भरती-ओहोटी

डॉ. श्रीकांत कार्लेकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

दररोज समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या भरती ओहोटीचे (Tides) सर्वांनाच विलक्षण कुतूहल आणि आकर्षण असते. सागरजलाची ही एक महत्त्वपूर्ण हालचाल असून या हालचालीचा परिणाम समुद्रातही बराच खोलपर्यंत जाणवतो. समुद्राचे पाणी दिवसाच्या काही ठराविक काळात किनाऱ्यावरून पुढे येते व ठराविक काळात मागे जाते, यास भरती-ओहोटी असे म्हणतात.

समुद्राच्या पाण्याला येणाऱ्या या भरती-ओहोटीचे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार दोन भरतीमधल्या किंवा दोन ओहोटीमधल्या वेळेच्या अंतरावरून (Time difference) ठरविलेले आहेत. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

  • दैनिक भरती-ओहोटी (Diurnal Tides) : या प्रकारात दोन भरती किंवा दोन ओहोटीमधील अंतर सुमारे २४ तास ४८ ते ५० मिनिटे इतके असते.
  • अर्ध दैनिक भरती-ओहोटी (Semi Diurnal Tides) : दोन भरती किंवा दोन ओहोटीमधील अंतर सुमारे १२ तास २४ ते २५ मिनिटे इतके असते.
  • उधाणाची दैनिक भरती-ओहोटी (Spring Tide) : पंधरा दिवसांतून फक्त एकदा, पौर्णिमेला किंवा अमावस्येला ही भरती किंवा ओहोटी आढळते. या वेळी समुद्राचे पाणी फार मोठ्या प्रमाणावर ठराविक काळाने वर चढते किंवा खाली जाते.
  • भांगाची भरती-ओहोटी (Neap Tide) : पंधरा दिवसांतून एकदा अष्टमीच्या दिवशी हा प्रकार आढळतो. या दिवशी समुद्रपृष्ठावर ठराविक काळाने कमी उंचीची भरती किंवा ओहोटी येते.
  • मासिक भरती-ओहोटी (Monthly Tide) : चंद्राच्या उपभू (Perigee) किंवा अपभू (Apogee) या म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यातील अंतर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त असण्याच्या स्थितीच्या वेळी महिन्यातून एकदा ही भरती-ओहोटी येते.
  • षण्मासिक किंवा सांपातिक भरती-ओहोटी (Equinoctial Tide) : दर सहा महिन्यांनी सूर्य पृथ्वीभोवती भासमान भ्रमणमार्गावर फिरत असताना सांपातिक भरती-ओहोटी येते.
  • वार्षिक भरती-ओहोटी (Yearly Tide) : सूर्याच्या उपसूर्य (Perihelion) व अपसूर्य (Aphelion) या, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यातील अंतर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त असण्याच्या स्थितीच्या वेळी  वर्षातून एकदा अनुक्रमे ४ जानेवारी आणि ४ जुलै या दिवशी ही भरती-ओहोटी येते.
  • सागरपृष्ठावर निर्माण होणाऱ्या भरती-ओहोटीचा संबंध चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणशक्तीशी आहे. यापैकी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणशक्तीचा भरती-ओहोटीशी अधिक जवळचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. चंद्र पृथ्वीला अधिक जवळ असल्यामुळे त्याचे पृथ्वीवरील आकर्षण सूर्यापेक्षा जास्त आहे. सूर्य आकाराने चंद्रापेक्षा ४०० पटीने मोठा असला, तरी तो पृथ्वीपासून चंद्रापेक्षा ४०० पट अंतरावर आहे. त्यामुळे सूर्याच्या गुरुत्वशक्तीचा भरती-ओहोटीशी असलेला संबंध सहज जाणवत नाही. 

सागरपृष्ठावरील पाण्यावर चंद्र-सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करू शकते. त्यामुळे आकर्षणशक्तीत सापडलेल्या पृथ्वीवरील पाण्याच्या पृष्ठभागावर फुगवटा (Bulge) निर्माण होतो. पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी केंद्रोत्सारी प्रेरणा कार्य करीत असते. परंतु पृथ्वीची जी बाजू चंद्रासमोर असते, तेथे मात्र केंद्रोत्सारी प्रेरणेपेक्षा चंद्राची आकर्षणशक्ती अधिक असते. याउलट चंद्राच्या विरुद्ध दिशेला जी बाजू असते, तेथे केंद्रोत्सारी प्रेरणा अधिक असते. अशा रीतीने पृथ्वीच्या मध्यवर्ती भागापासून दोन विरुद्ध दिशांना, दोन वेगवेगळ्या शक्ती कार्य करतात. या दोन्ही शक्तींमुळे दोन्ही विरुद्ध दिशेने पाण्याला फुगवटा निर्माण होतो. पृथ्वीवर ज्या दोन ठिकाणी भरती येते त्याच्या मधल्या भागी अर्थातच पाणी खाली जाते किंवा मागे जाते. भरतीच्या ठिकाणी वाढलेले पाणी आणि या ओहोटीच्या ठिकाणी कमी झालेले पाणी यांच्या प्रमाणात सारखेपणा असतो.

चंद्राकडील बाजूस असलेली आकर्षणशक्ती व विरुद्ध बाजूवर कार्य करणारी केंद्रोत्सारी प्रेरणा यांतील संतुलनामुळे दोन विरुद्ध ठिकाणी भरती निर्माण होत असल्यामुळे या सिद्धांतास संतुलन सिद्धांत (Equillibrium Theory) असे म्हणतात.

चोवीस तासांत चंद्र आपल्या पृथ्वीभोवतालच्या कक्षेत १२ अंश अंतर पुढे जातो आणि हे अंतर तोडायला  पृथ्वीला ४८ ते ५२ मिनिटांचा काळ लागतो. त्यामुळे चंद्रामुळे येणाऱ्या भरतीच्या वेळेत  

दर दिवशी ४८ ते ५२ मिनिटांचा फरक पडतो.

संबंधित बातम्या