बकेट लिस्ट 

विभावरी देशपांडे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

साराची डायरी
 

मा गेला एक आठवडा एकदम random वागते आहे. टेरेसमध्ये जाऊन बसते. ईयरफोन्स घालते आणि एकटक कुठंतरी पाहात बसते. नानी म्हणते तसं ‘शून्यात नजर लावून.’ काही विचारायला गेलं की म्हणते, ‘तुम्ही ठरवा, माझं काहीच म्हणणं नाहीये.’ आधी मला वाटलं की चिडली आहे. मी खूप आठवून बघितलं की माझं काही चुकलंय का. मी खोली आवरली, केस नीट बांधले. वेगवेगळे ड्रेसपण घातले तिनी शिवलेले. (मला आवडत नाहीत ते फार, म्हणून मी घालत नाही. तर ती खूप दर्द घेते त्याचा. म्हणून ते ट्राय केलं.) पण तिला ते कळलंपण नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी काही कांड केलेलं नाहीये. मग मी नीट observe करायला लागले. मेकूडनी काही माती खाल्ली आहे का. पार्सल तर आता अमेरिकेत आहे. तिनी स्काइपवरून मा च्या डोक्याला शॉट दिला असेल असं नाही वाटत. तशी चिल आहे पार्सल. मग वाटलं पा आणि तिचं कोल्ड वॉर आहे की काय! मी पा ला विचारलंपण, की सध्या इंडिया-पाकिस्तान सीन आहे का त्यांचा. पण तो हसला आणि म्हणाला, ‘अजिबात नाही, ती जरा आयुष्याचा विचार करते आहे.’ मला टेंशनच आलं. मागं एकदा ती असाच विचार करायला लागली होती आयुष्याचा, तर अचानक वेगन झाली. घरात नॉन व्हेज आणायला पण allowed नव्हतं. बाहेर मी तंदुरी मागवलं की एकदा डोळे मिटून बोलायला लागायची, ‘आपण जे खातो, तसा आपला स्वभाव होतो. मांसाहार (म्हणजे नॉनव्हेज) केला, की आपण तामसी होतो. (मी नानीला सांगताना म्हणाले होते, चिकन नको, मी तापसी पन्नू होईन. तर ती हसली आणि म्हणाली, ‘तापसी नाही, तामसी. म्हणजे aggressive आणि चिडके.) पण मला नाही वाटत तसं होतं. आमच्या शेजारचा कल्पकदादा, रोज चिकन नाहीतर मासे खातो. पण कुणी नुसते डोळे मोठे करून पाहिलं तरी त त प प होते त्याची... आणि समोरच्या बिल्डिंगमधल्या आपटे आज्जी, जन्मापासून प्युअर व्हेज आहेत, तरी सगळी सोसायटीला झापतात सारख्या. पण मा तेव्हा वेगळ्याच झोन मध्ये गेली होती. त्यामुळं ती काहीही बोलायची. लकीली तो झोन संपला आणि ती चिकन घेऊन आली. आता परत आयुष्याचा विचार म्हणजे डेंजर आहे. आता काय बॅन करणार ती?  

पण परवा अचानक तिनी declare केलं की ती हिमालयात चाललीये! म्हटलं अचानक ट्रेक? हिला कधीपासून ट्रेकिंग आवडायला लागलं? पण मग मला कळलं की ट्रेकिंगला नाही, विपश्यनेला जाणार आहे! म्हणजे खूप दिवस कुणाशी काही बोलायचं नाही. बापरे! काय चाललं आहे मला काही कळतंच नव्हतं. पण मी शाळेतून आले तेव्हा नानी आणि तिचं बोलणं ऐकलं.  ‘आई, अर्धं आयुष्य संपलं माझं. कुठं आहे मी? तुला माझी बकेट लिस्ट आठवतेय? विशीत ठरवलं होतं, आपण चाळीस होऊ तेव्हा ३ तरी शहरात आपलं बुटिक असलं पाहिजे. निदान दहा देश पाहिले असले पाहिजेत. सतार वाजवता आली पाहिजे आणि एक तरी हाफ मॅरेथॉन केली असली पाहिजे. पण आज यातलं काहीच नाहीये माझ्याकडं. राहुल आणि मी पण कुठं आहोत कळत नाहीये. घर, मुली यात वीस वर्षं कशी गेली कळलं नाही. मला या सगळ्याचा विचार करायला हवा. काहीतरी चुकलंय आई,’ मा. 

‘काय केलं नाही यापेक्षा काय केलं हे बघितलंस तर असं नाही वाटणार तुला.’ - नानी. 

‘नाही आई, असाच विचार करत आले आहे मी. म्हणूनच मला जे हवंय ते मिळवू शकले नाही.’ - मा. ‘असं वाटत असेल तर तू खरंच जाऊन ये विपश्यनेला.’ - नानी. 

आई शप्पथ! हे वेगनपेक्षा डेंजरस होतं. आमच्यामुळं मा ला काहीच करता आलं नव्हतं हवं ते. मला खूपच वाईट वाटलं. असं नाही व्हायला पाहिजे. तिला हवं ते तिनी करायला पाहिजे. मी ठरवलं की तिला आपलं कुठलंच काम करायला लावायचं नाही. मी रात्री तिचा अलार्म बंद केला. मी अलार्म लावून सकाळी उठले. कालच्या उरलेल्या पोळीचा रोल करून डबा भरला. माझी माझी अंघोळ केली, तयार झाले आणि एकटी बसस्टॉपवर गेले. शाळेतून परत आले तेव्हा मा घरीच होती. ‘बुटीकमध्ये नाही गेलीस?’ - मी. 

‘नाही, तुझी वाट पाहत होते.’ - मा. 
‘अशी दांडी मारलीस तर तीन सिटीजमध्ये कसं होणार तुझं बुटीक?’ मी जरा वैतागलेच. 

‘नाही झालं तर नाही झालं.’ - मा. 
‘पण मग तुला हवंय ते सगळं कसं मिळेल तुला?’ - मी. ‘तुला सांगू मला काय हवंय? मला तुला सकाळी झोपेतून उठवायचं आहे. तुझा डबा भरायचा आहे. केस विंचरायचे आहेत. तुला बसस्टॉपवर सोडायचं आहे.’ - मा. 

हात्तिच्या! मग का हिमालयात चालली होती ही! ‘पण मग तुझी बकेट लिस्ट?’ मी. 
मा नी मला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘आत्ता माझ्या बकेटमध्ये तू आणि दी आहात. ती तर मोठीच झाली. तू पण होशील पाच वर्षात. मग करीन काय करायचं ते.’  ‘मग हिमालय?’ मी. 

‘कॅन्सल!!’ मा. 
‘मग तू आता बुटिकमध्येपण जाणार नाहीस?’ मी. ‘जाणार तर! माझं काम मी करणारच! पण रडत नाही बसणार की मला हे जमलं नाही ते जमलं नाही. तुम्ही दोघी माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहात!’ - मा.  फारच भारी वाटलं मला. मी काहीच जिंकले नाहीये, शाळेत टॉपर नाहीये. मी कशात भारी पण नाहीये. पण मी मा ची अचिव्हमेंट आहे. एक नंबर. पण आता झोपते. आपलं आपलं उठायचं हा माझ्या बकेट लिस्टमधला आयटेम आहे.  ओके बाय.. गुडनाईट...

संबंधित बातम्या