समुद्रकडे 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

समुद्रशोध  :

समुद्र आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि विविधता कशी जपायची?... 
डॉ. श्रीकांत कार्लेकर

आपल्या प्रचंड ताकदीने, अहोरात्र किनाऱ्यावर येऊन आदळणारा समुद्र, समुद्रकड्यांसारखी (Sea Cliffs) दृष्ट लागावी इतकी सुंदर शिल्प तयार करीत असतो. निसर्गाने तयार केलेली ही देखणी पाषाण शिल्प आपली नजर  बांधून ठेवतात. 

हे सगळे देवाघरचे लेणे पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी किनाऱ्यावरच्या एखाद्या उंच कड्यावर उभे राहावे आणि तिथून सगळे नजरेत सामावून घ्यावे. मात्र ज्या कड्यावर आपण उभे असतो, तो समुद्रकडाही, शक्यतो खाली उतरून, त्याच्या जवळ जाऊन पाहावा. किनारी प्रदेशात तयार झालेले समुद्रकडे हे  निसर्गाचे एक अचंबित करणारे रूप आहे. दंतुर आणि खडकाळ (Rocky) किनाऱ्याचे, ते लगेच नजरेत भरणारे लक्षण आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळणारे समुद्रकडे असंख्य प्रकारचे, आकाराचे, उंचीचे आणि अतिशय विलोभनीय असे आहेत. वेगवेगळ्या खडकात तयार झालेले हे समुद्रकडे, निसर्गप्रेमी, पर्यटक आणि शास्त्रज्ञ या सगळ्यांनाच उच्च कोटीचा आनंद देत असतात. जगातील समुद्रकड्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या निर्मितीबद्दल अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत. 

सहाशे मीटर इतक्या उंचीच्या कड्यांबरोबरच जगात केवळ अर्ध्या मीटर उंचीचे कडेही समुद्रलाटांनी तितक्याच कुशलतेने तयार केले आहेत. समुद्राच्या लाटा, विविध प्रकारांनी आपल्या समोर असलेल्या भूशिराचे (Headland) घर्षण आणि अपक्षरण करून उंच, ताशीव कडे तयार करतात. खडकातील जोड व संधी, लाटांच्या माऱ्याला तोंड देत असलेला समोरचा पृष्ठभाग, खडकांचा कल, यासारख्या विविध घटकांवर समुद्रकडे निर्माण होण्याची प्रक्रिया अवलंबून असते.

वेगवेगळ्या प्रकारचे समुद्रकडे तयार होण्यासाठी किनारी प्रदेशाचे हवामान, लाटांची उंची, लाटांचा वेग, भरती ओहोटीतील फरक (Tidal Range), किनाऱ्याजवळील समुद्राची खोली या सर्वांचा हातभार लागलेला असतो. समुद्रकड्यांबद्दल एक गमतीची गोष्ट म्हणजे, हे कडे समुद्राजवळ तयार होतात, पण त्यांच्या जडणघडणीत सामुद्रिक क्रियांपेक्षा (Marine Processes) जमिनीवरून परिणाम करणाऱ्या क्रियांचे (Subaerial Processes) प्रमाण अधिक असते.

सागरी लाटांचे कार्य भूशिराच्या फक्त तळभागाजवळच्या काही प्रदेशापुरतेच मर्यादित असते. भूशिराचा वरचा भाग ठिसूळ, भुसभुशीत होऊन, विदारण होऊन (Weathering) खाली कोसळण्यासाठी संवेदनशील करण्याचे कार्य, भूशिरात झिरपणारे पावसाचे पाणी, त्यावर वाढणारी झाडे आणि अर्थातच इमारती, खोदकाम (Excavation), खनिकर्म (Mining) हेच सगळे घटक करीत असतात. तळभागावर प्रचंड आघात करून भूशिराला मागे हटवण्याचे आणि भूशिराच्या समुद्राभिमुख (Seaward) बाजूचे समुद्रकड्यात करण्याचे काम सागर लाटाच करीत असतात. कड्याखाली येऊन पडलेल्या भागातील दगडधोंड्यांचाच हत्यार म्हणून (Tools) लाटा वापर करतात व कड्याची झीज सातत्याने करत राहतात. सागराच्या प्रत्येक अग्रगामी (Swash) व प्रतिगामी (Backwash) लाटांबरोबर हे दगडधोंडे मागे पुढे होत राहतात. एकमेकांवर आपटून फुटतात, तुटतात आणि विलक्षण शक्तिनिशी कड्याच्या भिंतीवर आपटतात. कड्याच्या पृष्ठभागावर, दगडांच्या आणि वाळूच्या आघातामुळे छिद्रांची एक विस्तृत जाळीच तयार होते. कालांतराने ही जाळीही नष्ट होते व कड्याचा पृष्ठभाग (Cliff Face) गुळगुळीत होतो. ही क्रिया सतत होत असली, तरी लाव्हाच्या उद्रेकाने तयार झालेल्या कठीण खडकांच्या प्रदेशात, समुद्रकड्यांच्या निर्मितीला हजारो वर्षे लागतात.

गमतीचा भाग असा, की या हजारो वर्षांत समुद्राची पातळी (Sea Level) कधीही एकाच उंचीवर स्थिर राहत नाही. ती कधी खाली जाते तर कधी उंचावते. ती खाली गेली, तर सागरकडे तयार होण्याचे काम अर्धवट स्थितीत राहते आणि लाटांच्या माऱ्यातून मुक्त झाल्यामुळे असे समुद्रकडे समुद्रापासून दूर आणि थोड्या उंचीवर सोडून दिल्यासारखे असलेले दिसून येतात. समुद्र पातळी वर आली, तर पूर्वीच्या समुद्रकड्यांचा खालचा भाग पाण्याखाली जातो व कडे पाण्यात बुडालेले दिसतात. समुद्राची पातळी एकापेक्षा जास्त वेळा खाली गेली, तर खडकाळ, दंतुर किनाऱ्यावर, वेगवेगळ्या अंतरावर व उंचीवर समुद्रकडे परित्यक्त अवस्थेत (Abandoned) आढळतात. सागरी भूरूपांच्या अभ्यासकाला असे परित्यक्त कडे आढळणे म्हणजे मोठी मेजवानीच असते. त्यावरून तो त्या किनाऱ्याच्या उत्क्रांतीचा इतिहास मांडू शकतो.

समुद्रकड्यांच्या या विभिन्न अवस्था, महाराष्ट्राच्या व भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर इतर अनेक ठिकाणी  आढळतात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर लाटांचा जोर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे नैऋत्य दिशेकडून जास्त असतो. त्यामुळे या किनाऱ्यावरील बहुतांश समुद्रकडे नैऋत्याभिमुख (Facing Southwest) असल्याचे आढळते. याचा अर्थ असा नाही, की भूशिराच्या इतर बाजूंवर सागरकडे तयार होत नाहीत किंवा दिसत नाहीत. तिथेही कडे आढळतात पण नेऋत्याभिमुख बाजूकडील कडे संख्येने थोडे जास्त आणि अधिक आकर्षक, धोकादायक, गुळगुळीत व उंचच उंच असल्याचे दिसून येते. 

संबंधित बातम्या