आर्क्टिक महासागर

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 16 मार्च 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवती वर्तुळाकृती आकारात पसरलेला आर्क्टिक महासागर हा एक सर्वथैव वेगळाच समुद्र आहे. दीड कोटी चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा हा महासागर विशाल अशा प्रशांत महासागराच्या केवळ आठ टक्के एवढंच क्षेत्र व्यापतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे भूवेष्टित (Landlocked) असून केवळ काही ठिकाणीच तो अटलांटिक आणि प्रशांत महासागरांना जोडला गेला आहे. १७० अंश पश्चिम रेखावृत्ताजवळ असलेल्या बेरिंगच्या (Bering) सामुद्रधुनीमार्गे तो प्रशांत महासागराशी जोडला गेला आहे तर ग्रीनलँड, आइसलँड आणि ब्रिटिश बेटांजवळ या महासागराचं पाणी अटलांटिकच्या पाण्यात मिसळून जाताना आढळून येतं. 

आर्क्टिक महासागर हा अगदी अलीकडच्या काळातच पृथ्वीवर तयार झाला. तो केवळ एक लाख वर्ष जुना असल्याचं सागरविज्ञानातील संशोधन सांगतं. यामुळंच गेली अनेक शतकं त्याच्या विषयीची फारशी माहिती उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षांत मात्र या महासागराचं खूप मोठं संशोधन झाल्यामुळं त्याच्याविषयी माहितीचा मोठा खजिनाच समोर आला आहे. हे संशोधन असं सांगतं, की हा महासागर म्हणजे वास्तवात ग्रीनलँड-आइसलँड-फॅरोज पर्वतरांग आणि भूमध्य समुद्र यांचाच विस्तारित असा जलप्रदेश आहे! वर्षातला मोठा कालखंड हा महासागर गोठलेलाच असतो. त्यामुळंही महासागराच्या संशोधनात अनेक अडचणी येत असतात. 

आर्क्टिकमध्ये गेल्या साडेसहा कोटी वर्षांचा जो भूभौतिक (Geophysical) माहितीसाठा (Database) मिळाला आहे त्यावरून सागरवैज्ञानिकांना या महासागराचा भूशास्त्रीय इतिहास उलगडता आला. त्यातून असं लक्षात आलं, की साडेचौदा ते साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आर्क्टिक अलास्का हे भूतबक (Tectonic Plate) उत्तर अमेरिकन भूतबकापासून वेगळं झाल्यामुळं या महासागराची निर्मिती झाली. या समुद्राच्या तळभागावर आठ कोटी वर्षं जुना चिखलयुक्त गाळ आणि साडेसहा कोटी वर्षं जुना सिलिकायुक्त गाळ सापडला. त्यावरून असंही लक्षात आलं, की कमीतकमी चार कोटी वर्षांपूर्वीपर्यंत या महासागराचं पाणी उबदार होतं आणि जैविकदृष्ट्या हा समुद्र भरपूर उत्पादक (Productive) होता.    

रशियाच्या नोवोसोबिर्स्क बेटापाशी सुरू होणाऱ्या व उत्तर ध्रुवापासून ग्रीनलँड आणि एल्समेर बेटांपर्यंत पसरलेल्या मध्यवर्ती पर्वतरांगेमुळं आर्क्टिक महासागराचे दोन भाग झाल्याचं दिसून येतं. ही पर्वतरांग १८०० किलोमीटर लांब असून तिला लोमोनोसोव्ह पर्वतरांग असंही म्हटलं जातं. तिची रुंदी ६४ किलोमीटरपासून २०० किलोमीटर अशी आहे. यामुळं झालेल्या दोन भागांपैकी युरेशियाच्या जवळ असलेल्या भागाला युरेशिअन खळगा (Basin) आणि अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ असलेल्या भागाला अमेरेसिया खळगा म्हटलं जातं. 

या बुडालेल्या पर्वतरांगेवर अनेक सागरी गर्ता (Trenches) आहेत. ही पर्वतरांग अतिशय तीव्र उताराची असून तिचे अनेक फाटे आजूबाजूच्या समुद्रांत पसरलेले दिसून येतात. अटलांटिक महासागरांतील मध्यवर्ती पर्वतरांगेचा एक भाग उत्तरेकडं आर्क्टिक महासागरापर्यंत गेलेला आढळतो. ही रांग नान्सेन पर्वतरांग या नावानं ओळखली जाते.    

या महासागरांत अलास्का आणि ग्रीनलॅंडच्या उत्तरेकडची समुद्रबूड जमीन (Continental Shelf) ९५ ते २०० किलोमीटर रुंद आहे. युरेशियाच्या किनाऱ्याजवळ ती ४८० ते १९७० किलोमीटर रुंद आहे. ही समुद्रबूड जमीन अनेक घळ्यांनी विदीर्ण झालेली आहे. आर्क्टिक महासागरातील समुद्रबूड जगातल्या सगळ्या महासागरांतील समुद्रबूड जमिनींपेक्षा रुंद असून कॅनेडियन द्वीपसमूह, ग्रीनलँड आणि युरेशियातील अनेक बेटं आर्क्टिकमधल्या समुद्रबूडावरंच आहेत!

पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव या महासागरातील फ्रॅम खळगा या २३४५ फॅदम (४.३ किलोमीटर) खोलीवरील प्रदेशांत असून तो नान्सेन आणि लोमोनोसोव्ह पर्वतरांगांनी वेढलेला आहे. आर्क्टिकच्या पार्श्ववर्ती भागांत (Rim), न्यू सैबेरिअन, नोवाया झेमल्या, स्पिट्सबर्जेन, बोअर आयलंड व जॅन मायेन यांसारखी अनेक मोठी बेटं आढळून येतात. आर्क्टिकच्या किनाऱ्यावर ब्युफोर्ट समुद्र, पूर्व सैबेरिअन समुद्र, लॅपटेव समुद्र, कारा समुद्र आणि बॅरंट समुद्र असे अनेक पार्श्ववर्ती समुद्रही आहेत, जे सगळे उथळ आणि वर्षातला मोठा कालखंड पूर्णपणे गोठलेलेच असतात! जागतिक तापमान वृद्धीमुळं इथला बर्फ वितळून त्याचं नीचांकी प्रमाण वर्ष २०१९ च्या निरीक्षणात दिसून आलं. आर्क्टिकवरचे हिम आवरण २० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रातून आता नष्ट झालं आहे!

संबंधित बातम्या