मुल्हेर-मोरा आणि हरगड

मिलिंद देशपांडे
सोमवार, 12 एप्रिल 2021

सह्यगिरी

मागील लेखात आपण साल्हेर आणि सालोटा या दुर्ग यात्रेची माहिती घेतली. आता या लेखात आपण बागलाण प्रांतातील आणखी दुर्ग रत्नांची यात्रा करूया.

साल्हेर-सालोट्याची छान आणि अविस्मरणीय यात्रा संपवून आम्ही वाघांबे येथील सुनील महालेकडचा मुक्काम आवरता घेतला. आता आम्हाला गाठायचे होते मुल्हेर वाडी हे गाव, म्हणजेच मुल्हेर गडाचा पायथा. भल्या सकाळीच निघून मुल्हेर आणि मोरा हे जोड किल्ले तसेच पश्चिमेला असलेला हरगड किल्ला हे तीनही किल्ले एकाच दिवशी उरकायचे असा आमचा मानस होता. पण ते काही जमले नाही; याचा तपशील पुढे ओघात येईलच. 

वाघांबे ते मुल्हेर वाडी हे अंतर ३५ किलोमीटरचे असून यासाठी साधारण तासभर वेळ लागतो. वाटेत असलेल्या हरणबारी तलावावरून जाताना त्याचे सौंदर्य बघण्याची मजा काही निराळीच. मुल्हेर वाडीत पोहोचल्यावर ताज्या वडापावचा वास नाकात घुमला आणि तत्क्षणी आमची गाडी तिथे खिळली. आम्ही कधी पाय उतार झालो आणि वडापावावर ताव मारायला सुरुवात केली हे कळलेच नाही. गाडीवाल्याशी गप्पा मारता मारता वाटेची यथायोग्य चौकशी झाली आणि योग्य त्या सामानाची सॅक भरून आम्ही त्वरित निघालो ते या दुर्ग त्रिकुटाकडे. मुल्हेर वाडीतून मुल्हेर माचीस पोहोचायला दीड ते दोन तास लागणार होते असा अंदाज वडापाववाल्याने दिला होता. मुल्हेर गड हा दोन भागात विभागला असून मुल्हेर माची आणि बालेकिल्ला असे त्याचे दोन भाग झाले आहेत. आम्ही मुल्हेर माचीवर पोहोचलो आणि झाडाझुडपात हरवून गेलेले गणेश मंदिर आणि त्याच्या समोरील तलाव बघून आमचे मन हरपून गेले. एका बाजूला दिसणारा मुल्हेर आणि मोरागड तसेच दुसऱ्या बाजूला दिसणारा हरगड यांच्याबरोबर मधे म्हणजेच आम्ही दोघांच्या कुशीत होतो. थोडीशी विश्रांती घेऊन मुल्हेर माचीतून एकामागे एक असलेले, पण सध्या अगदीच ढासळत चाललेले दरवाजे पार करत आम्ही ४,२९० फूट उंची असलेल्या मुल्हेरच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. हा मुख्य दरवाजा ओलांडल्यावर डावीकडे गुहा आणि पाण्याचे टाके आहे. 

मुल्हेरचा माथा म्हणजे एक भले मोठे पठार आहे. पठारावरील मोती तलाव, राजवाड्याचे भग्नावशेष, तेथील गुप्त दरवाजा. भडंग नाथांचे बोडके मंदिर या सर्व गोष्टी पाहत आम्ही आता निघालो ते मोरागडाकडे. मोरागड हा खरेतर मुल्हेरचाच एक भाग आहे, पण मधल्या खिंडीमुळे तो विभागला गेला आहे. बालेकिल्ल्याची छोटी टेकडी उतरून दोघांच्या मधे असलेल्या खिंडीत यायला एक चोर दरवाजा आहे. पण इथे येणारी वाट जरा निसरडी असल्याने जपूनच मार्गक्रमण करावे लागते. छोट्याशा खडकातल्या छिद्रासारख्या भागातून खिंडीमार्गे आपण लगेच मोरा गडाच्या पदरात येतो. 

अतिशय उत्कृष्ट आणि एकाच खडकात कोरलेल्या पायऱ्या काही मिनिटांतच आपल्याला मोरा गडाच्या माथ्यावर पोहोचवितात. तेथील दरवाजाची स्थिती बरीच बरी आहे. मोराच्या माथ्यावरून मुल्हेरचा पसारा, मुल्हेर माचीवरील गणेश आणि सोमेश्वर मंदिरे आणि त्याच्या सभोवतालची हिरवीकंच वनराजी फारच अवर्णनीय दिसते. मुल्हेर आणि मोराच्या मधोमध बांधलेल्या तटबंदीवजा भिंती जवळून एक वाट सरळ मुल्हेर माचीवर जाते. म्हणजे आपण एका वाटेने वर प्रवेश करतो आणि दुसऱ्या वाटेने परत मुल्हेर माची, असा प्रदक्षिणा मार्ग असल्यासारखी ही वाट फारच सुंदर आणि सोपी आहे. उतारावरील बऱ्यापैकी झाडीतून सोमेश्वर मंदिराजवळून आम्ही आता परतलो ते मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी. हा सगळा मार्ग आणि दोन्ही किल्ल्यांचा परिसर खरोखर लक्षवेधी आहे. 

गणेश मंदिराचे आवार तर सर्व बाजूंनी दाट जंगलाने वेढलेले आहे. इथे मुक्काम करायचा खूप मोह होत होता, पण समोरून दूरदर्शन देणारा हरगड आम्हाला खुणावत होता आणि मुक्कामाचे कोणतेच साहित्य बरोबर नसल्याने आम्ही तडक हरगडाकडे निघालो. एक वाजून गेला होता आणि हरगड बघून आम्हाला सूर्यास्ताच्या आधी मुल्हेरवाडी गाठणे इष्ट होते. मुल्हेर माचीच्या गणेश मंदिरापासून उजवीकडे एक वाट सरळ हरगडकडे जाते एवढेच आम्हाला आमच्या वडापाववाल्या मित्राने सांगितले होते. मंदिरापासून अर्धा तास चालल्यानंतर आम्ही एका खिंडीवजा भागात पोहोचलो. येथूनच एक वाट पूर्वीच्या तोडलेल्या पायऱ्‍यांच्या मार्गाने गडावर जाते असे ऐकिवात होते आणि त्या मार्गाने आमच्या समोर काही मेंढपाळ गेलेले होते, हे आम्ही खिंडीत बसून जेवण करताना पाहिले होते. परंतु बराच प्रयत्न करून आम्हाला ती वाट काही केल्या सापडेना, म्हणजे कोरलेल्या पायऱ्या वर दिसत आहेत पण त्याचा मार्ग कळतच नव्हता. हरगडच्या अगदी पोटात पोहोचूनदेखील गडावर जाता येत नाही, किंबहुना वाट सापडत नाही याचे दुःख काय असते ते अशी वेळ आल्याशिवाय कळणारच नाही. 

चार वाजत आल्याने आणि मुक्कामाला मुल्हेर गावात पोहोचायचे असल्याने मन खट्टू करत आम्ही परतीचा मार्ग धरला. येताना फक्त डोक्यात हे मेंढपाळ किंवा बकऱ्या चरायला नेणारे यांनी काय जादू केली आणि ते कुठून वर गेले हा विचार करत सांजच्या वेळेला परत मुल्हेर गावी पोहोचलो. आमचा वडापाववाला मित्र (नाव आठवत नाही म्हणून असा उल्लेख करतो आहे) आमची जेवणासाठी वाट बघत होता. आजचा घडलेला प्रकार ऐकून त्यांनी आम्हाला चक्क वेड्यात काढले आणि बकरीवाले डोंगरात कुठेही घुसतात, तुम्ही मी सांगितलेल्या वाटेने का गेला नाहीत असे म्हणून आम्हालाच प्रश्न विचारला आणि ‘आज मला वेळ नव्हता, पण उद्या मी येतोच आहे तुमच्याबरोबर’, असा वादाही केला. चुकलेल्या गोष्टींची आणि वाटेची खंत न बाळगता आपण यशस्वी माघार घेतली या खुशीतच त्याच्याकडच्या जेवणावर आडवा हात मारला. त्याचे घर लहान असल्याने आम्ही मुल्हेर वाडीतील गावापासून लांब असलेल्या आणि सर्व ट्रेकर्सचे हक्काचे मुक्काम करण्याचे ठिकाण असलेल्या रघुराज पंडित यांच्या मठामध्ये निवास करण्यास गेलो. 

सकाळी लवकर उठून नित्य कर्म करीत आम्ही वाटाड्याच्या घरी पोहोचलो. आज अधिक उत्साहाने आणि झपझप पावले टाकीत आम्ही पुनश्च मुल्हेर माचीत पोहोचलो. तिथल्या निसर्गराजाचे रूप परत एकदा डोळ्यात आणि कॅमेऱ्‍यात साठवत आम्ही हरगडच्या दिशेने निघालो. आम्ही जेथे चुकलो होतो त्या ठिकाणाहून सरळ एक वाट झाडीत खाली उतरत होती. हीच वाट काल सापडली असती तर कालच आमचा हा किल्लादेखील पदरात पडला असता. असो, पण पदभ्रमण यात्रेत असे अनुभव खूप काही शिकवून जातात आणि पुन्हा कधी या रांगांवर पाय उतार झाल्यास वाट चुकणार नाही याची खात्रीही होते. अत्यंत घनदाट अशा झाडीतून थोडावेळ खाली उतरून आम्ही आता हरगडच्या छातीवरील चढाईच्या मार्गाला भिडलो होतो. अजूनही तो धनगरांचा विषय आणि त्यांचा मार्ग डोळ्यासमोरून जात नव्हता आणि आम्ही स्वतःवरच हसत होतो. 

सुमारे पाऊण तासांच्या भरभक्कम चढाईनंतर एका पडक्या दरवाजातून आम्ही गडाच्या माथ्यावर प्रकटलो. सह्याद्रीच्या अशा गड माथ्यावर खूप कष्टाने पोहोचल्यावर तिथल्या भर उन्हातला वारा अंगावर घेऊन ताजेतवाने होण्याची मजा काही औरच! गडावर असणारे शंकराचे मंदिर, एकच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आणि तिथे असलेली भली मोठी तोफ याव्यतिरिक्त तिथे पाहण्याजोगे काहीच नाही, पण गडाचा विस्तार मात्र खूप मोठा आहे हे नक्की. मंदिराच्या समोर पडलेले भरपूर तोफगोळे पाहून उमेशने स्वतःच्या ताकदीचा कस लावून एक भला मोठा तोफगोळा उचलून, दोन्ही हाताने डोक्यावर धरून फोटोची हौस भागवून घेतली. भग्नावशेष आणि कोरडी टाकी तसेच एकेकाळी बऱ्‍यापैकी राबता असलेले हे किल्ले वाकडी वाट करून पाहायला मात्र जरूर हवेत. पण अशी आवड असणारी ट्रेकर मंडळी सोडता या किल्ल्यांवर फारसे कोणी फिरकत नाही. शासनाच्या औदासिन्यामुळे हे किल्ले एकाकी पडलेत, हे मात्र खरे. अशा किल्ल्यांची थोडी डागडुजी करून किंवा त्यांचे पुनर्निर्माण करून जर पर्यटनाचा ओढा तिकडे वळविला तर हे दुर्ग पुन्हा बोलू लागतील यात शंका नाही. 

आल्या वाटेनेच परतायचे असल्याने आणि ही वाट म्हणजे एक पाणी मार्ग किंवा नाळेसारखा घसरड्या उताराचा मार्ग असल्याने, आम्ही थोडे गडदर्शन करून पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो. मुल्हेर माचीवरील गणेश आणि सोमेश्वर मंदिर, गडावरील जलव्यवस्थापनासाठी असलेली प्रचंड टाकी आणि तलाव, एका मागोमाग एक असलेले दरवाजे, मोरा गडावरील सुबक पायऱ्या आणि दरवाजा, हरगडची आम्ही चुकलेली पण पूर्वी वापरात असलेली थोडी अवघड वाट, हरगडावरील तोफ आणि मुल्हेरवरून दिसणारे मांगी-तुंगी, रतनगड ऊर्फ न्हावी किल्ला हे सगळे नीट न्याहाळायचे असेल आणि अशा आडवाटेवरच्या किल्ल्यांशी जवळीक साधायची असेल तर बागलाण मधील सोलबारी-डोलबारी रांगांवरील दुर्गरत्ने पाहायची असतील तर घराचा उंबरठा ओलांडायलाच हवा आणि ही निखळ आनंद देणारी छानशी भटकंती करायलाच हवी हे निश्चित.

संबंधित बातम्या