सागरजलाचे तापमान 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

समुद्रशोध
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 

जमीन आणि पाण्याला सूर्यापासून उष्णता मिळत असली, तरी जमिनीवर आणि पाण्यावर होणारे तापमानाचे वितरण मात्र सारखे नाही. पाण्याच्या पृष्ठभागावरून होणारे सूर्यकिरणांचे परावर्तन, खूप खोलीवर पसरत जाणारी उष्णता आणि पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी होते व मिळालेली उष्णताही पाण्यात इतरत्र पसरली जाते. पाणी हे उष्णतेचे मंदवाहक असून पाणी जमिनीपेक्षा उशिरा तापते व उशिरा निवते, त्यामुळे उन्हाळ्यात एखाद्या ठिकाणी जमिनीवर जितके तापमान असते, तितके समुद्रावर असत नाही.

अक्षांश, समुद्रप्रवाह, प्रचलित वारे, समुद्राच्या खोल भागातून अभिसरण पद्धतीने वर येणारे पाणी, हिमनग, क्षारता, जमिनीचे सान्निध्य आणि समुद्रसपाटीपासूनची सागरतळाची खोली अशा अनेक घटकांवर सागरजलाच्या तापमानाचे उभे व समकक्ष वितरण अवलंबून असते. सागरपृष्ठावर जास्तीत जास्त तापमान विषुववृत्तावर आढळत नाही, ते विषुववृत्ताच्या थोडे उत्तरेस आढळते. सर्वसाधारणतः उत्तर गोलार्धात तापमान जास्त असते. दक्षिण गोलार्धात पाण्याच्या हालचालींना भूमिखंडाचा अडथळा कमी होत असल्यामुळे तेथे तापमान कमी असते. तापमानाच्या अक्षवृत्तीय वितरणावर वायुभार पट्ट्यांच्या वितरणाचा परिणाम होत असल्याचे दिसते. सामान्यतः ध्रुवीय प्रदेशांकडे तापमान कमी होत जाते, परंतु तापमानातील हा फरक नियमित नसतो.  

सूर्याच्या सरळ किरणांमुळे विषुववृत्तीय प्रदेशात सागरजलाचे तापमान २६.६९ अंश सेल्सिअस असते. याउलट तिरक्या किरणांमुळे ध्रुवीय प्रदेशात ते विलयबिंदूच्या जवळपास आढळते. सारख्याच अक्षांशात असलेल्या समुद्राचे पाणी सगळीकडे सारख्या तापमानाचे असत नाही. महासागराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूकडील समुद्राच्या तापमानात तफावत असल्याचे दिसून येते. अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडे ब्रिटिश बेटांजवळ, उत्तर अटलांटिक समुद्रप्रवाहामुळे तापमान जास्त असते; तर पश्चिमेकडे लॅब्राडोरच्या शीतप्रवाहामुळे तापमान कमी होते.

उष्णतेच्या विषुववृत्ताच्या स्थितीत (Thermal equator) तसेच समुद्रप्रवाह आणि वाऱ्यांच्या दिशेत ऋतूनुसार जसे बदल होतात, त्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातही बदल होतात.

खोल समुद्रातील पाण्याच्या तापमानावर परिणाम करणारे घटक मात्र थोडे वेगळे आहेत, यात (१) पाण्यात शोषल्या गेलेल्या उष्णतेचे प्रमाण, (२) समुद्रप्रवाहाच्या वाहण्याच्या दिशेतील बदल, (३) क्षारता या घटकांचा समावेश होतो. सामान्यपणे जसजशी खोली वाढते, तसतसे सागरजलाचे तापमान कमी कमी होत जाते. मात्र हा नियम सगळीकडेच लागू होत नाही. निरनिराळ्या अक्षवृत्तांवर सागरतळाच्या रचनेनुसार तापमान कमी होण्याच्या या नियमात बदल होताना दिसतात.

सूर्यकिरणांमुळे प्रत्यक्षरीत्या फक्त ११५ फॅदम खोलीपर्यंतच्याच पाण्याचे तापमान वाढते. त्यामुळे तापमानात एकदम घट होते. १०० पासून ६०० फॅदम खोलीपर्यंत ही घट फार वेगाने होते. ६०० फॅदमपासून १००० फॅदमपर्यंत तापमानात होणारी घट अगदीच नगण्य असते. ध्रुवीय प्रदेशातील सागराच्या तळभागावरील पाण्याचे तापमान गोठणबिंदूच्या जवळपास असते. समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे त्याचे तापमान सहजासहजी गोठणबिंदूच्या खाली जात नाही. जर ते तापमान -६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले, तरच समुद्राचे पाणी गोठलेले दिसून येते.

विषुववृत्तीय समुद्रात व ध्रुवीय समुद्रात खोलीनुसार तापमान कमी होण्याच्या या क्रमात सारखेपणा आढळत नाही. विषुववृत्तीय समुद्रात तापमानात घट होण्याचा वेग ध्रुवीय समुद्रापेक्षा जास्त असतो. 

  • विषुववृत्तीय प्रदेशात सागरजलाचे जास्तीत जास्त तापमान २६.६ अंश सेल्सिअस व कमीत कमी २१.१ अंश सेल्सिअस असते. तापमानातील वार्षिक सरासरी फरक सुमारे ४ अंश सेल्सिअस इतका असतो.
  • ध्रुवीय प्रदेशात सागरजलाचे तापमान ० अंश सेल्सिअस असते. क्वचित प्रसंगी ते १० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. तेथेही तापमानातील वार्षिक सरासरी फरक १० ते १२ अंश सेल्सिअस इतकाच असतो.
  • समशीतोष्ण कटिबंधातील सागरजलाचे तापमान बरेच जास्त असते आणि तापमानातील वार्षिक सरासरी फरक ६.६ अंश सेल्सिअस ते ४.४ अंश सेल्सिअस इतका आढळतो.

भूवेष्टित समुद्राच्या पाण्याचे खुल्या समुद्रातील पाण्याशी सहज मिश्रण होऊ शकत नाही. यामुळे खुल्या समुद्रात ज्या पद्धतीने खोलीनुसार तापमानात घट होत असते, त्याच प्रकारची घट भूवेष्टित समुद्राच्या पाण्यात दिसत नाही. ज्या मर्यादेपर्यंत पाण्याचे सहज मिश्रण होते, त्या मर्यादेवर खुल्या समुद्राचे जे तापमान असते, तेच तापमान भूवेष्टित समुद्रात अधिक खोलीपर्यंत आढळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भूमध्य समुद्रातील पाण्याचे तापमान. 

संबंधित बातम्या