प्रवाळ आणि प्रवाळ खडक

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 6 जुलै 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

 

प्रवाळ आणि प्रवाळ खडक (Corals and Coral Reefs) हा समुद्रातील जैवविविधतेचा एक अतिशय सुंदर असा आविष्कार आहे. उथळ समुद्रातील प्रवाळ जीव आपल्याभोवती चुन्याचे उत्सर्जन करून त्याची कवचे तयार करतात. प्रवाळ जीव मृत झाल्यावर त्यांचे अवशेष व अल्गी वनस्पतीने टाकलेला चुनायुक्त क्षार एकत्र येऊन त्यापासून प्रवाळाचे किंवा पोवळ्याचे खडक तयार होतात. प्रवाळांच्या या खडकांना प्रवाळ मंच किंवा प्रवाळ भित्ती (Coral Reef) असे म्हटले जाते. प्रवाळ खडक तयार करणारे प्रवाळ हे एकत्रितपणे चुन्याचे संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत. 

सध्याच्या युगातील प्रवाळ हे खंडीय मंच किंवा समुद्रबूड जमिनीवर आणि खोल समुद्रातील बेटांच्या अवतीभोवती वाढताना आढळतात. १६ अंश ते ३६ अंश सेल्सिअस इतके सागरजलाचे तापमान, दर हजारी २५ ते ४० इतकी क्षारता, घट्ट व गुळगुळीत सागरतळ, पाण्याची सहज हालचाल आणि जोरदार भरती प्रवाह अशी परिस्थिती असणारे अपतट प्रदेश हे प्रवाळांच्या वाढीला आदर्श असे समुद्री विभाग असतात. गाळाचे संचयन किंवा गाळयुक्त समुद्र प्रवाह हे प्रवाळांच्या वाढीला प्रतिकूल असतात; कारण प्रवाळांच्या कठीण कवचाला असलेल्या छिद्राछिद्रांत हा गाळ अडकतो व प्रवाळांचे जीवनच नष्ट करतो. समुद्रात २० मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात पोचू शकतो, त्यामुळे या खोलीपर्यंत प्रवाळांची चांगली वाढ होऊ शकते. जगातील बहुतांशी समुद्रात ६० ते ९० मीटर खोलीपर्यंत प्रवाळ आढळतात. ज्या भागात समुद्र प्रवाह आहेत, अशा समुद्रातही प्रवाळ चांगले वाढतात. कारण इथे त्यांना, प्रवाहांनी आणलेली विविध अन्नद्रव्ये मिळतात. त्यामुळेच बंदिस्त समुद्र, उपसागर यासारख्या ठिकाणी प्रवाळ फारसे आढळत नाहीत.

समुद्र प्रवाह आणि लाटा यांमुळेच प्रवाळ खडकांना विविध आकार येतात असे आता लक्षात आले आहे. जिथे समुद्र प्रवाह हे शीत म्हणजे थंड पाण्याचे असतात, तिथे प्रवाळ वाढू शकत नाहीत. प्रवाळांच्या वाढीला प्राणवायू जास्त असलेले सागरजल व जलशैव (Plankton) यांचीही आवश्यकता असते. संपूर्ण जगातील महासागरांचा विचार करता असे दिसते, की ३० अंश उत्तर ते ३० अंश दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानचा प्रदेशच प्रवाळांच्या वाढीस सर्वाधिक अनुकूल आहे आणि म्हणूनच पृथ्वीवरच्या उष्ण कटीबंधीय प्रदेशात, प्रवाळ द्वीपे आढळतात.

मृत प्रवाळांच्या वसाहतीतच नवीन प्रवाळ जन्म घेतात व प्रवाळ खडकाचा विस्तार वाढू लागतो. त्यांची वाढ ही प्रवाळ द्वीपाच्या बाजूस व मध्याच्या दिशेने होते. अनेक वेळा लाटांच्या माऱ्यामुळे प्रवाळ खडक फुटतात व प्रवाळ पदार्थांचा चुरा, खडकातील भेगांत साठून राहतो.

प्रवाळांच्या एकूण १० लाख जाती आज ज्ञात आहेत. मात्र, त्यातल्या केवळ १० टक्के प्रजातींचाच सविस्तर अभ्यास झालेला आहे. जगातील अनेक ठिकाणी प्रवाळांचे नष्ट होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. पृथ्वीचे वाढणारे तापमान संवेदनशील अशा प्रवाळांचा नाश होण्यास कारणीभूत ठरते आहे. 

सामान्यपणे प्रवाळ भित्तींचे (Reefs) तीन प्रकार आढळतात. सीमावर्ती (Fringing), रोधक (Barrier) व कंकणाकृती (Atoll). किनाऱ्याजवळ, सीमावर्ती भागात तयार होणाऱ्या प्रवाळ खडकांना फ्रिजिंग रीफ म्हटले जाते. किनारा व हे खडक यांच्या दरम्यान एक अरुंद असा उथळ पाण्याचा प्रदेश असतो, याला लेंगून म्हटले जाते. 

सीमावर्ती फ्रिजिंग रीफ हे प्रवाळ प्रदेश अरुंद व लांब असतात. साधारणपणे दीड ते २ किलोमीटर लांबीचे हे प्रवाळ मंच समुद्रात १५ फॅदम (२४ मीटर) खोलीपर्यंत आढळतात. 

लक्षद्विप व अंदमान द्वीपसमूह तसेच सुमात्रा, सेलेबस व तांझानिया येथे या प्रकारचे प्रवाळ खडक दिसून येतात. जेव्हा किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर प्रवाळ खडक तयार होतात, तेव्हा त्यांना रोधक किंवा 'बॅरिअर रीफ' असे म्हटले जाते. रीफ व किनारा यामध्ये विस्तीर्ण व उथळ असा समुद्राचा लेंगून सदृश विभाग असतो. बॅरिअर रीफची प्रवाळ रांग ही सलग नसते. ती अनेक ठिकाणी खंडीत झालेली असते. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस क्किन्सलँडच्या किनाऱ्याजवळ ग्रेट बॅरिअर रीफ नावाची एक प्रवाळ भिंत असून ती सुमारे १९०० किलोमीटर लांब आहे. 

प्रवाळ भित्तीचा तिसरा प्रकार म्हणजे कंकणाकृती प्रवाळ मंच. हे प्रवाळ ही रोधक प्रवाळांप्रमाणेच खंडित झालेले असतात. यांचा आकार नालाकृती किंवा कंकणाकृती असतो. यांच्या आतल्या म्हणजे मध्यवर्ती भागात एक उथळ लगून असते. दिगो गार्सिया हे हिंदी महासागरातील छोटेसे प्रवाळ कंकण आहे. अंदमान व लक्षद्विप समुद्रातही अनेक प्रवाळ कंकण, रोधक मंच व सीमावर्ती प्रवाळ आहेत. 

संबंधित बातम्या