अटलांटिक महासागर 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 2 मार्च 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

अटलांटिक महासागर पूर्वेला युरोप व आफ्रिका या खंडांनी मर्यादित केला असून, याच्या पश्चिमेला उत्तर व दक्षिण अमेरिका ही खंडे आहेत. उत्तरेला असलेल्या डेब्हिस उपसागर, डेन्मार्कची सामुद्रधुनी व नॉर्वे समुद्र या अरुंद जलाशयांनी हा महासागर आर्क्टिक महासागराला जोडला गेला आहे. दक्षिणेला याचा विस्तार अधिक आहे. ३५ अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ याची पूर्व-पश्चिम लांबी जवळ जवळ ५९२० किलोमीटर आहे. उत्तरेला ४० अंश उत्तर अक्षवृत्तापाशी हा महासागर ४८०० किलोमीटर विस्तृत आहे. मात्र, विषुववृत्तापाशी, याची पूर्व-पश्चिम लांबी खूपच कमी म्हणजे फक्त २२५० किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण भूपृष्ठापैकी १/६ क्षेत्र या सागरानं व्यापलं आहे. या सागराच्या एकूण क्षेत्रफळापैकी २४ टक्के क्षेत्र हे १००० मीटरपेक्षाही कमी खोलीवर आहे. 

अटलांटिक महासागरात समुद्रबूड जमिनीचा (Continental Shelf) विस्तार सगळीकडे सारखा नसून काही ठिकाणी ३ किलोमीटर तर काही ठिकाणी ८0 किलोमीटर इतक्या रुंदीचा हा विभाग आढळतो. 

जगातील सर्वांत मोठे समुद्रबूड न्यूफाऊंडलंड व ब्रिटिश बेटाजवळील ‘ग्रँड बँक’ व ‘डॉगर बँक’ या ठिकाणी आहेत. दक्षिण अटलांटिकमध्ये ३५ मीटर खोलीवर असलेल्या विस्तृत समुद्रवूड जमिनीस ‘पॅंटेगोनियन शेल्फ’ असं म्हणतात. फॉकलँड ही बेटं याच शेल्फवर आहेत. या महासागराचं आणखी एक वैशिष्ट्य असं, की उत्तर भागात, बाल्टिक समुद्र, हडसन उपसागर, उत्तर समुद्र, डेब्हिसची सामुद्रधुनी, डेन्मार्कची सामुद्रधुनी यांसारखी आखातं किंवा पार्श्ववर्ती समुद्र (Marginal Seas) आहेत. संपूर्ण अटलांटिकच्या समुद्रबूड जमिनीवर वेस्ट इंडिज, ब्रिटिश बेटं, न्यू फाऊंडलंड, अझोर्स, केप वेर्दे, कॅनरी यासारखी अनेक लहानमोठी बेटं आहेत. 

इंग्लिश ‘S’ या अक्षरासारखी व अटलांटिकच्या जवळ जवळ मध्यातून उत्तर-दक्षिण पसरलेली अशी ‘अटलांटिक रीज’ नावाची पर्वतरांग हे अटलांटिकचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. उत्तरेला आइसलँडपाशी सुरू होणारी ही रांग दक्षिणेस बौव्हेट बेटाशी संपते. या पर्वतरांगेच्या आइसलँड ते स्कॉटलँडपर्यंतच्या भागाला ‘बीव्हीले थॉमसन रीज’ असं  म्हणतात. ग्रीनलंड ते आइसलँडच्या भागात पसरलेल्या या रांगेच्या रुंद भागाला ‘टेलिग्राफ पठार’ म्हणून ओळखण्यात येतं. या पर्वतरांगेचा ‘S’ या इंग्रजी अक्षरासारखा आकार एक महत्त्वपूर्ण गोष्ट सुचवतो, ती अशी, की सागराच्या दोन्ही बाजूला असलेली भूमिखंडं पूर्वी कधीतरी एकाच सलग भूमिखंडाचे भाग असावेत! 

सर्वसाधारणतः ही पर्वतरांग दोन्ही किनारपट्ट्यांना समांतर असून तिचे अनेक फाटे दोन्ही किनाऱ्याच्या दिशेनं पसरले आहेत. दक्षिणेकडं असलेल्या अनेक फाट्यांपैकी ‘गिआना रीज’, ‘वाल्व्हीस रीज’ हे महत्त्वाचे आहेत. या पर्वतरांगेची एकूण लांबी १४ हजार ४०० किलोमीटर आहे. या रांगेची रुंदी ४००० मीटरपेक्षा अधिक नाही. उत्तरेकडं ही रांग जास्त रुंद असून दक्षिणेकडं निमुळती होत गेलेली आहे. विषुववृत्तापाशी असलेल्या अरुंद ‘रोमांश रीज’मुळं  या संपूर्ण पर्वतरांगेचे दोन भाग झाले आहेत. उत्तरेकडच्या भागास ‘डॉल्फीन राइज’ व दक्षिणेकडच्या भागास ‘चॅलेंजर राइज’ असं म्हणतात. या जलमग्न पर्वतश्रेणीच्या तळाशी, अत्यंत मंदगतीनं भूकवचाची पश्चिमेकडं हालचाल होत आहे. 

पाण्याखाली असलेल्या या पर्वतरांगेवरील पर्वतांची शिखरं अनेक ठिकाणी बेटाच्या स्वरूपात पाण्याच्या वर आली आहेत. अझोर्स बेटांच्या समूहातील ‘पिको बेट’ हे सर्वांत उंच बेट असून त्यावरील ज्वालामुखीची उंची समुद्रसपाटीपासून २२९५ मीटर आहे. 

मध्यवर्ती पर्वतरांगेमुळं अटलांटिक महासागराचे पूर्व व पश्चिम असे दोन प्रमुख भाग झाले आहेत. या दोन्ही भागांत अनेक सागरी खळगे (Ocean basins) आढळतात. लॅब्राडोर बेसिन, स्पॅनिश बेसिन, नॉर्थ अमेरिकन बेसिन, केप वेर्दे, गिआना, ब्राझील व अंगोला बेसिन, अगुल्हास व अर्जेंटिना बेसिन या नावानं ओळखले जाणारे खळगे त्यांच्या खोलीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. 

अटलांटिकच्या किनारपट्टीवर अर्वाचीन वलीपर्वत (Fold mountains) नाहीत. त्यामुळं अटलांटिकच्या तळभागावर सागरी गर्ता (Trenches) खूपच कमी आहेत. मध्यवर्ती पर्वतरांगेमुळं पूर्व व पश्चिमेकडं खंडान्त उताराचं (Continental slope) प्रमाणही बरंच कमी आहे. त्यामुळंच खूप खोलीच्या गर्ता या महासागरांत निर्माण होऊ शकलेल्या नाहीत. 

संबंधित बातम्या