नवीन वर्षात मी... 

विभावरी देशपांडे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

साराची डायरी
 

आज नानीनी मला ही शायनी डायरी आणून एक वर्ष झालं. मी तिला म्हटलं होतं, की मी एक वर्ष रोज डायरी लिहीन. तीसुद्धा मराठीत. आणि मी ती लिहिली! ऑफ कोर्स माझ्या लाइफमध्ये रोज काही एवढं भारी होत नाही की मी रोज लिहावं. आपल्या लाइफमध्ये रोज भारी घडायला आपण काही Ann Frank नाही. ते चांगलंच आहे तसं. पण तिच्या डायरीमुळं सगळ्या जगाला कळलं, की तिच्याबरोबर काय झालं. माझ्यापेक्षा थोडीशीच मोठी होती ती. पण त्या घरात किती वर्षं अडकून राहिली. शेवटी तिला पकडलंच हिटलरच्या लोकांनी आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलं. तिकडंच मेली ती म्हणे नंतर. त्या डायरीमुळं जगातल्या लोकांना खूप खूप काय काय कळलं. पण मला एक गोष्ट लक्षात आली, की मी खूप लकी आहे. 

म्हणजे त्याचं काय झालं, की दोन आठवड्यांपूर्वी माझ्या शाळेनं मार्मालेड आणि पापाराझीला भेटायला बोलावलं. मला टेंशन आलं. मला टर्मिनलमध्ये खूप बेकार मार्क्स मिळाले. मला शाळेत जे शिकवतात ते मुळीच आवडत नाही. मला चित्रं काढता येत नाहीत. मला स्पोर्ट्‌समध्ये काहीच येत नाही. मी कशातच ग्रेट नाहीये. मला काही फरक पडत नाही पण मला माहीत आहे की मा आणि पा ला त्याचं वाईट वाटत असणार. त्यांना प्राऊड वाटेल असं काहीच नाहीये माझ्यात. ते कधी तसं म्हणत नाहीत पण मला माहीत आहे. 

शाळेत असेम्ब्ली होती. एक टॉपिक दिला होता आणि सांगितलं होतं की यावर काहीतरी प्रेझेंट करायचं. आम्हाला हिस्टरी असा टॉपिक होता. तर मी गंमत म्हणून एक छोटासा डायलॉग लिहिला, की ॲन फ्रॅंक आणि मी बोलतोय. मी तिला सांगते आहे, की माझं लाइफ कसं टफ आहे. मला कसं काही जमत नाही. कसं कुणालाच माझ्याबद्दल प्राऊड वाटत नाही... आणि ती मला सांगते आहे की तू किती लकी आहेस. तू सेफ आहेस. तुला कुणी पकडणार नाही, मारणार नाही. Algebra च्या पीरियडला मला बोर होतं म्हणून मी खूप वेळ टॉयलेटमध्ये जाऊन बसते. तशी मी गेले. तर माझ्या मागं बसणाऱ्या अर्णवनी माझी बुक घेतली टाइमपास करायला. तो माझ्या बुकमध्ये कार्टून काढतो. म्हणजे पकडली गेले तर मी पकडली जाईन. मला माहीत आहे ते. पण तो खूप छान Drawing काढतो म्हणून मी काही बोलत नाही. (खरं म्हणजे तो हसला की त्याला मस्त खळी पडते. मला आवडते ती. पण मी ते कुणाला सांगत नाही. उगाच लगेच आम्हाला चिडवतील. माझ्या फ्रेंड्सना तेवढंच सुचतं.) त्यानी मी लिहिलेलं वाचलं आणि असेम्ब्लीच्या मीटिंगला मॅमना Direct सांगूनच टाकलं की सरस्वतीनी नाटक लिहिलं आहे असेम्ब्लीसाठी. माझी खिट्टी सरकली. मी जाऊन त्याला झाप झाप झापलं आणि मॅमना सांगितलं की मी काही नाटक बिटक लिहिलं नाहीये. मला काहीही येत नाही. 

मा आणि पा, मॅमना भेटून आले. मला वाटलं आता मला खूप ओरडा बसणार. पण त्यांनी मला समोर बसवलं. 

‘सरू.. तुला मार्क्स मिळत नाहीत. तुला खेळता येत नाही. तुला डान्स येत नाही, तू चित्र काढत नाहीस..’ मा. 

‘मला माहीत आहे. सॉरी..’ मी. 
‘मला खूप वाईट वाटतं..’ पा. 
‘...’ मी. 
‘असं वाटतं की आमचंच चुकलं,’ मा. 
‘नाही. मलाच काही येत नाही. माझंच चुकलं..’ मी. 

‘आमचं चुकलं कारण तुझं काय चुकतं आहे ते आम्ही तुला सांगितलं नाही,’ पा. 

मला काहीच कळलं नाही. 

‘म्हणजे?’ मी 
‘तुझ्याकडं काय आहे ते तुला दिसत नाही. जे नाही त्यावर तू ठरवतेस की तुला काही येत नाही,’ मा. 
माझी ट्यूब हळूहळू पेटली. मॅमनी माझी कम्प्लेंट करायला नाही, माझं कौतुक करायला त्यांना बोलावलं होतं. मी लिहिलेलं नाटक अर्णवनी हळूच मॅमना दाखवलं होतं. इतकं छान लिहूनही मी नाही का म्हणते आहे हे त्यांना कळत नव्हतं. 

‘तुझ्याकडं जे आहे ते तू विसरते आहेस. असं गिव्ह अप केलं असतं तर आज Ann ची डायरी आपल्याला मिळाली असती का वाचायला?’ मा. 
‘या वर्षी न्यू इयर्स रिसोल्युशन कर. तुला जे छान येतं ते आणखी छान कसं करता येईल,’ पा. 

मी त्यांना घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी अर्णव मला भेटला. मी त्याला सॉरी म्हणाले. तर तो खळी पाडून हसला. मला म्हणाला, ‘तू पीटरचं Character पण ॲड कर ना त्याच्यात..’ मी त्याच्याकडं बघतच राहिले. नंतर सखी मला म्हणाली, ‘ई ! तू ब्लश करत होतीस!!’ काहीही!! सखी खूप पिक्चर बघते. 
तर आता मी नवीन वर्षी डायरी नाही, नाटकं लिहिणार आहे. नानी म्हणाली आहे, ‘हव्या तेवढ्या वह्या देईन मी तुला!’ मज्जा! 

तर.. नंतर कधीतरी भेटू... 
ओके बाय, गुडनाइट...
(समाप्त)

संबंधित बातम्या