द नेम इज सारा 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

साराची डायरी

ही गोष्ट आहे साराची.. दहा वर्षांची मुलगी. या वयातील मुले स्वतःकडे, आपल्या आईबाबांकडे आणि एकूणच जगाकडे कशी बघतात याची ही गोष्ट. एकदम साधी, मजेशीर, गमतीदार.. तरीही थोडी अंतर्मुख करणारी.. या वयोगटातील प्रत्येक मुलामुलीचीही अशीच गोष्ट असू शकेल... 

हाय... द नेम इज सारा. मी मागच्या आठवड्यात टेन इयर्स.. सॉरी सॉरी... दहा वर्षांची झाले. (नानीची कंडिशन... सॉरी अट आहे की डायरी मराठीत लिहायची. तरच मला ही shiny डायरी मिळेल. त्यामुळे मी ट्राय करणार आहे.) हां.. तर आजपासून मी डायरी लिहिणार आहे. ख्रिसमस वेकेशनच्या आधी आमच्या मराठीच्या स्वप्ना मॅम म्हणाल्या, ‘डायरी लिहायची, कारण का आपण दिवसभरात काय करतो हे एकदा वळून पाहायला पाहिजे.’ मी म्हटलं ओके.. पण वळून पाहिलं तर सोफ्यावर बसलेली ‘मार्मालेड’ माझ्याकडं बघत होती. भूत बघितल्यासारखी. मी दचकलेच. मी विचारलं काय झालं? तर काहीच बोलली नाही. मी म्हटलं आता पळा, कारण हे एक्‍स्प्रेशन म्हणजे ती आता रडणार. तेवढ्यात ‘पापाराझ्झी’ म्हणाला ‘मोनू... रुबिना म्हणाली ना? एक किलो इकडं तिकडं होतंच वेट!’ मग मी मागं वळून पाहण्याची आयडिया कॅन्सल केली. म्हटलं डायरेक्‍ट डायरी लिहू. 

तर मारमालेड म्हणजे माझी आई. तिला मा म्हणायचं असं तिचं ठरलं आहे. पण मी तिला कधीच मा म्हणणार नाहीये आणि पपाला पपा म्हणणार नाहीये. कारण ते दोघं दुष्ट आहेत. त्यांनी दीदीचं नाव लक्ष्मी ठेवलं आहे आणि माझं... Guess what??? स-र-स्व-ती!!! आणि आमचं आडनाव काय आहे माहितीये? मो-चे-मा-ड-क-र ! I mean...WHAT?? What were you thinking folks? झ्या माझ्या सगळ्या फ्रेंड्‌सची नावं किलर आहेत. अलिशा, अनन्या, निस्सा, सलोनी, मोनिशा... आणि माझं काय? सरस्वती???? नानीच बेस्ट आहे, कारण तिनं मारमालेडचं नाव ठेवलं मोनिका... आणि आजी तर डॉन आहे.. म्हणजे पापाराझ्झीची आई.. कारण तिनं त्याचं नाव ठेवलंय राहुल.... ‘नाम तो सुनाही होगा’वालं. मग माझं नाव सरस्वती का? माझी दीदी लकी आहे... म्हणजे lucky वाली नाही... तिचं नाव लकी आहे. तिच्या फ्रेंड्‌सनी ठेवलेलं. (तशी ती लकीपण आहेच.. कारण ती खूप pretty आहे आणि हुशारपण आणि ती गिटार पण वाजवते आणि ती कथ्थक पण खूप भारी करते.) Anyway... तर मी खूप वेळा विचारलं त्यांना की माझं नाव असं का ठेवलं. तर मारमालेड म्हणाली, ‘मला माझ्या मुलींची नावं अशी हटके ठेवायची होती.. क्‍लासिक...पोएटिक.’ 

म्हणजे काय मला माहीत नाही. एनीवे आपलं नाव काय ठेवायचं हा चॉईस आपल्याला कुठं असतो ना? आपलं बारसं होतं तेव्हा आपण एक छोटासा किडा असतो. वळवळणारा. आपले हातपाय पण आपल्याला माहीत नसतात. माझा एक व्हिडिओ आहे, छोटं बाळ असतानाचा. त्यात मी माझ्याच मुठीकडं बघून हसते आहे. खदाखदा... बावळट होते मी... सगळीच बाळं बावळट किडे असतात. 

तर... बावळट किड्यांना कुणी चॉईस देत नाही त्यांचं नाव काय ठेवायचं याचा. पण म्हणून मी पण कुणाला चॉईस दिलेला नाहीये. मी त्यांची नावं ठेवली आहेत. आई म्हणजे मारमालेड, पपा म्हणजे पापाराझ्झी. दीदी म्हणजे मेकूड आणि आजी म्हणजे पार्सल. 

पण असं का हे मी आत्ता लिहू शकत नाही कारण दहा वाजलेत आणि नानीची दुसरी अट होती, दहानंतर टिकटिक वन होईपर्यंत पण जागायचं नाही. सो गुड नाईट..

संबंधित बातम्या