व्होट आउट 

विभावरी देशपांडे
सोमवार, 8 जुलै 2019

साराची डायरी
 

आमची सोसायटी मस्त आहे. मधलं ग्राउंड, लॉन सगळं भारी आहे. ‘पा’ मेंटेनन्सचे पैसे भरतो. सगळेच भरतात. मा म्हणते, ‘गेटेड कम्युनिटीचा हाच advantage आहे. मुलांच्या सेफ्टीचा प्रश्‍न नाही.’ आम्ही कितीही उशिरापर्यंत खाली खेळू शकतो. इट इज व्हेरी सेफ. शिवाय पार्सल नेहमी म्हणते, ‘आपल्यातलेच लोक आहेत almost सगळे, त्यामुळे संस्कारांचा प्रश्‍न नाही..’ तिचं वेगळंच लॉजिक असतं. मला ते फार कळत नाही पण तिलाही ‘आपली सोसायटी भारी आहे’ हे मान्य आहे एवढं मला कळतं. आमचा ग्रुपपण एकदम मस्त आहे. सगळ्यांचे बाबा आयटीमध्ये, नाहीतर डॉक्‍टर, नाहीतर बिजनेसमॅन आहेत. सगळ्यांकडे गाड्या आहेत. सगळे वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा फॉरेन ट्रीप करतात. त्यामुळे आमच्या ग्रुपचे डिस्कशनचे सब्जेक्‍ट्‌स सेम असतात. ट्युनिंग भारी जमतं. 

पण काल आमच्या ग्रुपमध्ये एक अनवाँटेड गेस्ट आला. गणेश. तो आमच्याच सोसायटीतला आहे पण, नाही पण. म्हणजे कसं आहे, आमच्या बिल्डींग्ज ज्यांनी बांधल्या आहेत, त्यांना कुणीतरी कंपल्सरी केलंय की एक बिल्डिंग त्यांच्यासाठी बांधायची जे आमच्यासारख्या बिल्डींग्जमध्ये राहणं अफोर्ड करू शकत नाहीत. चांगली आहे आयडिया, पण म्हणून त्यांना खेळायला कसं घेणार? म्हणजे मला तसा काहीच प्रॉब्लेम नसतो. शेजारी बांधकाम चालू होतं तिथली सोनू माझी फ्रेंड होतीच की! पण ग्रुपमध्ये सगळ्यांनाच चालेल असं नाही ना.! कारण ग्रुपचा रूल आहे आमच्या. नवीन मेंबर घ्यायचा असेल, तर सगळ्यांनी व्होटिंग करायचयं. जर जास्त लोकांना चालणार असेल तरच येतो नवीन मेंबर. प्रथमेशला हा रूल माहीत असून त्यानी डायरेक्‍ट आणलंच त्याला. म्हणजे काय झालं सांगू का? आम्ही सगळे क्रिकेट खेळत होतो, (म्हणजे मुलं खेळत होती, आम्ही कॉमेंट्री करत होतो. आमच्यातली फक्त अनन्या क्रिकेट खेळते.. आणि ती मुलांपेक्षा भारी खेळते); तर प्रथमेशची टीम हरत होती. तो जामच पेटला होता. तेवढ्यात कंपाउंडवरून एक बॉल आत आला. (‘त्या’वाल्या बिल्डिंगमधली मुलं मागच्या रस्त्यावर क्रिकेट खेळतात. कारण या सोसायटीचा पार्ट असूनही त्यांना आमच्या प्ले एरियामध्ये एंट्री अलाऊड नाहीये. असं का माहीत नाही. पण आमच्या सेफ्टीसाठी असेल बहुतेक) प्रथमेश तो बॉल घेऊन मागं गेला. आम्हाला वाटलं सॉलिड राडा होईल आता. कारण दरवेळी होतो. त्यांच्या प्ले एरियातून बॉल्स इकडं येऊन गाड्यांच्या काचा फुटतात. परवा तर जोग आजोबांच्या डोक्‍यालाच लागला बॉल. यावर काय ॲक्‍शन घ्यायची याबद्दल नेक्‍स्ट कमिटी मीटिंगमध्ये डिस्कशन होणार आहे. 

... तर मी काय सांगत होते? आम्हाला वाटलं प्रथमेश जाऊन भांडेल. पण तो एका मुलाला घेऊन आत आला. त्याच्या हातात एक जुनी बॅट होती. दरवेळी बॉल इकडं येतो तेव्हा तो यानीच मारलेला असतो म्हणे. सिक्‍सर डायरेक्‍ट. धोनी हेलिकॉप्टर शॉट! प्रथमेश म्हणाला, ‘गणेश आजपासून आपल्याबरोबर खेळणार आहे. क्रिकेट लीगमध्ये हा जर आपल्या टीममध्ये आला तर आपण नक्की जिंकू! आणि technically तो आपल्याच सोसायटीत राहतो, so why not?’ प्रथमेश असं म्हणाला आणि ग्रुपमध्ये सॉलिड राडा झाला. सगळे एकदम बोलायला लागले. ‘बॅड इन्फ्लुएन्स, not allowed, पप्पा रागवतील, unhygienic, bad words..’ असे मिक्‍स शब्द ऐकू आले मला. मला कळत नव्हतं काय करायचं. प्रथमेश म्हणतोय त्यात चूक काहीच नव्हतं. पण असं कसं खेळणार एकत्र? मग उद्या गणपतीचे कार्यक्रम, दिवाळी, पार्ट्या, ट्रेक सगळ्याला त्या बिल्डिंगमधले लोक यायला लागले तर? आमच्या सेफ्टीचं काय? शेवटी असं ठरलं, की उद्या वोटिंग घ्यायचं. मी ठरवलं ‘नो’ म्हणायचं. सेफ्टी फर्स्ट. 

आज शाळेतून आले. आल्या आल्या माझा आयपॅड टाइम असतो. ‘मा’चं फेसुबक बघू शकते मी. मला ‘आपलं मराठी बिग बॉस’ बघायला अलाऊड नाहीये. पण नो प्रॉब्लेम. फेसबुकवर सगळं कळतं काय झालंय ते. मी अपडेटेड असते. तर मी असंच काहीतरी वाचत होते, की पराग कान्हेरे आउट झाला. तर मला एक आर्टिकल दिसलं. एक माणूस पोटावर झोपलेला, आजूबाजूला पाणी आणि त्यांच्या शर्टात एक बाळ होतं. पोटावर झोपलेलं. हे असे का पाण्यात झोपलेत म्हणून मी नीट वाचलं तेव्हा कळलं की त्या डेड बॉडीज होत्या. डोनाल्ड ट्रम्पनी मेक्‍सिकोच्या लोकांना अमेरिकेत यायला अलाऊड केलं नाही. म्हणून काही लोक बोटीनं येत होते. तशाच एका बोटीतून हा माणूस आणि त्याची छोटी मुलगी खाली पडले आणि बुडून मेले. मला खूप खूप वाईट वाटलं. रडूच यायला लागलं. का नाही येऊ देत त्यांना हा ट्रम्प? त्यांना नाही का वाटत आपल्या मुलांनी सेफ राहावं, चांगल्या ठिकाणी राहावं? चांगलं शिकावं? येऊ देत की. रागच आला मला. पण तेवढ्यात तन्वीचा फोन आला इंटरकॉमवर, ‘खाली ये, वोटिंग सुरू झालं’ असा. मी गेले पळत.. 

सगळे गणेशला ‘नो’ म्हणाले. माझंही तसंच ठरलं होतं. पण माझी टर्न आली तेव्हा कसं काय माहीत नाही, मी ‘येस’ म्हणाले! गणेश व्होट आउट झाला. कारण त्याला दोनच व्होट्‌स मिळाली. पण मला का माहीत नाही, खूप छान वाटतंय. ओके बाय.. गुड नाईट...

संबंधित बातम्या