सातारा स्वच्छतेतून समृद्धीकडे

संजय शिंदे
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये (ग्रामीण) सातारा जिल्हा देशात अव्वल ठरला. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, हागणदारीमुक्ती, तंटामुक्ती, पर्यावरणसमृद्ध गाव अशा स्वच्छताविषयक स्पर्धात्मक योजनांमध्ये सातत्याने जिल्ह्याने अव्वल स्थान राखले. याच वाटचालीचा घेतलेला आढावा.

स्वच्छतेकडून आरोग्याकडे आणि आरोग्याकडून समृद्धीकडे वाटचाल करणे म्हणजे सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर आश्‍वासक दमदार पाऊल टाकणे. सरकारने यासाठी अनेक योजना राबवते. त्यात कायमस्वरूपी अव्वल ठरणे अवघड असते. कारण लोकसहभाग आणि जनतेत जाणीव जागृती निर्माण करून त्यात सातत्य राखणे एवढेच नव्हे तर त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करून नवीन सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे अवघड असते. नेमक्‍या त्यातच महाराष्ट्रात पुरोगामी म्हणून लौकिक असलेल्या यशवंतराव चव्हाण आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीत अधिकारी, लोकप्रतिनिधींसह जनतेने कंबर कसली आणि आपल्या जीवनात मोठे परिवर्तन आणले. प्रगतीच्या वाटेला नवी दिशा देत, इतर बाबींप्रमाणे स्वच्छतेतही आपला ठसा देशभर उमटवला.

देशातील ७१८ जिल्ह्यात ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण यंदा ऑगस्टमध्ये राबविण्यात आले. महिनाभरात स्वच्छतेबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने हे अभियान राबविले. त्यासाठी खास समिती नेमून प्रत्येक जिल्ह्यातील दहा ते १६ ग्रामपंचायतींची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली. आतापर्यंत केलेले स्वच्छतेचे काम, वैयक्तिक शौचालयांचे प्रमाण, हागणदारीमुक्त गावांमध्ये वाढ, संस्थांमार्फत हागणदारीमुक्त गावांची तपासणी, शौचालय बांधणीचे जिओ टॅगींग, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती अशी पाहणी झाली. त्याचप्रमाणे शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठेची ठिकाणे, धार्मिक स्थळे, गावाचा परिसर या ठिकाणी शौचालये सुस्थितीत आहेत का? त्यांचा वापर होतो का? या ठिकाणी घनकचरा आणि सांडपाणी यांच्या निचऱ्याची व्यवस्था आहे का? असे थेट परीक्षण करण्यात आले. स्वच्छतेबाबत सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांची सभा व त्यांच्याशी संवाद समितीने साधला. स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रबोधन, लोकांच्या मुलाखती घेऊन समितीने प्रतिसाद जाणून घेतला. त्याचप्रमाणे मोबाईलवर स्वच्छतेबाबत जास्त मते जिल्ह्याने मिळवली आहेत. अशा प्रकारे स्वच्छतेबाबतच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले. 

उत्तम प्रशासनाची परंपरा
जिल्ह्याला समृद्ध राजकीय वारसा व उत्तम प्रशासनाची परंपरा आहे. स्वच्छतेबाबत ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता  अभियान लोकसहभागातून राबवले. त्यात जिल्ह्यातील निढळ, लोधवडे, धामणेर, आसगाव, मान्याचीवाडी, जखीणवाडी, वयगाव, विंचुर्णी, काळेवाडी, कातळगेवाडी, भोसरे, बिदाल इत्यादी गावांनी राज्य स्तरावर लौकिक मिळवला. त्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले. त्याद्वारे ग्रामीण भागात लोकसहभागातून शौचालयाची उभारणी झाली. केवळ शौचालये उभी राहिली नाहीत तर त्याच्या वापराबाबत जनजागृती झाली. शौचालयांची उपयुक्तता लोकांना पटली, त्याने होणारी गावाची स्वच्छता आणि आरोग्यसंवर्धन हे लक्षात आले. अभियानाच्या माध्यमातून गावे एकसंघ झाली. तंटे कमी झाले. हागणदारीच्या जागी सुशोभित बगीचे झाले. उघड्यावरील हागणदारीमुळे होणारे जलजन्य आजार घटले. कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ आदी साथरोग कमी झाले, लोकांच्या आरोग्य जपले गेले. आजारावरचा खर्च होणारा पैसा वाचला. शासकीय कार्यालयात स्वच्छतागृहे तयार झाली. विद्यार्थ्यांचे आजारपणामुळे होणारे नुकसान घटले. त्याचा दृश्‍य परिणाम ग्रामीण भागातील मुले ही निरोगी व सदृढ होऊ लागली. त्यांच्या बुद्धीमतेतही वाढ झाली. आजारपणामुळे गावातील लोकांचा रोजगार बुडायचा. मात्र आता तो वाचू लागला. लोकांची कार्यक्षमता वाढू लागली. त्यातूनच स्वच्छतेतून समृद्धीकडे पावले पडू लागली. दारात नळ, घरात शौचालय यामुळे ग्रामीण महिलांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबली. शौचविधीस जाण्यासाठी आता अंधार पडायची वाट महिलांना पाहावी लागत नाही. त्यामुळे आजार कमी झाले. हे सर्व चांगले परिणाम केवळ घरात स्वच्छतागृह बांधल्यामुळे झाले. 

शाळांमध्ये जनजागृती
स्वच्छतेचे महत्त्व पटल्याने प्रत्येक शाळेत, अंगणवाड्यात शौचालये झाली. विद्यार्थांना शौचालय वापरण्याची सवय लागली. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष आहे. मासिक पाळी व्यवस्थापनाचा कार्यक्रम जिल्ह्यात शालेय स्तरावर राबविण्यात आला. प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन दिली आहेत. महिला बचत गटामार्फत अस्मिता योजनेअंतर्गत नॅपकिन उपलब्ध करुन देण्यात आले. शालेय मुलींचे वयात येताना होणारे शारीरिक बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक संदेश घरोघरी पोचविण्यासाठी स्वच्छतादूताची कामगिरी बजावली. आता विद्यार्थांमध्ये उघड्यावर हागणदारी ही संकल्पनाच नष्ट झाली आहे.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर करण्यापूर्वीच जिल्ह्यात प्लॅस्टीकमुक्तीचा उपक्रम राबविला होता. त्यामध्ये सरकारचे सर्व विभाग, कार्यालये, शाळा, अंगणवाड्या सार्वजनिक ठिकाणी जमल्या. त्यांनी एका दिवसांत ४७ टन इतके प्लॅस्टिक जमा केले. जिल्हा परिषदेने सगळ्या ग्रामपंचायतीत ही मोहीम राबविली. त्यानंतर प्लॅस्टिक बंदी कायद्यामुळे या मोहिमेस आणखी बळ मिळाले. ग्रामीण भागात प्लॅस्टिक पिशव्या अपवादाने दिसू लागल्या. जिल्हा परिषदेने नंदकिशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आणि ग्रामसेवकांची खास कार्यशाळा घेतली. त्यामुळे अनेक गावांत ओला व सुका कचरा वेगळा होऊ लागला. गावागावात प्लॅस्टिक संकलन केंद्रे उभारली. प्लॅस्टिक संकलनासाठी लोक पुढाकार घेऊ लागले. महाबळेश्‍वर तालुक्‍यात अभियानाने मोठी आघाडी घेतली. मुळातच निसर्गाने फुललेल्या महाबळेश्‍वरला स्वच्छतेची जोड मिळाल्यामुळे परदेशी पर्यटकांबरोबरच देशातील पर्यटकांमध्ये चांगला संदेश पोचला. पर्यटनवाढीसाठी त्याचा निश्‍चितच फायदा होणार आहे.   

पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त पुढाकार
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त पुढाकार घेतला. जागृती करण्याबरोबरच प्रत्यक्ष सहभागही घेतला. पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, सर्व आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचेही स्वच्छतेत योगदान राहिले. स्वच्छतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्यापासून गावपातळीवरील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी कायमच झटून काम केले. जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व खातेप्रमुख गटविकास अधिकारी, विस्तारअधिकारी व गटसंसाधन केंद्राचे कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. विशेषतः पाणी व स्वच्छतेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे धनाजी पाटील, संजय पवार, अजय राऊत, राजेश भोसले,रवींद्र सोनवणे, गणेश चव्हाण, राजेश इंगळे, श्रीकांत शीलवंत, चंद्रकांत पिसाळ यांचा अभियानाच्या अंमलबजावणीत मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्या, साखर कारखाने, सामाजिक संस्था, युवक मंडळे, भजनी मंडळे, महिला बचत गट, तनिष्का व्यासपीठातील महिलांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. 

पाचगणी देशात प्रथम
स्वच्छतेच्या शहरी विभागातही सातारा जिल्ह्यातील शहरांनीदेखील अव्वल स्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण (शहरी) २०१८ स्पर्धेत एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या  शहरांच्या गटांत पाचगणी पालिका पहिली, तर महाबळेश्‍वर पालिकेला १९ आणि कऱ्हाड पालिकेला ३९ वा क्रमांक मिळाला. एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सातारा पालिकेने राष्ट्रीयस्तरावर ५७ वे मानांकन मिळवले. 

स्वच्छतेत जिल्ह्याची कामगिरी

  •     संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आजपर्यंत राज्य व विभाग पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्यातील.
  •     निर्मलग्राम पुरस्काराने देशात सर्वात जास्त, जिल्ह्यातील १४३७ ग्रामपंचायतींना सन्मान.
  •     २०१६ मध्ये जिल्ह्यातील १४९० ग्रामपंचायती व ११ तालुके हागणदारीमुक्त. राज्यातील पहिला हागणदारीमुक्त प्रमाणित जिल्हा म्हणून गौरव
  •     २०१६-१७ मध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने देशातील चांगल्या ७५ जिल्ह्यांचा सर्व्हे केला. त्यात सातारा देशात तिसरा.
  •     २०१६-१७ मध्ये स्वच्छता दर्पणमध्ये देशात पहिला क्रमांकाने सन्मानित
  •     केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या लघुपट स्पर्धेत साताराचा ‘दृष्टी‘ लघुपट देशात प्रथम
  •     २०१२ च्या बेसलाईन सर्व्हेनुसार, जिल्ह्यातील ४ लाख ७० हजार ७६८ कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा, त्याचे प्रमाण शंभर टक्के.
  •     वैयक्तिक शौचालय बांधकामाचे शंभर टक्के छायाचित्रे सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड.
  •     शाश्‍वत स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जिल्ह्यातील तीन हजार लोकसंख्येवरील २१६ ग्रामपंचायतीत राबविला. त्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत व कंपोस्ट खत तयार करण्यात येते.
  •     सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत १०० टक्के सांडपाणी शोषखड्डे तयार करण्याचे काम अनेक ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले.

राज्यात प्रथम प्रमाणित हागणदारीमुक्त सातारा जिल्हा आहे. स्वच्छतेबाबत लोकजागृती व्हावी, लोकसहभाग सक्रिय असावा, यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले. स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगण्याचे उपक्रम राबविले. या अभियानामध्ये विविध शासकीय विभाग, प्राध्यापक, शिक्षक , विद्यार्थी, महिला, विविध संस्थांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. 
- संजीवराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा

स्वच्छतेत सातारा जिल्ह्याला मिळालेले यश पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या प्रयत्नांचे फळ आहे. विद्यार्थ्यांनीही जनजागृती केली. आता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देणार आहे. जिल्ह्यातील १४८ ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभे राहिलेत. घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण होते. ग्रामपंचायतींना गांडूळ खतातून १३ लाख उत्पन्न मिळाले. पुढील वर्षी एक कोटी रुपये मिळतील. अभियानाने रोगराई कमी होण्यास मदत झाली.
- डॉ. कैलास शिंदे, 
   मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या