दिवसांना रंग असतात 

विभावरी देशपांडे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

साराची डायरी
 

मला असं वाटतं, की दिवसांना रंग असतात. म्हणजे रोजच असं होतं असं नाही, पण खूप वेळा असं होतं की मी उठते आणि उठल्या उठल्या मला एक रंग वाटतो. दिसत नाही.. वाटतो. म्हणजे कधी कधी वास ऐकू येतो की नाही? फोडणीचा आवाज आला की वास नाकात जायच्या आधी मला वास ऐकू येतो किंवा आवाज दिसतो. सी बिल्डिंगमधल्या नूलकरकाकू नुसत्या दिसल्या, तरी त्या बोलायच्या आधी त्यांचा आवाज ऐकू येतो.. म्हणजे.. आवाज दिसतो. असं मलातरी होतं. बाकीच्यांचं नाही माहीत. तसा मला रंग वाटतो. एखादा दिवस ग्रीन वाटतो. सगळं मस्त आणि फ्रेश वाटतं. मूड, डब्यातली भाजी, पेपरवाला रघू अगदी कपूर मॅमपण फ्रेश वाटतात. एखादा दिवस लाल असतो. चिडका, दुष्ट. त्या दिवशी शॉवरला गरम पाणी नीट येत नाही, मा दुधात कॉफी कमी घालते, बसला उशीर होतो. फर्नांडिस मॅम ओरडतात. सगळी गणितं चुकतात, मेकूडशी भांडण होतं. (ते रोजच होतं, पण त्या दिवशी डेंजर राडा होतो.) एखादा दिवस लव्हेंडर असतो. तो दिवस गात गातच सुरू होतो. झाडावरचे सगळे पक्षी दिसायला लागतात. सारखा केक बेक होत असल्यासारखा वास येतो. कुणीच केक करत नसतं तरी. मनातून येतो. सगळीकडं फुलं दिसतात. शाळेत माझी तंद्रीच लागते. मी ऑटो ट्रान्सपोर्ट होऊन थिएटरमध्ये जाऊन हॅरी पॉटर बघत असते.. आणि अचानक डॅनियल रॅडक्लीफ शेजारी येऊन बसतो. पण मी पटकन लगेच येते क्लासमध्ये परत. नाहीतर लव्हेंडर डेचा लाल दिवस होईल. मग एक दिवस असा ट्रान्सपरंट कलरचा असतो. त्या दिवशी मला सकाळपासून उगाच रडू येतं. एखाद्या डेंजर स्वप्नामुळं जाग येते आणि मग सगळं sad sadder saddest होत जातं. पार्सल सकाळी एक वेगळाच रेडिओ चॅनेल लावते. एकदा मी म्हटलं, विविध भरती असा नवा चॅनेल सुरू झाला आहे. तर तिनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, ‘अगं महामाये! हा सगळ्यात जुना आहे. आमच्या वेळचा. तेव्हा असल्या मिरच्या, लिंबू, टोमॅटो नसायचे रेडिओवर.’ बरं असेल. तर त्यावर सकाळी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम लागतो. Transparent  दिवशी त्यावर सगळी रडकी गाणी लागतात. बसमध्ये ज्युनियर, मिनी केजीमधलं कुणीतरी नक्की रडतं. रात्री घरी होम थिएटरचा प्लॅन केला, तर नक्की असा एखादा सीन येतो ज्यामुळं ‘पा’ला रडू येतं. हे सगळं कुणी ठरवून, मुद्दाम नाही करत. दिवसांना असे रंग असतातच. 

हे सगळं मी का सांगतेय तर सध्या गेले काही दिवस माझा प्रॉब्लेम झालाय. माझ्या सगळ्या दिवसांचा कलर एकच आहे. ग्रे! म्हणजे काहीच नाही. फ्रेश, चिडका, रडका काहीच नाही. मला काहीच वाटत नाही. मला फक्त कंटाळा येतो. काहीच करावंसं वाटत नाही. नुसतं बसून राहावंसं वाटतं. मट्ठासारखं. नानी म्हणते शेणाचा पो टाकलाय. शाळेत काही डोक्यात शिरत नाही. मॅम ओरडल्या तर वाईट पण वाटत नाही. मेकूडनी मकडीगिरी केली तरी मी भांडत नाही. स्वीगीवाल्याला पाहूनपण आनंद होत नाही. खाली पण जावंसं वाटत नाही खेळायला. गेले काही दिवस असंच चाललं आहे. मला त्याचं पण काही वाटत नव्हतं. पण हेमामावशी आली आणि डोक्याला एक वेगळाच शॉट सुरू झाला. (माझा नेक्स्ट डे रेड होता हे obvious आहे.) 

... तर असं झालं, की ‘मा’नी हेमामावशीला हे सांगितलं की आजकाल सरू खूप डल असते, तिला कसलं मोटिव्हेशन नाहीये, ड्राईव्ह नाहीये. तर ती म्हणाली, ‘बापरे! बहुतेक हे प्री टीनएज डिप्रेशन आहे.’ हेमामावशीला सगळ्यातलं सगळं येतं. कुकिंग, ॲस्ट्रॉनॉमी, अरोमा थेरपी, सायकोलॉजी, farming... एकूण एक विषयातली एकूण एक गोष्ट. असं तिला आणि ‘मा’ला वाटतं. मग मा हायपर झाली आणि तिच्या एका मित्राकडं मला घेऊन गेली. तो मुलांचा डॉक्टर आहे. तो मला आवडला. त्याला मी सांगितलं, की विशेष काही नाही झालं. माझे सगळे दिवस ग्रे आहेत सध्या. तर त्याला भारी वाटलं. तर तो म्हणाला, ‘एक्सप्लेन!’ मग मी त्याला माझी डेज आणि कलर्सची थियरी सांगितली. तर तो भयानक इम्प्रेस झाला. ‘मा’ला म्हणाला, ‘कुठलं फालतू टेंशन घेतेस? तुझी मुलगी सॉलिड क्रिएटिव्ह आहे. हार्मोनल चेंजेसमुळं डल होतात मुली या वयात! तिला नाही तुला ट्रीटमेंट पाहिजे!’ 

मी मा समोर हसले नाही! पण माझा उरलेला दिवस आपोआप लव्हेंडर झाला! 

ओके बाय.. गुडनाइट...

संबंधित बातम्या