‘मा’चा आरसा 

विभावरी देशपांडे
सोमवार, 13 मे 2019

साराची डायरी
 

काल माझी खिट्टी सरकली शेजारच्या मायरावर. स्वतःला काय समजते कोण जाणे! तिची आई कधीतरी ‘मिस पुणे’ झाली होती म्हणे. तेव्हापासून हिला वाटतं हीच ब्युटी क्वीन आहे. सारखी सगळ्यांवर कॉमेंट्‌स करत असते. ‘शी! तुझी स्कीन किती ऑइली आहे. शी तुझं नाक किती मोठं आहे. तुला किती ब्लॅक हेड्‌स आहेत. तुझे केस किती फ्रिझी आहेत..’ जाम राग येतो तिचा. आता मी आहे तशी आहे. मला काही फरक पडत नाही. नानी म्हणते, ‘ब्युटी इज स्कीन डीप - म्हणजे आपण कसे दिसतो हे फार महत्त्वाचं नाहीये. आपण कसे आहोत, आपण विचार कसा करतो, काम कसं करतो, लोकांशी कसे वागतो हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळंच आपण सुंदर होतो.’ बरोबर आहे. पण लोकांना आतलं दिसत नाही ना! असं इन्व्हिसिबल एक्‍सरे मशिन असायला हवं होतं. सारखं बरोबर घेऊन फिरायचं. म्हणजे आपण आतून किती सुंदर आहोत हे लोकांना कळेल. ते होईल तेव्हा होईल. पण आत्ता मायराला गप्प कसं बसवायचं कळत नाहीये. कारण मी दिसायला चांगली नाहीये हे ती मला सारखं सारखं सांगते. मला सवय झाली आहे. पण काल एकदम लिमिट क्रॉस केली तिनं. 

तिच्या आईला तिला पिक्‍चरमध्ये घालायचं आहे. तिचं म्हणणं आहे, की ती बॉर्न ॲक्‍टर आहे. सोसायटीच्या कार्यक्रमात ती ‘मार डाला..’वर सेम माधुरी दीक्षितसारखी नाचली होती. आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये भन्साळी अंकल राहतात. ते सगळ्यांना सांगतात, की ते संजय लीला भन्साळी यांचे भाऊ आहेत. (मारमालेड म्हणते ते टिंग्या टाकतात.) ते म्हणाले, तिला डायरेक्‍ट एंट्री मिळेल. फक्त फोटो काढावे लागतील. म्हणून तिच्या मॉमनं एका भारी फोटोग्राफरकडून फोटो काढून घेतले. ते बघायला तिनं आम्हाला बोलावलं. तिची मॉम बूमरॅंगसारखी म्हणत होती ‘मायरु किती प्रिटी आहे. मायरु गॉड गिफ्टेड आहे.’ माझ्या कानाचा स्विच ऑफ केला होता, पण अचानक तिची मॉम म्हणाली, ‘तुला काढायचे आहेत का फोटो?’ तर मायरा म्हणाली, ‘तिचे नाही येणार चांगले. ती तिच्या आईसारखी काळी आहे. बाबासारखी दिसत असती तर चांगले आले असते.’ माझ्या कानाचा स्विच ऑन झाला. माझ्याबद्दल वाईट बोलली तर ठीक आहे एकवेळ. पण माझ्या मारमालेडबद्दल वाईट बोलायला अलाऊडच नाहीये कुणाला. मी लहान असताना एकदा पार्सलच्या भिशी फ्रेंड्‌स घरी आल्या होत्या. घरी मी आणि पार्सलच होतो. मला झोपवून ती बाहेर आली. मला मधेच जाग आली तेव्हा एक फ्रेंड म्हणत होती, ‘तुझ्या राहुलवर गेली बरं झालं. पण सरुनं आईचा रंग घेतलाच तिच्या. तेव्हाच माझ्या वल्लरीला सून करून घेतली असतीस तर?’ तेव्हा फार समजायचं नाही, पण मला हे कळलं की माझ्या ‘मा’ला वाईट म्हणतेय ती. मी माझी ठकी (डॉल) जोरात फेकून मारली होती त्या फ्रेंडला. संध्याकाळपर्यंत पार्सलनं मला कोपऱ्यात उभं केलं होतं, तरी मी सॉरी म्हणाले नव्हते. आता मी मोठी झालेय त्यामुळं मला कितीही राग आला तरी मी तो कंट्रोल करते. मी उठले आणि घरी निघून आले. 

माझ्या डोक्‍यातला राग जातच नव्हता म्हणून मी टीव्ही लावला. तर त्यात ती ad आली. एक क्रीम असतं, ते लावलं की आपण गोरे होतो. मी माझी पिगी बॅंक उघडली, आमच्या समोरच्या मनोहर वाण्याकडं गेले. ती ट्यूब आणली आणि मारमालेडच्या रूममध्ये ठेवली. मला वाटलं रात्री ती विचारेल हे क्रीम कुणी आणलं? पण तिनं काहीच विचारलं नाही. मला रडू यायला लागलं. ते कुणाला कळू नये म्हणून मी पटकन झोपून गेले. 

आज सकाळी उठले तर माझ्या उशीपाशी एक चिठ्ठी होती. ‘मा’नं लिहिलेली. 
‘सरू, माझा आरसा तू आहेस. तुला मी गोरी व्हावं असं वाटत असेल तर मी हे क्रीम लावीन. पण मला माहीत आहे की माझ्या या आरशात मी खूप सुंदर दिसते. मग बाकी कुठलाच आरसा, कुठलीच माणसं मला काय म्हणतात यानं मला काहीच फरक पडत नाही आणि तो तुलाही पडायला नको.’ खूप भारी वाटलं. मी तिचा आरसा आहे आणि त्यात ती जगात भारी दिसते. बाकी गेले उडत. मी ती ट्यूब कचऱ्यात टाकली आणि धावत जाऊन तिला मिठी मारली. ती काहीच बोलली नाही, पण तिला कळलं. कारण माझ्या गालावर गरम पाणी पडलं. 

आता आरशाला झोप आली आहे. ओके बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या