किल्ले जंजाळा ऊर्फ वैशागड

मिलिंद देशपांडे
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

सह्यगिरी

औरंगाबाद जिल्ह्यातील आणि खान्देशच्या जवळ असलेल्या अजिंठा रांगेवर अपरिचित दुर्गांची एक शृंखलाच उभी आहे. जंजाळा, वेताळवाडी किल्ला, सुतोंडा, अंतुर, लोन्झा, पाटणादेवीतील कण्हेरगड, लहुगड, भांगशी किल्ला, देवगिरी हे किल्ले; तर घटोत्कच, अजिंठा-वेरूळ, भांगशी, रुद्रेश्वर ही लेणी... इतके सगळे पाहायला चांगली आठ ते दहा दिवसांची उसंत काढून जायला पाहिजे. एका टप्प्यात हे करणे कदाचित वेळेअभावी जमेल असे नाही, पण दोन टप्प्यात मात्र एकदम फुरसतीने ही ठिकाणे पाहणे आणि या पुरातन किल्ल्यांचा आनंद घेणे यात एक वेगळीच मजा आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ही मोहीम दोन टप्प्यात करायचे मनात होते आणि अगदी ठरले तेव्हा मात्र कोरोनाच्या महासाथीमुळे भटकंतीवर एकदमच गदा आली होती. यंदाच्या वर्षी सुरुवातीला पूर्ण महाराष्ट्रातच पावसाने दिलेली ओढ आणि बरेच दिवस घराचा उंबरठा ओलांडला नसल्याने आमच्या चार समविचारी आणि भटकंती प्रिय सखे-सोबती यांच्यासमोर अचानक ही कल्पना मांडली आणि त्यांनीही ती लगेच उचलून धरली. मग काय तीन वर्षांपूर्वीचा तयार केलेला आणि जपून ठेवलेला हा तपशीलवार कार्यक्रम सर्वांसमोर ठेवला आणि निघायची तारीख निश्चित केली. आमचे मित्र संजय नाईक आणि सुधीर जोशी (काका) यांनी चार वर्षांपूर्वी हा संपूर्ण परिसर पाहिला असल्याने त्यांचे मार्गदर्शन घेऊन मी, विवेक देशपांडे, राजू बदामीकर आणि जीवन बागुल या चौकडीने सहा दिवसांच्या आखलेल्या प्लॅननुसार पुण्यातून कूच केले.

भल्या पहाटे पुणे ते औरंगाबाद हा मोठा टप्पा पार करून सिल्लोड, उंडणगाव फाटामार्गे जंजाळा या एकदम निसर्गरम्य गावात पोहचायचे होते. पण प्रवासाला झालेला उशीर लक्षात घेता आणि जंजाळा किल्ला, तसेच त्याच्या पोटात दडलेले अप्रतिम असे घटोत्कच लेणे पाहायला पुरेसा वेळ मिळणार नाही या हेतूने, अजिंठा लेण्यांच्या मुखापाशी असलेल्या फर्दापूर या गावात मुक्काम करायचा, असा निर्णय वाटेतच आम्ही घेतला. हाताशी थोडा वेळ होता. त्यामुळे सिल्लोडवरून अजिंठ्याकडे पुढे जाताना उंडणगाव फाट्यावरून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या अन्वा येथील प्रसिद्ध शिवमंदिर पाहायचे आम्ही निश्चित केले. उंडणगाव फाट्यावरून गोळेगावमार्गे अंदाजे दहा किलोमीटर अंतरावरील हे प्राचीन मंदिर म्हणजे पाषाणातून कोरून काढलेले दगडी कमळच म्हणावे लागेल. अत्यंत सुंदर आखीव-रेखीव कोरीवकाम या मंदिरावर केलेले आहे. आत्ता जरी हे शिवमंदिर आहे असे सांगितले जात असले, तरी मूळचे हे विष्णू मंदिर आहे असे तज्ज्ञांचे मत आहे आणि या मंदिराच्या बाह्य अंगावरील विष्णू देवाची चोवीस रूपे याचा पुरावा देत उभी आहेत. बऱ्याच मूर्तींची झीज झाली असली तरी त्यांच्या चेहऱ्‍यावरील हावभाव, त्यांचा डौल आणि इतर सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही अवेळी ठरविलेल्या या आडवाटेवरची ही भटकंती आणि या मंदिराची भव्यता मनाला अगदी भुरळ पाडून गेली हे मात्र निश्चित. अन्वा मंदिराचे असंख्य फोटो काढून आम्ही सायंकाळी अजिंठा लेण्यांच्या दारात असलेल्या फर्दापूर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या विश्रांती गृहात मुक्कामासाठी पोहोचलो. जगभरातून अजिंठा - वेरूळ या लेण्यांच्या समूहाला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी इथे आवक-जावक करतात, पण तिथे जाणाऱ्या रस्त्याचे हाल बघून मन खिन्न झाले. पर्यटकांना मिळणाऱ्या किमान सुविधांकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे हे मात्र खरे.

भल्या पहाटे उठून परत त्याच खराब रस्त्याने गलबतात बसल्यासारखे धक्के खात फर्दापूरचा घाट चढलो. उंडणगावमार्गे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या व्ह्यू पॉइंटवरून नजरेच्या एका टप्प्यात दिसणाऱ्या अजिंठा लेण्यांचे सकाळच्या कोवळ्या उन्हात दर्शन घेतले, पण एकही पर्यटक नसल्याने ही लेणी फारच भकास वाटत होती. उंडणगाव फाट्यावरून उजवीकडे वळून जंजाळा या गावी पोहोचायला सकाळचे नऊ वाजून गेले होते. वाहन जंजाळा गावातच लावले. आम्ही पहिल्यांदाच या भागात येत असल्याने आणि नेमक्या वाटेने जाता यावे म्हणून आम्ही गावातून एक वाटाड्या बरोबर घेतला. आधी पडून गेलेल्या थोड्याशा पावसाने हा परिसर मात्र हिरवागार झाला होता. गावातून बाहेर पडताच, दूरवर उभ्या आडव्या पसरलेल्या जंजाळा ऊर्फ वैशागड याचे दर्शन फारच रम्य दिसत होते. गावातून लगेचच काही अंतरावर असलेली घटोत्कच लेणी पाहून मग जंजाळाकडे जायचे असे आम्ही ठरविले आणि अर्ध्या तासाच्या आतच आम्ही लेण्यांच्या प्रवेशद्वारी पोहोचलो. 

 शासनाने आता येथे उत्तम पायऱ्यांचा रस्ता केल्याने अगदी कोणीही या लेण्यांपर्यंत विनासायास पोहोचू शकते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात वाकाटक नरेशाचा मंत्री वराह देव यांनी ही लेणी खोदली असा संदर्भ आहे. वीस खांबांवर उभ्या असलेल्या मुख्य दालनात खूप अंधार असल्याने बरोबर टॉर्च असणे गरजेचे. दालनाच्या एका कोपऱ्यात ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख असून तो आता झिजल्याने अस्पष्ट झाला आहे, पण त्यामध्ये अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आढळतो. भर पावसात लेण्यांच्या शेजारी वाहणारा धबधबा आणि समोरच्या डोंगरावरील वनराजी पर्यटकांना निश्चितच इथे खेचू शकेल यात शंका नाही. पण अशी अपरिचित ठिकाणे मुद्दाम वेळ काढून तेथील इतिहास समजावून घ्यायला मात्र अनवट वाटेने फिरायची हौस असणे गरजेचे. लेण्यांचे आणि परिसराचे फोटो काढून आता आम्ही निघालो ते जंजाळा किल्ल्याकडे. संपूर्ण सपाटीवरून आणि अगदी बैलगाडी सहज जाऊ शकेल असा कच्चा रस्ता थेट गडावर जाऊन  भिडतो.

जंजाळा किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे, जंजाळा गावाच्या बाजूने भूदुर्ग आहे पण इतर तीन बाजूंनी मात्र तो चांगला उठावलेला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. एक वाट जरंडी गावातून वर येते, तर एक वाट वेताळवाडी धरणाच्या बाजूने वर येते आणि आम्ही मार्गक्रमण करून आलेली वाट जंजाळा गावातून थेट किल्ल्यावर सपाटीच्या रस्त्याने पोहोचते. या वाटेवरून खरेतर किल्ल्यावर प्रवेश करायला पूर्वी दरवाजा असेलसुद्धा, पण आता मात्र एका फोडलेल्या तटबंदीवजा छोट्या खिंडीसारख्या भागातूनच किल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. काहीशे एकरांवर पसरलेला या किल्ल्यावर असलेले बांधकाम, बुरूज, तटबंदी  बऱ्यापैकी उद्‍ध्वस्त अवस्थेतच आहे; हे या दुर्गाचे दुर्दैव बाकी काय! त्यातल्या त्यात जरंडी दरवाजाच काय तो टिकून आहे. गडावरील तलाव, जलाशय यांचीदेखील अवस्था भयानकच आहे. गडावरील अनेक नक्षीदार दगड, एक तोफ, शरभाचे भंगलेले दगडी शिल्प (दोन भागात तुटलेले) हे मागील दोन वर्षांत पुरातत्त्व खात्याने आता तिथून उचलून स्वतःच्या संग्रहालयात नेले असे आमच्या वाटाड्याने सांगितले. याच बरोबर अश्रफ या आमच्या वाटाड्याने आता गडावर दुरुस्तीचे काम करण्याचे मंजूर झाले आहे हे सांगितल्यावर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.

गडावरील काही इमारती - सय्यद -अल -कबीर -कादरीची कबर, तेथील फारसी भाषेतील शिलालेखाचे दगड, राहत्या वाड्यांचे अवशेष, राणी महाल, मस्जिद हे सर्व उद्‍ध्वस्त झालेले आहे. पुनर्निर्माण होण्याची वाट बघत असलेले हे आडवाटेवरच सौंदर्य पाहायची मजा काही औरच.

जंजाळा किल्ल्यावरून दिसणाऱ्या वेताळवाडीच्या किल्ल्याचे दूरदर्शन आणि वेताळवाडी धरण, दूरवर दिसणारे जंजाळा हे छोटेखानी गाव हे सारे डोळ्यात साठवून ठेवण्याजोगेच आहे. फर्दापूरला परत येताना अंभई या गावात असलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर अगदी वेळ काढून बघण्याजोगे ठिकाण. सध्या या मंदिराला अतिशय भडक रंग दिल्याने त्याचे मूळ रूप नष्ट झाले आहे. अशा प्राचीन वास्तूंचे विद्रूपीकरण करणे योग्य नाही असे मला मनोमन वाटते. खरेतर जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा-वेरूळ या लेण्यांच्या परिसरात असलेले हे आडवाटेवरचे किल्ले निजामशाहीच्या इतिहासाची साक्ष देत मोठ्या रूक्ष मनाने उभे आहेत आणि त्यांची हळूहळू झीज होत आहे. हा संपूर्ण परिसर शासनाने योग्य ती डागडुजी करून पुन्हा उभा केला तर या संपूर्ण निसर्गसंपन्न परिसराला पर्यटकांची रांग लागल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो.

पावसाळ्यानंतर हा परिसर फिरण्यासाठी खूपच अनुकूल आहे. या मार्गावरील पुढील किल्ल्यांची माहिती पुढच्या लेखात मी देईनच पण तोपर्यंत आपणही या दुर्ग यात्रेची यंदाच्या पावसाळ्यानंतर आखणी करून ठेवायला काहीच हरकत नाही.

संबंधित बातम्या