गोप्या घाट ते शिवथर घळ

मिलिंद देशपांडे
सोमवार, 21 जून 2021

सह्यगिरी

एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची गोष्ट... ‘सकाळ’मध्ये मी ‘निवेदने’ या सदरात नेहमीप्रमाणे निवेदन दिले होते, की राजगड ते शिवथरघळ असा ट्रेक आयोजित केला आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने या ट्रेकला भटक्यांची रांग लागली आणि ही दुर्गम यात्रा एकशे दहा लोकांना बरोबर घेऊन केली. या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत... 

त्या काळात असे किल्ले आणि अनगड वाटांनी रानोमाळ भटकंती हे वेड्यांचे लक्षण समजले जायचे. पण थोडेफार आढेवेढे घेऊन काही सुजाण पालक माझ्याबरोबर अशा अनगड वाटांची भटकंती करायला आपल्या पाल्यांना पाठवायला तयार व्हायचे. काहींच्या घरी जाऊन, विशेषतः मुलींच्या, सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी काढायला लागायची. त्यांचे असे साशंक होणे आणि खातरजमा करून मग परवानगी देणे हे रास्तच होते, पण परत आल्यावर मात्र त्यांचा विश्वास दृढ झालेला असायचा. राजगडला आणि शिवथर घळीला वेगवेगळी भेट देऊन झाली होती आणि अशाच शिवथर घळीच्या एका भेटीत तेथील व्यवस्थापक जांभेकर गुरुजी आणि गांगल गुरुजी यांनी मला गोप्या घाटाने येणारी वाट सुचवली होती. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी हा मार्ग एकदा तरी पायउतार होऊन यायचे हे मनाशी पक्के ठरवले होते. एका भटक्या सहकाऱ्याशी बोलून, तेथील खाणाखुणा लक्षात घेऊन मी ही पदयात्रा आखली होती.

गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालली बळे

धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे॥

गर्जती मेघ तो सिंधू। ध्वनी कल्लोळ उठला।

कड्यासी आदळे धारा। वात आवर्त होतसे॥

इतके सुंदर आणि यथार्थ वर्णन रामदास स्वामींनी करून ठेवले आहे, की हे वाचताच तेथे न जातादेखील आपल्याला या जागेचे महात्म्य लक्षात येते. एप्रिल महिन्याच्या ऐन उन्हाळ्यात आमच्या भटकंतीतील एक सहकारी आडकर यांनी स्वारगेट डेपोमधून एवढ्या मोठ्या ग्रुपकरिता खास दोन बसेसची व्यवस्था केली होती. संध्याकाळच्या गाडीने निघून वाजेघरमार्गे राजगडावर पोहोचायला रात्रीचे अकरा वाजून गेले होते. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे गडावरील पद्मावती देवीच्या मंदिरात बाहेरील ओसरीवर आणि पुरातत्त्व खात्याच्या कचेरीत ही गिरीप्रेमी मंडळी अक्षरशः दाटीवाटीने म्हणजेच कोंबून झोपली होती. सकाळी लवकर उठूनसुद्धा एवढ्या लोकांचा चहा नाश्ता होईपर्यंत आठ वाजून गेले होते. गडाचे दुरूनच दर्शन घेऊन एक भली मोठी आरोळी ठोकून आणि छत्रपती शिवरायांचा जयजयकार करून आम्ही निघालो होतो, संजीवनी माचीमार्गे भुतोंडे गावाकडे. हे भुतोंडे गाव ओलांडूनच गोप्या घाटमार्गे आम्ही शिवथर घळीत पोहोचणार होतो. 

समूहाचे मुख्य नेतृत्व जरी मी करत असलो, तरी माझ्याबरोबर संजय नाईक आणि इतर सहा-सात मंडळी सहनेतृत्व करायला आली होती. पद्मावती माचीवरून कूच करून ढाल काठीच्या बाजूने आमचा भलामोठा जथ्था बालेकिल्ल्याच्या पोटातून संजीवनी माचीकडे सरकू लागला. संजीवनी माचीचा निम्म्याहून अधिक टप्पा पार केल्यानंतर अळू नावाचा दरवाजा लागतो. हे दोन दरवाजे पार करत खालची घसरण उतरून, संजीवनी माचीच्या पोटातून आमचे बिऱ्हाड आता भुतोंड्याकडे सरकू लागले. पाठीवरच्या भल्या मोठ्या सॅकमध्ये स्वयंपाकाचा शिधा, रॉकेलचा स्टोव्ह, भांडीकुंडी हे सर्व सामान भरल्याने सॅक चांगलीच फुगली होती आणि ते ओझे डोंगरातून घेऊन जाताना नाकी नऊ येत होते. भुतोंडे गावाकडे उतरायला लागल्यावर वाटेतल्या एका धनगर वाड्यावर आम्ही सगळे विश्रांतीसाठी थांबलो आणि अचानक आभाळ भरून यायला सुरुवात झाली. मी हे संकट हेरले आणि एवढा मोठा ग्रुप वाटेत अडकला तर भयंकर हाल होतील म्हणून तडक भुतोंडे गावाकडे निघालो. गावात पोहोचायच्या आधीच विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू झाला. अर्धवट भिजलेल्या अवस्थेत आम्ही भुतोंड्याच्या देवळात पोहोचलो. पुढचे तीन तास पावसाने आसमंत धू धू धुतला. आता आपले सगळे वेळापत्रक कोलमडणार या जाणिवेने आम्ही गलितगात्र झालो होतो. काही मुलींनी तर चक्क रडायला सुरुवात केली, आता आपले काय होणार म्हणून. कारण त्या दिवशीच आम्ही शिवथर घळीत पोहोचणे अपेक्षित होते, पण या अवेळी आलेल्या संकटामुळे ते आता दुरापास्त होते.  

अचानक आलेला पाऊस संध्याकाळी थांबला, पण या नवख्या वाटेने निबीड अरण्यातून पोहोचणे शक्य नव्हते. सर्वांची समजूत घालत आणि गावकऱ्यांशी सल्लामसलत करत आम्ही नाइलाजाने भुतोंडे गावी मुक्काम करण्याचे मान्य केले. ग्रुपमधील तणावाचे वातावरण निवळण्यासाठी मग आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत एकीकडे स्वयंपाकाची तयारी चालू केली. सकाळी लवकरच उठायचे असल्याने आम्ही मंदिरात आमच्या पथाऱ्या पसरल्या. 

भल्या पहाटे परत एवढ्या लोकांचा चहा उरकून निघायला सात वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाटघर धरणाचा म्हणजेच येसाजी कंक जलाशयाचा फुगवटा खूप आटला होता. गावातून समोरच सह्याद्रीच्या कण्यावर (क्रेस्ट लाईन) इंग्रजी ‘व्ही’ आकाराचा गोप्या घाट आम्हाला खुणावत होता. धरणाच्या खोल गेलेल्या पाण्याला वळसा घालून आणि भुसभुशीत अशा गाळाच्या जमिनीवर कसरत करत, वेळवंडी नदीच्या मुखाकडून आम्हाला कुंबळ्याचा डोंगर चढून जायचे होते. हा टप्पा खूप उभ्या चढणीचा नसला तरी उन्हामुळे बऱ्यापैकी दमछाक करीत आम्ही घाटमाथ्यावर पोहोचेपर्यंत सकाळचे दहा वाजून गेले होते. आता आम्ही या खिंडीवजा ‘व्ही’ आकाराच्या अगदी समीप होतो. पूर्वीच्या काळच्या या घाटवाटांचे एक भारी कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे, या वाटेवरून ये-जा करणाऱ्यांची तृषा भागावी म्हणून अशा सर्व वाटांवर पाण्याची सोय उपलब्ध असते. फक्त हे शोधण्याकरिता स्थानिक वाटाड्या बरोबर असणे अत्यंत गरजेचे असते आणि आम्हीदेखील तो घेतला होता. खिंडीच्या वर डाव्या हाताला थोडेसे चढून गेले की एक सुंदर पाण्याचे टाके आहे. घळीमध्ये पोहोचायची घाई असली तरी अंगातले गेलेले त्राण परत एकवटण्यासाठी सोबत आणलेल्या लिंबांचे दोन पातेली भरून सरबत केले. सर्वजण ताजेतवाने झाल्यावर बरोबरचा थोडा खाऊ पोटात ढकलून आम्ही टाक्यातील पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. आता येथून वाटाड्या परत जाणार होता. त्याने जंगलांच्या वाटांचे योग्य मार्गदर्शन करून आम्हाला वाटेला लावून दिले आणि तो स्वगृहाकडे निघाला. 

आता इथून आमचा प्रवास वाट्याड्याशिवाय चालू झाला. गोप्या घाट उतरताना तेथे असलेले निबीड अरण्य लक्षात घेता आणि अनुभवाच्या जोरावर, तसेच डोंगरातील शिस्तीनुसार साधारण पंधरा ते वीस लोकांमागे एक लीडर अशी विभागणी करून मी म्होरक्याचा ध्वज हातात घेऊन पुढे निघालो. रस्ता फारसा अवघड नसला तरी जंगलातील गुरांच्या आणि माणसांच्या पायवाटा ओळखत आणि फारसे न चुकता दुपारी एकदाचे कसबे शिवथर या गावात पोहोचलो. तेथून शिवथर घळ मात्र अजून एक तासाच्या अंतरावर होती. गर्द झाडीतून बाहेर पडल्यावर समोर दिसणारे रामदास पठार, कावळा किल्ला, त्यातून फोडून काढलेला वरंधा घाट, न्हावीण नावाचा सुळका हे सारे सौंदर्य रखरखत्या उन्हातदेखील मनाला मोहून टाकणारे होते. पुढील तासाभरात आम्ही घळीत पोहोचलो. वेळापत्रकानुसार आज रात्री आम्हाला पुण्यात पोहोचायचे होते, पण पावसाचे अवेळी आलेले संकट आणि आम्हाला झालेला उशीर याची पुण्यातील पालकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळी मोबाइल नव्हते. आता हे पुण्यात कळले नाही तर आमच्या घरची लँडलाईन रात्रभर खणखणत राहणार या चिंतेने मी थोडासा हवालदिल झालो होतो. पण ते कोणालाही जाणवून देणे म्हणजे पूर्ण ग्रुपचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखे होते. घळीत पोहोचून, दर्शन घेऊन आणि मठातील प्रसाद म्हणून तांदळाची खिचडी खाल्ली. थोड्या विश्रांतीनंतर आम्ही त्वरित वरंधा घाटात घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच माझेरी गावाजवळील पारमाची किंवा सोनेभाऊ या गावांकडे निघालो. पुण्याकडे किंवा भोरकडे जाणाऱ्या शेवटच्या बसेस जर का चुकल्या तर परत एक मुक्काम वाढून मग सगळ्यांवरच मोठा पेच प्रसंग ओढवला असता. 

दमलेल्या अवस्थेतदेखील झपझप पावले उचलीत, सूर्य कलता कलता आम्ही वरंधा घाटाच्या फाट्यावर पोहोचलो. एवढा मोठा ग्रुप बघून दोन बसेस न थांबताच निघून गेल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि इतर लीडर्सकडे बॅचला सोपवली आणि माझेरी गावातील एका स्थानिकाला विनंती केली, की काही करून मला तुझ्या गाडीवरून महाड येथे पोहोचते कर. त्याने त्वरित ही विनंती मान्य केली आणि पुढच्या पाऊण तासात मी महाडला पोहोचलोदेखील. तेथील आमचा डोंगर मित्र आणि माझ्याबरोबर हिमालयापर्यंत भटकंती केलेला शरद गांगल याला आमची अडचण सोडविण्यास सांगितले. त्याने त्वरित एका ट्रकची व्यवस्था केली. मी ट्रकमध्ये आणि तो स्वतःच्या गाडीवर वरंधा घाटापर्यंत आलो. सर्वजण आमची आतुरतेने वाट पाहत होते. शरदचे आभार मानून सर्व मंडळींना ट्रकमध्ये बसवले आणि अत्यंत खराब रस्त्याने एकमेकांवर आदळत-आपटत एकदाचे भोरला पोहोचलो. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. स्टॅंडवर सगळ्यांना बसवून आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून मी तडक पुण्याला ट्रंक कॉल लावला, तो अर्ध्या तासाने लागला. तोपर्यंत सर्व पालकांचे फोन वाजून गेले होते. पण आम्ही सुखरूप आहोत हे कळल्यावर माझे ज्येष्ठ बंधू विवेक देशपांडे रात्री एक वाजेपर्यंत पालकांना निरोप देण्याचे काम करत होते. रात्री भोर ते पुणे एकही गाडी नसल्याने शेवटी आम्ही स्टॅंडवरच पथाऱ्या पसरल्या आणि पहाटे पाचच्या पहिल्या गाडीने सकाळी सात वाजता सुखरूपपणे पुण्यनगरीत पोहोचलो. अवेळी आलेल्या संकटाने पालकांचे थोडेसे शाब्दिक प्रहार सहन करावे लागले, तरी या अनगड वाटेची आणि त्या संकटाची आजही सगळे जण आवर्जून आठवण काढत असतात. आता गोप्या घाटाच्या अलीकडील गावांपर्यंत डांबरी सडक झाल्याने गोप्या घाटाचा ट्रेक सुकर झाला आहे. असे असूनसुद्धा फारसे ट्रेकर्स इकडे फिरकत नाहीत याची खंत वाटते. धुळे येथील विख्यात समर्थभक्त शंकर कृष्ण देव यांनी १९१६ साली या  सुंदर ठिकाणाचा म्हणजेच नावाप्रमाणेच असलेल्या सुंदरमठाचा शोध लावला.

वरंधा घाटाच्या परिसरात, वाघजाईच्या निबिड अरण्यात वसलेले हे सुंदर ठिकाण. याच ठिकाणी दासबोधासारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली. सभोवतालचा परिसर आणि वरून कोसळणारा धबधबा; तसेच घळीच्या ऐन माथ्यावर असलेला जावळी प्रांतावर राज्य करणाऱ्या चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे अवशेष आणि त्या परिसरातील स्फटिकासारख्या असणाऱ्या पाण्याची मोठी कुंड हे सगळेच ‘विलक्षण’ या शब्दात वर्णन करण्याजोगे. पावसाळ्यात तर हे ठिकाण तिथल्या धबधब्यांमुळे पर्यटकांचे आकर्षणच झाले आहे. हे ठिकाण पावसाळ्यात जरूर पाहाच, पण राजगडावरून गोप्या घाटाच्या मार्गे शिवथर घळीकडे नेणारी वाट थंडीच्या मोसमात एकदा चालून बघायला काय हरकत आहे? पण त्यासाठी वाटाड्याची मदत घ्या बरं का!

संबंधित बातम्या