सातमाळ रांगेचे दुर्गवैभव - इंद्राई

मिलिंद देशपांडे
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021


सह्यगिरी

नाशिकपासून जवळ असलेली एक डोंगररांग म्हणजेच अजंठा सातमाळ रांग. सूरगणापासून सुरू होऊन रेणुका देवीमुळे झोतात आलेल्या चांदवड किल्ल्याच्या मार्गे पुढे सरकत मनमाड जवळील नावाजलेल्या अशा अंकाई- टंकाई या किल्ल्यापाशी येऊन ही डोंगररांग संपते. अचला, अहिवंत, रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी, धोडप, ईखारा हे या रांगेवरील सुरुवातीचे किल्ले, चांगले चार वेळा पाहून झाले होते आणि काही कारणांमुळे रांग पुढे सरकत होती, पण आमचे पाय मात्र पुढे सरकत नव्हते. म्हणतात ना, तो योगच यावा लागतो... 

मनाशी दृढनिश्चय केला होता, चार सखे-सोबती जमवून अजंठा सातमाळ रांगेची अपुरी दुर्गयात्रा करायचीच आणि सातमाळ रांगेतील उरलेले दुर्गवैभव पदरात पाडून घ्यायचे. गणेशोत्सवाच्यावेळी ये-जा करणाऱ्या पर्जन्यराजाच्या वर्षावामुळे हा शिजलेला बेत पुढे ढकलावा लागला. पण काही झाले तरी दीपावलीपूर्वी ही भ्रमंती फत्ते करायची हे मनात योजले होते. नाशिकचा भटक्या मित्र अभिजितने अगदी काही दिवसांपूर्वीच या रांगेचा श्रीगणेशा केला असल्याने त्याच्याकडून अद्ययावत माहिती जमा केली. मी, राजू बदामीकर, संजय नाईक आणि मनोज पवार अशा चौकडीने २५ ते २९ ऑक्टोबर या काळात या रांगेतील फारशा प्रचलित नसलेल्या सहा किल्ल्यांची ही रांग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वेळेअभावी इंद्राई, चांदवड, राजधेर, कोळधेर, कांचना-मंचना एवढेच किल्ले बघून आणि उर्वरित चार किल्ले म्हणजेच कात्रा, मेसणा, अंकाई- टंकाई हे पुढच्या यात्रेसाठी राखीव ठेवून पुण्यात परत आलो. जरी थोडेफार दुर्लक्षित असलेले आणि फक्त गडकोटांवर प्रेम करणारे ट्रेकर्सच इथे फिरकत असल्याने म्हणावा तसा पर्यटकांचा राबता इथे नसतो. पण इतिहासाची आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत, त्यांच्या आधीपासून हे किल्ले इथे अजूनही तग धरून उभे आहेत. हेच त्यांचे वैशिष्ट्य आणि आकर्षण. 

बहुतांश भटकी मंडळी इंद्राई आणि राजधेर हे किल्ले बघण्यासाठी पायथ्याशी वसलेल्या राजधेरवाडी या गावातून वर जाणाऱ्‍या वाटेने मार्गक्रमण करतात. पण आम्ही मात्र हाती आलेल्या ताज्या बातमीनुसार वडबारे या गावातून जाणाऱ्या धोपट मार्गाची निवड केली. ही सर्व डोंगररांग मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड या रेणुका देवीच्या प्रसिद्ध ठिकाणापासून अगदीच पंधरा-वीस किलोमीटरच्या परिघात असल्याने आम्ही आमची तळछावणी चांदवड येथेच निश्चित केली होती. पहाटे लवकर उठून एक किंवा दोन किल्ले बघायचे आणि चांदवड गाव गाठायचे असे पद्धतशीर नियोजन केले होते. याचे मुख्य कारण म्हणजे या सर्व किल्ल्यांवर राहायची पुरेशी व्यवस्था नाही आणि पाण्याचा फारसा उपसा नसल्याने पावसाळ्यानंतरदेखील पाण्याची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे पाठपिशवीत तहान आणि भूक लाडू पाठीवर अडकवून स्वतःच्या वाहनाने किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावात पोहोचायचे आणि गडदर्शन करून परत चांदवडास मुक्कामी यायचे असा नित्यक्रम झाला होता. 

पहिल्या दिवशी भल्या पहाटे पुण्याहून निघून चांदवड गावाच्या आधी सोग्रस फाट्यावरून वळून आम्ही कोळधेर किल्ला पदरात पाडून घेतला आणि सायंकाळी चांदवड येथे मुक्कामासाठी परतलो. कोळधेर या किल्ल्याबद्दल पुढील लेखात सविस्तर लिहीनच. दुसऱ्या दिवशी आम्ही भल्या पहाटे उठून राजदेरवाडीच्या अलीकडे असलेल्या आणि चांदवड पासून फक्त सात किलोमीटरवर असलेल्या वडबारे गावात पोहोचलो. आदल्या दिवशी तेथे जाऊन ८३ वर्षांच्या (फक्त) तरुण वाटाड्याशी वाटाघाटी करून आलो होतो. त्यामुळे बरोबर सकाळी सहा वाजता हे मार्गदर्शक आणि आमच्यासाठी डोंगरांचे खरे हिरो घराच्या बाहेर उभे होते. धोतर, हातात काठी आणि टॉवेलमध्ये बांधलेला भाकर तुकडा पाठीवर लटकावून हा उमदा गडी आमची वाट बघत होता. काशिनाथराव जाधव हे त्यांचे नाव. वडबारे हे अगदी छोटेखानी गाव पार करून आम्ही जीप जाऊ शकेल अशा सपाटीच्या रस्त्याने काशिनाथमामांच्या संगतीने इंद्राई किल्ल्याकडे पावले वळवली. पाठीमागून भास्कराने कोवळ्या सूर्यकिरणांचा शिडकावा या सह्याद्रीच्या रांगेवर हळूच पसरवायला सुरुवात केली होती. 

इंद्राई किल्ला गावातून लगेचच दिसत नाही, पण डावीकडचा साडेतीन रोडगा या डोंगरावर मात्र लवकर सूर्यकिरण पोहोचल्याने तो उठून दिसत होता. पौराणिक दंतकथेनुसार अगस्ती ऋषींचा आश्रम चांदवडजवळील डोंगरावर होता. एकदा भूक लागली असता त्यांनी चार रोडगे भाजले आणि त्यावर लावण्यासाठी तूप मागण्याकरिता ते चांदवड गावात आले.  

कोणीही त्यांना तूप दिले नाही म्हणून रागाने त्यांनी या नगरीला चांडाळनगरी असे नाव दिले आणि मग अपभ्रंश होऊन चांदवड हे नाव रूढ झाले. चारपैकी अर्धा रोडगा त्यांनी गोमातेस देऊन उर्वरित साडेतीन रोडगे तेथेच ठेवले. तोच हा ‘साडेतीन रोडगा’ डोंगर. सुमारे तासाभराच्या सपाट चालीनंतर आम्ही एका तलावाजवळ पोहोचलो. तलावात अजूनही मागच्या धबधब्यातून म्हणजेच निसर्गाच्या ओंजळीतून बऱ्यापैकी पाण्याची धार तलावात भर टाकत होती, आणि त्यामागे अवाढव्य पसरलेला आणि माथ्यावर सोनेरी प्रकाश झळकावत इंद्राईचा अजस्र पसारा नजरेच्या टप्प्यात मावत नव्हता. 

इंद्राई किल्ल्याकडे तोंड करून आणि मुख्य रस्ता सोडून, गावाकडून येणाऱ्या एका लांबलचक धारेवर आम्ही चढायला सुरुवात केली. साधारण वीस मिनिटांच्या चढणीने आम्ही त्या रांगेच्या माथ्यावर पोहोचलो आणि डावीकडे परत एकदा इंद्राईने आपला रुद्र कातळटप्पा दाखवत दर्शन दिले. आता परत या चढणीच्या मार्गाने आम्ही हळूहळू अगदी कातळ टप्प्याशी भिडलो. कातळ भिंतीशी पोहोचताच उभा कडा अंगावर येतोय असा भास होतो. येथूनच ही वाट कड्याला बिलगून डावीकडे वळते आणि दूर वरूनच आपल्याला पायऱ्‍यांच्या मार्गावर असणारी कडा फोडून काढलेली खाच दिसते. काही अवधीतच आपण पायरी मार्गाला भिडतो. एका खडकातून (कड्यातून) तासलेला किंवा पोखरून काढलेला हा पायरीमार्ग आणि त्यावर असलेले खडकाचे छत्र बघताना आणि हे निर्माण करताना छिन्नी- हातोड्याने केलेली कमालीची सुबकता हे पाहून विस्मयाने पाचही बोटे तोंडात गेल्याशिवाय राहात नाहीत. अक्षरशः दोन हत्ती शेजारून चालत जाऊ शकतील एवढी रुंदी आहे या पायऱ्यांची. या कड्यात असलेल्या अनेक पाकोळ्यांच्या घरट्यांमधून पाकोळ्यांनी आमची दखल घेत भीतीपोटी कर्कश आवाजात आमचे स्वागत केले. अदमासे पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळली आणि पुढे परत घळीसारख्या भागातून पुढच्या अशाच कोरीव पायऱ्‍यांनी आमचे स्वागत केले. 

गडाच्या अवशेषवजा उरलेल्या दरवाजातून आम्ही गडाच्या सपाट माथ्यावर पोहोचलो. थंडगार वारा अंगावर घेत आणि तृषा भागवत आम्ही अगदी जवळ असलेल्या कातळातून खोदून काढलेल्या गुहा पाहिल्या. येथून समोरच राजधेर, कोळधेर, धोडप, ईखारा सुळका, कांचना-मंचना रवळ्या-जावळ्या हा सातमाळ रांगेचा दुर्ग पसारा एका टप्प्यात नजरेत येतो. आम्हीही हिंडलेल्या सहा किल्ल्यांपैकी सर्वात जास्त पुरातन अवशेष किंवा पाहण्याच्या वास्तू या इंद्राई किल्ल्यावर आहेत. तलाव, पाण्याची काही कोरडी तर काही पाणी पिण्याजोगी टाकी, महादेवाचे मंदिर आणि त्याच्या समोरील दगडी बांधकाम असलेला सुंदर तलाव, मंदिराच्या माथ्यावर असलेला आणि सुबक पायऱ्या खोदलेला तलाव, एकाच रांगेत खोदून काढलेल्या गुहांची भली मोठी रांग हे सगळे आणि बालेकिल्ला पाहायला किंवा पूर्ण गडफेरी करायला किमान दोन तास लागतात. आमच्यापेक्षा जास्त उत्साह काशिनाथमामांचा होता. त्यामुळे पूर्ण गडाची प्रदक्षिणा आणि आजूबाजूचे खोरे बघताना, मुंबई-आग्रा महामार्ग, चांदवड किल्ला, साडेतीन रोडगा डोंगर, राजधेर-कोळधेरची बाजू बघत पुन्हा पायरी मार्गाकडे पोहोचताना एका वेगळ्या वाटेने म्हणजे वापरात नसलेल्या पायरी मार्गाने उतरून मूळ पायरी मार्गाच्या तळाशी पोहचण्याची आमची मनीषा काही पूर्ण होऊ शकली नाही. कारण या वाटेला घाणेरीचे जंगल प्रचंड वाढले होते. आल्या वाटेने खाली उतरून वडबारे गावाकडे जाणाऱ्या डोंगर धारेने, पण पूर्ण सपाट चालीचा लांबचा आणि थोडा कंटाळवाणा प्रवास करत आम्ही दुसऱ्या रस्त्याने काशिनाथमामांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या नातीने दिलेला फक्कड चहा पिऊन अगदी वीस मिनिटांतच आम्ही आमच्या चांदवड मुक्कामी येऊन धडकलो.

बराच काळ रखडलेल्या या दुर्गवारीचा श्रीगणेशा इंद्राईने झाला आणि शेवट कांचना-मंचनाने झाला. परतीच्या पावसाने हरित वस्त्र न्यायलेली ही सह्यरांग, त्यावर वाऱ्याच्या लयीबरोबर डोलणारी रानफुले, आणि निर्धास्तपणे बागडणारे पक्षीवैभव हे सारे डोळे भरून साठवण्याजोगे असेच आहे. पुढील दोन लेखांत मी उर्वरित किल्ल्यांची माहिती घेऊन पुनश्च भेटीला येईनच, पण तोपर्यंत तुम्हीदेखील सवड काढून या सातमाळ रांगेतील अपरिचित दुर्गांची वारी करायला सज्ज झाल्यास मला अधिक आनंद होईल.

संबंधित बातम्या