समुद्रतळावरील गाळ

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 23 मार्च 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

सागरतळावर जमणाऱ्या सर्व प्रकारच्या गाळाला 'सागरी निक्षेप' (Marine Deposits) असं म्हणतात. जमिनीच्या झिजेनंतर तयार झालेला सगळा गाळ अखेरीस समुद्रतळावर जाऊन साचतो. या गाळाचं संचयन, समुद्रतळावर खूप मोठ्या प्रमाणावर होतं. सागरी निक्षेपात या गाळाबरोबरच मृत अशा सागरी वनस्पती व सागरी जीवांचा समावेश केला जातो.

जमिनीवरील गाळ जितक्या सहजपणे दिसू शकतो, तितक्या सुलभतेनं सागरी निक्षेप पाहता येत नाही. भूपृष्ठाच्या ऊर्ध्वगामी हालचालीनंतर सागरतळाचा प्रदेश वर येऊन उघडा पडल्यावर त्यावरून अशा निक्षेपांचं स्वरूप समजून येतं. अनेक वेळा सागरतळावरील गाळ हा शास्त्रीय संशोधनाकरता मुद्दाम, महाकाय अशा यंत्राच्या साहाय्यानं वर काढला जातो व त्याचा अभ्यास केला जातो.

भूपृष्ठाच्या हालचालीनंतर समुद्रतळावर तयार झालेले जलजन्य स्तरित खडक वर येतात. समुद्रसपाटी खाली गेल्यानंही असे खडक उघडे पडतात. या स्तरित खडकांमध्ये अनेक सागरी जीवांचे अवशेष गाडले गेलेले आढळून येतात. सागरतळावर आढळणाऱ्या निक्षेपांचं विशिष्ट गटांत वर्गीकरण केलं जातं.
१)    किनाऱ्याजवळच्या प्रदेशावरील निक्षेप (Littoral Deposits) : उधाणाची भरती व उधाणाची ओहोटी यांच्या मर्यादेमधील निक्षेपांचा यात समावेश होतो.
२)    उथळ पाण्यातील निक्षेप (Shallow Water Deposits) : ओहोटीच्या मर्यादेपासून १८३ मीटर (१०० फॅदम) खोलीपर्यंतच्या सागरतळावरील निक्षेप यात समाविष्ट केले जातात. साधारणत: हे निक्षेप समुद्रबूड जमिनीच्या सागरतळाकडील मर्यादेपर्यंत असतात. 
३)    गभीर निक्षेप (Bathyal Deposits) : प्रामुख्याने हे निक्षेप सागरी उतारावर सापडतात.
४)    अगाधीय निक्षेप (Abyssal Deposits) : सागरी मैदानं व सागरी गर्ता यामध्ये सापडणाऱ्या निक्षेपांचा यात समावेश केला जातो.

या सर्व सागरी निक्षेपांचं भूजन्यप्राणिज असंही वर्गीकरण केलं जातं.

भूजन्य निक्षेप (Terrigenous Deposits) : 
बऱ्याच अंशी, हे निक्षेप समुद्रबूड जमीन व सामुद्रिक उतार या दोन विभागांवरच आढळून येतात. यात वाळू, दगडगोटे, माती इत्यादींचा समावेश होतो आणि असा सर्व गाळ किनाऱ्यावरील नद्यांनी वाहून आणून समुद्रात टाकलेला असतो किंवा किनाऱ्याची समुद्रलाटांनी झीज होऊन तयार झालेला असतो. 
सागरी गर्तांमध्ये असलेल्या निक्षेपात कॅल्शियमचं प्रमाण फारच कमी असल्याचं आढळलं आहे. ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडलेली राख हवेतून तरंगत सारगपृष्ठावर येऊन पडते. या राखेचं जास्त संचयन झाल्यावर ती कालांतराने जड होऊन सागरतळावर पोचते. सागरी मैदानं व सागरी गर्ता या विभागातही ही राख आढळून येते. 

भूजन्य निक्षेपाचे काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत -
(१) निळ्या रंगाचा चिखल (Blue Mud) : भूवेष्टित समुद्रांत व समुद्रबूड जमिनीवर हा चिखल फार मोठ्या प्रमाणात आढळतो. खडकातील लोखंडाचे सल्फाइड व सेंद्रिय द्रव्य यांच्यामुळं या गाळाला निळा रंग प्राप्त होतो.  
(२) तांबड्या रंगाचा चिखल (Red  Mud) : समुद्रबूड जमिनीवर फार मोठ्या लोहयुक्त घटकांमुळं याला तांबडा रंग येतो. इतर भूजन्य निक्षेपांच्या तुलनेनं हा निक्षेप सागरतळावर फारच अभावानं आढळतो. पीत समुद्र, ब्राझीलचा किनारा व अटलांटिकचा बराचसा तळभाग या ठिकाणी हा निक्षेप विशेषत: आढळतो.
(३) हिरव्या रंगाचा चिखल (Green Mud) : ज्या समुद्रबूड जमिनीवर फार मोठ्या नद्या येऊन मिळत नाहीत, अशा ठिकाणी हिरव्या रंगाच्या चिखलाचं प्रमाण जास्त असतं. १०० ते ९०० फॅदम खोलीवर उत्तर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या किनारपट्टीवर हा चिखल दिसतो. ग्लुकोनाईटमुळं चिखलाला हिरवा रंग प्राप्त होतो.

प्राणिज निक्षेप (Pelagic Oozes) : प्रवाळ, शंख, शिंपले इत्यादींच्या अवशेषांपासून तयार झालेल्या सेंद्रिय निक्षेपास उथळ प्रदेशातील निक्षेप म्हटलं जातं. प्लँक्टन नावाच्या सागरी जिवाच्या अवशेषापासून तयार झालेले जे निक्षेप आढळतात त्यांना प्राणिज गाळ किंवा उझ म्हणतात. हे निक्षेप प्रामुख्यानं खोल समुद्रात आढळतात. ग्लोबिजेरिना, रेडिओलॅरिअन, डायाटम आणि टेरेपॉड हे प्राणिज गाळाचे मुख्य प्रकार आहेत.

संबंधित बातम्या