मेकूडचा ब्रेकप 

विभावरी देशपांडे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

साराची डायरी
 

आज आमच्या घरी एक solid कांड झाला. (कांड म्हणजे मोठी घटना. मी पार्सल समोर एकदा असं म्हणाले तर ती म्हणाली ‘काय झालं? कांड? हे काय नवीन? आमच्यात मसाले कांडतात’) ‘आजीला मराठी नीट येत नाही’ असं मी नानीला सांगितलं तर ती म्हणाली ‘बरोबर आहे निर्मलाताईंचं! हा मराठी शब्द नाही, हिंदी आहे. आजकाल तुमची भाषा म्हणजे भेळ आहे सगळी.’ तिला कायमच ‘निर्मलाताईंचं’ सगळं बरोबर वाटतं. लग्नात तसं ठरलं होतं बहुतेक. एनीवे! मी तिच्याशी फार वाद घातला नाही. भेळ तर भेळ! मला आवडते. 

हां... तर कांड असा झाला की मेकूडचा ब्रेकप झाला. हो... तिला बॉयफ्रेंड होता. मला माहीत होतं हे, पण मला माहीत आहे हे तिला माहीत नव्हतं. मला कायकाय माहीत आहे हे तिला कधीच माहीत नसतं. तिला वाटतं मी अजून मिनीकेजीत आहे, (Actually मिनीकेजीत असताना मलाच बॉयफ्रेंड होता. अंश... तो मला म्हणाला होता, ‘विल्यू बीमाय GF? I will give you jelly sweets everyday. म्हटलं ओके.. २ महिने मी रोज जेली स्वीट्‌स खाल्ली. मग मला बोर झालं. मग मी ब्रेक केला होता.) एनीवे... तर अखिलेश मेकूडचा बॉयफ्रेंड आहे हे मला कधीच कळलं होतं. पण तिला तिची, ‘परफेक्‍ट गर्ल’ची इमेज ब्रेक करायची नव्हती. त्यामुळं तिनी कुणाला सांगितलं नाही. पण रात्री सगळे झोपले की किंवा पहाटे अभ्यासाला बसले की ती आणि अक्की video call पण करायचे. एकदा डोळे मिचकावले की hug आणि दोनदा डोळे मिचकावले की पप्पी. हे मला पण कळलं होतं. पण आज पहाटे एकदम ‘सुरसूर’ असा आवाज आला. इतका जोरात की मलापण जाग आली. मेकूड फोन बघून रडत होती. मी जागी झालेलीपण तिला कळलं नाही. मी परत पांघरुणात तोंड लपवलं. ती म्हणाली ’It’s all over! अक्की... मी तुला नाही विसरणार कधीच..’ मी मनात म्हटलं, बरं झालं आत्ताच झाला ब्रेकप. मेकूड संडेला जाऊन tattoo करणार होती, L आणि A असा. आधी केला असता आणि मग ब्रेकप झाला असता तर? परत A पासून नाव असलेलाच boyfriend शोधायला लागला असता तिला. 

तर दिवसभर मेकूड खोलीतून बाहेर आलीच नाही. दारपण उघडलं नाही. मारमालेड, पार्सल, नानी सगळ्यांनी ट्राय केलं. त्यांना आधी टेंशन आलं पण मी त्यांना दाखवलं की ती दिवसभर whatsapp वर online होती, म्हणजे ती ओके होती. पार्सल म्हणाली तसं ‘जिवाचं बरंवाईट करू नकोस पोरी’ वगैरे काही नव्हतं. 

पापाराझ्झी घरी आला तेव्हा तो मात्र वेड्यासारखा panic झाला. मारमालेड म्हणाली, ‘relax, बहुतेक अखिलेशशी ब्रेकप झालाय तिचा. She will be ok!’ आई शप्पथ! म्हणजे या दोघांना माहीत होतं हे? मला जरा बोरच झालं. पण मग रात्री पापाराझ्झीनी hot chocolate केलं आणि तिला दार उघडायला सांगितलं. तर तिनी लगेच उघडलं. पापाराझ्झीनी तिला जवळ घेतलं. सगळे म्हणाली ’Aww...daddy’s little girl.’ पण मला माहीत आहे तसलं काही नाहीये, तिला भूक लागली होती solid. आहे मी आहे daddy’s little girl! 
उद्या मी दार उघडणार नाहीये सकाळपासून. बघू! माझ्यासाठी करतो का हॉट चोकोलेट! मी लहान आहे म्हणून काय झालं? कांड माझ्याही लाईफमध्ये होतात! ओके गुड नाईट.

संबंधित बातम्या