हरिश्चंद्रच्या बेलाग वाटा

मिलिंद देशपांडे
रविवार, 31 जानेवारी 2021

सह्यगिरी

नगर, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर उभा असलेला आणि भटक्यांचे नंदनवन असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड! थोडीफार भटकंती झाल्यावर एखाद्याने जर हरिश्चंद्र पाहिला नसेल, तर त्याला इतर भटकी मंडळी वेड्यात काढतात. प्रचंड पसारा असलेला आणि विपुल वनराजीबरोबर पशू-पक्षी, वन्यप्राणी यांचा मुक्त वावर असलेला हा किल्ला दुर्गम तर आहेच; पण अनेक बाजूंनी गड माथ्यावर यायची परवानगी देणारा हा किल्ला नितांत रमणीयदेखील आहे.

हरिश्चंद्र पर्वत खरा गाजला तो तेथील भव्य-दिव्य अशा कोकणकड्याच्या सौंदर्याने. पण याव्यतिरिक्त तेथे असलेले हरिश्चंद्रेश्वराचे रेखीव मंदिर, केदार लिंगाची थंड पाण्यात असलेली गुहेतील पिंड, नग्नावस्थेतील गणेशाची भव्य मूर्ती असलेल्या गणेश गुहांचा समूह, गच्च जंगलाचा साज असलेले तारामतीचे उंच शिखर, बालेकिल्ला, प्रचंड आणि थंडगार तसेच रुचकर असलेला पाणीसाठा आणि पुष्करण्या हे सगळे अनुभवायचे असेल तर चांगली दोन दिवसांची सवड काढून, सख्या सोबत्यांची मोट बांधून या दुर्गावर भटकंती करायलाच हवी.

माळशेज घाटाच्या ऐन माथ्यावर आणि सह्याद्रीच्या कण्यावर आपले पाय भक्कमपणे रोवून हा किल्ला हजारो वर्षे भल्या दिमाखात उभा आहे. माळशेज घाटाच्या अगदी अलीकडे खुबी फाट्यावरून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर गावातून टोलार खिंडीमार्गे जाणारी वाट ही पारंपरिक वाट आहे. बहुतांश भटकी मंडळी या मार्गाचा वापर करतात, कारण पुणेकर आणि मुंबईकर या दोघांनाही ही वाट पायथ्याशी पोहोचण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. घनदाट जंगलातून टोलार खिंड गाठायची आणि डावीकडे असणाऱ्या कड्यातून खोबणीच्या वाटेने रेलिंगचा आधार घेत गडमाथा गाठायचा. माथ्यावर पोहोचून पायांना थोडीशी विश्रांती देत फिरत-फिरत जाणाऱ्‍या वाटेने किंवा बालेकिल्ल्याच्या पोटातून जाणाऱ्‍या वाटेने थेट मंदिरापाशी मुक्कामी पोहोचायचे.

पाचनाईकडून येणारी वाट पुणे आणि मुंबईकरांना लांबचा प्रवास करून यायला लावणारी आहे. पुणे-संगमनेर-राजुरमार्गे पाचनाईला पोहोचण्यासाठी किमान सहा तासांचा गाडी प्रवास करायला लागतो. पाचनाईतून येणारी वाट ही एकदम धोपट- अगदी राजरस्त्यासारखी! गडावरून उगम पावणाऱ्या मंगळ गंगा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने अगदी दीड तासात आपण फारसे कष्ट न घेता अगदी मंदिराच्या समोर पोहोचू शकतो.

खिरेश्वर गावात अगदी आश्रम शाळेच्या जवळ किंवा काही वर्षांपूर्वी बांधलेल्या पिंपळगाव-जोगा धरणाच्या बंधाऱ्यानजीक एक देखणे दगडी शिल्पकलेचा नमुना असलेले शिवमंदिर आहे. नागेश्वर हे त्याचे नाव. यादवकालीन असलेले मंदिर आपल्या भटकंतीतून थोडासा वेळ काढून जाताना किंवा येताना पाहण्याजोगे असेच आहे. शेषशायी विष्णूची मूर्ती, छतावर कोरलेली देखणी शिल्प पाहून कारागिरांच्या अजोड कामगिरीचा आपल्याला प्रत्यय येतो. इथूनच वर जाणारी थोडीशी अवघड, पडझड झालेली आणि घसाऱ्यातून मार्गक्रमण करणारी जुन्नर दरवाजा असलेली आणि पूर्वीचा राजमार्ग म्हणून मिरवणारी वाट आहे. पण मात्र सोबतीला स्थानिक वाटाड्या आणि उत्तम माहितगार नेता असल्याशिवाय या अवघड श्रेणीतील वाटेकडे चुकूनही वळू नये. या व्यतिरिक्त गणेश धारेची, कोतुळकडून येणारी आणि राजदरवाजाची अशा अनेक वाटांनी वर येता येते, पण फारशा वापरात नसलेल्या या वाटा तुडवायच्या असतील आणि रानोमाळ भटकायचे असेल तर भरपूर वेळ आणि तंगडतोड करायची तयारी तर हवीच. पण स्थानिक वाटाड्या किंवा मार्गदर्शक नसेल तर वाट चुकून प्रचंड विस्तारलेल्या या गडावर चकवा लागलाच म्हणून समजा! असो.

या सगळ्या वाटांवरून भटकून झाले की माझ्यासारख्याला दोन वाटा कायमच साद घालतात. त्या म्हणजे अंतर्वक्र असलेल्या हरिश्चंद्रच्या कोकणकड्यावरून खाली दूरवर दिसणाऱ्या बैल पाडा या आदिवासी गावातून वर येणाऱ्या आणि अतिशय अवघड श्रेणीमध्ये मोडणाऱ्या दोन वाटा- एक म्हणजे भवानी नाल्याची किंवा नळीची वाट आणि दुसरी म्हणजे माकड नाळ.

रुद्रभीषण अशा आणि वरून खाली पाहताना नजरेला घाबरविणाऱ्या कोकणकड्याच्या माथ्यावरून डोकावून पाहिले, की कोकणकड्याच्या उजव्या बाजूला अगदी शेवटाला दिसणारी नाळ म्हणजे भवानी नाल्याची वाट किंवा सध्या ट्रेकर्सना मोहिनी घालणारी नळीची वाट. बैलपाड्यातून या नाळेच्या सुरुवातीला किंवा कुशीत पोहोचायला चांगला दीड तासांचा, परंतु सोप्या श्रेणीतला चढ आहे. इथून मात्र कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत किमान पाच ते सहा तासांची तीव्र आणि अंगावर येणारी तसे पूर्ण ढासळ असलेली वाट आहे. आधीची झाडीतून असलेली वाट नाळेत घुसल्यावर मात्र एकदम उजाड होऊन जाते. संपूर्ण वाटेत विविध आकाराचे मोठे प्रस्तर खंड अस्ताव्यस्त पसरलेले आहेत आणि दोन्ही बाजूला उंच उभे कातळकडे. अनेक ठिकाणी ही वाट खूप अरुंद होते, तर कधी या कातळाच्या भिंती खूप दूरवर नेणारी... अशा या वाटेतून वर सरकताना नराचा वानर होतो. पाच ते दहा फुटांचे आरोहण करायला लागणारे पाच-सहा टप्पे आणि तीस ते पस्तीस फुटांचा कातळकडा हा अवघड टप्पा पार करताना मात्र रोपची गरज भासतेच. हे सगळे साहस करून आपण माथ्याच्या अगदी जवळ असलेल्या खिंडीत पोहोचतो. येथून एक वाट सादडे घाटाच्या मार्गे पुन्हा उतरून बैल पाड्यात घेऊन जाते आणि एक वाट थेट कोकणकड्यावर म्हणजेच पर्यायाने हरिश्चंद्र गडावर पोहोचते.

माकड नाळेच्या वाटेलासुद्धा बैल पाड्यातून सुरुवात केल्यावर पहिल्या दीड तासाच्या टप्प्याची वाट तीच आहे. एका ओढ्यातील पाणवठ्यावरून कोकणकड्याकडे तोंड केल्यावर डावीकडे वर जाणारी नळीची वाट आणि येथूनच उजवीकडे घुसणारी वाट म्हणजे माकड नाळ. प्रचंड छातीवरचा चढ चढत आणि वाटेतले अवघड रॉक पॅच येंगत कोकणकडा आणि रोहिदास शिखराच्या मधे असलेल्या तारामतीच्या लिंगी जवळच्या खिंडीत आपल्याला पोहोचायला जवळ जवळ आठ ते दहा तासांचा कालावधी लागतो. यामध्ये एक प्रस्तर खंड पार करण्यासाठी अक्षरशः जिवाची बाजी लावायला लागते. अंदाजे ५० फूट असलेला हा खडक त्याच्या शेवटच्या टप्प्यातील ओव्हरहॅंगमुळे खूपच कठीण आहे. हे सगळे साहस संपवून तारामतीच्या लिंगीचे दर्शन घेत आपण पुढे पठारावरून आणि कारवीच्या जंगलातून जवळ-जवळ एक तास पायपीट करून तिथे असलेल्या एकमेव पाणवठ्याकडे जातो. गलितगात्र झालेले शरीर अक्षरशः जमिनीवर कोसळते. पाणवठ्याच्या कडेला शेकोटीची ऊब घेत उघड्यावर आकाशातील चांदण्यांशी संवाद साधायचा किंवा बरोबर आणलेल्या तंबूत आपला मुक्काम ठोकायचा. जमलेच तर दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिदास शिखरावरून दिसणारा नजारा बघायला जायचे. इथून मात्र तारामतीच्या मार्गे जुन्नर दरवाजाच्या अंगाने एक तर हरिश्चंद्र गाठायचा, नाही तर तारामतीच्या पोटातून जुन्नर दरवाजाच्या बाजूला असलेले नेढे पाहत-पाहत तीन ते चार तासांची पदयात्रा करून पुन्हा खिरेश्वर गाठायचे.

नळीची आणि माकड नाळेची वाट धोकादायक अाहे. उत्कृष्ट नियोजन, सराईत गिर्यारोहक, गिर्यारोहणाची साधने असल्याशिवाय आणि बैल पाड्यातील कमा, कमळू किंवा काशिनाथ यांच्यासारखे वाटाडे सोबत असल्याशिवाय या वाटेला फिरकूच नये, असा एक अनुभवी सल्ला मात्र मी निश्चितच देईन. गडावरून दिसणारे अलंग, कुलंग, मदन, भैरवगड, शिवनेरी, हडसर, चावंड, जीवधन, नाणेघाट, कलालगड, कुंजरगड हे हरिश्चंद्रच्या माथ्यावरून  पक्ष्यांच्या नजरेने पहायचे असतील आणि सत्यवचनी राजा हरिश्चंद्र तसेच योगी चांगदेवांच्या स्मृती जागविणाऱ्या या माथ्यावरील इतिहासाच्या पाऊलखुणा मनात साठवायच्या असतील, तर मात्र पाचनाई आणि खिरेश्वरच्या मार्गाने धोपट हरिश्चंद्र ही अनुभूती घ्यायलाच हवी!

संबंधित बातम्या