किल्ले चांदवड आणि राजधेर

मिलिंद देशपांडे
सोमवार, 6 डिसेंबर 2021

सह्यगिरी

आमच्या सातमाळ रांगेतील किल्ल्यांचा श्रीगणेशा इंद्राईने झाला आणि त्यावरील अविस्मरणीय अशा वास्तू आणि निसर्गसौंदर्य पाहून आम्ही लुब्ध झालो होतो. चांदवड गावातील सुग्रास भोजनावर ताव मारून आम्ही चक्क लवकर ताणून दिली, कारण उद्या दोन किल्ले पदरात पाडून घ्यायचे होते...

चांदवड किल्ला चांदवड गावाच्या अगदी लगतच आहे आणि किल्ल्याच्या पदरात असलेल्या चंद्रेश्वर मंदिरापर्यंत जाणारा चढणीचा घाट रस्ता खूपच सुंदर असल्याने गावातून पंधरा मिनिटांतच या मंदिरापाशी जाता येते. अत्यंत सुबक असलेले हे मंदिर गडाच्या पार्श्वभूमीवर खूपच उठून दिसते. मंदिराचे दर्शन घेऊन, तेथूनच किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेने आम्ही मार्गस्थ झालो. मंदिरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर अतिशय सुबक असा नितळ पाण्याचा तलाव आहे. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी हा तलाव निर्माण केला असे सांगितले जाते. येथून किल्ल्याचा चढ चालू होतो आणि वीस-पंचवीस मिनिटांतच आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचतो. येथे एका उद्‍ध्वस्त वाड्याचे चौथरे आणि भिंती दिसतात. सदर अवशेष हे पेशवेकालीन टांकसाळ किंवा मुद्रकाचे आहेत. इथे त्या काळात चांदीची नाणी पाडली जायची, पण आता तेथे फक्त अबोल अवशेष पाहूनच समाधान मानावे लागते. हा सगळा भाग किल्ल्यावर जाताना डाव्या बाजूला येतो आणि इथूनच म्हणजे पश्चिमेकडे गडाची वाट चालू होते. 

बऱ्यापैकी सपाटीवरून आणि थोडी चढाई करून आपण पश्चिम धारेकडे (नाकाडाकडे) जाणारी वाट तुडवत शेवटी मात्र कातळभिंतीजवळ येऊन भिडते. इथे मात्र मोठी ढासळ पडली आहे, आणि त्यातूनच भिंतीच्या दिशेने पायरी मार्गाकडे चढावे लागते. वाटेत बुरूज आणि उद्‍ध्वस्त तटबंदीचे अवशेष आपले लक्ष वेधून घेतात. मराठेशाही मोडून काढण्याकरिता इंग्रजांनी केलेले प्रताप इथेही नजरेस पडतात. बालेकिल्ल्याकडे किंवा सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या इथेही उद्‍ध्वस्त केलेल्या दिसतात. तेथे कोणीतरी एक अत्यंत तकलादू शिडी लावली आहे आणि वर पकड घेण्यासाठी कुंपणाला लावतात ती काटेरी तार लावली आहे. गेल्या दोन वर्षांत महासाथीमुळे कोणीही इकडे फिरकले नसल्याने वरपासून आलेली एक रस्सी किंवा कॉटन रोप अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. गिर्यारोहणात अशी जोखीम घेणे आणि किल्ल्यावर चढून जाणे धोक्याचे असल्याने आम्ही तो मोह टाळला. खरेतर आमच्याकडे गिर्यारोहणाचे साहित्य असले, तरी तो धोकादायक विचार मनातून काढत आम्ही परतीचा मार्ग धरला. शासनाला किंवा वनखात्याला या लेखाद्वारे मी अशी विनंती करीन, की तिथे एक भक्कम शिडी बसविल्यास सर्वसामान्य लोकांनादेखील या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येईल. अन्यथा अपुऱ्या ज्ञानाने आरोहण करण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन गंभीर संकटाशी सामना करावा लागेल, हे निश्चित.

असे असले तरी पायऱ्‍यांच्या बाजूला असलेल्या काही गुहा, कमानीसदृश कोरीव कामाची महिरप, फारसी शिलालेख, तसेच वरून दिसणारा साडेतीन रोडगा डोंगर, चंद्रेश्वर मंदिर, तलाव, महामार्ग, इंद्राई आणि कोळधेर किल्ले हे मात्र मनात साठवण्याजोगे. फोडलेल्या पायऱ्यांनंतर शिल्लक पायऱ्‍यांवरून वर गेले की तलाव, वाड्यांचे उद्‍ध्वस्त अवशेष, फुटका दरवाजा, शरभ या काल्पनिक प्राण्याचे शिल्प आणि पाण्याची टाकी हे किल्ल्यावर बघण्याजोगे होते, असे माहीतगारांनी सांगितले. परत येण्यासाठी तीच धोपट वाट वापरत अवघ्या अर्ध्या तासात आम्ही चंद्रेश्वर मंदिराजवळ सावलीत ठेवलेल्या यांत्रिक रथाकडे पोहोचलो. पोटात कावळ्यांनी कावकाव सुरू केली होती आणि चांदवडमध्ये जेवण करून पुनश्च मोर्चा वळवायचा होता राजधेर किल्ल्याकडे, म्हणून त्वरित चांदवडच्या दिशेने निघालो. 

जठराग्नी शांत करून आम्ही रस्ता कसा आहे? वाटाड्या मिळेल का? ही चौकशी करण्यासाठी राजधेरवाडी गेलो. चांदवडपासून राजधेर गडाचा पायथा असलेले राजधेरवाडी हे गाव फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. गावात पोहोचताच तेथील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आमचे लक्ष वेधून घेत होता. या गावाला आदर्श गाव म्हणून किताब मिळाला आहे. गाडीतून पायउतार झालो आणि एका घरापाशी थांबून चौकशी केली असता, आमच्यासारख्या ट्रेकर्सना वाटाड्या म्हणून मार्गदर्शन करणारे वसंतराव जाधवच समोर आले. त्यांनी ‘शेतीच्या कामामुळे मी येऊ  शकणार नाही, पण आला आहात तर आत्ताच उरकून टाका राजधेर,’ असा बहुमोल सल्ला दिला. आम्हाला वाटेला लावून मार्गातल्या खाणाखुणा सांगत, तुम्ही अंधाराच्या आत परत याल हा विश्वासदेखील दिला. काही वेळेच्या गप्पांमध्येच त्यांचे या परिसरातील किल्ले आणि इतिहास याबद्दलचे ज्ञान याचे चांगलेच आकलन झाले. त्यांनी गाव सोडून असलेल्या पाण्याच्या टाकीवरून एका घसरणीचा टप्पा पार करायला सांगितला आणि मग आणखी दोन टप्पे पार केल्यावर शिडी मार्ग दिसेल असेही सांगितले. तसेच गडावर काय पहायचे हे सांगून त्यांनी आमचा निरोप घेतला. 

बऱ्यापैकी चढणीचा मार्ग संपवून आम्ही दुसऱ्या टप्प्यावर असलेल्या एका तलावाजवळ पोहोचलो आणि अचानक मला युरोपियन रोलर (नीलपंख) आणि कॉमन कॅस्टरेल (सामान्य खरुची) या तशा फारशा न दिसणाऱ्या पक्ष्यांनी खूप सुंदर दर्शन दिले. इतकेच नव्हे तर छबी टिपण्यासाठी पुरेसा वेळही दिला. हा आविष्कार पाहून, शेवटचा चढ चढून आम्ही तिसरा टप्पा गाठला आणि ऐन कातळकड्याच्या पोटातून डावीकडे सरकत लोखंडी शिडीपाशी (खरेतर हा भक्कम जिनाच आहे) पोहोचलो. पूर्वीच्या काळातील पायऱ्या ब्रिटिशांनी इथेही उद्ध्वस्त केल्याने २०१९मध्ये वनखात्याने ही शिडी बसवली आहे. याचे कंत्राट वसंतराव जाधव यांनीच पूर्ण केले आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! निर्धोकपणे या जिन्यावरून वर गेल्यावर एक छोटेसे प्रवेशद्वार लागते आणि त्याच्या डाव्या कमानीवर एक फारसीतला शिलालेख आहे. शिडीच्या बरोबर विरुद्ध दिशेने सुस्थितीत असलेल्या, पण खाली खोल टप्पा असलेल्या साधारण ६५ पायऱ्या चढून आपण गडावर प्रवेश करतो. 

सपाटीवरून एक वाट उजवीकडे आणि एक वाट डावीकडे जाते. उजव्या वाटेवर अगदी जवळच एक सुस्थितीत असलेला वाडा दिसतो, त्याव्यतिरिक्त या भागात बघण्याजोगे काही नाही. डावीकडच्या वाटेवर मात्र किल्ल्याचा पसारा चांगलाच आहे. पहिली एक कातळातील गुहा लागते आणि त्याच्या वरच्या भागात घुमटीदार इमारत आहे. याच्या एका छोट्या चौकोनातून आतमध्ये डोकावून पाहिले, तर हा विहीरवजा पाण्याचा झाकलेला साठा आहे हे लक्षात आले. येथून पुढे बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आणि गडफेरी करणारी वाट दिसते. आम्ही गेलो तेव्हा गवत इतके माजले होते, की वाटा शोधाव्या लागत होत्या. उजव्या बाजूने पुढे जाऊन कड्याच्या माथ्यावरून मांगी-तुंगी, रतनगड, कांचना, कोळधेर, इंद्राई, धोडप हा सातमाळ रांगेचा पसारा वातावरणामुळे थोडासा धुसर दिसत होता. गडावरील तलाव, काही भुयारी टाकी आणि महादेवाचे मंदिर पाहून लगोलग परतायचा निर्णय घेतला, कारण आम्हा चौकडीशिवाय या गडावर कोणीही नव्हते. अंधाराच्या आत लांबचा पल्ला गाठून राजधेरवाडी गाठायची होती, म्हणून पावलांना परत फिरण्याची आज्ञा केली. 

येताना वाढलेल्या गवतामुळे आणि खालच्या शेवटच्या ढोर वाटांमुळे थोडीशी फसगत झाली, पण दिशाज्ञान आणि अनुभवाच्या शिदोरीवर काही काळातच आम्ही मूळ पदावर येऊन गावात दाखल झालो. मोर्चा तळछावणी चांदवडकडे वळविला. भरूच, सुरत ही गुजरातमधील बंदरे, नाशिक, औरंगाबाद या महत्त्वाच्या बाजारपेठा या सगळ्या व्यापारी मार्गावर असलेले हे किल्ले आणि चांदवड गावाचे महत्त्व म्हणून प्राचीन काळापासून नांदत असलेला हा किल्ला आणि परिसर, यांचे महत्त्व पेशवाईपर्यंत अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल. परतीच्या प्रवासात, प्राचीन काळात अपुऱ्या तंत्रज्ञानात निर्माण केलेल्या या किल्ल्यांच्या निर्मात्याला सलाम करत, इंग्रजांनी त्यांची केलेली नासधूस आणि या वैभवशाली 

दुर्गांची आजची स्थिती हा विषय चघळत, चांदवड मुक्कामी कधी पोहोचलो हे कळलेच नाही.

 

संबंधित बातम्या