच उतरंडीला आपण सोपी पण फिरून येणारी वाट वापरू असा मौलिक सल्ला दिला. स्थानिक लोकांना मान दिला की आपल्या पारड्यात नक्कीच काहीतरी चांगले पडते हा अनेक वर्षांचा माझा अनुभव आहे. आम्ही त्याच्या म्हणण्याला लगेचच होकार दिला. गावापासून थोडासा चढ मग सपाटीवरील शेताच्या बांधावरून वाट कापत आम्ही थेट भिडलो त्या उभ्या चढणीला. ही वाट वापरात नसल्याने काटेरी जाळ्या आणि तेथील घसारा यामुळे आमची घसरण होत होती. तासाभराने एका घळीत पोहोचलो व वर पाहिले तर एक खिंडीवजा भाग दिसत होता. तोच आमचा गडावर पोहोचण्याचा मार्ग, हे वाटाड्याने सांगितल्यावर आमचे पाय जरा जडच झाले. सत्तर टक्क्याहून अधिक चढाई झाल्याने आता माघारी फिरणे व घसाऱ्यातून उतरणे म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. पण एकमेकांच्या मदतीने आणि काही वेळा चतुष्पाद होत एकदाचे गडावर प्रवेशलो. पंधराशे मिटर म्हणजे जवळपास पाच हजार फुटांवर पोहोचल्यावर घामाने डबडबलेल्या अवस्थेत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून आणि भंडारदऱ्याच्या पाण्यावरून शीतलता घेऊन येणारी झुळूक आम्ही अनुभवली. हे तर आमच्या सारख्या भटक्यांचे सुखच जणू. 

गडावर तशी बऱ्यापैकी सपाटी असून १२-१३ पाण्याची टाकी आहेत. गडावरच्या भैरोबाचा तांदळा (शेंदूर लावलेला दगडाचा देव), वेताळाचे देवस्थान हे बघून आणि काही टाक्यातले पिण्याजोगे पाणी पिऊन आम्ही निघालो गडभ्रमंतीला. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई ते रतनगडाच्या रांगेतील रांगडा सह्याद्री आणि त्यावर गुण्यागोविंदाने नांदणारे एकाहून एक सरस असलेले रतन, अलंग, कुलंग, मदन हे किल्ले, कात्राबाई खिंड तसेच भंडारदरा धरण आणि त्याचे प्रचंड विखुरलेले पाणी हे सगळे विहंगम दृश्य डोळ्यात साठविताना खरेच दमछाक होते. अशा या सगळ्याच रांगड्या दुर्गांवर जाऊन तेथील माती आपण आपल्या मस्तकी भाळली आहे, या कृत्याने आमचा ऊर अभिमानाने भरून आला. 

या थोड्या दुर्लक्षित झालेल्या किल्ल्यांवर भटकंती करून आणि आजूबाजूचा प्रदेश पाहिला की मनाला किती समाधान लाभते हे अशा अनगड माथ्यावर उभे राहिल्याशिवाय समजणारच नाही. म्हणून मी आग्रहाने सांगेन, नवख्या किंवा सराईत भटक्यांनी अशी आव्हाने उचलायलाच हवीत आणि आपण घेतलेला आनंद इतरांपुढे मांडलादेखील पाहिजे. असो. 

आता लांबचा पल्ला असला तरी दुसऱ्या वाटेने उतरायचे निश्चित झाले होते. या नळीच्या वाटेच्या खिंडीत आम्ही येऊन पोहोचलो. थोडासा कातळ टप्पा व कोरीव पायऱ्या उतरून आम्ही एका ट्रॅव्हर्सला (डोंगराच्या पोटातून जाणारी आडवी वाट) लागलो. येथे दोन गुहा असून एकात पाणी आहे. याच्या शेजारीच खडकावर कोरलेला नंदी व शिवपिंड आहे. पुन्हा एकदा पाणी पिऊन व बाटल्या भरून खाली खुणावत असलेल्या मुतखेल गावाकडे पावले वळवली. लांबून येणारी थोडीशी कंटाळवाणी असलेली ही वाट परत आपल्या अवघड वाटेच्या टप्प्यातल्या शेताडांपाशी मिळते आणि तेथूनच एक टेकडी उतरली की आपण मुतखेल गावात पोहचतो. दोन दिवसांच्या या भटकंतीने आम्हाला बरेच काही दिले व दाखविले. आता गाडीतून पुण्याच्या भाऊगर्दीत पुनश्च मिसळण्यासाठी आम्ही जड अंतःकरणाने गाडीचे दरवाजे उघडले.

संबंधित बातम्या