मेकूडचा स्वैपाक 

विभावरी देशपांडे
सोमवार, 17 जून 2019

साराची डायरी
 

‘स्वीगी केलं माझ्या फोनवरून. सू सू (म्हणजे शू नाहीये. रडण्याचा आवाज आहे. तो कसा लिहायचा मला कळलं नाही. रडताना नाकातून असा आवाज येतो. म्हणून सू सू म्हणजे रडण्याचा आवाज आहे.. लक्षात ठेवा) पण त्या माणसाला सू सू पत्ताच कळत नव्हता घराचा आणि मीटिंग चालू होती त्यामुळं सू सू.. शक्‍यच नव्हतं त्याचा फोन घेणं..’ 

कोण असेल हे? ऑफ कोर्स मारमालेड. नाही नाही.. काहीच झालं नाही. काल तिची अचानक मीटिंग ठरली त्यामुळं तिला यायला उशीर झाला. कमल मावशी as usual सुटीवर आहेत. पा जर्मनीला गेलाय आणि पार्सलची भिशी होती म्हणून ती चश्‍मेबद्दूरकडं गेली होती. मेकूडच्या बेस्ट फ्रेंडचा पाचवा ब्रेकप झाल्यामुळं ती डिप्रेशनमध्ये गेली. म्हणून ते सगळे खोली बंद करून महत्त्वाचं डिस्कशन करत होते. थोडक्‍यात, आमचं डिनर स्किप झालं. मला तर आनंदच झाला. मी पटकन आंबा खाल्ला. पार्सल आणि मा एकाच वेळी घरी आल्या. घरात स्वैपाक नसल्यामुळं मी जेवले नाही याचं मा ला भयंकर वाईट वाटलं. त्यामुळं हा ‘सू सू’ सीन झाला. तिला इतकं गिल्टी वाटत होतं, की तिच्याकडं बघून एखाद्याला वाटेल तिनी माझा खूनच केलाय! 

‘बंद करते माझं बुटीक. सू सू.. नको तो सू सू लॅक्‍मे फॅशन वीक. माझ्यामुळं माझी पोरं उपाशी राहाणार असतील, तर नको मला  करिअर - बीरिअर..’ मा.  ‘पण मी आंबा खाल्ला..’ मी. 

‘किती आंबे खाशील? उष्णता होईल,’ मा. 

अरेच्चा! हिला वाईट वाटू नये म्हणून मी बोलले तर माझ्यावरच गेम पडली. म्हटलं आपण गप्पच बसावं. 

‘चुकलंच माझं आई.. सॉरी...’ मा. 

वाटलं पार्सल आता ‘मा’ला मोठ्ठं लेक्‍चर देईल. कसं बायकांनी हाऊस वाइफ असलं पाहिजे.. वगैरे वगैरे. पण पार्सल सॉलिड गुगली टाकते कधी कधी. तसंच आज झालं, ‘इतकं काही आकाश कोसळलं नाहीये. उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. कुकुली बाळं नाहीयेत ह्या पोरी. सतरा वर्षांची आहे लक्ष्मी. नंदू झाला होता मला तेव्हा. साधा वरण भाताचा कुकर लावता येत नाही? एक दिवस स्वतःचं आणि बहिणीचं पोट भरता येत नाही तिला? कुठाय ती?’ पार्सल. माझ्यासाठी ह्या वर्षातला बेस्ट डे होता हा! मेकूडचं काहीतरी चुकलं होतं आणि तिच्यावर पडी पडणार होती. याऽऽऽऽहूऽऽऽऽ! इन्स्टंट उठले आणि मेकूडला बाहेर बोलावलं. ती जांभया देत बाहेर आली. खरंतर ती रोज रात्री दोन वाजेपर्यंत फोनवर वेब सिरीज बघत बसते. पण सगळे झोपेपर्यंत ती खूप झोप आल्याची acting करते, पार्सलनी तिला सॉलिड झापलं. पार्सल बोलायला लागली की मीच काय, मा आणि पा पण गप्प बसतात. म्हणजे नेहमी तिचं सगळंच बरोबर असतं असं नाही, पण ती घरातली सीनियर मोस्ट मेंबर आहे म्हणून. पण मेकूड इतकी आगाऊ आहे की ती पार्सलला पण उलट बोलली, 

‘स्वैपाक म्हणजे रॉकेट सायन्स नाहीये. मी उद्याचं डिनर मॅनेज करीन. फक्त मला संध्याकाळचे दोन तास द्या..’ मेकूड. 

‘ठीक आहे, मी उद्या भजनाला जाणार आहे आणि आई बुटीकमध्ये. आम्ही परत येईपर्यंत स्वयंपाक तयार असला पाहिजे आणि बाहेरून आणायचं नाही,’ - पार्सल. 

‘डन डील’ - मेकूड. 

सॉलिड डेरिंग आहे यार मेकूडमध्ये! तिला काहीही करता येत नाही. तरी बिनधास्त चॅलेंज घेतला तिनी! त्याचं सिक्रेट मला आज कळलं. मी क्‍लब हाऊसमध्ये दगड का माती खेळून आले. तेव्हा प्रणवच्या चपला दिसल्या मला दारात. मला एका मिनिटात कळलं सगळं. प्रणव मेकूडचा मित्र आहे. तिला त्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये पण त्याला ती खूप आवडते. तिला खरंतर हे नीट माहितीये पण ती माहीत नसल्यासारखं दाखवते. पण मी हुशार असल्यामुळं मला सगळं कळतं. प्रणव स्वैपाक एक नंबर करतो. आमटी भातापासून स्ट्रॉगनॉफपर्यंत. प्रणव आमटीला फोडणी देत होता आणि ती काकडी टोमॅटोच्या salad चं डेकोरेशन करत होती. तिनी घड्याळात पाहिलं आणि म्हणाली, ‘प्रणव, लास्ट मिनिट्‌स!’ सेम मास्टरशेफसारखं. मी हातपाय धुऊन येईपर्यंत तो गेला पण! तेवढ्यात पार्सल आली आणि पाठोपाठ मा. मेकूडची डिनर अरेंजमेंट बघून त्या थक्कच झाल्या. खूप कौतुक केलं तिचं. मला जाम राग आला. मेकूडनी चीटिंग केली होती. ‘तिनी नाही केला स्वैपाक. तिनी प्रणवकडून करून घेतला,’ सरळ सांगून टाकलं. 

मा एकदम भडकली. डायरेक्‍ट झापायला लागली मेकूडला. तर मेकूड म्हणाली, 

‘डिनर मॅनेज करायचं असं म्हणाली होती आजी, मीच कुक करायचं असं कुठं म्हणाली? मी केलं मॅनेज.’ तिचा पॉइंट actually बरोबर होता, पण कोर्टमध्ये. घरात नाही. मा आणखीच पेटली. इतक्‍यात पार्सलनी तिचा टॉप क्‍लास गुगली टाकला. ‘हं.. हुशार आहेस तू लक्ष्मी. आजच्या काळात टिकून कसं राहायचं बरोबर कळतं तुला. कोण म्हणतं बायकांनीच केला पाहिजे स्वयंपाक. इतकी वर्षं बायका राबल्या किचनमध्ये, राबू दे आता पुरुषांना. हे बघ, तुला नसेल ना शिकायचा स्वयंपाक, नको शिकूस. नवरा मात्र सुगरण शोध म्हणजे झालं..’ 

ह्याला काय अर्थ आहे? सॉलिड डोकं सरकलं आहे माझं. म्हणजे पार्सल म्हणाली त्यात चूक काहीच नाहीये. पण पुन्हा मेकूड जिंकलीच! नेहमीसारखी! आय वाँट धिस डे टू एंड! 

ओके, बाय गुड नाईट.   

संबंधित बातम्या