सेलिब्रिटीहूड

विभावरी देशपांडे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

साराची डायरी
 

मला ना, सेलिब्रिटीहूड खूप भारी वाटतं. असं मस्त मोठ्या गाडीतून रेड कार्पेटवर उतरायचं! मोठे मोठे हीलवाले सॅंडल्स घालून चालायचं, मागं वळून पब्लिककडं बघायचं. गोड हसायचं आणि हात करायचा. मग पापाराझी (म्हणजे माझा बाबा नाही, खरे खरे रिपोर्टर लोक जे कचाकच फोटो काढतात) त्यांना वेगवेगळ्या पोझेस द्यायच्या. लोकांना सेल्फी द्यायचे. मग पेपरात आणि सोशल मीडियावर फोटो येणार. केवढं भारी वाटतं! म्हणजे दरवेळी तुम्हाला काहीतरी भारी करावंच लागतं असं पण नाहीये. जनरल.. एका पार्टीला गेलं, ‘स्पा’मध्ये गेलं, जिमला गेलं तरीपण असं सगळं होतं. मी ठरवलं होतं, मोठेपणी आपण सेलिब्रिटी व्हायचं. त्यासाठी काय करायचं, हेपण माहीत नव्हतं. पण परवा मेकूडची एक फ्रेंड आली होती नताशा म्हणून. ती एका बाईची असिस्टंट म्हणून काम करते, ती बाई तुम्हाला सेलिब्रिटी बनवून देते.. एकतर आपण ‘एबीसी ऑफिशिअल’ असा एक अकाऊंट सुरू करायचा. (ए बी सी म्हणजे तुमचं जे नाव असेल ते). त्याच्यावर रोज वेगवेगळे फोटो टाकायचे. म्हणजे कॉफी पिताना, जिम करताना, चिल करताना, फ्रेंड्‌स आले की, अगदी झोपतानासुद्धा (नंबर वन, नंबर टू करताना नाही हां! म्हणजे तसा रूल नाहीये काही, पण कशाला ना!). नंतर एक स्टायलिस्ट, एक मॅनेजर, एक मेकपमॅन आणि एक हेयरड्रेसर... की almost झालो आपण सेलिब्रिटी! म्हटलं व्वा! सोप्पं आहे की! 

पण आज माझी आयडियाच चेंज झाली. काय झालं माहितीए का? आमच्या सोसायटीचा बर्थडे होता; तर त्यासाठी कुठल्यातरी सेलिब्रिटीला बोलवायचं असं चाललं होतं. आमच्या सोसायटीतल्या राधाच्या आईचे खूप फ्रेंड्‌स सेलिब्रिटी आहेत. पण आमचं खूप अचानक ठरलं आणि सेलिब्रिटी लोक खूप बिझी असतात, त्यामुळं कुणालाच जमत नव्हतं. मग आमच्या नवाथेआजींच्या भजनी मंडळातल्या एका बाईंच्या मुलाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या नवऱ्याची बहीण सेलिब्रिटी आहे - उर्वशी कपूर म्हणून. (रणबीर कपूरची लांऽऽऽऽऽऽऽऽबची बहीण आहे म्हणे) तिला मॅनेज केलं. ती येते म्हणाली, पण तिनं पैसे मागितले. म्हटलं बर्थडे पार्टीला पैसे? फुकट भारीतला केक आणि भारी जेवण मिळतं तर कशाला पैसे? पण आज्जी म्हणाल्या, ‘त्यांच्या वेळेची किंमत असते ती! एवढ्या बिझी शूटिंगमधून येतात हे सेलिब्रिटी, म्हणून पैसे घेतात.’ सगळे म्हणाले, ‘ठीक आहे.’ आदल्या दिवशी कोण मिळणार नाहीतर? 

मिस उर्वशी येणार म्हणून सगळे excited होते. मेकूड आणि तिच्या फ्रेंड्‌सनी ‘आयएमडीबी’वर सर्च केलं, तर काहीच मिळालं नाही. पण यू ट्यूब वर लिंक्‍स मिळाल्या. म्युझिक व्हिडिओज, कुठल्यातरी चॅनेलवरची देवीची सिरीयल वगैरे... ती गाडीतून उतरली. तिच्यामागं दोन बॉडी बिल्डर्स होते. (सेफ्टीसाठी म्हणे! पण आमच्या सोसायटीत बाहेर सिक्‍युरिटी गार्डस आहेत!) एक assistant होती. ती सारखी तिचा फोन assistant ला देत होती, परत घेत होती. ती अज्जिबात हसत नव्हती. पण कुणी सेल्फी काढायला आलं, की ती खूप हसायची. तिनी पटकन केक कापला, फोटो काढले. Obviously ती डाएटवर होती म्हणून तिनी काहीच खाल्लं नाही... आणि ती निघूनपण गेली! म्हटलं असेल बुवा असंच. आपल्याला कुठं माहीत आहे, सेलिब्रिटीहूड कसं असतं! 

मग रात्री काय झालं, मी हट्ट केला म्हणून मेकूड मला तिच्या फ्रेंड्‌सबरोबर पावभाजी खायला घेऊन गेली. तर आमच्या मागच्या टेबलवर एक मुलगी एका मुलासमोर बसली होती. तिला आम्ही दिसत नव्हतो, पण आम्हाला तिचं बोलणं ऐकू येत होतं. ती त्याला सांगत होती, की आज त्या सोसायटीत मिळालेले सगळे पैसे गाडीच्या रेंटवर, असिस्टंट, बाऊन्सर्स (म्हणजे ते बॉडी बिल्डर्स), आर्टिस्ट आणि कपड्यांच्या रेंटवरच खर्च झाले. आता काम मिळायला हवं, नाहीतर काही खरं नाही... 

शॉकच बसला. ही तीच होती.. उर्वशी! ती एकदम मस्त मराठी बोलत होती. बकाबका पावभाजी खात होती! (आमचा मेन्यू काय वाईट होता?) तिच्या बोलण्यावरून कळलं की ही तीच आहे. नाहीतर मेकपशिवाय तिला ओळखणं impossible होतं. मला वाईटच वाटलं. हे सगळं तिनी पैसे देऊन आणलं होतं. तिचं स्वतःचं काहीच नव्हतं! आणि आता काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत तिच्याकडं. आणि सेलिब्रिटी म्हणून आल्यामुळे पार्टी एंजॉयपण नाही करता आली. 

मी घरी आल्यावर ‘मा’ला म्हणाले, ‘मला नाही व्हायचं सेलिब्रिटी. ते ‘बिचारे’ असतात..’ ती म्हणाली, ‘सगळे असे नसतात.. आणि सेलिब्रिटी व्हायला म्हणून काही करायचं नसतं. आपण जे करतो ते चांगलं केलं, की आपण लोकांना आवडायला लागतो.. आणि मग आपोआप होतो सेलिब्रिटी!’ 

ही आयडिया चांगली आहे. फक्त काय करायचं हे ठरवायला लागणार आहे. उद्या बघू. झोप आली. 

ओके बाय, गुड नाईट...

संबंधित बातम्या