समुद्रातील लाटा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

समुद्राच्या पृष्ठभागावर निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली सतत सुरू असतात. काही हालचालींत जलबिंदू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेले जातात, तर काही हालचालींत सागरपातळी नुसतीच वर-खाली होते. सागरपृष्ठावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रावर विविध प्रकारच्या लाटा (Sea Waves) तयार होतात. सागरजलाच्या अस्थिरतेचे हे नेहमी आणि सहज आढळणारे रूप आहे. 

समुद्रलाटेचे सर्वसामान्य रूप पाहिले तर असे दिसते, की प्रत्येक लाटेवर शिखर किंवा उंचवटा (Crest) आणि गर्ता (Trough) म्हणजे खोल भाग असे दोन मुख्य भाग आहेत. दोन शिखरातील अंतरास तरंगलांबी (Wave length) आणि शिखराची उंची व खोल भागाची उंची यातील फरकास लाटेची उंची (Wave Height) असे म्हणण्याचा प्रघात आहे. कमी तरंगलांबीपासून जास्त तरंगलांबीपर्यंतच्या अनेक लाटा समुद्रपृष्ठावर तयार होत असतात. अशा सर्व प्रकारच्या सागरी लाटा त्यांचा प्रवेग (Velocity), उंची (Height) व वारंवारता (Frequency) गुणधर्मानुसार बदलत असतात. 

सामान्यपणे शिखरावरील जलकण हे लाट ज्या दिशेने पुढे सरकत असेल त्याच दिशेने पुढे जाताना दिसतात. परंतु, खोल भागातील कण लाटेच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसतात. याचा परिणाम असा होतो, की खोल भागाच्या उजवीकडील व डावीकडील शिखरातील जलकण स्वतःभोवती वर्तुळाकृती मार्गाने फिरतात. मात्र सागरपृष्ठावरील लाटांचे स्वरूप इतके सोपे नसते. वाऱ्याच्या वेगामुळे सागरपृष्ठावर लाटांची खूप मोठी शिखरे व खोल भाग तयार होतात आणि लाटा फार वेगाने पुढे सरकतात. लाटांतील जलकण स्वतःभोवती फिरत असले तरी जलकणांच्या हालचालींचा एकत्रित परिणाम लाट पुढे सरकण्यात होत असतो. 

समुद्रामध्ये कमी-जास्त तीव्रतेच्या लाटा निर्माण होण्यामागे वारा हेच कारण आहे. जास्त तरंग लांबीची लाट जास्त काळ टिकून राहते. अशा लाटेचा वेगही जास्त असतो. हिंदी महासागरात पश्चिमेकडे लाटांचा वेग सर्वांत जास्त म्हणजे दर सेकंदाला १५ मीटर इतका दिसून येतो. लाटेची उंची हीसुद्धा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. सामान्यतः महासागरात आढळणाऱ्या लाटांचा वेग एकदम कमी होतो आणि तळभागाशी होणाऱ्या जलकणांच्या घर्षणामुळे लाटेची उंचीदेखील वाढते. उंची प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास लाट फुटते. फुटणाऱ्या लाटेस भग्नोर्मी  (Breaker) असे म्हणतात. उतरत्या (Sloping) किनारपट्टीवर ही लाट एकापेक्षा अधिक वेळा फुटलेली आढळते.

समुद्रबूड जमिनीच्या (Continental Shelf) खोलीवरही लाटांचे फुटण्याचे प्रमाण अवलंबून असते. समुद्रबूड जमिनीवर पाणी जसजसे उथळ होत जाते, तसतशा लाटा फुटत राहतात. परंतु, खोल समुद्रात त्या फुटत नाहीत. किनाऱ्याजवळ आल्यानंतर पाण्याच्या उथळपणामुळे लाटेची उंची वाढते व ती फुटते. ती फुटल्यानंतर किनाऱ्याला समांतर वाहणारे प्रवाह तयार होतात. या प्रवाहांना ‘तट समांतर प्रवाह’ (Longshore Currents ) असे म्हणतात. 

समुद्राच्या पृष्ठभागापासून जसे आपण अधिकाधिक खोल जातो, तशी जलकणांची ही वर्तुळाकृती हालचाल कमी होत जाते. काही मीटर खोलीवर जलकणांची हालचाल जवळजवळ नष्टच होते. यामुळेच पाणबुड्या बोटी खवळलेल्या समुद्रातदेखील जास्त खोलवर स्थिर उभ्या राहू शकतात. 

लाटा नेहमीच वाऱ्यामुळे तयार होतात असे नाही. वायुभारात (Atmospheric Pressure) अचानक झालेला बदल, सागरतळावर होणाऱ्या हालचाली यामुळेही खूप मोठ्या व जास्त वेगाच्या आणि अधिक काळ टिकणाऱ्या लाटा निर्माण होतात. यांना विध्वंसक लाटा (Destructive Waves) म्हणतात. सागरतळावर भूकंप झाल्यास किंवा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास अशा लाटा तयार होतात. अनेक वेळा समुद्रावर किनाऱ्यापासून खूप दूर निर्माण झालेल्या लाटा हजारो मैल लांबपर्यंत पसरतात आणि किनाऱ्यावर विध्वंस घडवून आणतात. 

अलास्कातील अल्युशिअन बेटावर १९४६ मध्ये निर्माण झालेल्या लाटांचा जोरदार तडाखा ३२०० कि.मी. दूर असलेल्या हवाई बेटांना बसला होता. १७ जुलै १९९८ रोजी समुद्रातील भूकंपामुळे निर्माण झालेल्या लाटेत पापुआ न्यूगिनीत हजारो लोक बेघर झाले होते. वादळी हवेमुळेही अशा लाटा तयार होतात. सागरपृष्ठावरील हवेतील वायुभारात एकदम होणारे बदल अनेकदा या लाटा निर्माण करतात.

संबंधित बातम्या