Democracy ची ऐशीतैशी 

विभावरी देशपांडे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

साराची डायरी
 

काल मा खूप अपसेट झाली होती. का? तर माझे टर्मिनलचे पेपर्स मिळाले. मी काही अभ्यासात खूप भारी नाहीये. म्हणजे मला बी ग्रेड मिळते मोस्टली. मला असं खूप वेळा वाटतं की मला भारी गेलाय पेपर. पण मॅमना तसं वाटत नाही. त्याला काय करणार? अपनी अपनी मर्जी! किंवा मा आणि पा चं भांडण झालं की मा म्हणते, ‘Whatever! Democracy आहे!’ 

मला मॅथ्स येतंच नाही आणि सायन्सपण. माझं डोकं एकदम बंद होऊन जातं. ‘पा’चा जुना लॅपटॉप बंद झाला एक दिवस. तो म्हणाला, ‘हार्ड डिस्क उडली आहे’ आणि नवीन घेऊन आला. मला वाटतं मला मॅथ्सची हार्ड डिस्कच नाहीये. उडायचा प्रश्नच नाही. पण डोकं नवीन आणता येत नाही ना! मी पूर्वी रडायचे पण नानीनी मला समजावून सांगितलं, की सगळ्यांना सगळं येतच असं नाही. काही थोडेच लोक असतात जे जिनियस असतात. म्हणजे न्यूटन, आइन्स्टाइन, नवव्या मजल्यावरचा देवेशदादा. पण बाकीच्यांना एक काहीतरी येतं आणि एक नाही. आपल्या ब्रेनचे दोन पार्टस असतात म्हणे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. ज्यांचा लेफ्ट ब्रेन भारी असतो त्यांना मॅथ्स छान येतं आणि राईट ब्रेनवाल्यांना languages आणि creative गोष्टी. म्हटलं ओके! आपला राईट ब्रेन भारी आहे. मा किंवा पा मला कधीच म्हणाले नाहीत, की तुझा लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग कर. म्हणून बरं आहे. नाहीतर वाटच लागली असती. मा आणि पा मला कधीच ओरडले नाहीत ग्रेड्सवरून आणि इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये तर मी एक नंबर आहे. मागच्या वर्षीपासून डिबेट कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घ्यायला लागलेय. एकदा मला Opposite टीमच्या प्रणालीचा इतका राग आला, की मी माईक घेऊन तिला मारायला गेले तर मला डीबार केलं! तसं अलाऊड नसतं म्हणे. पण ती काहीतरी बावळटासारखं बोलत होती. बोलायचं म्हणून! काहीच पॉईंट नव्हता तिच्याकडं. मग माझी सटकली. पण नंतर कळलं, की असंच करतात डिबेटमध्ये. आपला पॉईंट सोडायचा नाही. मला वाटलं की मा आणि पा च करतात असं. पण एनीवे.. मी शाळेत माझ्या डिबेट्स आणि एस्सेसाठी फेमस आहे. 

पण मग मा का अपसेट झाली? तर.. मला इंग्लिशमध्ये खूपच कमी मार्क्स मिळाले. मी पण शॉक झाले. कारण मी भारीतला भारी पेपर लिहिला होता. मी टीचरशी जाऊन भांडले पण. तर त्या म्हणाल्या ‘एसे चुकीचा लिहिला आहे’ चुकीचा कसा? राईट पर्सनल ओपिनियन असं लिहिलं होतं. मी लिहिलं ओपिनियन, तर म्हणाल्या, ‘असा ओपिनियन नसतो कधी. चुकीचा आहे. बोर्ड एक्झाममध्ये मार्क्स मिळणार नाहीत. आत्तापासून सवय करा. मी सांगते तसा Essay लिहायचा पर्सनल रिस्पॉन्स मध्ये.’ मी पुढं बोलणार होते पण मला नाही बोलू दिलं. माझी सटकली. मला वाटलं डस्टरनी त्यांना... पण नाही, मला शाळेतूनच डीबार करतील. मी गपचूप घरी आले. पण मला इतका राग आला होता! मी मा ला म्हणाले, ‘मला जायचंच नाहीये शाळेत. माझ्या पर्सनल ओपिनियनला Value च नाहीये काही. इकडं तरी democracy पाहिजे! पण कुठंच नाहीये. मला इकडं राहायचंच नाहीये. मला कुठंच राहायचं नाहीये.’ तिला काहीच सुचलं नाही. मी माझा पेपर फेकला आणि खोलीत जाऊन बसले. बाहेर आलेच नाही. 

रात्री मला भूक लागली म्हणून मी बाहेर आले तर मा आणि पा माझा पेपर हातात घेऊन बोलत होते. ‘मा’ला रडू येत होतं. ती म्हणाली, ‘किती सुंदर लिहिलंय तिनी. पण तिच्या मताला काही किंमतच नाहीये. त्यांना जे हवंय ते तिच्यात नाहीये. कसं होईल रे तिचं’? पा नी मा ला जवळ घेतलं आणि म्हणाला, ‘कशाला काळजी करतेस? She is tough! She will find a way!’ सगळं नीट होईल आणि कुणी नाही तरी आपण आहोत ना?’ 

मला एकदम भारी वाटलं. माझा पर्सनल रिस्पॉन्स माझ्या पर्सनल आईबाबांना आवडला. घरात तरी Democracy आहे बाबा! Democracy म्हणून मी फ्रीजमधला चॉकोलेट केक खायला काढला तर मा म्हणाली, 

‘न जेवता केक नाही खायचा. भूक लागली असेल तर आधी वरणभात खा!’ 

शी! कसली Democracy! 
ओके.. बाय गुडनाईट...

संबंधित बातम्या