किनारी भूरूपे 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

समुद्र किनारे हा पृथ्वीवरच्या निसर्ग सुंदर प्रदेशांपैकी एक अतिशय सुंदर प्रदेश आहे! जगातल्या सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचे विलक्षण आर्जवी सौंदर्य आणि विविधता यामुळे माणसाला पहिल्यापासूनच मोठे आकर्षण वाटत आले आहे. कधीही न थांबता अव्याहतपणे सुरू असलेले लाटांचे फुटणे, त्यांची गाज, भरती-ओहोटी यामुळे किनाऱ्यांचा जिवंतपणा नेहमीच जाणवत राहतो. अव्याहत बदल हा इथला स्थायीभावच आहे! जगातले सगळेच समुद्र किनारे विलक्षण सुंदर अशा सागरी भूरूपांनी नटलेले आहेत आणि किनारी भागातल्या अनेक घटकांमुळे त्यांना हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. 

समुद्र पृष्ठावरील वाऱ्यांमुळे अनेक प्रकारच्या लाटा तयार होतात. लाटांची दिशा, उंची आणि वेग यांत ऋतूनुसार खूप बदल होत असतात. आपल्याकडे मॉन्सूनच्या आधी व मॉन्सूननंतरच्या काळात म्हणजे फेब्रुवारी ते मे आणि ऑक्टोबर ते जानेवारी या काळात वायव्य व पश्चिम दिशेकडून साधारणपणे ३ ते ८ नॉट (ताशी ७ ते १८ किमी) वेगाने येणाऱ्या २ मीटर उंचीच्या लाटा, मॉन्सूनमध्ये नैऋत्येकडून १४ नॉट (ताशी ३२ किमी) वेगाने वाहतात. त्यांची उंची ५ ते ७ मीटर इतकी वाढते. 

अनेक भूशिरे (Headlands), समुद्रकडे (Sea Cliffs), समुद्रगुहा (Sea Caves), मोठमोठ्या खडकांच्या आणि दगडांच्या राशी, लाटांनी घासून तयार केलेले तटीय मंच (Shore Platforms) आणि वाळूच्या छोट्या छोट्या पुळणी अशी विलक्षण सुंदर भूरूपे खडकाळ (Rocky) किनाऱ्यावर नेहमीच दिसून येतात. ठराविक तासांनी येणाऱ्या भरती आणि ओहोटीमुळे इथल्या खाड्या आणि पुळणी आपले जीवनचक्र सारखे बदलत असतात. भरतीच्यावेळी नदीमुखात घुसणारे पाणी, अनेक किमी अंतर कापून नदीत घुसते. त्याबरोबर अनेक सागरी जीवही प्रवास करतात. भरतीच्यावेळी पुळणी पाण्याखाली जाऊ लागतात. ओहोटीच्यावेळी पाणी पुन्हा वेगाने समुद्राच्या दिशेने उतरू लागते. 

पावसाळ्यात भरतीचे प्रवाह ओहोटी प्रवाहाइतकेच वेगवान असू शकतात. शिवाय ते पाण्यात भोवरेही निर्माण करतात. या भोवऱ्यांच्या जागाही बदलत राहतात.  ठराविक काळाने येणाऱ्या भरती ओहोटीतील तफावत (Tidal range) एक मीटरपासून अनेक मीटर असू शकते. किनाऱ्याच्या रचनेनुसार (Configuration) यात थोडाफार बदलही होतो. याबरोबरच किनाऱ्याला समांतर वाहणारे तटवर्ती प्रवाहही असतात. आजकाल हळूहळू वाढणाऱ्या सागर पातळीमुळे आत्तापर्यंत माहीत असलेल्या समुद्र प्रवाह चक्रातही बदल होऊ लागलेत. स्थानिकांना पावसाळ्यातील आणि नंतरच्या दिवसातील आपल्या परिसरातील समुद्र किनाऱ्यावरच्या लाटांचे, भरती ओहोटीचे, प्रवाहांचे नेमके व अचूक ज्ञान असते. पण वाढणाऱ्या सागर पातळीमुळे त्यांचीही गणिते आता थोडी चुकू लागली आहेत. 

किनाऱ्यावर आढळणाऱ्या पुळणी (बीचेस) खूपच वैविध्यपूर्ण असतात. पावसाळ्यात सर्वच पुळणींची अतोनात क्षती होते आणि त्या अरुंद होतात. सामान्यपणे बऱ्याचशा पुळणी या वाळूच्या असल्या तरी काही पुळणीवर चिखलाचे प्रमाणही वाढताना दिसते. खडकाळ किनाऱ्यावर लांब रुंद असे सागरतट मंच असून त्यांच्या जमिनीकडच्या, डोंगर पायथ्याच्या बाजूंवर मोठमोठ्या शीळा आणि दगडांचा खच पडलेला दिसतो. लाटांच्या सदैव सुरू असलेल्या माऱ्यामुळे हे दगड फुटून, विदीर्ण होऊन सर्वत्र पसरलेले दिसतात. पावसाळ्यात भरतीच्यावेळी हा प्रदेश रौद्र रूप धारण करतो. भरतीच्यावेळी वर आलेले पाणी या मंचावर ठिकठिकाणी साठून, मंचावरील खडक निसरडे होतात. या मंचावर हजारो वर्षांच्या पाण्याच्या आघातामुळे अनेक खड्डे पडून डबकी तयार होतात. काही किनाऱ्यांच्या विस्तीर्ण खडकावर वाळू आणि चिखलयुक्त मातीत खारफुटीची झाडे वाढलेली दिसतात. सगळ्या किनाऱ्यांवर उंचच उंच समुद्र कडे आणि अरुंद  पण खोल गुहा दिसतात. पावसाळ्यात लाटांची उंची आणि प्रभाव वाढल्यामुळे हे कडे आणि गुहा अधिक धोकादायक होतात

संबंधित बातम्या