मी भारीच आहे 

विभावरी देशपांडे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

साराची डायरी
 

‘सारू! मला आरवनी प्रो टाकला!’ सखी माझ्याकडं पळत आली. 

‘हो? काय म्हणालीस मग त्याला?’ मी. 
‘मला खूप भारी वाटलं, म्हणून मी हो 
म्हणली!’ - सखी. 

‘म्हणली काय म्हणली? म्ह णा ले! घाण मराठी बोलतेस तू...’ मी! (आता काही संबंध आहे का याचा?)  ‘तू उगाच मला क्रिटीसाईज करू नकोस, कळलं ना?’ - सखी. 
‘उगाच नाही, मला नाही आवडत असं मराठी बोललेलं...’ - मी. 

‘मग नको बोलूस माझ्याशी’ - सखी. 
‘हो! आता काय! तुला बॉयफ्रेंड मिळाला! आपलं डील मोडलंस तू!’ - मी. 

‘तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना? तुला आनंद झाला पाहिजेल!’ - सखी. 
‘पाहिजेल नाही पा हि जे !’ - मी. 

‘खड्ड्यात जा, तू जेलस होते आहेस म्हणून माझ्या मराठीच्या चुका काढते आहेस,’ - सखी. 

‘काहीतरी बोलू नकोस, गप्प बस..’- मी. 
‘तूच गप्प बस’ - सखी. ‘तूच.. तूच तूच..’ 

आमचं भांडण खूप वेळ चाललं. मग तिनी स्कूल बॅग आपटली आणि ती निघून गेली. जाऊ दे! मला राग आला होता. तिनी आमचं डील ब्रेक केलं होतं. 

आमच्या दोघींचं ठरलं होतं. कॉलेजमध्ये जाईपर्यंत बॉयफ्रेंड, डेटिंग वगैरे काहीही करायचं नाही, कारण आम्ही लहान आहोत. पण आमच्या सगळ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स तरी आहेत नाहीतर त्यांना कुणीतरी प्रो तरी टाकलेला आहे. पण आम्ही दोघीच अशा होतो ज्या कुणालाच आवडत नव्हतो. म्हणून आम्ही असं डील केलं होतं. मायरा हे ऐकून म्हणाली होती, ‘तुम्हाला कुणी प्रो टाकत नाही म्हणून असं डील केलं आहे तुम्ही..’ आम्ही भांडलो तेव्हा तिच्याशी, पण ती म्हणते ते १०० पर्सेंट खोटं नाहीये. खरंतर मला वाईट वाटायचं. म्हणजे असं नाही, की मला बॉयफ्रेंड पाहिजे. काय करायचा बॉयफ्रेंड? मी थोडीच मेकूडसारखी डेटवर जाऊ शकणार आहे? पण आपण कुणालातरी आवडतो असं कळलं की भारी वाटतं ना! आपल्यात आवडण्यासारखं काहीतरी आहे असं वाटतं. मी तर खूप वेळा प्रॅक्टिस पण केली आहे की कुणीतरी प्रो टाकायला आला आणि मी नाही म्हणाले. ‘सॉरी! मी ठरवलं आहे की कॉलेजमध्ये जाईपर्यंत नो बॉयफ्रेंड्स!’ आणि मग तो ४ वर्षं थांबला. कॉलेजच्या पहिल्या दिवशी दारात त्यानी मला थांबवलं आणि रेड रोज दिलं... आणि म्हणाला, ‘मैने चार साल तुम्हारा इंतजार किया है। अब तो हां कह दो।’ (हे नेहमी हिंदीत का होतं मला माहीत नाही..) इतके दिवस ठीक होतं! माझ्याबरोबर सखी होती. पण तिलापण बॉयफ्रेंड मिळाला! मी एकटीच राहिले. 
आमच्या सोसायटीत ऋतू नावाचा माझा फ्रेंड आहे. सगळे आम्हाला चिडवतात. खरंतर काहीच कारण नाहीये, पण आम्हाला दोघांना चष्मा आहे, म्हणून! काहीपण! सगळे त्याच्या मागं लागले होते तिला प्रो टाक प्रो टाक म्हणून. काल त्यानी टाकला प्रो! का माहीत नाही पण मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला! मी हो च म्हणाले! सखीनी डील मोडलं तर मी का नाही मोडायचं? 

मी घरी आले आणि मेकूडला सांगितलं दोस्तीत, की मला बॉयफ्रेंड मिळाला. मला वाटलं ती झापेल! पण ती म्हणाली, ‘Awwwww! Cho chweet!’ शॉकिंग! एक बॉयफ्रेंड मिळाला की किती गोष्टी सॉल्व्ह होतात. तिला एकदम माझ्याबद्दल ‘ब्रो फीलिंग’ आलं असणार. पण दुसऱ्या दिवशी मॅटरच झाला त्याला भेटायला थोडी आधी गेले खाली, तर तो आला आणि माझ्याशी एकदम हळू आवाजात बोलायला लागला. 
‘Actually! मला तुला सांगायचं होतं की आपण ब्रेकप करूया? - काय झालं सांगू का? शाळेत माझी एक क्रश होती. ती इतकी भारी आहे, की मला वाटलंच नाही ती मला हो म्हणेल. पण तिला कळलं की मला गर्लफ्रेंड मिळाली. तर तिनीच मला आज प्रो टाकला! मी हो म्हणालो! तर आपण ब्रेकप करूया का?’ - ऋतू. 

‘मूर्ख, बावळट, अक्कलशून्य!’ - मी (मनातल्या मनात). ‘बोल ना काहीतरी..’ - मूर्ख ऋतू! 
‘इट्स ओके! As you wish,’- मी. 

‘थँक यु! तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस,’- ऋतू. 
‘Go to hell..’ - मी (मनातल्या मनात). 

‘You are welcome,’ - मी (खरं खरं!) 
भांडून काय करणार? तुला मी आवडायला पाहिजे असं कंपल्शन कुठं करू शकतो आपण कुणावर? 

त्याला इट्स ओके म्हणून मी वर आले पण मला खूप म्हणजे खूपच रडू यायला लागलं... ‘मी इतकी वाईट आहे का? मी कधीच कुणाला आवडणार नाही का?’ विचार करून करून मला रडूच यायला लागलं. एरवी मेकूडला माझ्याशी काहीच देणं घेणं नसतं, पण आज तिला कळलं बहुतेक. तिला ब्रेकअप्सचा एक्सपीरियन्स आहे म्हणून असेल. तिनी खूप प्रेमानं मला जवळ घेऊन विचारलं, ‘काय झालं?’ मी तिला सगळं सांगितलं. तर ती जाम सटकली. म्हणाली, ‘तो मूर्ख आहे! तुझ्यासारख्या भारी मुलीला dump केलं त्यानी. पण मुलं मूर्खच असतात सारा! त्यांना भावच नाही द्यायचा! आणि त्यावरून आपली व्हॅल्यू तर कधीच ठरवायची नाही. दीपिकाला पण डंप केलं होतं त्या मूर्ख रणबीरनी. म्हणजे ती भारी नाहीये का?’ 

मी म्हणाले, ‘ती एक नंबर आहे! तो वेडा आहे..’ 
ती म्हणाली, ‘Exactly! तू एक नंबर आहेस, तो वेडा आहे.’ 

मला एकदम मस्त वाटलं. मला माहीत आहे एखाद्या मुलीनी डंप केलं, तर मुलं पण असंच म्हणत असणार की मुली स्टुपिड असतात. पण एक गोष्ट मी नक्की ठरवली आहे. कुणालातरी मी आवडते की नाही यावरून मी स्वतःला आवडायचं का नाही हे ठरवणार नाहीये. मी भारीच आहे. हे फिक्स आहे. आणि हे डील मीच माझ्याशी केलं असल्यामुळं दुसऱ्या कुणी ते मोडायचा प्रश्नच नाहीये! 
ओके बाय.. गुडनाईट...

संबंधित बातम्या