साल्हेर-सालोटा

मिलिंद देशपांडे
सोमवार, 29 मार्च 2021

सह्यगिरी

गुजरातच्या सीमेला जोडणारा देशावरील बागलाण प्रदेश खरोखरच वैभवशाली आहे. सह्याद्रीचे दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आणि किल्ल्यांतील सर्वोच्च किल्ला म्हणून ख्याती असलेला साल्हेर किल्ला इथेच तग धरून बसलाय. साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा, हरगड, रतनगड ऊर्फ न्हावी हे किल्ले आणि जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेली मांगी-तुंगी शिखरे असा पसरलेला सुपीक प्रदेश हे तर बागलाणचे वैशिष्ट. हा सर्व प्रदेश निरखून पाहायचा असेल तर चांगली सहा-सात दिवसांची सवड काढून, पाठीवर ओझे वाहून न्यायची तयारी आणि उत्तम नियोजन यांचा संगम करावा लागतो.

बागलाण प्रदेश नाशिककरांना  जवळचा, त्यामुळे उरलेल्या महाराष्ट्रातल्या भटक्यांनी शक्य झाल्यास सवड काढून एकदाच पाहून घेतल्यास उत्तम, अन्यथा दोन भागात केल्यासही चालेल. मी मात्र २००० साली चौल्हेर ते मांगी-तुंगी असा सलग पाच दिवसांचा प्लॅन केला होता आणि आम्ही चारजणच असल्याने स्वतःच्या गाडीने ही यात्रा सुफळ संपूर्ण झाली. आज आपण साल्हेर आणि सालोटा या एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या दुर्गजोडीची यात्रा समजावून घेऊया. आमच्यापैकी एक मित्र बँकेच्या सेवेत असल्याने आम्ही पुण्यावरून रात्री निघण्याचे ठरविले. गाडी मित्राची असली तरी गाडीमध्ये सॅक भरताच त्याने गाडीची किल्ली माझ्या हातात देऊन, ‘रात्रीची गाडी तूच चालव मी आपला शेजारीच बरा’, म्हणत स्वतःची सोय करून घेतली. अर्थात भटकंतीच्या छंदाबरोबर गाडी चालवणे हादेखील माझा आवडीचा विषय, त्यामुळे 'नेकी और पूछ पूछ' असेच काहीसे झाले. पुण्याहून नाशिककडे आम्ही रात्री नऊ वाजता प्रस्थान ठेवले आणि वाटेत चहा ढोसत नाशिकच्या द्वारका चौकात पोहोचायला आम्हाला रात्रीचे दोन वाजले होते. मुंबई आग्रा रोडच्या फ्लाय ओव्हरखाली आम्ही एक चहाची गाडी बघून, सुरक्षित ठिकाण म्हणून इथेच थोडा वेळ अंग टाकू असा सर्वानुमते निर्णय घेतला. कारण अवेळी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचून काहीच उपयोग नव्हता. 

चार वाजता उठून पुन्हा गाडीवरचा चहा पिऊन आम्ही आग्रा हायवेने सटाण्याकडे निघालो. सटाण्यात चहा व न्याहारी करून आम्ही चौल्हेर किल्ल्याकडे निघालो (याबाबत मी पुढे लिहीनच). किल्ला बघून खाली यायला आम्हाला दोन वाजून गेले होते. चौल्हेर आणि इतर किल्ल्यांवर जाण्यासाठी ताहराबाद यामार्गे पुढे जावे लागते. आजचा कार्यक्रम एवढाच होता. सुंदर वटवृक्षाखाली आम्ही आमची सोबत आणलेली शिदोरी फस्त केली. आता आम्हाला जायचे होते ते साल्हेर आणि सालोटा यांच्या पायथ्याशी असलेल्या वाघांबे गावात मुक्कामासाठी. चौल्हेर ते वाघांबे हे अंतर किंवा प्रवास खूप लांबचा नव्हता. संध्याकाळी साधारण साडेचार ते पाच या दरम्यान आम्ही वाघांबे या आदिवासी गावात पोहोचलो. अशा अनोळखी गावात बरोबर कुठे थांबायचे आणि आपल्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था कशी करायची याची आम्हा भटक्यांना बरोबर नॅक असते. जरा मोठे घर आणि दारात एक जीप व ट्रॅक्टर बघून मी गाडी थांबवली. संजय नाईक आणि उमेश पेडगावकर यांना सांगितले की ‘खाली हात लौटना नही’ आणि आमची गाडी बघून एक उमदा तरुण आमचे स्वागत करत घराच्या ओसरीवर आला. सुनील महाले हे त्याचे नाव. ‘किल्ल्यावर जायचं ना? मग लावा गाडी इथं,’ अशा त्याच्या प्रेमळ हाकेला आम्ही त्वरित होकार दिला. न सांगताच हातात थंडगार पाण्याचे तांबे आले आणि ओसरीवरूनच आत आवाज गेला, ‘पाहुण्यांना चहा टाक गं.’ चहा संपताच, मी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतोय, तुम्ही समोर बांधलेल्या खोलीत वस्ती करा असा प्रेमळ आदेशच दिला. किती आपलेपणा होता सुनीलच्या या आदरातिथ्यामध्ये. आम्ही समोरच्या घरात विसावलो. थोड्या वेळाने पाय मोकळे करण्यासाठी आम्ही चक्कर मारायला बाहेर पडलो. शे-सव्वाशे उंबरठ्यांचे हे गाव डोंगराच्या कुशीत छान विसावले होते आणि तेथील तीन मजली आश्रम शाळा पाहून तर आम्ही आश्चर्यचकित झालो. मावळत्या दिनकराचे दर्शन घेऊन आम्ही परतलो आणि उद्याच्या मोहिमेचे नियोजन करून सॅक भरून ठेवली. एका दिवसात दोन अवाढव्य किल्ले करणे आणि सायंकाळच्या आत परत वाघांबे गाठणे हे म्हणावे इतके सोपे काम नव्हते. सुनीलकडे उत्तम भोजनाचा आस्वाद घेत गप्पांचा फड चांगलाच रंगला. तुमच्याच्याने वाट सापडवणे जमणार नाही म्हणून तुमच्या सोबत एकदम अनुभवी वाटाड्या देतो, या त्याच्या सांगण्याने आमची उद्याची काळजी मिटली होती. आता सकाळी लवकर निघायचे असल्याने थोड्या काळातच आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. 

पहाटे पाच वाजताच ठरल्याप्रमाणे उठून आम्ही स्वतःच्या गॅस स्टोव्हवर चहा तयार केला आणि पोट मोकळे करण्याचा कार्यक्रम उरकून, बरोबर सहा वाजता उजाडता उजाडता खोलीबाहेर तयार होऊन बसलो. आमचा वाटाड्याही अगदी वेळेत सोबत कोयता घेऊन आला होता. वाघांब्यातून साल्हेर आणि सालोटा यांच्यामध्ये असलेल्या वाघांबे खिंडीत पोहोचायला सुमारे दोन ते अडीच तास लागणार होते. सुमारे दीड तास चालल्यावर आम्ही एका धारेवर पोहोचलो आणि तेथूनच या दुर्ग जोडीचे दूरदर्शन आम्हाला वेगळाच आनंद देऊन गेले. त्यांचे हे रूप कॅमेरात साठवून आम्ही आमची पुढची वाटचाल सुरू केली. या मार्गदर्शक वाटाड्यांचा वाट दाखविण्याबरोबर आणि एक महत्त्वाचा फायदा असतो, तो म्हणजे त्यांना वाटेतील आड बाजूचे पाणीसाठे बरोबर माहीत असतात. 

खिंडीत पोचेपर्यंत साडेआठ वाजून गेले होते आणि ऊन व्हायच्या आत आम्हाला प्रथम

सालोटा किल्ल्याचा माथा गाठायचा होता. खिंडीतून साधारण पाचशे मीटर पलीकडे जाऊन गर्द झाडीचा पट्टा संपवत आम्ही मुख्य चढाईला सुरुवात केली. एका ओहोळातून बऱ्यापैकी घसारा असणारी ही वाट मग चढ संपवून एका ट्रॅव्हर्सला म्हणजे आडव्या वाटेला जाऊन मिळाली. ही अरुंद वाट आणि वाटेतील खडकाळ टप्पा पार करण्यासाठी मी पुढे सरसावून सोबत असलेला रोप सर्व अवघड ठिकाणी फिक्स केला आणि मग उमेश आणि संजय माझ्या मागून आले. बांधलेला रोप तसाच ठेवून आम्ही साधारण सत्तर अंशात कोरलेल्या पायऱ्यांची पोहोचलो. कशा आणि कोणी या पायऱ्या निर्माण केल्या असतील हा विचार करत आणि छातीच्या भात्याची फासफुस करत पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो. येथून मात्र आडवी पण बऱ्यापैकी रुंद वाट कपारीतून दोन दरवाजे पार करत माथ्यावर घेऊन जाणार होती. वाटेत पाण्याची सुकलेली अनेक टाकी आणि कड्यातून सुटून पडलेले दगड ओलांडत आम्ही एकदाचे किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावरील अत्यंत सुंदर आणि रुचकर पाणी पिऊन, थोडे ताजेतवाने होऊन गडमाथा गाठला. सालोटाच्या माथ्यावरून साल्हेरचा मार्ग आणि दगडात कोरलेल्या पायऱ्‍या तसेच सर्वोच्च माथ्यावरील परशुरामाचे मंदिर पाहून आम्ही अक्षरशः अवाक झालो होतो. गडावर टाकी आणि काहीसे पडीक अवस्थेतील दरवाजे सोडता विशेष काही बघण्याजोगे नाही, पण खिंडीतून माथा आणि त्याच वाटेने परत हे साहस नक्की काय हे मात्र त्याच्या माथ्यावर उभे राहिल्याशिवाय कळणारच नाही हे नक्की. भरपूर फोटो काढत अत्यंत सुयोग्य पद्धतीने आम्ही परत खिंडीत पोहोचलो. पोटातील अग्नी शांत करणे गरजेचे असल्याने बरोबर आणलेले तयार आणि पौष्टिक खाद्य पोटात रिचवून थोड्या विश्रांतीनंतर आम्ही निघालो ते साल्हेरच्या दर्शनाला. 

खूप दिवसांच्या राहिलेल्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही आतुर झालो होतो. पुन्हा खिंडीतून थोडे पलीकडे साल्हेरच्या पदरातून आणि एका नुकत्याच पडलेल्या दरडीतून मार्ग शोधत आम्ही साल्हेरच्या अतिसुंदर अशा पायऱ्‍यांच्या समीप पोहोचलो. विश्रांती आणि फोटोसाठी दरवाजाच्या सावलीत बसलो असता बरोबर समोर सालोटा आम्हाला खुणावत होता. दरवाजाची बांधणी बघत आणि पुढे कड्याच्या पोटातून जाणारी ट्रॅव्हर्स आपल्याला साल्हेरच्या मुख्य पठाराकडे घेऊन जाते. तेथूनच लांबच्या पण सुरक्षित असलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर किंवा सर्वोच्च माथ्यावर जाणारी धोपट वाट आहे. बरीच मंडळी दरवाजानंतर असलेल्या अवघड आणि ठिसूळ मार्गाने म्हणजेच शॉर्टकटने परशुरामाच्या मंदिरावर जायचा प्रयत्न करतात, पण ही वाट खूप निसरडी असल्याने न वापरलेली बरी. पठारावरील गंगासागर तलाव, माता रेणुका देवीचे मंदिर, यज्ञकुंड, खूप मोठे असलेले आणि अद्‍भुत असे पावलांचे ठसे किंवा खळगे आणि सर्वोच्च माथ्यावरील परशुरामाचे मंदिर हे खास बघण्याजोगे. परशुरामाच्या दारात उभे राहून सालोट्याकडे नजर फिरवली तर निव्वळ वेड लागते आणि विश्वासच बसत नाही की काही तासांपूर्वीच या वाटेने आपण सालोटा काबीज केला होता. परशुराम मंदिराच्या परिसरात चौफेर नजर फिरवत परत पठारावर येऊन आणि पश्चिमेच्या बाजूला असलेल्या एकामागे एक असलेले दरवाजे ओलांडून, खडकात खोदलेल्या उभ्या पायऱ्या उतरत समोर असलेल्या कोकणकड्यासारखा भासणारा शैलकडा नजरेत साठवत आम्ही आता दुसऱ्या बाजूने साल्हेर वाडी या गावात पोहोचणार होतो. ही चालसुद्धा साधारण अडीच तासांची होती. वाडीच्या अगदी जवळ असलेल्या पदरात छान गर्द झाडीत एक मंदिर आहे. तिथे पुढच्यावेळी नक्कीच मुक्काम करूया असे स्वतःला समजावत आम्ही साल्हेर वाडीत पोहोचलो. गावात जत्रा असल्याने पंचक्रोशीतील अनेक भक्तगण जमा झाले होते. ठरलेल्या प्लॅननुसार सुनीलचा भाऊ आमच्यासाठी जीप घेऊन आला होता. एका जीपमध्ये सुमारे १८ ते २० माणसे बसवून आम्ही वाघांबे गाव गाठले. आता पुढील तीन दिवसांत उर्वरित सहा किल्ल्यांची भटकंती करण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. वाघांबे गावात छान पिठूर चांदणे पडले होते आणि सभोवतालच्या डोंगररांगा यात उजळून निघाल्या होत्या. कधी एकदा जेवण पोटात पोहोचते व स्लीपिंग बॅगमध्ये शरीर घुसवतोय याची वाट बघत आणि उद्याचे नियोजन करताना आज झालेल्या भटकंतीवर आमच्या चर्चेला उधाण आले होते.

संबंधित बातम्या