झाडं तोडून डेव्हलपमेंट?

विभावरी देशपांडे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

साराची डायरी
 

पावसानी माझं डोकंच फिरवलं आहे. सारखा पडतोय! मधे दोन तीन दिवस सुट्टी मिळाली पावसामुळं ते बरं झालं. पण बोरच होतंय इन जनरल. खेळायला खाली जाता येत नाही.. आणि मागच्या आठवड्यात मला जामच सर्दी झाली. सारखं नाक वाहात होतं. मलाच मेकूड नाव ठेवायची वेळ आली होती. माझ्या फ्रेंड्सच्या आया हायपर झाल्या आणि कुणालाच माझ्याकडं खेळायला येऊ दिलं नाही त्यांनी. त्यांच्यामुळं आपोआप मा हायपर झाली आणि तिनी मला घरात बसवून ठेवलं. मग काय करणार? मी खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसले चार दिवस. 

परवा एक डेंजर गोष्ट झाली. आमच्या सोसायटीच्या बाहेर एक झाड आहे. मोठ्ठंच्या मोठठं! कसलं आहे माहीत नाही मला. पण खूप छान आहे. त्याच्या फांद्या रस्त्याच्या या बाजूला सुरू होतात आणि फुल रस्ता कव्हर करून त्या बाजूला जातात. कडक ऊन असलं, तरी या झाडाखालून जाताना एक कण ऊन लागत नाही... आणि धो धो पावसात या झाडाखाली थांबलं की फुल प्रोटेक्शन मिळतं. त्याच्या फांद्यांवर खूप वेगवेगळ्या रंगांचे मस्त मस्त पक्षी येतात. पूर्वी एक माकड फॅमिली पण राहायची. पण त्यांना पकडून नेलं! कारण पहिल्या मजल्यावरच्या गंप्याला एका बेबी माकडानी ओचकारलं. तर बेसिकली ते झाड फार भारी आहे.. म्हणजे होतं.. 

तेच सांगतेय. झालं काय, की खूप खूप वारा सुटला आणि तीन चार फांद्या मोडून खाली पडल्या. खाली शहाकाकांची मर्सिडीज होती. त्यांच्याकडं दोनच पार्किंग लॉट्स आहेत आणि तीन गाड्या. त्यामुळं एक बाहेर लावावी लागते. आता मर्सिडीज बाहेर म्हणजे आतल्या गाड्या आणखी भारी आहेत. तर ते भयानक भडकले. त्यांनी काही लोकांना बोलावलं आणि नुसत्या फांद्याच नाही कापल्या तर झाडच तोडलं! ते कुणीतरी टॉपचे आहेत. त्यामुळं त्यांना पर्मिशन्स मिळतात ज्या बाकीच्यांना मिळत नाहीत. काही लोकांना बरंच वाटलं कारण त्या फांद्या म्हणे डेंजरसच होत्या. गंप्याचे बाबा तर खूषच झाले. त्या दिवशी आम्ही रात्री टण्णूकाकाकडं जेवायला गेलो होतो. (लहानपणी पा आणि हा काका टण्णू गोळा करायचे म्हणून तो टण्णूकाका! मी तर कधी टण्णू पहिला पण नाहीये. कुठे असतात टण्णूची झाडं काय माहिती!) तर परत येताना एक माणूस त्या झाडाच्या स्पॉटवर बसलेला दिसला. पा उतरून बघायला गेला, तर सी बिल्डिंगमधले धामणकरकाका! आमचे फेव्हरेट! एकदम जॉली आहेत ते. च ची भाषा बोलतात. आमच्याबरोबर क्रिकेट खेळतात. आमच्यासाठी काजूकंद आणतात. खेळता खेळता एखादा मुलगा पडला, रडला तर काहीही करून त्याला हसवतात. ते धामणकरकाका चक्क रडत होते. म्हणाले, ‘मला आठवतंय तेव्हापासून आहे हे झाड इकडं. आमच्या बंगल्याचा पाठीराखा होता तो. किती वेळा चढून बसलो असीन मी. कधी लपाछपी खेळायला, कधी बामणेकाकांची टोपी उडवायला, कधी अण्णांच्या मारापासून वाचायला. काय काय पोटात घातलं या झाडानी आणि काय काय दिलं मला इतकी वर्षं! एका क्षणात कापून टाकलं रे त्या शहानं. डोक्यावरचं छप्पर काढून नेलं असं वाटतंय!’ पा च्या पण डोळ्यात पाणी आलं. त्यानी काकांना मिठी मारली, तर ते लहान मुलासारखं रडायला लागले. मला खूपच आश्चर्य वाटलं यार! म्हणजे मांजर मेलं, कुत्रा मेला तर रडू येतं. पण झाड तोडलं तर इतकं वाईट वाटलं त्यांना. पा, मा ला सांगत होता. धामणकरकाकांचा बंगला पाडून आमची सोसायटी केली आहे. त्यामुळं ते इकडं जन्मापासून राहतात. त्यांची ॲटॅचमेंट असणार त्या झाडाशी. 

दोन दिवस झाले याला. पण मला सारखं ते तुटलेलं झाड आणि रडणारे काकाच आठवत होते... आणि मग मला सगळ्या तशाच गोष्टी दिसायला लागल्या. पा आणि मा बोलत होते. ॲमेझॉनमध्ये खूप झाडं जळाली म्हणे. (Amazon म्हणजे एक मोठठं जंगल आहे ते. वेबसाइट नाही. शॉपिंगला प्रॉब्लेम नाहीये काही) आणि त्याला ब्राझिलमधले लोक रिस्पॉन्सिबल आहेत. 

टण्णूकाका पण परवा चिडला होता, आरे कॉलनीतली झाडं तोडतायेत म्हणून. म्हणजे सगळीकडं सगळेच लोक असं करतायेत. मेकूड म्हणाली, ‘मग काय? डेव्हलपमेंट नाही करायची का?’ मला कळलं नाही की झाडं तोडून डेव्हलपमेंट कशी होते? होत असेल म्हणजे, नाही असं नाही. पण मला कळलं नाही. मग जितकी जास्त डेव्हलपमेंट, तितकी जास्त झाडं तोडणार का? म्हणजे मी मोठी होईपर्यंत खूप डेव्हलपमेंट आणि एकही झाड नाही?? बापरे! मला कसंतरीच वाटलं. पण म्हटलं बघू काय होतं आहे. 

पण रडणारे धामणकरकाका मी विसरूच शकत नव्हते. त्यांचा उदास चेहरा आम्हाला अज्जिबात आवडत नव्हता. काहीही करून त्यांना चियर अप करायचं असं मी ठरवलं. मग मी आणि माझ्या ग्रुपनी एक भारी आयडिया केली. आम्ही कॉन्ट्री काढलं आणि कोपऱ्यावरच्या नर्सरीमधून एक छोटंसं रोप घेतलं. (आख्खं झाड कसं देणार?) ते धामणकरकाकांच्या दाराबाहेर ठेवलं, बेल वाजवली आणि लपून बसलो. त्यांनी दार उघडलं. समोरचं रोप पाहिलं. आम्हाला वाटलं. आता तरी हसतील! पण मोठी माणसं जरा विचित्रच असतात. ते रोप पाहून ते पुन्हा रडायलाच लागले. मी पार्सलला हा किस्सा सांगितला. तर तिनी मला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘वेडे! आनंदाश्रू होते ते! खूप छान काम केलंत तुम्ही...’ म्हटलं, ‘ओह! हॅपी टियर्स! मग ठीक आहे.’ 

ओके बाय, गुड नाइट...

संबंधित बातम्या