किल्ले कोळधेर आणि कांचना

मिलिंद देशपांडे
सोमवार, 20 डिसेंबर 2021

सह्यगिरी

सातमाळ रांगेच्या तीन लेखांपैकी हा अंतिम लेख. पहिल्या लेखांमध्ये मी कोळधेर किल्ल्याचा ओझरता उल्लेख करत याबद्दल लिहीनच असे आश्वासन दिले होते; ते वर्षभराच्या ‘सह्यगिरी’ या लेखमालेच्या अंतिम पुष्पात तुमच्यापुढे सादर करताना विशेष आनंद होतो आहे. 

दुर्ग मालिका पाहण्यासाठी आम्ही पुण्याहून भल्या पहाटे निघालो. त्याच दिवशी दुपारच्या जेवणानंतर हा किल्ला पदरात पाडून घ्यायचा असे आमचे नियोजन होते. नाशिक-आग्रा महामार्गावरून सटाण्याकडे वळणाऱ्या सोग्रस फाट्यावरून अंदाजे दहा किलोमीटर गेल्यावर एक ‘T’ जंक्शन लागते, येथूनच एक रस्ता सटाणा आणि एक रस्ता फिरून चांदवड या गावी जातो. या ठिय्यावरूनच चांदवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच दोन किलोमीटर अंतरावर तांगडी हे आदिवासी गाव आहे. खरेतर ही छोटीशी वस्ती आहे. इथूनच एक वाट कोळधेर किल्ल्याकडे जाते. हे वाचनात आले होते. वस्तीवर गाडी लावून चौकशीसाठी थांबलो असता, सागर देशमाने या ग्रामस्थाने आमची विचारपूस केली. शेतीच्या कामामुळे मला जमणार नाही असे सांगत त्यांनी गडाच्या वाटेचे योग्य ते मार्गदर्शन केले. गावालगत असलेल्या एका पाझर तलावाला वळसा घालून जाणारी वाट आम्हाला दाखवून दिली. तलावावरून एका चढणीने आम्ही एक विस्तीर्ण पठारावर दाखल झालो. या पठारावरून राजधेर किल्ला आपली भक्कम उंची आणि प्रशस्तपणा दाखवत चांगलाच उठून दिसत होता. या पठारावरून कोळधेर किल्ल्याचा माथा आणि त्या लगतची खिंड हे खूप दूरवर दिसत होते. पण तरी पठारावरून जाणारी गवताने बुजलेली सपाट वाट तशी सोपी होती. वाटेत भेटलेल्या गुराख्यांनी आम्हाला तेथून योग्य वाट दाखविली. 

खिंडीतून बऱ्यापैकी चढ चालू होतो. हा सर्व परिसर तसा गवताळ आणि झाडी नसलेला आहे, त्यामुळे उन्हाचा तडाखा झेलत, वाट शोधत शोधत आम्ही एका पाणवठ्यावर पोहोचलो. पावसाळा ओसरला असला तरी खडकातून झिरपणाऱ्‍या निर्मळ पाण्याने तहान भागवून आम्ही पुढे प्रयाण केले. गडाचा पूर्ण माथा गाठता येत नाही, पण त्याच्या पोटात असलेल्या गुहेपर्यंत मात्र नक्कीच पोहोचता येते. प्रचंड वाढलेले गवत आणि त्यामुळे बुजलेल्या वाटा धुंडाळत आम्ही अंदाजाने गडाचा फुटका दरवाजा आणि गुहेकडे घेऊन जाणारा पायरी मार्ग शोधत होतो. महत्प्रयासाने डावी-उजवी करत एकदाचा तो पायरी मार्ग दिसला आणि मग शोधमोहीम संपल्याने पायातले गेलेले त्राण पुन्हा एकवटून आम्ही माथ्यावरील गुहेचा मार्ग धरला. 

गुहेकडे जाणारी वाट मात्र चांगलीच पाय घसरवणारीची आणि अगदीच छातीवरच्या चढाईची होती. ही गुहा आणि उद्‍ध्वस्त दरवाजा, तसेच तेथील पायऱ्या सोडता या किल्ल्यावर तसे फारसे पाहण्याजोगे नाही. पण तेथून दिसणारा राजधेर, इंद्राई या किल्ल्यांचा परिसर फारच नेत्रदीपक आहे. परतीच्या मार्गावर माझ्या चाणाक्ष नजरेने एक गवतात लपलेला भगवा अचूक टिपला आणि तेथेच मारुतीरायाची मूर्ती लपलेली आहे हे लक्षात आले. मग काय, आलो ती आणि थोडी फसवणारी वाट सोडून आम्ही अंजनीसूत हनुमानाच्या उघड्या-बोडक्या मूर्तीसमोर दाखल झालो. फारशा प्रचलित नसलेल्या गडकोटांवर हे असेच उघडे अवशेष दिसतात आणि पूर्वजांनी निर्माण केलेले हे अलौकिक सौंदर्य आणि त्यांची सद्यःस्थिती पाहून मन विषण्ण होते हे मात्र खरे. 

सायंकाळ व्हायच्या आत परत तांगडी गावात पोहोचायचे असल्याने आता विसावा घेऊन चालणार नव्हते. पावलांची गती वाढवत मावळत्या दिनकराचे सौंदर्य नजरेत आणि कॅमेऱ्‍यात साठवत पाझर तलावापाशी लावलेल्या गाडीपाशी कधी पोहोचलो ते कळलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आमच्या या दुर्गयात्रेचा शेवट कांचना-मंचना या जोड किल्ल्याने होणार होता. १६७०मध्ये सुरतेची दुसऱ्यांदा दाणादाण उडवून छत्रपती शिवाजी महाराज बागलाण प्रांताकडे परतत असताना या किल्ल्याच्या शेजारीच असणाऱ्‍या कांचनबारी (बारी म्हणजे खिंड), जिथे दाऊदखानाशी केलेले दोन हात आणि गाजलेली लढाई, ज्यात शिवरायांचा प्रत्यक्ष सहभाग होता, हे ठिकाण याची देही याची डोळा बघण्याचे स्वप्न आज पूर्ण होणार होते. खरेतर या किल्ल्याची प्रचलित वाट खेळबारी गावातून किल्ल्याकडे जाते. पण, सोग्रस फाट्यावरून पुरी गावामार्गे पानसरे मळा किंवा वस्तीपर्यंत गाडी जात असल्याने, तसेच या बाजूने फारशी चढण नसलेला मार्ग असल्याने आम्ही या मार्गाला पसंती दिली. गाडी पानसरे यांच्या घरापाशी लावून लगेचच गड चढाईला सुरुवात केली. तळातून कांचना-मंचना ही दोन  शिखरे आणि त्यामधील खिंड सहजपणे नजरेत भरते. ‘अल्याड डोंगर पल्याड डोंगर अन मधेच खोल खोल दरी..’ असेच काहीतरी या कांचन मंचन सुळक्याकडे पाहताना वाटत होते.

पानसरे मळ्यापासून अंदाजे पाचशे मीटर कच्च्या गाडीरस्त्याने पुढे गेल्यावर एक आदिवासी पाडा लागतो. तेथूनच किल्ल्याकडे जाणारी वाट सुरू होते. संपूर्ण मार्गावर घाणेरी आणि इतर काटेरी झुडुपांनी वाट भरून पावली आहे. एका तासातच ऐन खिंडीच्या खाली एका सपाटीवर आपण येऊन पोहोचतो. तेथे एक पाण्याचे टाके आहे, पण पाणी मात्र पिण्याजोगे नाही. येथून अवघ्या दहा मिनिटांत आपण या जोड किल्ल्यांच्या मधोमध असलेल्या खिंडीत पोहोचतो. खिंडीला लागूनच एक वाट कपारीत खोदलेल्या टाक्यांच्या समूहाकडे घेऊन जाते आणि तेथील पाणी मात्र रुचकर आहे. येथून किल्ल्यांकडे नजर टाकता उजवीकडे सुळकेवजा कांचना आणि डावीकडे भिंतीवजा मंचना हे जोडदुर्ग, वर कसे जायचे? हा संभ्रम आपल्या मनात उत्पन्न करतात. तळातून चढून येणाऱ्या वाटेवर बऱ्‍यापैकी ऊन असल्याने दमछाक झाली होती. ती खिंडीतील सावलीमध्ये घेतलेल्या थांब्याने विरून गेली आणि आम्ही या दुर्गांच्या दर्शनासाठी सज्ज झालो. 

कांचना किल्ल्यावर जाणाऱ्या पावट्या (छोट्या चौकोनी पायऱ्या) बऱ्यापैकी उद्‍ध्वस्त आहेत आणि हा सर्व टप्पा उभ्या कातळात खोदलेला आहे. त्यावर माजलेल्या निवडुंगासारख्या झाडोऱ्यामुळे वाट किचकट तर आहेच, पण वर जाण्यासाठी गिर्यारोहणाची साधने आणि तंत्र, तसेच भक्कम अनुभव पाठीशी हवा. कारण उभ्या कड्यात खोदलेल्या या पायऱ्या खालच्या दरीमुळे धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे फाजील आत्मविश्वास ठेवून त्यावर चढण्याचा प्रयत्न न केल्यास उत्तम. मी आणि मनोजने रोप लावून पहिल्या टप्प्यापर्यंत यशस्वी आरोहण केले, पण पुढील सुळक्यावर जायचा मार्ग बंद असल्याने आम्ही तेथूनच यशस्वी माघार घेतली. सर्व आरोहण संपवून आम्ही परत खिंडीत आलो आणि मंचनाच्या भिंतीला मागून वळसा घालत, पुरुषभर उंचीच्या गवतातून पाऊलवाट शोधत, किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग शोधून काढला. या पायऱ्या खराब असल्या तरी यासाठी कोणतीही साधने लागत नाहीत. अगदी सहजपणे आपण मंचनाच्या सपाट माथ्यावर प्रवेश करतो. माथ्यावर पोहोचता क्षणीच समोर कांचनाचा सुळका आणि त्यावर जाणारी अवघड पायऱ्यांची वाट पोटात धडकी भरवते. गडाच्या सपाटीवर पाण्याची टाकी, एक भुयारासारखा मार्ग आणि तेथून दिसणारी ईखारा, धोडप, रवळ्या-जवळ्या ही सातमाळ रांग केवळ लक्षणीय.

सुंदर वातावरणात सर्व बाजूंनी फोटो काढत आणि कांचनाच्या सुळक्याला पुन्हा पुन्हा न्याहाळत आम्ही परत खिंडीमध्ये पोहोचलो. तेथे खडकावर असलेल्या आणि पूर्ण झिजलेल्या अतिशय अस्पष्ट अशा हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. कपारीत खोदलेल्या टाक्यांमधील पाणी पिऊन आणि बाटलीत भरून आम्ही आमची ही चार दिवसांची दुर्गवारी समाप्त केली, आणि आल्या वाटेने पुण्यनगरीकडे निघालो.

निसर्गप्रेमी, साहसप्रेमी तसेच गडप्रेमी मित्रांनो मागील जानेवारीपासून म्हणजे गेले बारा महिने ‘सह्यगिरी’ या सदरातून मी अनेक अपरिचित किल्ल्यांची तुम्हाला ओळख करून दिली. मला भावलेला सह्याद्री माझ्या तुटपुंज्या लेखणीतून तुमच्या समोर सादर केला. या शेवटच्या पुष्पाच्या अंती मी एवढेच म्हणेन, की महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत, श्री. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही अनेक परिचित-अपरिचित ठिकाणे आहेत, ती श्रद्धेने आणि डोळसपणे पाहिली तर नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडेल आणि हाती काहीतरी वेगळेच गवसले याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. सह्याद्रीवरील या अनेक दुर्गम गडकोटांची मी गेली चाळीस वर्षे वारी करतोय. या सह्यपर्वताने विनासायास मला त्याच्या माथ्यावर आणि गिरिशिखरांवर यायची परवानगी दिली म्हणूनच हे आव्हान आणि छंद मी जोपासू शकलो यात माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे या सख्या सह्याद्रीचे ऋण व्यक्त करत आणि छत्रपती शिवरायांना त्रिवार मुजरा करत, मी वर्षभर चालविलेली लेखणी आता थांबवतो. अखेरीस कवी वसंत बापट यांच्या एका कवितेची आठवण होते. ते म्हणतात...

‘भव्य हिमालय तुमचा आमचा,
केवळ माझा सह्यकडा, 
गौरीशंकर उभ्या जगाचा, 
मनात पूजीन रायगडा....’ 

तुम्हीही या सह्यगिरीच्या वाऱ्या करून तेथील इतिहासाच्या खुणांचा मागोवा घ्यावा म्हणून आपणा सर्वांना भरघोस शुभेच्छा!

(या लेखाबरोबर ‘सह्यगिरी’ हे सदर समाप्त होत आहे.)
 

संबंधित बातम्या