माझी खिट्टी सरकते... 

विभावरी देशपांडे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

साराची डायरी
 

गेल्या आठवड्यात height म्हणजे height झाली. माझी एकूण एक सगळ्यांशी भांडणं झाली. भांडण नंबर वन - ‘मा’शी झालं! सकाळी सकाळी. म्हणजे मला आता बोर्नव्हिटा अजिबात आवडत नाही. कारण सिम्पल आहे, मी आता लहान नाहीये. मला कॉफी आवडते. मेकूड आणि मा पितात तशी ब्लॅक कॉफी मला कधीच मिळत नाही. दुधात थोडी कॉफी मिळते. कारण म्हणे मी लहान आहे आणि कॅफिननी मुलांची बुद्धी मंद होते. म्हटलं, आधीच मला बी ग्रेडच्या पुढं जात येत नाहीये. त्यात कॉफी पिऊन बुद्धी आणखी मंद व्हायला नको. म्हणून मी पिते दूध कॉफी घालून. परवा इन्स्टंटवाली कॉफी संपली तर मला बोर्नव्हिटा दिलं. मला ओकारी आली तर मलाच ओरडली, ‘नाटकं करू नकोस’ म्हणून. मला इतका राग आला. कान गरम झाले एकदम. मला कळलंच नाही काय होतं आहे. मी टेबलावरच्या वस्तू एक एक करून खाली फेकायला लागले. आजकाल माझी खिट्टी सरकली, की मला समजतच नाही मी काय करते आहे. ते करताना समजत असतं, की आपलं चुकतं आहे. पण माझे हात माझ्या डोक्याचं काही ऐकतच नाहीत. मा इतकी चिडली, की माझ्याशी दिवसभर बोललीच नाही. (फटके मारलेले चालतात एकवेळ; पण बोलायचं नाही ही पनिशमेंट खूप डेंजर असते.) 

भांडण नंबर टू - आम्हाला शाळेत एक बेक्कार बोरिंग प्रोजेक्ट दिला. As usual मी घरी आल्यावर ते विसरले. मला आदल्या दिवशी आठवण झाली आणि मी भराभर प्रोजेक्ट पूर्ण केला. मला काही फोटोजचे प्रिंटआउट्स हवे होते. पण आमच्या घरी प्रिंटर नाहीये. म्हणून मी ‘पा’ला फोन केला की मेकूडने मेल केलेले प्रिंटआउट्स आण. तर तो विसरला. मी म्हटलं, ‘काय यार बाबा!’ तर माझ्यावरच चिडला आणि म्हणाला, ‘असली आयत्या वेळची कामं मला सांगत जाऊ नकोस. तुझे प्रिंटआउट्स काढू का त्या टोकियोच्या डेलिगेशनचं शेण साफ करू?’ ‘टोकियोचे लोक’ त्यांच्या गाई म्हशी का घेऊन आले आहेत मला कळलं नाही..  नंतर पार्सल म्हणाली, ‘त्याचा अर्थ literally घ्यायचा नसतो. तो वैतागला होता म्हणून असं म्हणाला.’ सगळे आजकाल वैतागलेलेच असतात. ते माझ्यावर राग काढू शकतात, पण मी नाही. कारण मी लहान आहे. तर माझी  खिट्टी सरकली... मी माझं प्रोजेक्ट टराटरा फाडून टाकलं आणि त्यांना सांगितलं, की लेट रिमार्क केला तर तुम्ही सही करायची. 

भांडण नंबर थ्री - ऑफ कोर्स मेकूडशी. तिनं माझ्या टिफिनच्या टॉवेलला लिपस्टिक पुसली. मी तिच्या ३ लिपस्टिक्सची टोकं तोडली. Result- आमची खतरनाक मारामारी. 

भांडण नंबर फोर - सादशी. त्याला मी पंधरा मिनिटं खाली फिरवलं तरी त्यानी वर येऊन शू केली. मी चिडून म्हटलं, ‘आता तूच पूस ती..’ तर तो गुरगुरला. माझी खिट्टी गेली. मी त्याला फटका मारला. 

या सगळ्यात माझी समजूत काढायला एकटा साद आला. बाकी सगळ्यांनी माझीच चूक असल्यासारखं माझ्याशी बोलणं बंद केलं. 

आज नानी आली तेव्हा तिला कळलं की काहीतरी जाम राडा आहे. मी तिला सगळं सांगितलं. मी म्हणाले, की सगळे चूक आहेत. मला वाटलं की तिला पटेल. तर ती म्हणाली, ‘सरू, आपल्या आसपासची, आपल्याला ओळखणारी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात ना ती आपला आरसा असतात. कारण ती कधी आपल्याशी खोटं वागत नाहीत. जेव्हा त्या चार माणसांशी आपलं भांडण होतं, तेव्हा विचार असा करावा की ती सगळी चूक आणि आपण बरोबर असं कसं असेल? असेलही कदाचित. पण तू विचार कर आणि तूच ठरव.’ 

आता मात्र हाईटच झाली. ती पण त्यांच्या साईडची आहे. पण नानी जगातली सगळ्यात हुशार आणि भारी माणूस आहे, त्यामुळं मी तिच्यावर कधीच ओरडत नाही. मी रडत रडत झोपून गेले. दुपारी चार वाजता मला जाग आली, तेव्हा मी किचनमध्ये गेले. नानी ‘मा’ला ओरडत होती. 

‘सरू खूप नाजूक वयात आहे. या वयात भान नाही राहात कशाचं. तू या वयाची होतीस तेव्हा घरातून निघून गेली होतीस चिडून, आठवतं? तिचं असं का होतंय यामागचं physical कारण तुलाही कळत नसेल, तर मात्र कमाल आहे...’ मा चुपचाप ऐकत होती. 

म्हणजे काय मला नीट कळलं नाही. पण ‘मा’नी माझ्यासाठी ती पिते तशी कॉफी केली, ‘पा’ रात्री पेस्ट्रीज घेऊन आला... आणि मेकूडनी माझ्याबरोबर फ्रेंड्सचा एपिसोड पहिला. माझ्या लक्षात आलं, की मी पण जरा जास्तच चिडते आजकाल. फिजिकल कारण असेल नानी म्हणाली तसं... पण मी पण जरा कंट्रोल करायला हवं स्वतःला! 

ऑल इज वेल नाऊ. कान गरम होत नाहीयेत. खिट्टी सरकत नाहीये. मस्त झोप येतेय. 

ओके बाय, गुडनाईट...

संबंधित बातम्या