वेळेच्या आधी... 

विभावरी देशपांडे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

साराची डायरी
 

कधीकधी मला वाटतं, की मला अगदी चुकीचे आईबाबा मिळाले आहेत. म्हणजे अगदी जुने! Behind the times. त्यांना माहीतच नाहीये की माझ्या शाळेत, फ्रेंड सर्कलमध्ये काय चाललं आहे. मला इतके रुल्स घातले आहेत ना की बस! असे कपडे घालायचे नाहीत, असे शब्द बोलायचे नाहीत. फक्त फ्रेंड्सबरोबर मॅक डी मध्ये जायचं नाही. Instagram वापरायचं नाही... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे १५ प्लस लिहिलेले शोज पाहायचे नाहीत. एक मिनिट! सगळे बघतात! माझे फ्रेंड्स आईबाबांना न सांगता रेग्युलरली इंस्टाग्राम वापरतात. पण मला काहीच शक्य नाहीये कारण माझ्याकडे स्मार्टफोनच नाहीये! पा नी पार्सलसाठी स्मार्ट फोन आणला आणि तिचा डबडा फोन मला दिला. पण मी खूप मॅच्युअर आहे. त्यामुळं मी वाद घालतच नाही. जाऊ दे. 

पण माझ्या मॅच्युरिटीला माझे फ्रेंड्स बावळटपणा म्हणतात. माझ्यात डेअरिंग नाहीये म्हणतात. मी लक्ष देत नाही, पण कधीकधी लिमिट क्रॉस होते. परवा तसंच झालं. आमच्या क्लासमधल्या आयुषनी सेक्रेड गेम्स-२ पाहिली. खूप म्हणजे खूप adult आहे म्हणे ते.. पण आयुष सगळे A शोज पाहतो. कसं माहीत नाही. पण तो म्हणतो, की त्याचे आईबाबा चिल आहेत. थापा मारत असणार. चोरून बघत असणार. त्यानी त्याच्या बाबांच्या फोनचा पासवर्ड पण crack केलाय. 

तो एकदम गणेश गायतोंडेसारखा बोलत आला क्लासमध्ये. (मी काय ते लिहू नाही शकत कारण सगळं xxx असं लिहावं लागेल. कारण त्या शिव्या आहेत आणि मला त्या allowed नाहीयेत.) त्यानी खूप डिटेलमध्ये स्टोरी सांगितली. सगळे सॉलिड इम्प्रेस झाले. सगळ्यांनी ठरवलं की आज घरी जाऊन एक तरी एपिसोड पाहायचा. मी सांगितलं, की मला allowed नाहीये. तर सगळे मला खूप हसले. संस्कृती तर म्हणाली, ‘किती लेम! Allowed कुणालाच नाहीये. पण विचारायला कशाला जायचं? बावळट!’ 

बास! विषय एंड! मला बावळट म्हटलेलं मुळीच आवडत नाही. मी हुशार नसीन, टॉपर नसीन, टॅलेंटेडपण नसीन; पण मी बावळट नक्की नाहीये! मला जाम म्हणजे जामच राग आला. मी ठरवलं, की मा ला सरळ जाऊन सांगायचं की मी सेक्रेड गेम्स बघणार म्हणजे बघणार. पण मला माहीत होतं की ती परमिशन देणंच शक्य नाहीये. मग मी ठरवलं की तिला कळू न देता बघायचं. पण कसं बघणार? माझ्याकडं स्मार्टफोन नाहीये. मग मा चा लॅपटॉप मिळवायचा असं मी ठरवलं. आज Saturday आहे. मा दुपारी तिच्या फ्रेंड्ससोबत लंचला जाणार होती. मेकूड फिल्ड ट्रिपला गेली होती. मी मा ला सांगितलं की मी एकटी थांबेन थोडा वेळ. मी आता मोठी झाले आहे. तिला सरळ थाप मारली की माझ्या प्रोजेक्टसाठी मला इन्फो हवी आहे म्हणून लॅपटॉप देऊन जा. मा लगेच विश्वास ठेवते माझ्यावर. कारण मी कधीच खोटं नाही बोलत. मला थोडं वाईट वाटलं. पर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। मी बावळट नाही हे मला प्रूव्ह करायचंच होतं. ती गेल्यावर मी नेटफ्लिक्स ओपन केलं आणि सेक्रेड गेम्स बघायला लागले. पण Sad म्हणजे मला खूपच बोअर झालं ते. बघता बघता डोळे मिटायला लागले. कधी झोप लागली ते कळलंच नाही. 

मी उठले तेव्हा माझ्या हातात लॅपटॉप नव्हता. मला भयानक टेंशन आलं. मी धावत बाहेर गेले तर मा काहीतरी वाचत होती. बाजूला लॅपटॉप ठेवला होता. मी म्हटलं माझा विषय एंड. आता फुल फायरिंग. पण ती मला ओरडलीच नाही. उलट हसून म्हणाली, ‘चल, आपण केक करूया!’ मी उडीच मारली. मा बरोबर केक करायला मला खूप आवडतं. आम्ही बॅटर तयार केलं आणि केक बेक करायला ठेवला. पण मा ला आज काय झालं होतं कोण जाणे. तिनी टाईमिंग पूर्ण व्हायच्या आतच केक बाहेर काढला आणि त्यात सुरी घातली. सगळं केक स्पॉईल झाला. मी चिडलेच. म्हटलं, ‘काय गं! टायमर चालू आहे अजून. वेळेच्या आधीच का काढलास केक? खराब झाला ना!’ तर ती हसली आणि म्हणाली, ‘कळलं? वेळेच्या आधी गोष्टी केल्या की काय होतं?’ 

मला एकदम स्ट्राईक झालं! मी म्हणाले, ‘सॉरी! सगळ्यांनी पाहिलं सेक्रेड गेम्स. म्हणून मी पाहिलं. पुन्हा नाही पाहणार. पाहिलं तर पनिश कर मला...’ ती हसली आणि म्हणाली, ‘तुझं चुकलंय हे तुला कळलंय ना? मग तू नाहीच पाहणार. लोक काय करतात यावर आपण नाही ठरवायचं आपल्याला काय करायचं आहे ते. आपण विचार करायचा आणि मगच ठरवायचं!’ मला पटलं तिचं आणि सेक्रेड गेम्स पाहून कुणी स्मार्ट होत नाही आणि न पाहून बावळट होत नाही. 

दुसरा केक केला आम्ही. भारी झालाय. 
ओके बाय, गुडनाईट...    

संबंधित बातम्या