‘भाई’वाला पिक्‍चर 

विभावरी देशपांडे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

साराची डायरी
 

का ल आमच्याकडचे सगळे सिनेमाला गेले होते. कुठल्यातरी gangster वरचा सिनेमा आहे असं मला वाटलं होतं म्हणून मी नाही गेले. मला नाही आवडत मारामारी. माझा बेंच पार्टनर आहे पार्थ म्हणून. तो mad आहे. त्याला मोठेपणी gangster व्हायचंय. कारण त्याचं म्हणणं आहे, की पिक्‍चरमध्ये त्यांनाच भाव असतो खूप. Actually त्याचं बरोबर आहे. मी पण गुंड होऊ शकते, पण मला व्हायचं नाहीये त्या मूर्ख पार्थसारखं. हां... तर म्हणूनच मी ठरवलं की पिक्‍चरला जायचं नाही. मेकूडपण जाणार नव्हती कारण तिचं सबमिशन होतं. पण नंतर मला कळलं की मी गंडले. मी गेले नाही कारण पिक्‍चरचं नाव होतं ‘भाई’! पण नंतर कळलं की पिक्‍चर कुठल्या गुंडाबद्दल नव्हता, ‘नाच रे मोरा’ या गाण्याला ज्यांनी चाल लावली आहे त्या आजोबांचा होता. पु. ल. देशपांडे. 
(पुल म्हणजे ब्रिज नाही. पु डॉट ल डॉट देशपांडे.) 

तर हे आजोबा खूप भारी होते. एकदा मी नानीकडं गेले होते. हॉलमध्ये पाऊल टाकलं तर नाना आणि नानी डोळे पुसत होते, म्हटलं ‘आई शप्पथ! काय झालं?’ म्हणजे नानी रडते खूप वेळा. पण नाना? ते एकदम रफ टफ आहेत. मर्द को दर्द नाही होता टाइप्स. आर्मीत होते ना ते! ते कधीच रडत नाहीत. मला टेंशनच आलं. मग नंतर लक्षात आलं की ते हसून हसून रडत होते. कारण नानीनं ‘निवडक पुलं’ची सीडी लावली होती. नानी म्हणाली, ‘ये ये.. हे बघ हे आजोबा किती मस्त आहेत’ पण मी तेव्हा mad होते. मी फक्त सिंड्रेला बघायचे किंवा Shin -Chan. म्हटलं मला नाही बघायचं हे. तू सिंड्रेला लाव. तिनं खूप प्रयत्न केला पण मी नाही ऐकलं. शेवटी लावलं तिनं. 

पण मागच्या वर्षी नाना खूप आजारी पडले. हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्‍टर म्हणाले होते, सांगता येत नाही. रात्रभर आम्ही सगळे तिकडंच होतो. नाना बोलू शकत नव्हते नीट. पण तरी कसंबसं म्हणाले, ‘निवडक पुलंची सीडी लाव. आज जायचंच असेल तर सगळ्यांना हसताना बघायचं आहे मला.’ त्या रात्री मी ‘निवडक पुलं’चे सगळे भाग पहिले. हसून हसून वेडी झाले होते मी. केवढे भारी होते ते आजोबा. एका point ला मला वाटलं, हे काय? नाना देवाघरी जातील आज बहुतेक आणि आपण हसतोय काय? पण मग ही त्यांचीच आयडिया होती हे आठवलं. हसता हसता मी तिकडंच झोपून गेले. उठले तेव्हा मी घरी होते. मला कळेना काल रात्री काय झालं ते. मी धावत बाहेर गेले तेव्हा मारमालेड रडत होती. पण हे रडू विथ स्माइल होतं. चितळे मास्तर ऐकताना मला आलं होतं ना, तसं. ती म्हणाली, ‘सरस्वती, नाना out of danger आहेत आता. Nothing to worry.’ जोरात ओरडले, ‘याहू... Thanks to पुलं आजोबा! त्यांच्यामुळं नाना बरे झालेत.’ ती हसली आणि मला जवळ घेऊन म्हणाली, ’Perfect! Laughter IS the best medicine.’ 

हे सगळं मारमालेडच्या लक्षात कसं राहात नाही? मी पुलं आजोबांची fan आहे हे विसरली ती! एरवी हे कम्पलसरी खायचं. ते कम्पलसरी प्यायचं म्हणून मला जबरदस्ती करते, ‘पुलंच्या सिनेमाला कम्पल्सरी यायचं असं का नाही म्हणाली? तिनं सांगितल्याशिवाय मला कळणार कसं ना; हा भाई ‘भाई का बड्डे’वाला नाहीये. पुलं आजोबांचा आहे ते?’ आता मी नानीला सांगणार आहे मला घेऊन जायला. उद्याच्या उद्या. ओके बाय, गुड नाईट.

संबंधित बातम्या