समुद्र पातळीत होणारे बदल 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

समुद्रशोध  : एंटरटेनमेंट
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

समुद्राची पातळी ही स्थिर नसून ती अनेक वेळा वर खाली होत असते. या हालचालींचा कालखंड जसा कमी जास्त असतो, तशी त्यामागची कारणेही वेगवेगळी असतात. कोणत्याही ठिकाणच्या सरासरी समुद्र पातळीत होणारे बदल जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. जेव्हा जेव्हा वाढलेल्या तापमानामुळे पृथ्वीवरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळले, त्या प्रत्येक कालखंडात पृथ्वीवरील समुद्रांच्या पाण्यात वाढ होऊन सगळीकडच्या समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या कालखंडाला आंतरहिमानी कालखंड (Interglacial) म्हणतात. पृथ्वीच्या तापमानात घट झाल्यानंतर या पाण्याचे जेव्हा पुन्हा बर्फात रूपांतर झाले आणि पृथ्वीवरचा मोठा भूभाग बर्फाच्या आवरणाखाली गेला, तेव्हा सगळ्या समुद्रातील पाणी कमी होऊन सागरपातळी खाली गेली आणि पृथ्वीवर बर्फ तयार होऊन हिमयुगांची (Ice Age) निर्मिती झाली. या कालखंडाला हिमानी कालखंड (Glacial) असे म्हटले जाते. 

आत्तापर्यंत पृथ्वीवर अनेक हिमयुगे आणि त्यांच्या दरम्यान आंतरहिमानी युगे होऊन गेली. गेल्या साडेचार लक्ष वर्षांत गुंझ, मिंडेल, रिस आणि वुर्म अशी चार हिमयुगे झाली, ज्या प्रत्येक वेळी समुद्राची पातळी सामान्यपणे १०० मीटरनी खाली गेली. सगळ्यात शेवटचे हिमयुग अठरा हजार वर्षांपूर्वी येऊन गेले. प्रत्येक हिमयुग साधारणपणे ७० ते ९० हजार वर्षे आणि आंतरहिमानी युग १० हजार वर्षे टिकते. सध्या आपण अंतरहिमानी या सागरपातळी वाढण्याच्या कालखंडात असून जागतिक पातळीवर सर्वत्र समुद्रपातळीत वाढ होते आहे. 

काही वेळा पृथ्वीपृष्ठाच्या भूप्रक्षोभक मंद स्थानिक हालचालींमुळे सागरपातळी वर खाली होते. या हालचाली अनुलंब म्हणजे उभ्या (Verticle) प्रकारच्या असतात. सागरतळाचे उंचावणे व दबणे, किनारा खचणे या घटना अशा हालचालींमुळे होतात. भूकवचात संतुलन राखण्यासाठी या हालचाली घडत असतात. यामुळे स्थानिक पातळीवर किनाऱ्याच्या अनुषंगाने समुद्र पातळी खाली वर होते. 

मुंबईजवळ ठाण्याच्या खाडीत बुडालेल्या झाडांचे अवशेष दृष्टीस पडतात. यावरून तो भाग हळूहळू खचत असावा आणि समुद्र पातळी वर येत असावी असे म्हणता येते. चेन्नईजवळ महाबलीपुरम येथे किनाऱ्यावर चोल राजांच्या कारकिर्दीत चार शिवालये होती. आता तेथे एकच शिवालय आहे. इतर शिवालयांचे अवशेष ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. महाराष्ट्रात रेवस बंदर व गुहागर बाग इथे जुन्या खारफुटी या झाडांचे बुंधे अवशिष्ट स्वरूपात दिसतात. कोकण किनाऱ्यावर गुहागर, कोळथरे, मिऱ्या अशा अनेक ठिकाणी पूर्वीच्या उच्च समुद्रपातळीच्या वेळी टायर झालेल्या पुळणी (Raised beaches) दिसतात. कच्छच्या रणात पश्चिम बाजूस इ.स. १८१९ नंतर अधोगामी हालचाली होऊन तो भाग पाण्याखाली बुडाल्याचे निदर्शनास आले आहे.  

पोरबंदरजवळ आजच्या समुद्रपातळी पासून खूपच उंचीवर शंख, शिंपले व इतर सागरजन्य पदार्थ आढळतात. याचा अर्थ तेथील किनारा हळूहळू उंचावला जात असला पाहिजे किंवा किनारा खाली जात असला पाहिजे. महाभारतासारख्या प्राचीन भारतीय वाङ्‍मयातदेखील सागरपातळीच्या हालचालींची नोंद घेतलेली आढळते. भगवान श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका हे अशाच हालचालींचे उदाहरण सांगता येईल. 

स्वीडनच्या किनाऱ्याचा काही भाग गेल्या दोनशे वर्षांत दोन मीटरने उंचावला गेल्याचे आढळून आले आहे. उत्तर समुद्रातील डॉगर बँक्स हा मासेमारीचा संचय पूर्वी एक मोठे बेट म्हणून ओळखला जाई. परंतु आता तो २० मीटर  पाण्याखाली गेला आहे.  

गेली काही वर्षे सातत्याने जगातील समुद्रांच्या पातळीत वाढ होते आहे. गेल्या काही हजार वर्षांत, पृथ्वीवरच्या हिम आवरणाचे प्रमाण हिम वितळल्यामुळे ३३ हून जास्त टक्क्यांनी कमी झाले आहे आणि त्यामुळे समुद्राची पातळी  अनेक मीटर्सनी सर्वत्र उंचावली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे जगातील व विशेषतः आर्क्टिक आणि अंटार्क्टिकवरील हिम वितळत असून, हिमालय, युरोपियन आल्प्स येथील हिमनद्याही वेगाने वितळत आहेत.  गेल्या दशकात पूर्व अंटार्क्टिकवरील बर्फाच्या थरात दरवर्षी दोन सेंमी या वेगाने वाढ झाली आणि पश्चिम अंटार्क्टिकवरचा थर दर वर्षी नऊ मिमी या वेगाने वितळला आहे. जगाच्या काही भागात गेल्या ५० वर्षांत स्थानिक पातळीवर सागरपातळी १० सेमीने वाढली आहे!

संबंधित बातम्या