औंढा, पट्टा आणि बितनगड

मिलिंद देशपांडे
सोमवार, 10 मे 2021

सह्यगिरी

काही गोष्टींचे योग यायलाच लागतात तसेच काही भटकंतींचेदेखील. इगतपुरीजवळील कळसूबाई रांग ही प्रसिद्ध आहेच, पण त्याला बिलगून असलेली एक दुर्ग साखळी बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे; ती म्हणजे आड, औंढा, पट्टा आणि बितनगड. गडांची रांग एकमेकांना बऱ्यापैकी खेटून बसलेली आणि खरेच आडबाजूला असल्याने यांची माझ्या भटकंतीच्या यादीत भर पडली नव्हती. पण एकदाचा हा योग जुळवून आणला आमच्या नाशिकस्थित मित्राने म्हणजेच अभिजित अकोलकरने. अशी संधी आली की माझ्यासारखा भटका पुढे मांडलेल्या कामांची यादी बरोबर मार्गी लावतो, कारण अशी सुसंधी आणि छान डोंगरवेडा मित्र बरोबर असला की मग काय पाहिजे?

ठरलेल्या दिवशी मी रात्रीच्या मुक्कामासाठी नाशिकला अभिजितच्या घरी पोहोचलो. बऱ्याच दिवसांच्या साठलेल्या गप्पा आणि दुसऱ्या दिवसाचे नियोजन करून निवांत झोपी गेलो. भल्या पहाटे उठून आवराआवरी करून आम्ही निघालो; बरेच दिवस बाजूला पडलेल्या डोंगर यात्रेचे सौंदर्य अनुभवायला. अभि नाशिकचाच असल्याने आणि हा परिसर त्याला नवीन नसल्याने आम्ही कोणताही नकाशा, पुस्तक बरोबर घेतले नव्हते आणि एवढेच काय, तर भ्रमणध्वनीवरून गुगल बाईंची मदतदेखील घ्यायची गरज आम्हाला पडली नाही. कारण याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर आम्ही अनेकदा पायदळी तुडवला होता. झुंजुमुंजु शेत असतानाच आम्ही घरातून बाहेर पडलो. अभिजितने टाटा नॅनोचे दार उघडल्यावर मी थोडा साशंक होऊन त्याला म्हणालो, ‘अरे ‘नॅनो’नी जायचं? पुढील डोंगरातल्या चढणीच्या अवघड आणि काही ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यावर ही बया धावेल का नीट?’ पण ‘तू चल रे फक्त’ हे त्याचे उत्तर ऐकताना त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास मला बराच धीर देऊन गेला. अखेर आमची जोडी पाठपिशव्या आतमध्ये ठेवून नॅनोमध्ये विराजमान झाली आणि भुर्र आवाज करीत आमचा प्रवास आजच्या ध्येयाकडे सुरू झाला. रामप्रहरी नाशिक शहरातील देवळालीमार्गे आम्ही सिन्नर-घोटी रस्त्याला लागलो. बरोबर थोडेफार खाऊ-पिऊचे पदार्थ असले तरी हमरस्त्यावरील वडा, भजी आणि मिसळीचा वास आम्हाला काही स्वस्थ बसू देत नव्हता. एकदा का सकाळी सकाळी भरपेट न्याहरी करून जठराग्नी शांत केला की मग आमच्यासारख्या भटक्यांना पाणी आणि चहा मिळाला तरी आम्ही प्रसन्न असतो. कारण त्यानंतर भूक असते ती फक्त डोंगरदऱ्यातून रानोमाळ भटकून, कडे कपाऱ्या चढून आणि या गिरिशिखरांच्या माथ्यावर पोहोचून तेथील थंडगार वारा पिऊन, निसर्गराजाचे विलोभनीय दर्शन पोट भरून डोळ्यात साठविण्याची. वाटेवरील बऱ्यापैकी वाटसरू गोळा झालेला हॉटेलवजा ढाबा पाहून आमच्या नॅनोचे चक्र तिकडे वळविले. न्याहरीवर यथेच्छ ताव मारून आम्ही निघालो ते आमचे पहिले लक्ष्य असलेल्या बितन गडाकडे. 

इगतपुरी मार्गावरील घोटीपासून भंडारदऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून टाकेत या गावामार्गे वळणावळणाच्या आणि डोंगराच्या विळख्यातून नागमोडी रस्त्याने आमची गाडी आता म्हैस वळण किंवा म्हैस घाटाला भिडली होती. कोकणवाडी, एकदरा ही छोटेखानी गावे मागे सोडत आम्ही बितनवाडी या गडाच्या ऐन कुशीत असलेल्या गावात पोहोचलो. गावातील मंदिराच्या कट्ट्यावर प्रभात काली जमलेल्या स्थानिकांना गाडी कुठपर्यंत जाईल? असा सवाल केल्यावर गाडी पार गडाला टेकंल, असा उत्साही सल्ला दिल्यावर आम्ही त्वरित तिकडे मार्गस्थ झालो. या रस्त्यावरून दूरवर दिसणारा बितनगड कोवळ्या उन्हात न्हाऊन निघाला होता. खरेतर संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा आणि त्यावर उठावलेले हे दुर्ग प्रातःसमयी सोनसळी उन्हात बघणे फारच मोहक असते आणि त्यामुळे आपल्या पायातले बळदेखील वाढते. सुमारे तीन किलोमीटर म्हणजे अगदी गडाला खेटून जाईपर्यंत हा रस्ता डांबरी होता, त्यामुळे आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. या रस्त्यावर दुतर्फा पांगारा फुलला होता आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेला बितनगड आम्हाला साद घालीत होता. या मनोहरी दृश्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करत आणि सुरक्षित जागेवर जाऊन आम्ही गाडीचे इंजिन बंद केले आणि त्वरित निघालो या गडाकडे. साधारण पंधरा मिनिटांची आणि पायथ्याशी पसरलेल्या गर्द वनराजीतून आमची वाट पुढे जात होती. मधेच एका ठिकाणी शेंदूर लावलेले दगड दिसले. स्थानिक लोक याला माऊली म्हणतात. माऊलींचे आशीर्वाद घेऊन आम्ही गडाच्या मुख्य धारेला भिडलो आणि काही वेळातच आम्ही गडाच्या कातळ टप्प्याशी पोहोचलो. किंचितसा अवघड असा हा टप्पा पुढे यातच कोरलेल्या पायऱ्यांपर्यंत जातो आणि त्यांच्यातील खोबणी आणि खाच-खळगे यांचा आधार घेत आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. वाटेत एक गुहा लागते, तिथे जवळच पाण्याची सोय आहे. गडाचा माथा अगदीच छोटा असल्याने, फार कमी वेळात तो आपण पाहू शकतो. पण गडावरून दिसणारे औंढा, पट्टा, आड आणि कळसूबाईच्या रांगेतील इतर दुर्गमाला या सकाळच्या अल्हाददायी वातावरणात खूप उठून आणि स्पष्ट दिसत होती. गडावर फारसे बघण्याजोगे नसल्याने आणि पुढे औंढा किल्ल्याकडे प्रयाण करायचे असल्याने आल्यावाटेने माघारी फिरत आम्ही आमच्या यांत्रिक रथापाशी पोहोचलो. परतीच्या मार्गावर झाडीमध्ये आम्हा नवख्यांना पाहून पक्षिगणाचा चाललेला किलबिलाट मनाला उत्तेजित करत होता. 

या तीनही दुर्गांच्या माथ्यावरून एकमेकांकडे जायचे गाडीमार्ग आणि भ्रमण मार्ग अगदी स्पष्ट दिसतात, कारण ही रांग पूर्णपणे बोडकी आहे. पण त्यामुळेच कदाचित याचे रौद्र सौंदर्य बघताना एक वेगळीच मजा वाटते. बितनवाडी सोडून आम्ही औंढा गडाकडे जाताना अभिने डांबरी रस्ता सोडून एकदम कच्च्या रस्त्यावर वळण घेतले आणि बिनधास्तपणे तो गाडी हाकू लागला. माझ्या मनात मात्र या छोट्या गाडीने काही दगाफटका केला तर असे विचार येऊ लागले. या सगळ्या रांगांवर प्रचंड प्रमाणात पवनचक्क्या (विंडमिल) विखुरल्या आहेत आणि काही वेळा तर त्यांच्या पोटातून जाताना फिरणाऱ्या पात्यांच्या भयानक आवाजाने मन भयभीत होते हे नक्की. गाडीचे सर्व अवयव वाजवत आम्ही आता औंढा किल्ल्याच्या समीप पोहोचलो होतो. किल्ला कसला सुळकाच म्हणाना... लांबून पाहताना तर यावर जायला मार्ग असेल का अशीच शंका येते. सुळक्याला अगदी खेटून असलेल्या पवनचक्कीच्या खालीच आम्ही नॅनोला विश्रांती दिली. माहितीनुसार बरोबर एक छोटा रोप, पाणी आणि कॅमेरा घेऊन तडक सुळक्यावर जाण्यासाठी सज्ज झालो. 

खालून सुळक्याकडे बघताना डावीकडील एक वाट पट्टा ऊर्फ विश्रामगडाकडे जाते आणि उजवीकडे जाणारी वाट, कड्याला चिकटूनच काही वेळातच आपल्याला थेट पायऱ्यांशी जाऊन भिडविते. पायऱ्यांपासून खाली दिसणारे निनावी नावाचे गाव अगदी चित्रात दाखवावे तसेच भासत होते. काही पायऱ्या फोडल्याने तेथे लावलेल्या साखळीचा आधार घेऊन वर जाऊन अभिने त्याच्याकडचा रोप फिक्स करून ठेवला आणि त्याच्या पाठोपाठ मीदेखील वर पोहोचलो. सुकलेल्या घशाला ओलावा आणत आम्ही आता औंढ्याच्या माथ्यावर विसावलो होतो. अगदी छोटेखानी असलेल्या या माथ्याचा खरेतर सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजेच टेहळणीसाठी उपयोग केला जायचा, हे आमच्यासारख्या भटक्यांना कोणी सांगायची गरज नव्हती. इथून बितनगड आणि अर्धचंद्राकृती पसरलेल्या पट्टा ऊर्फ विश्रामगडाचे दृश्य फारच डोळे दीपवणारे होते. एका बाजूला दिसणारे कळसुबाई आणि अलंग, कुलंग, मदन हे महान किल्ले आमचे लक्ष वेधून घेत होते. थोडा टाइमपास आणि फोटोग्राफी करून आम्ही लगेचच परतीच्या मार्गाने अर्ध्या तासातच गाडीपाशी पोहोचलो. कारण सायंकाळच्या आत आम्हाला विश्रामगडावर वस्तीसाठी पोहोचायचे होते. 

वरून बघताना पट्ट्याकडे जाणारा कच्चा रस्ता आपल्या गाडीला झेपेल का नाही याची खात्री नव्हती. परतीच्या मार्गावर औंढा गडाकडे जाणारा उतार उतरून आम्ही एका पठारावर पोहोचलो. आल्या वाटेने न जाता एका शॉर्टकटने पट्ट्याकडे जायचे ठरविले. थोडे अंतर पार करताच आम्ही एका ठिकाणी थबकलोच कारण, समोर साधारण दोन किलोमीटर अंतरावर एक गाव दिसत होते. पण गाडी घालायची का नाही असा यक्षप्रश्न आमच्या दोघांसमोर उभा राहिला. पण हा रस्ता घेतला नाही तर पंधरा-वीस किलोमीटरचा फेरा पडणार असल्याने शेवटी अभिजितने मी खाली उतरून गाईड करतो आणि तू गाडी चालव असे सांगितले. अत्यंत अवघड म्हणजे दगड धोंडे चुकवत या रस्त्याने समोरच्या गावात पोहोचायला आम्हाला पाऊण तास लागला. येथून मात्र रस्ता बराच चांगला असल्याने आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. पुढच्या काही काळातच आम्ही पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडी गावात पोहोचलो. तेथील एका घरगुती हॉटेलात उदरभरण करून ऊन खूप असल्याने विश्रांती घेतली. कारण आता सिमेंटच्या पायऱ्यांनी फक्त पंधरा वीस मिनिटांतच आम्ही गडावर पोहोचणार होतो. 

उन्हे कलल्यावर आम्ही सॅक खांद्याला लटकवून गावातून किल्ल्याकडे निघालो. प्रवेशद्वारापाशी आता वनखात्याने दरडोई शुल्क व नावनोंदणी करूनच गडावर जायची प्रथा चालू केल्याने, ते सोपस्कार उरकून आम्‍ही पायऱ्यांकडे निघालो. किल्ल्याचा खूप छान जीर्णोद्धार करून तो खूपच शोभिवंत केला आहे हे सुरुवातीपासूनच लक्षात येते. पट्ट्याचा पसारा प्रचंड असल्याने तो पाहायला वेळही लागणार होता, त्यामुळे आज दिवसभराची पायपीट करून अस्ताला जाणाऱ्या भास्कराचे रूप न्याहळत आणि त्या सांजवेळी वरून दिसणाऱ्या कळसूबाई रांगेचे दर्शन घेत आम्ही तेथेच मुक्काम करणार होतो, हे आधीच ठरविले होते. निम्म्या पायऱ्या चढल्यावर उत्तरमुखी त्रिंबक दरवाजा आणि तेथून गावात जाणारी जुनी वाट आपले लक्ष वेधून घेते. वर जाताना एक सातवाहनकालीन पाण्याचे टाके, पट्टाबाईचे देऊळ, दगडी बांधकाम शैलीचा अंबरखाना आणि त्यामध्ये निर्माण केलेले उत्कृष्ट संग्रहालय असे बरेच काही बघायचे होते. आता सूर्य पश्चिमेकडे झुकायला लागल्याने आम्ही फक्त वरच्या पठारावर जाऊन सूर्यास्ताचे दर्शन घ्यायचे आणि मुक्कामाला मंदिरात परतायचे एवढाच कार्यक्रम ठेवला होता आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी. स्वतः शिजविलेल्या खिचडीचा आस्वाद घेत जुन्या आणि नवीन मोहिमांची स्वप्ने रंगवत सह्याद्रीच्या माथ्यावरून येणाऱ्या आल्हाददायी वाऱ्याला अंगावर घेत निद्रेच्या अधीन झालो. सकाळी कोवळ्या उन्हात गडावरील सात टाकी, बारा टाकी, दगडी खांबांच्या आधारावर निर्माण केलेल्या गुहा, दिल्ली दरवाजा आणि सर्वोच्च माथ्यावरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात भरत पुन्हा परतीच्या मार्गाकडे निघालो. 

बहामनी, निजामशाही, मुघल आणि छत्रपती शिवराय या सगळ्यांचाच या गडाशी संबंध आला आहे. कळसूबाईच्या बलाढ्य रांगेजवळ, इगतपुरीच्या निसर्गरम्य परिसरात, थळ घाटाच्या पूर्वेला असणारी ही रांग आणि जालना शहर लुटून परतताना महाराजांना संगमनेरला मुघलांशी लढावे लागले आणि ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील शेवटची लढाई. त्या लढाईनंतर ते पट्टा किल्ल्यावर पोहोचले आणि दगदगीने आजारी पडल्यावर महिनाभरासाठी येथे विश्रांती घेण्यास थांबले म्हणूनच या गडाला विश्रामगड असे नाव पडले. असा थोडा आडबाजूचा आणि दुर्लक्षित परिसर पहायचा असेल आणि श्री एकनाथ महाराजांनी लिहून ठेवल्याप्रमाणे ‘रावणाचा छेदिला अंगोठा, तेथे झाला औंढा-पट्टा, त्रिंबकीच्या बिकट वाटा ,औंढ- पट्टा प्रसिद्ध.’ या सगळ्याची अनुभूती घ्यायची असेल तर तीनही किल्ल्यांची जोड यात्रा करत पदभ्रमंतीने किंवा गाडीने फिरत ही भटकंती तुम्हाला नक्कीच सुखकारक वाटेल. फक्त विश्रामगडावरच मुक्काम करण्याजोगी जागा असल्याने आपणही आपल्या भटकंतीचे नियोजन त्याच प्रमाणे करावे हा मौलिक सल्ला देऊन थांबतो.

संबंधित बातम्या