राजगड-तोरणा दुर्गयात्रा

मिलिंद देशपांडे
सोमवार, 15 मार्च 2021

सह्यगिरी

पुण्याहून नसरापूर किंवा बनेश्वरमार्गे वेल्ह्याकडे जायला लागलो की इंग्लिश साहेबाने घातलेल्या फेल्ट हॅटच्या किंवा क्रिकेटपटू वापरतात तशा आकाराचा डोंगर आपले त्वरित लक्ष वेधून घेतो. हाच तो ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ म्हणजेच महान दुर्ग किंवा दुर्गराज राजगड. मूळचा मुरुंब देवाचा डोंगर म्हणून आजही आपली ओळख जपून ठेवणारा हा किल्ला आणि इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून आजही मोठ्या ऐटीत उभा आहे. 

‘दुर्गम इति दुर्गः’ याची प्रचिती देणारा हा किल्ला पुण्यापासून अगदीच जवळ. छत्रपती शिवरायांच्या ऐन उमेदीच्या काळात चोवीस वर्षे राजधानीचा किल्ला म्हणून किताब मिळवणारा हा किल्ला दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, साहसप्रेमी यांची जणू पंढरीच. मी १९८१ साली प्रथम या किल्ल्यावर जायचे धाडस केले. हो धाडसच म्हणावे लागेल, कारण पायथ्यापर्यंत जायची अपुरी वाहन व्यवस्था, किल्ल्यावर जायच्या बुजलेल्या वाटा, थोडेफार जनावरांचे भय आणि किल्ल्यावर राहायची अपुरी व्यवस्था, त्यातून डोंगर-दऱ्या आणि किल्ल्यावर भटकंतीसाठी जाणारे म्हणजे वेडेच असा जनसामान्यात असलेला समज, या सगळ्यांवर मात करून एकदाची ही साहसी मोहीम यशस्वी झाली. अगदी पायथ्यापर्यंत म्हणजे गुंजवणे वाजेघर किंवा पाली गावापर्यंत झालेला रस्ता आणि गडावरील निवास तसेच भोजनाची सोय यामुळे हा किल्ला आता आवाक्यात आलाय म्हणा ना. तेव्हाची चोर दिंडीची म्हणजेच गुंजवणे किंवा वाजेघराकडून येणारी वाट ही तिथे नसलेल्या सुरक्षा कठड्यांमुळे (रेलिंग) खूपच अवघड वाटणारी होती, पण आता मात्र राजगडाच्या घेऱ्यातून वर येणाऱ्या सर्वच वाटा या धोपट झाल्या आहेत. अनेक सुखदुःख पचविलेल्या या बेलाग आणि बुलंद अशा किल्ल्याची बऱ्यापैकी डागडुजी झाली असली, तरी तिथे येणारे भ्रमिकांचे प्रचंड लोंढे आणि त्यातील काही जणांचा बेताल कारभार पाहून मन अक्षरशः विषण्ण होते. कारण यातील बहुतांश मंडळी ही आपली बेफाम पर्यटनाची हौस भागविण्यासाठी आणि आपले फाजील साहस सोशल मीडियावर पसरविण्यासाठी येतात, हे मी कैकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांमुळेच इथे मांडतोय. पण अनेक स्वयंसेवी संस्था मात्र शिवप्रेमाने प्रेरित होऊन गड स्वच्छतेसारखे अनेक कार्यक्रम राबवून आपणही इतिहासाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वयंस्फूर्तीने आणि आपल्या परीने योगदान देत असतात ही आनंदाची बाब आहे. 

एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी, आप्पा देशपांडे, दादा फडतरे आणि भूषण खांबेटे या मित्रांनी मिळून पद्मावती माचीवरील, देवळा शेजारील पाण्याचे टाके उपसले होते आणि पुढील अनेक वर्षे हजारो ट्रेकर्सना तेथील स्वच्छ पाण्याने आपली तहान भागवता आली. गोनीदांच्यानंतर या टाक्याची स्वच्छता करणारे आम्हीच होतो. असो. 

राजगड गाजला तो त्याच्या पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची तसेच अत्यंत राकटपणे मान उंचावून उभ्या असलेल्या देखण्या बालेकिल्ल्यामुळे. महाराजांच्या सख्या-सोबत्यांनी निर्माण केलेला राजगड दुर्ग स्थापत्याचा एक अजोड असा नमुनाच आहे. आकाशातून याचे छायाचित्र टिपले असता एखादा गरुड हवेत झेपावला आहे असाच भास होतो. पुणे-वेल्हा रस्त्यावर मार्गासनीमार्गे गुंजवणे गावातून किंवा वेल्हा रस्त्यावरील पाबे गावाच्या मार्गे खरीव खिंडीतून, साखरमार्गे वाजेघरातून चोर दिंडीमार्गे, पालीमार्गे राज दरवाजातून, भुतोंडे गावाच्या बाजूने म्हणजेच भोरमार्गे अळू दरवाजातून आणि गुंजवणे गावातून किर्र जंगलातून गुंजवणे दरवाजामार्गे अशा अनेक मार्गाने राजगडावर पोहोचण्याची महती काय वर्णावी? प्रत्येक वाटेचे सौंदर्य आणि साहस वेगळेच. खरेतर तीनही ऋतूंमध्ये म्हणजे, पावसाळ्यात धुक्याची शाल पांघरून बसलेला, हिवाळ्यात सोनकीच्या फुलांनी आणि अनेक वन बाळांनी आपल्या मुळातच असलेल्या सौंदर्यात भर घालून हिरवाकंच शालू ल्यायलेला आणि भर उन्हाळ्यात आपल्या राकटपणाची भीती घालणाऱ्या या दुर्गाची महती काय सांगावी. हे सौंदर्य याची देही याची डोळा अनुभवायलाच हवे. माझा खूप जुना मित्र पुष्कराज आपटे याने राजगडाचे ऋतुचक्र हा स्लाइड शोदेखील तयार केला होता. इतका मानवी मनाला किंबहुना दुर्गप्रेमींच्या मनाला भुरळ घालणारा हा किल्ला आहे. 

माझ्यासारखा भटकंतीचा वसा घेतलेल्याला तर मिळेल तेव्हा याच्या अंगाखांद्यावर बागडायची इतकी हौस की १२७ वेळा सर्व ऋतूंमध्ये अगदी पौर्णिमा आणि अमावस्या याचे खास सौंदर्य टिपण्यासाठी केलेली भटकंती अजूनही अपुरीच वाटते. खरे सांगू का, माझे आणि या दुर्गराजाचे हितगुज अजून संपलेच नाही असे वाटते. राजगडावर खरेतर इतके लिहिता येईल पण अनेक दिग्गजांनी आणि इतिहास तज्ज्ञांनी यावर विपुल लिखाण केले असल्याने त्या वाटेला माझ्यासारख्याने न जाणेच उचित ठरेल. पण गो. नी. दांडेकर म्हणजेच आप्पांच्या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे एवढेच म्हणावेसे वाटते की ‘या सम हाच’!

पुण्यातल्या कुठल्याही उंच इमारतीवरून किंवा टेकडीवरून, एवढेच काय तर अगदी लकडी पुलावरूनदेखील सिंहगडाकडे नजर फिरवली असता, त्याच्या बरोबर उजव्या हाताला एक उंच दुर्ग आपली नजर वेधून घेतो आणि तो म्हणजेच तोरणा ऊर्फ प्रचंडगड. ४६०६ फूट उंच असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ल्याचा मान पटकावून भल्या दिमाखात उभा असलेला दिसतो. जेम्स डग्लस या इंग्लिश प्रवाशाने म्हणून तर याचे वर्णन ‘गरुडाचे घरटे’ असे केले आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्याहून वेल्हा या गावी जावे लागते आणि वाटेवर राजगड आपल्या डाव्या हाताला बराच वेळ आपली साथ सोबत करत राहतो. तेथे सापडलेल्या २२ हंडे सुवर्ण मोहरा आणि त्याचा राजगडाच्या निर्मितीसाठी झालेला उपयोग ही कथा आजदेखील तितक्याच आनंदाने ऐकवली जाते. पण गडावरील तोरण नावाच्या वनस्पतीमुळेच या गडाचे नाव तोरणा पडले असावे, असा कयास तज्ज्ञ मंडळी करतात. वेल्हे गावातून गडमाथा गाठायला पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागायचा, पण आता स्वतःचे वाहन असल्यास दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता आपल्याला गाडीनेच थोड्या उंचीवर घेवून जातो आणि पर्यायाने गड चढायला दीड तास पुरतो. वेल्ह्यातील तोरणा विहार हॉटेलमध्ये वस्ती करायची. सुरेशराव कदम म्हणजेच सगळ्या ट्रेकर्सचे लाडके आणि आदरणीय भाऊ. (नुकतेच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांना विनम्र आदरांजली.) त्यांच्या कुटुंबाचा प्रेमळ आणि आग्रही पाहुणचार घेऊन गडावर जायचे. कोठी आणि बिनी दरवाजा ओलांडून तोरण जाईचे आणि मेंगाई देवीचे दर्शन घ्यायचे, अवघड वाट असलेल्या झुंजार माचीचे रूप माथ्यावरूनच न्याहाळायचे, वेळ असेल तर कोकण दरवाजामार्गे बुधला माचीच्या शेवटापर्यंत जाऊन यायचे आणि परतल्यावर मेंगाईच्या टाक्यातील पाण्याने फ्रेश होऊन खोकड टाक्याच्या पाण्याने तृषा भागवत ताजेतवाने व्हायचे आणि पुनःश्च परतीच्या मार्गाला भिडायचे. 

खरेतर तोरणा नीट निरखून पाहायचा असेल तर गडावर किमान एक दिवस मुक्काम करणेच योग्य. तसेच राजगडाच्या इतिहासात नखशिखांत नाहायचे असेल आणि राजगड पूर्ण वाचायचा असेल, तर किमान दोन किंवा तीन दिवस येथे तळ ठोकूनच बसायला हवे. हे दोनही किल्ले एकदा पूर्ण न्याहाळून झाले, की मग स्वराज्यातील या दोन अतिमहत्त्वाच्या दुर्गांना जोडणारी पदयात्रा तुम्हाला नक्कीच मोहात पाडेल याची माझ्या मनात शंका नाही. हो, राजगड ते तोरणा हीच ती आनंदयात्रा. गिरिमित्रांनो या दुर्ग यात्रेसाठी पावसाळ्यानंतरचा मोसम एकदमच बहारदार, कारण या वाटेवर पावसाळ्यानंतर काही काळच पाण्याची उपलब्धता असते आणि वाटेतील काही धनगर झापांवर आवाज दिल्यास अस्सल गावरान ताक मिळू शकते. पहिल्या दिवशी राजगडावर तेथील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत आणि शिव प्रेमाने प्रेरित होत पद्मावती माचीवर मुक्काम करायचा आणि दुसऱ्या‍ दिवशी भल्या पहाटे उठून संजीवनी माचीच्या आळू दरवाजामार्गे तोरण्याकडे जाणारी डोंगर रांग पकडायची. माथ्या-माथ्यावरून घेऊन जाणारी ही डोंगर यात्रा थेट बुधला माचीच्या बुधल्यापाशी जाऊन भिडते. तेथील एक छोटासा रॉक-पॅच (आता इथे शासनाने शिडी लावली आहे) येंगून बुधला माचीवर दाखल व्हायचे आणि मजल दरमजल करत कोकण दरवाजाने प्रचंडगडावर प्रवेशायचे. गडावरील स्थानिकांच्या औदार्यातून मिळालेला भाकरतुकडा खायचा आणि गडाचे सौंदर्य टिपत टिपत वेल्हे गावी पोहोचायचे.

राजगडावरून दिसणारे सिंहगड, पुरंदर, वज्रगड, कावळा, रोहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, मकरंदगड, गोप्या घाट, येसाजी कंक जलाशय यासारखा पसरलेला स्वराज्याचा परिसर आणि तोरण्यावरून दिसणारे लिंगाणा तसेच रायगड हे सारे डोळे भरून अनुभवायचे असेल तर ही दुर्गजोडीची यात्रा करायलाच हवी. सोप्या श्रेणीची ही दुर्गयात्रा करताना पायवाटा आणि ढोरवाटा यांची गल्लत होऊ नये म्हणून वाटाड्या सोबत असणे केव्हाही चांगलेच. मग चला तर गिरिमित्रांनो, यंदाच्या पावसाळ्यानंतर हा बेत नक्की असू देत तुमच्या पुढील भटकंतीच्या पटलावर.

संबंधित बातम्या