आम्ही travel freak 

विभावरी देशपांडे
सोमवार, 6 मे 2019

साराची डायरी
 

आमच्याकडे सगळे travel freak आहेत. म्हणजे तुम्हाला वाटेल, की सगळे खूप प्रवास करतात. पण तसं नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, की प्रवास करायचा म्हटला की सगळे वेडे होतात. कसं ते मी एक्‍स्प्लेन करते. आमच्याकडं fox traveller, TLC, National geographic असे channels सारखे चालू असतात. म्हणजे समोर कुणी बसलेलं असतं असंपण नाही. Channel चालू असतो. मग मा इकडून तिकडं जाताना, फोनवर काहीतरी करताना मधेच टीव्ही बघते. तेव्हा इजिप्त, टर्की, स्पेनबद्दल काहीतरी चालू असेल तर एकदम जोरात किंचाळते. मग पा घरात असेल तर तो दचकतो. ती म्हणते, ‘किती वर्षं झाली... मला जायचं होतं ’xyz’ ला. नाही जाता येत अजूनही. लग्नाआधी पप्पांच्या ट्रान्स्फर्समुळं खूप फिरले. तेव्हा मला वाटायचं. लग्नानंतर पण असं मस्त जिप्सी लाइफ जगता येईल...’ (जिप्सी म्हणजे आपलं सामान घेऊन सगळीकडं फिरणारे लोक. त्यांना घरच नसतं आणि मा तर सारखी म्हणत असते ‘आपल्याला ह्याहून मोठं घर घ्यायला हवं. मग जिप्सी लाइफ कसं जगणार होती काय माहीत?) हां.. तर मा असं खूप काय काय बोलते... की कसं लग्नाआधी पा तिला म्हणाला होता आपण इकडं जाऊ, तिकडं जाऊ.. असं करू, तसं करू... आणि आता तो कसा सगळं विसरला आहे. मग पा म्हणतो, ‘तुझं चुकलंच मोना, तू त्या रोहन शास्त्रीला हो म्हणायला हवं होतंस. सगळं जग फिरली असतीस त्याच्याबरोबर.’ रोहन शास्त्री म्हणजे माचा कॉलेजमधला मित्र. तो मर्चंट नेव्हीत आहे. मा त्याला नाही म्हणून ‘पा’ला हो म्हणाली. तिनं travel हा विषय काढला की तो रोहन हा विषय काढतो. मग प्रवास VS रोहन अशी फाइट होते. रोहन जिंकतो आणि मा परत टीव्ही बघायला लागते. Problem असा आहे, की ‘मा’ला प्रवास करायला खूप आवडतो आणि ‘पा’ला अज्जिबात नाही. त्याला हॉटेलमध्ये तंगड्या वर करून झोपायला आवडतं आणि ‘मा’ला आसपास जे असेल नसेल ते सगळं बघायला आवडतं. (एकदा आम्ही कुठंतरी गेलो होतो. तर ती शेजारच्या गावातला ट्रायबल संडास बघायला गेली होती.) तिचं म्हणणं आहे, की आपण जितका प्रवास करतो तितकी जास्त माहिती आपल्याला मिळते, एक्‍स्पीरीयन्स मिळतो आणि आपण भारी होतो. ‘पा’चं म्हणणं आहे, ‘आजकाल ऑनलाइन गेलं की सगळी माहिती मिळते.’ मा आणि पा ‘मेड फॉर इच अदर’च्या ऑपोसिट आहेत. पण तरी ते एकमेकांना आवडतात. कसं काय माहीत नाही. 

तर कालपण असंच झालं. सकाळी स्पेन आणि पोर्तुगालचा काहीतरी शो चालू होता. मा पुन्हा किंचाळली. एकदम laptop घेऊन बसली आणि धडाधड सर्च मारायला लागली. थोड्या वेळानी एकदम ओरडली, ‘१० मे ते २५ मे! मी स्पेन आणि पोर्तुगालला जाणार आहे. कोण कोण येणार आहे?’ मी आणि मेकूड एकमेकांकडं बघायला लागतो. मेकूडनी तिचं टिपिकल ’whattevvaa’ वालं एक्‍स्प्रेशन दिलं आणि ती insta वर busy झाली. मग मानी माझ्याकडं पाहिलं. धमकी दिल्यासारखं. मी जरा घाबरलेच. मी हात वर केला. तेवढ्यात पा बाहेर आला. मग पुढचा १ तास दोघांचं सिरीयस डिस्कशन झालं. दरवर्षी होतं तसं. ‘वेळ किती आहे? हवा कशी असेल? बजेट आहे का? सध्या विसा मिळायला किती वेळ लागतो.’ वगैरे वगैरे. मग ठरलं की जायचं म्हणजे जायचं! ‘मा’नी online shopping पण सुरू केलं. आमचे हॉलिडे लुक्‍स, Airport लुक्‍स सगळं ठरलं. मला वाटलं ह्यावेळी आमचं दरवर्षीचं रेकॉर्ड ब्रेक होणार! मोचेमाडकर family युरोपला जाणार! Yooohoooo!!! 

पण रात्री ‘मा’नी सहज म्हणून पासपोर्ट काढला! तर तो एक्‍स्पायर झाला होता! परत एक मोठं डिस्कशन.. 
तू कधीच तुझे डॉक्‍युमेंट्‌स वेळेवर बघत नाहीस.. - पा. 
पण तुला आठवण करायला काय होतं. तू नवरा आहेस ना माझा? - मा. 
मी हजार वेळा आठवण करतो. तुलाच काही पडलेली नसते - पा. 
पासपोर्टचा काही उपयोग करायचा चान्स तरी मिळाला आहे का इतक्‍या वर्षात. कुठं नेलं आहेस का तू? - मा. 
उगाच विषय बदलू नकोस. पासपोर्ट हे खूप महत्त्वाचं डॉक्‍युमेंट आहे. वापरलं - नाही वापरलं तरी - पा. 
जाऊ दे, मी नाहीच करत रिन्यू. उपयोग काय त्याचा? - मा. 
नको करूस.. तुझी मर्जी - पा. 
खरंच... रोहनला हो म्हणाले असते, तर ही वेळ आलीच नसती. सतत पासपोर्टची गरज पडली असती आणि तो एक्‍स्पायर झालाच नसता - मा. 
मा चिडली की काहीही बोलते. पासपोर्ट एक्‍स्पायर होऊ नये म्हणून कुणी नवऱ्याचं सिलेक्‍शन करतं का? मला हसूच आलं खूप. 
एनीवे, आम्ही उद्या पाचगणीला जाणार आहोत family trip ला. २ दिवस. मला झोपायला हवं आता. ओके बाय, गुड नाइट.  

संबंधित बातम्या