आजोबा, मुडा आणि गवळदेव

मिलिंद देशपांडे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सह्यगिरी

सह्याद्रीच्या बालाघाट रांगेत वसलेला आजोबा किंवा आजा पर्वत पाहायचा राहून गेला ही रुखरुख मनाला सतावत होती. पण म्हणतात ना काही गोष्टींना योग आणि वेळ यावी लागते. घनचक्करची रांग फिरताना याचे मनोहारी दूरदर्शन घेऊन समाधान मानावे लागले होते. पण तेथून घराकडे पावले वळविताना मात्र एकदा या ‘आजोबां’च्या अंगाखांद्यावर बागडायला यायचे आणि जवळपासचा परिसरदेखील पिंजून काढायचा हा दृढनिश्चय करूनच माघारी परतलो होतो. 

आमच्यासारख्या भटक्या मंडळींना जरा अवधी मिळाला की शहरातल्या भाऊगर्दीत रमण्यापेक्षा दूरदेशीच्या गडमाथ्यावर हिंडण्याची आणि तेथील निसर्गाशी संवाद साधण्याची भारी हौस असते. पाठ पिशवी खांद्याला लटकवून पाच सात जणांचे समविचारी टोळके जमवून आणि सह्याद्रीच्या दऱ्‍याखोऱ्‍यातून मार्ग काढीत, जरा वेगळे पदरात पाडून घ्यायची आस उराशी बाळगून केलेली ही भटकंती दमछाक निश्चितच करते, पण त्यातून मिळालेला आनंद शब्दात मांडणे खरेच कठीण. अभी अकोलकर, रवी देशपांडे, लाल्या जोशी आणि मी अशी ‘गिरीकंड’ असणाऱ्या मंडळींची मोट बांधायला फारसा वेळ लागला नाही. दिवसांचे गणित जमवत आम्ही एकदाचे तयार झालो.

मागच्या लेखात मी शिरपुंजे-भैरवगड, घनचक्कर आणि पाबरगड या यात्रेबद्दल लिहिले आहेच. भैरव- घनचक्कर- मुडा- गवळदेव- कात्राबाई ते आजोबा ही सलग रांग करता येऊ शकते. पण स्थानिक वाटाड्याची उपलब्धता, पाण्याची कमतरता, हे सलग करताना वाटेत मुडा किंवा गवळदेव यांच्या माथ्याजवळ करावा लागणारा मुक्काम आणि त्यासाठी पाठीवर मिरवायला लागणारे तंबूचे मोठे ओझे, लागणारे सलग दिवस हे गणित जमवणे थोडे अवघड. म्हणूनच ही यात्रा दोन टप्प्यात केलेली बरी असे मला सुचवावेसे वाटते. आम्हीदेखील तेच केले. या परिसरात पर्जन्यमान भरपूर असले तरी पावसाळ्यानंतर दोन किंवा तीनच महिने पाणी उपलब्ध असते आणि त्यांच्या जागा माहीत नसतील तर मात्र या वाटा पाण्याविना तुडविणे म्हणजे महाभयंकर काम. पुण्याहून निघून आम्ही आमचा गिरिमित्र अभिजित अकोलकर यांच्या संगमनेरच्या घरी पोहोचलो आणि त्याला चार चाकीत बसवून राजुरमार्गे कुमशेत या डोंगरांनी कवेत घेतलेल्या गावी प्रस्थान केले. कुमशेतचा लालू असवले या डोंगरगड्याच्या घरी पोहोचेपर्यंत सकाळचे नऊ वाजले होते. सध्याची क्रेझ असलेला चुलीवरचा चहा पिऊन आम्ही निघालो ते थेट मुडा गडाकडे.

कुमशेतचा कोंबडा सुळका उन्हात चांगलाच तळपत होता. त्याला डाव्या हाताला ठेवत खड्या चढणीच्या आणि थोड्या ढिसाळ वाटेने आम्ही पोहोचलो ते मुड्याच्या पठारावर. मुडा आणि गवळदेव ही तर घनचक्कर या तिसऱ्या क्रमांकाचे शिखर असलेल्या रांगेतील उंचावलेली शिखरे आहेत. पठाराच्या अगदी जवळच लालूने एका जरा झरायुक्त पाणवठ्याची जागा दाखवून आम्हाला खूश केले. तृषा भागवत आम्ही मुडा पाहण्यास निघालो. खरेतर मुडा आणि गवळदेव यावर फारसे काही बघण्याजोगे नाही. पण तेथून सभोवताल दिसणारा परिसर मात्र मनाला ताजेतवाने आणि खूश करतो. माथ्यावर तसे बोडके जंगल आहे आणि थंडीत जरी गेले तरी या सह्य माथ्यावर उन्हाने चांगलीच दमछाक होते. त्याचे दर्शन घेऊन आमची पदयात्रा चालू झाली, गवळदेव किंवा गवळीदेवाकडे. याचा उंचावलेला मार्ग मात्र चांगलाच दमछाक करणारा आहे. माथ्यावरून घनचक्कर, भैरवगड, कात्राबाई, रतनगड आणि अगदी कळसुबाई ते हरिश्चंद्रगड ही सह्याद्रीतील रत्नांची खाण पाहून अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटते. आमच्या सोबत आणलेले तहान लाडू आणि भूक लाडू संपवून आम्ही गवळदेवाच्या पोटातून आमच्या पुढील लक्ष्याकडे म्हणजेच कात्राबाईच्या खिंडीकडे कूच केले. वाटेत काही स्थानिकांनी ससा, डुक्कर, सायाळ यांच्यासाठी लावलेले सापळे (ट्रॅप) नजरेस पडले आणि अजूनही ही अवैध शिकार चालू आहे हे बघून मन कष्टी झाले. इथून मात्र रतनगडचा परिसर आणि त्याच्या सभोवताली असलेला अक्राळ-विक्राळ रांगडा सह्याद्री खरेच भीतीदायक वाटतो. मजल-दरमजल करत आणि एके ठिकाणी लालूने दाखविलेल्या गुप्त पाणीसाठ्याचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो ते कात्राबाईच्या माथ्यावर. सृष्टीने चौफेर उधळलेला निसर्गाविष्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करत आम्ही आता कात्राबाई उतरायला सुरुवात केली होती. 

 घनदाट जंगलाचे पडदे मागे सारत आणि ब्रिटिशांनी या मार्गावर त्याकाळी उभारलेल्या मैलाच्या दगडांचे अवशेष यांची खूणगाठ बांधत गुडघ्यावर आलेला भार सोसत एकदाचे सपाटीवर पोहोचलो. रस्त्याने लालूच्या घरी पोहोचेपर्यंत भास्करराव अस्ताकडे निघाले होते. लालूच्या घरी तांदळाच्या भाकरीबरोबर अस्सल गावरान रस्सा आणि डाळ भातावरील गावठी तुपाचा भरपेट आस्वाद घेत घराच्या बाहेरील ओसरीवर निरभ्र आकाशातील चांदणे डोळ्यात साठवत निद्रादेवीच्या अधीन कधी झालो ते कळलेच नाही. सकाळी लवकर लालूच्या कोंबड्याने, पाव्हणं उठा, म्हणून बांग दिली. बिस्तरा आवरून चहा बिस्किटांचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या सगळ्यात महत्त्वाच्या लक्ष्याकडे म्हणजेच आजोबाकडे गाडी वळवली. 

कुमशेत मधून मोराची वाडी पार करून अगदी आजोबाच्या कुशीत असलेल्या दोन घरांच्या वस्तीमध्ये आम्ही आमचा चारचाकी रथ विसाव्याला ठेवला. तेथून निव्वळ १५ मिनिटांतच शिदोबा या स्थानिक देवापाशी आम्ही पोहोचलो. हे स्थान म्हणजे डेहणे गावातून कोकणाच्या बाजूने गुहिरीच्या दऱ्याने घाटमाथ्यावर येणारा एक भरभक्कम चढाचा आणि आपल्या सहनशीलतेचा अंत पाहणारा मार्ग आहे. पण अनेकांसाठी तर हा पायाखालचा आणि राजमार्गच. आजोबा, आता डाव्या हाताला वर उठावलेला दिसत होता. हा सह्याद्री रांगेचा खरंच आजोबा वाटतो. मुंबईकर रस्त्यांसाठी कल्याण-मुरबाडमार्गे डेहणे या गावातून, नाहीतर कसारा-घोटी-राजुरमार्गे कुमशेत गावातून यावर येण्याचे मार्ग आहेत. पुणेकर मात्र कुमशेत गावातून जाणेच पसंत करतात. वाल्मिकी ऋषींनी जिथे रामायणाचे लेखन केले, सीतामाईने लव-कुश यांना जन्म देऊन त्यांचा पाळणा जेथे हलविला आणि वाल्मिकी ॠषी यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आजेपण म्हणून हा आजा पर्वत किंवा आजोबा अशी कथा सांगितली जाते. डेहणे गावाकडून येताना हा आश्रम गडाच्या मध्यावर आपल्याला बघायला मिळतो. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आणि रतनगड तसेच हरिश्चंद्रच्या मधे मान उंचावून उभा असलेला हा आजोबा पर्वत. डेहणे गावातून येणारी आणि वाल्मिकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली वाट किंवा गुहिरीच्या दऱ्याने म्हणजेच अवघड नाळेने किंवा पाथरा घाटमार्गे कुमशेतकडे येणारी वाट या सगळ्याच वाटांचे सौंदर्य उत्तमच आहे.

आम्ही आता शिदोबाकडून आजोबाकडे जाणाऱ्या वाटेने वर निघालो होतो. वाटेत पडलेल्या दरडींमुळे थोडी कसरत करत आजोबाच्या पोटात डाव्या अंगाने जाणाऱ्‍या वाटेला दीड तासातच आम्ही भिडलो. थोड्याशा निमुळत्या वाटेने तोल सावरत पुढील अर्ध्या तासातच आम्ही आजा पर्वताच्या पदरात पोहोचलो. वाटेतल्या ओहळामध्ये काही ठिकाणी अगदी मोजकेच पाणी शिल्लक होते. पण त्यात मुक्तपणे विहार करणाऱ्या पाणनिवळ्या पाहून निर्धोक मनाने आम्ही आमची तहान भागवली. काही मिनिटातच आम्ही आजोबाच्या कड्यावर पोहोचलो. उत्तर दिशेला तोंड करून उभ्या असलेल्या या कड्यावरून दिसलेल्या सह्याद्री पर्वतराजीचे जे काही दर्शन घडले ते पाहून अक्षरशः आमचे भान हरपले होते होते. कळसुबाई ते रतनगड, हरिश्चंद्र, कोंबड किल्ला, किरडा, करंडा, कात्राबाई, गवळदेव, मुडा, घनचक्कर, भैरव गुहिरीचा दरा, कुमशेतचा वाकडीचा खुटा, बुधला, मळा, सांधण दरी, करोली घाट, चिंचवाडी, पाथऱ्या घाट हा परिसर आमच्या लालूने बकऱ्या आणि गुरांना फिरविण्यासाठी अक्षरशः पिंजून काढला आहे, हे त्याच्या तोंडातून ऐकत आम्ही आजोबाच्या माथ्यावर कधी पोहोचलो ते कळलेच नाही. माथ्यावरून परत निघालो ते शिदोबाच्या मंदिराकडे. सह्याद्रीच्या विविध शिखरांवरून होणारे आजोबाचे दूरदर्शन आज मात्र त्याच्या माथ्यावर उभे राहिल्याने आमच्या मनात एक वेगळेच समाधान होते. आज लाल्या जोशी दमल्यामुळे खालच्या वस्तीतच थांबला होता. खाली उतरून, त्याला घेऊन आम्ही आमचा मोर्चा वळविला ते एका अत्यंत दुर्लक्षित आणि निसर्गरम्य अशा ठिकाणाकडे म्हणजेच धारेरावच्या कोकण कड्याच्या माथ्यावर.

सगळे उरकून धारेरावपर्यंत पोहोचायला दुपारचे चार वाजून गेले होते. धारेराव मंदिर चहुबाजूंनी वेढलेल्या जंगलात आणि बंधाऱ्‍याने अडविलेल्या जलाशयाच्या काठी वसलेले आहे. गर्द वनराजीतील हा स्थानिक देव आणि तेथे वनखात्याने बांधलेल्या छत्र्या तसेच वन्य प्राणी-पक्षी यांच्या निरीक्षणासाठी बांधलेला मनोरा आणि तेथील नीरव शांतता यामुळे आपण दुसऱ्या जगात असल्याचा भास होत होता. मंदिराच्या अलीकडे मुक्कामाच्या छत्रीपाशी गाडी पार्क करून आम्ही त्वरित निघालो ते मावळत्या दिनकराचे दर्शन घ्यायला. फक्त वीस मिनिटांच्या चालीतच आम्ही जंगलाचा पट्टा संपवून विस्तीर्ण अशा कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचलो. 

सोनेरी किरणे आपल्या अंगाभोवती 

लपेटून समोरील सह्याद्रीच्या रांगा उजळून निघाल्या होत्या. येथून हरिश्चंद्रचा कोकण कडा, घोडी शेप, माळशेज घाटाचा परिसर, आजोबा हे सर्व सुवर्ण धारांनी नाहून निघाले होते. अंधार पडायच्या आत पुन्हा मुक्कामावर येऊन तंबू सजवला आणि पुढच्या अनगड पदयात्रेत  कुठे जायचे ही चर्चा करत एकीकडे गॅसवर खिचडीचा बेत शिजायला ठेवला. लालूला मला कुमशेतला सोडायचे होते. मी आणि लाल्या जोशीने त्याला घरी सोडले. त्याच निबिड अरण्यातून परत येताना 

आमची अक्षरशः टरकली होती. जेवण झाल्यावर रात्री हाडे गोठविणाऱ्या थंडीतून टॉवरवर बिछाने पसरलेले आमचे डोंगर मित्र अभिजित आणि रवी, बरोबर एक वाजता काकडत उतरून आमच्या तंबूमध्ये घुसले. भल्या पहाटे पक्ष्यांनीच कूजन करीत आम्हाला तंबूतून बाहेर पडायला आणि त्यांचे विविधरंगी पक्षी वैभव पाहायला आमंत्रण दिले. दोन्ही प्रकारचे किंगफिशर, पाणकावळे, खाटीक, बुलबुल आणि इतर बरीच पाखरमाया कॅमेऱ्यात टिपत, अविस्मरणीय पदभ्रमण यात्रेची आठवण काढत आणि खूप कष्टाची चाल करूनदेखील मनाने ताजेतवाने होत आम्ही आमचा रथ घराच्या दिशेने वळविला.

संबंधित बातम्या