भारी गिफ्ट 

विभावरी देशपांडे
सोमवार, 11 मार्च 2019

साराची डायरी
 

मागच्या महिन्यात आनंदकाकानं माझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलं. तो लंडनला राहतो ना, त्याच्याकडं भारी भारी गोष्टी असतात. पण तो जरा कन्फ्यूज्ड आहे. कारण त्याला खूप भाच्या-भाचे, पुतण्या आणि पुतणे आहेत. तो एकदम खूप गिफ्ट्‌स घेतो आणि पाठवतो. मग कधीकधी सगळ्या मिक्‍स होतात. आनंदकाकानं परत असाच गोंधळ केला. माझ्यासाठी एक मोठी drawing book आणि एक भारी कलरिंग सेट पाठवला. पण मला अज्जिबात म्हणजे अज्जिबात चित्रं काढता येत नाहीत. म्हणजे मी एकदा ख्रिसमस ट्री काढली आणि मारमालेडला दाखवली तर ती म्हणाली. ’Awww....कित्ती क्‍यूट आहे हे गाढव!’ मग चित्रं काढायचीच नाहीत असं मी ठरवलं. मी म्हटलं पण, की दुसऱ्या कुणाचातरी चुकून आलाय तर परत करू. तर नानी म्हणाली, ‘राहू दे कपाटात. तुला काही तो जेवायला मागत नाहीये.’ म्हटलं, ओके! शिवाय पार्सलला घरी आलेल्या लोकांना ‘आमच्या नंदूनं बघा काय पाठवलं आहे’ असं म्हणून दाखवायला उपयोगी पडेल. 

म्हणून गेले तीन महिने तो कपाटात आहे आणि एकदाही त्यानं जेवायला मागितलेलं नाहीये. 
मागच्या आठवड्यात maths क्‍लासला जाताना मला सोनी भेटली. शेजारी नवीन बिल्डिंग बांधतायेत ना, तिकडं काम करणाऱ्या कुणाचीतरी मुलगी आहे. मी रोज येताना-जाताना बोलते तिच्याशी. ती फार गोड आहे. तिच्याकडं नीट कपडे नसतात, खेळणी नसतात, पण ती मजेत असते. हसत असते. पण परवा ती रडत होती. मी तिला विचारलं की काय झालं. तिनं सांगितलं, बांधकामावरचे काका तिला ओरडले. मी विचारलं का? तर तिनं आत्ताच बांधलेल्या भिंतीवरचं चित्र दाखवलं. ते इतकं भारी होतं, की मी बघतंच बसले. मी म्हटलं, ‘आई शप्पथ! एक नंबर आहे हे..’ ती म्हणाली, ‘ह्याच्यामुळं मला ओरडा बसलाय. मला ते पुसायचं आहे.’ 

मी क्‍लासहून आले परत तरी मला तीच आठवत होती. मला एक आयडिया सुचली. मी माझं कपाटातलं kit काढलं आणि तिला नेऊन दिलं. ती आनंदानं उड्याच मारायला लागली. पण नेमकं त्याच रात्री पार्सलच्या ओळखीचं कुणीतरी आलं. पार्सल म्हणाली, ‘नंदूकाकानं दिलेलं गिफ्ट दाखव गं..’ मला काय करावं सुचेना. मी म्हणाले, ‘ते kit ना.. ते हरवलं...’ सगळे एकदम ओरडले, ‘हरवलं?’ आणि मग सगळे बराच वेळ खूप काय काय बोलले. ‘असं कसं हरवलं?’ ‘ठीक आहे, होतं,’ ‘असं कसं होतं? imported होतं ते kit.’ ’हल्ली सगळं मिळतं आई आपल्याकडं...’ माझ्या कानात कुणीतरी वाक्‍यांचं फ्रूट सलाड ओततं आहे असं वाटलं मला. इतक्‍यात बेल वाजली. दारात एक गरीब दिसणारा माणूस आणि त्याच्याबरोबर सोनी. तिच्या हातात एक सुंदर चित्र होतं. पण ती रडत होती. तिचा बाबा होता बहुतेक तो. तो म्हणाला, ‘माझ्या पोरीकडं हे भारी सामान सापडलं. तुमच्या मुलीच्या दप्तरातून पडलं असावं. म्हणून घेऊन आलोय परत. हिनं चोरलं नाहीये. तिला मिळालं असंल..’ पार्सलनं माझ्याकडं बघितलं. मी मान खाली घातली. मारमालेडनं त्यांना आत बसवलं. तिच्या हातातलं चित्र पाहिलं. आमच्या दोघींचं चित्र काढलं होतं तिनं. हातात हात घातलेलं, BFF सारखं. पार्सलनं ते बघितलं आणि म्हणाली, ‘हे तिच्या दप्तरातून पडलेलं नाहीये. तिनं दिलंय तुमच्या मुलीला. कारण तिला चित्रं काढता येत नाहीत आणि तुमची मुलगी सुंदर चित्र काढते. तुम्ही घेऊन जा ते कीट परत. पण एका अटीवर. हे चित्र आम्हाला द्यायचं..’ मला चित्र देऊन सोनी गेली. आणि मग सगळ्यांनी माझे खूप लाड केले. खरंतर इतकं काय केलं मी तेच मला कळलं नाही. पण लाड होत असतील तर why ask silly questions?? 
आत्तापर्यंत मला मिळालेलं सगळ्यात भारी गिफ्ट म्हणजे सोनीचं ते चित्र. ओके बाय, गुड नाईट...

संबंधित बातम्या