आकाशी भिडलेला भैरवगड

मिलिंद देशपांडे
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

सह्यगिरी

महाराष्ट्रात एकूण पाच भैरवगड आहेत. कोयनेच्या खोऱ्यातील वनराजीत वसलेला, कणकवलीच्या जवळ वसलेला नरडव्याचा, हरिश्चंद्रच्या कुशीत वसलेला कोथळ्याचा, घनचक्करच्या रांगेतला शिरपुंजे गावचा आणि माळशेज घाटाच्या पोटात व नाणेघाटाच्या समीप असलेला आणि गिर्यारोहकांचे आव्हान असलेला मोरोशीचा भैरवगड असे हे पाच भैरवगड आपल्या सौंदर्याने मोठ्या दिमाखात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेले आहेत.

मोरोशीचा भैरवगड हा नाणेघाटाच्या पठारावरून एखाद्या देवळाच्या कळसासारखा भासतो, तर माळशेज घाट उतरून पुढे कल्याणकडे जाण्याच्या महामार्गावरून मोठ्या प्रस्तर भिंतीसारखा दिसतो. त्याच्या मागे असणाऱ्‍या उत्तुंग पर्वत रांगेमुळे तो बऱ्याचदा मिसळल्यासारखा किंवा लपल्यासारखा भासतो. पण नजर चाणाक्ष असेल तर मात्र या महाकाय प्रस्तर भिंतीवरील ताशीव कड्याच्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांमुळे तो लगेच नजरेत भरतो आणि खालून ती अजस्त्र भिंत नवख्यांना दाखवायला तर फारच आनंद होतो. त्याचे हे भीतीदायक रूप पाहून त्यावर जायचे कसे? हा प्रश्न मनाला भिडला नाही तरच नवल.

१९८०च्या दशकात हरिश्चंद्र- नाणेघाट हा परिसर मी कायमच भटकायचो आणि तेही सख्यासोबतींना घेऊन. पण भैरवगडावर जायचा तुटलेला पायरी मार्ग आणि पाण्याची अपुरी व्यवस्था म्हणून बरेच दिवस त्याच्या माथ्यावर पोहोचण्याचा योग आला नव्हता. त्या काळात गिर्यारोहणाच्या साधनांची वानवा असल्याने या साहसी दुर्गाची भ्रमंती अशीच पुढे ढकलली जात होती. १९९०मध्ये मात्र आम्ही चार मित्रांनी मिळून अवघड श्रेणीत मोडणाऱ्‍याया  दुर्गाची वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या सह्याद्रीचा लाव्हा रस जेव्हा शांत झाला आणि त्याचे थर निर्माण झाले, त्यातूनच सह्याद्रीत अनेक प्रस्तर भिंती आणि सुळक्यांची निर्मिती झाली. सातमाळ रांगेतील धोडप किल्ला, लोणावळ्याच्या परिसरातील तेलबैला भिंती, त्रंबकेश्वरजवळ असलेला दुर्गभांडार आणि माळशेज घाटातील मोरोशीचा आकाशाला गवसणी घालू पाहणारा भैरवगड ही याची मूर्तीमंत उदाहरणे. अशा प्रस्तर भिंती गिर्यारोहकांना आणि आमच्यासारख्या साहस प्रेमींना साद न घालतील तरच नवल.

अशा प्रकारच्या प्रस्तर भिंतींना डाईकची रचना असे म्हटले जाते आणि याच डाईकच्या रचनेतून तयार झालेला हा उत्तुंग भैरवगड मला बरेच दिवस खुणावत होता. 

पूर्वीची ही सगळी भ्रमंती ‘लाल डब्या’तून, म्हणजेच राज्य परिवहन मंडळाच्या साध्या बसमधून केली जायची. माळशेज घाट हा तेथे कायम पडणाऱ्या दरडींमुळे कायमच धोकादायक समजला जातो आणि त्या काळी तर तेथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट अशीच होती. त्यातून रात्री तर वाहतूक जवळ जवळ बंदच असायची. पुण्याहून निघून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरोशी गावापर्यंत पोहोचायचे म्हणजे द्राविडी प्राणायमच असायचा. पुणे ते ओतुर ही बस पकडायची मग ओतूरमार्गे पुढे कल्याण मुरबाडकडे जाणारी बस धरायची. पण त्यांची उपलब्धता इतकी कमी की मोरोशी गावात पोहोचेपर्यंत अख्खा दिवस कारणी लागायचा. त्यामुळे योग्य नियोजन असेले तर या एका किल्ल्यासाठी दोन किंवा तीन दिवस खर्ची पडायचे, पण आता मात्र रस्ता उत्तम असल्याने आणि शासनाच्या तसेच स्वतःच्या गाड्यांची रेलचेल असल्याने अगदी भल्या पहाटे उठून भैरवगडाचा माथा गाठून रात्री पुण्यात परत येणे अवघड राहिलेले नाही. असा मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला आणि चारशे फूट सरळसोट ताठ मानेने उभा असलेल्या या भन्नाट आणि साहसी दुर्गावर जायची मजा न्यारीच आहे.

पुण्याहून दुपारी निघावे आणि आळेफाटा येथून नाशिक महामार्ग सोडून डावीकडे ओतूर गावाकडे वळावे. डिंगोरे, ओतूर, बनकर फाटा, मुंजाबाचा डोंगर, डावीकडे दिसणारी हटकेश्वर रांग, हडसर किल्ला, पिंपळगाव -जोगा धरणाचा जलाशय आणि त्यामागे अजगरासारखा पसरलेला हरिश्चंद्रगड, माळशेज घाटाच्या ऐन माथ्यावर वसलेले महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे अप्रतिम रिसॉर्ट, माळशेज उतरताना लक्ष वेधून घेणारा काळूचा धबधबा आणि संपूर्ण घाटातून दिसणारी निसर्गमाया पाहत भैरवगडाच्या कुशीत वसलेल्या मोरोशी गावात मुक्कामाला जावे. गावातील स्थानिक तुमची राहायची व्यवस्था करतात किंवा हायवेवरील काही हॉटेलदेखील आता पर्यटकांच्या स्वागताला तयार असल्याने मुक्कामाची व्यवस्था तेथेदेखील होऊ शकते.

मोरोशीतून भल्या पहाटे उठून हायवे क्रॉस करून वनखात्याने निर्माण केलेल्या ‘किल्ले भैरवगड’ या कमानीतून सरळ थोडेसे शेतातून आणि मग जंगलातून चढण चढत आपण साधारण दीड ते दोन तासाच्या चालीने किल्ल्याच्या पदरात किंवा माचीवर पोहोचतो. पूर्वी इथे छोटेखानी वस्ती होती पण अपुऱ्या सुविधांमुळे ती आता मोरोशीला येऊन मिळाली. माचीवर सुंदरसे पठार आहे आणि तेथून पूर्ण आणि स्पष्टपणे भैरव गडाचा जो रुद्रावतार दिसतो तो पाहून काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. ही अख्खी भिंत आपल्या अंगावर येईल का काय असे भासते. तेथूनच दिसणारा देवदांड्याचा डोंगर, नाणेघाटाच्या पठारावर आणि अजनावळे गावालगत असलेले वऱ्हाडचे डोंगर, कोकणात उतरणाऱ्या भोरांडे नाळेची बाजू, नाणेघाटात आपले टोक घेऊन आकाशाशी सलगी करणारा नानाचा अंगठा हे सह्याद्रीचे रौद्र सौंदर्य पाहून आपण बेभान तर होतोच आणि आपला थकवादेखील पळून गेलेला असतो. आम्हीदेखील थोडी पोटपूजा आणि तहान भागवत पुन्हा पायातले बळ एकवटून या अजस्र भिंतीच्या माथ्यावर जाण्यास मार्गस्थ झालो. या पठारावरून पुढे अगदी भिंतीच्या तळातून चढ चढत थोड्याशा घसाऱ्यावरून ही वाट गडाच्या भिंतीला वळसा मारून चालू होणाऱ्या पायरी मार्गाच्या खिंडीकडे आपल्याला घेऊन जाते. वाटेत आपली तृषा भागविण्यासाठी एक अप्रतिम कोरलेले टाके आहे. पाण्याची हीच काय ती एकमेव व्यवस्था आहे. अगदी गडाच्या माथ्यावरसुद्धा आणि वाटेतल्या टाक्यांमध्येदेखील पाणी अटलेले असते, त्यामुळे पाणी पिऊन आणि सोबत साठा घेऊनच पुढे मार्गस्थ होणे उचित ठरते.

इंग्रजांनी अनेक किल्ले उद्ध्वस्थ केले, त्यातून या किल्ल्याचादेखील दर्जेदार असा पायरी मार्ग सुटला नाही. खिंडीत पोहोचल्यावर पायरी मार्ग आणि एकूणच तो कातळ कडा मान वर करून पाहताना, आपल्या डोक्यावरची टोपी कधी गळून पडते ते कळत नाही. सुरुवातीचा पन्नास-साठ फुटांचा टप्पा बऱ्‍यापैकी चांगल्या स्थितीत असल्याने तिथपर्यंत सुरक्षा दोराची फारशी गरज भासत नाही. पण त्यावर असलेल्या एका गुहेपाशी पोहोचल्यावर मात्र त्याला असलेल्या छीद्रातून त्या गुहेत प्रवेश करावा लागतो आणि येथून मात्र पुढील पायऱ्या उद्ध्वस्त असल्याने गिर्यारोहणाचे कसब तंत्र आणि योग्य ती साधने यांचा योग्य वापर करूनच गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. अवघड टप्पा आणि नंतरच्या सर्व पायऱ्या बऱ्याच ठिकाणी ओपन असल्याने या संपूर्ण मार्गावर सुरक्षा दोर लावणे अत्यंत गरजेचे आहे. अंदाजे दीडशेहून अधिक उंचीचा हा टप्पा वळणे घेत, एका बाजूला आ वासलेली दरी तर दुसऱ्‍या बाजूला खडा कातळटप्पा अशा अरुंद मार्गाने घोरपडीच्या तंत्राचा वापर करतच आपण माथ्यावर पोहोचतो. वाटेतील दोन-तीन टाकी बुजलेली आणि सुकलेली आहेत. शेवटचा टप्पा पार करताच आपण निवडुंगाच्या जाळीतून अंग चोरत सर्वोच्च टप्प्यावर किंवा माथ्यावर येतो. गडाचा माथा म्हणजे एक अरुंद धार आहे. दोन्ही बाजूला खोलवर पसरलेल्या दरीचे सौंदर्य न्याहाळत पूर्वपश्चिम पसरलेल्या या अंतिम टप्प्यावर असलेल्या भगव्यापाशी पोहोचताच आपला ऊर आनंदाने भरून येतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून येणारा भन्नाट वारा पीत, नाणेघाटाचे टोक ते हरिश्चंद्रगडाचा परिसर आणि नटलेल्या डोंगररांगा यांचे विहंगम दृश्य मनाला फारच मोहून टाकते.

त्या दिवशी आम्हा चौघांना गड माथ्यावर पोहोचेपर्यंत सकाळचे दहा वाजून गेले होते. डिसेंबर महिना असला तरी उन्हाचा चटका या उजाड भैरवगडाच्या माथ्यावर चांगलाच जाणवत होता. गडावर बघण्याजोगे काहीच नसल्याने आणि आजूबाजूचा ३६० अंशात पसरलेला परिसर बघून, फारसा वेळ वाया न घालवता येताना केलेली प्रस्तरारोहणाची कसरत आणि जाताना करावा लागणारा रॅपलिंगचा थरार याची चर्चा करत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

त्याकाळी म्हणजे आम्ही गेलो तेव्हा, हा किल्ला अजिबात सुरक्षित नव्हता पण. पुण्यातील सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह (SCI) या संस्थेने तेथे मारलेल्या केमिकल बोल्ट्समुळे तो खूपच सुरक्षित झाला आहे. असे असले तरीही योग्य मार्गदर्शक, गिर्यारोहणाचे पूर्ण ज्ञान असलेला नेता आणि गिर्यारोहणाची सर्व साधने बरोबर घेऊनच हे धाडस केलेले बरे, हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने सांगतो.

जून ते ऑक्टोबर हा पर्जन्यकाळ सोडता आडवाटेवरचा आणि आपल्यामध्ये असलेल्या साहस शक्तीला आव्हान देणारा हा मोरोशीचा भैरवगड एकदा तरी जाऊन पाहायला काहीच हरकत नाही. या किल्ल्यावरील अनेक व्हिडिओ बघताना एका गोष्टीची खंत वाटते, की अनेक अतिउत्साही मंडळी गिर्यारोहणाच्या तंत्राची पायमल्ली करत विनारोप आरोहण करत असतात. इतकेच काय तर फाजील आत्मविश्वास बाळगत सेल्फी स्टिकने शूटिंग करत करत वर चढतात. पण त्यांना हे भान नसते की आपण आपल्या आणि आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांच्या जिवाशी खेळतोय. साहस असावे पण ते अतिरेकी नसावे, कारण अनुकरणप्रिय आणि अपुरा अनुभव असलेली मंडळी हेच बघून साहस करतात आणि ते साहस त्यांच्या जिवाशी बेतण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एकूणच ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंगचे क्षेत्र आणि त्यात अनेक वर्षे कार्य करणारी मंडळी नाहक बदनाम होतात. जे करायचे ते निसर्गाचे भान ठेवून आणि जरा जपूनच, म्हणजे अशा अनेक साहसी सौंदर्य स्थळांना आणि सह्यगिरीच्या गिरी शिखरांना आपण पूर्ण आत्मविश्वासाने न्याहाळू शकू, तसेच आपल्याबरोबर हा आनंद इतरांनादेखील वाटू शकू!

संबंधित बातम्या