दक्षिण काशी : वाई 

भद्रेश भाटे, वाई
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष
कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे धार्मिक क्षेत्र वाई. साताऱ्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर. येथील प्राचीन शिल्पकला व स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेली मंदिरे आणि परिसरातील निसर्गरम्य सृष्टिसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात. 

पेशवे काळात सरदार रास्ते यांनी कृष्णा नदीच्या उत्तर तीरावर सुबक फरसबंदी घाट व अनेक मंदिरे बांधली. त्यांपैकी महागणपतीचे मंदिर प्रेक्षणीय आहे. सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ मध्ये त्या काळात सुमारे दीड लाख रुपये खर्च करून मंदिर बांधले. गाभाऱ्यात एकाच दगडातून घडविलेली सहा फूट उंच, सात फूट लांब, पाच फूट रुंद अशी भव्य व बैठी गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या भव्यतेमुळे हे मंदिर महागणपती (ढोल्या) या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. पाचगणी, महाबळेश्वरला येणारे पर्यटकही या गणपतीचे दर्शन घेतात. या शिवाय नदी तीरावर काशी विश्वेश्वर, धुंडी विनायक, सिद्धेश्वर, परशुराम, चक्रेश्वर, काळेश्वर व शहरात विष्णू-लक्ष्मी, अंबाबाई, व्यंकटेश, समर्थ रामदास स्वामी स्थापित रोकडोबा अशी अनेक मंदिरे आहेत. या मंदिरातून प्राचीन वास्तू व शिल्पकलेचा नमुना पाहावयास मिळतो. कृष्णा तीरावरील सात घाटांवर दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य द्वादशीपर्यंत एकामागून एक कृष्णोत्सव साजरे होत असतात. गणपती घाटावर दरवर्षी वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. शहराच्या पूर्वेस एक किलोमीटर अंतरावर फुलेनगर येथे नदीच्या डाव्या तीरावर भद्रेश्वर हे शिवमंदिर आहे. दरवर्षी श्रावणात भाविकांची गर्दी असते. येथून दिसणारे नदीचे पात्र, समोरचा सोनजाई डोंगर, झाडांमध्ये लपलेल्या छोट्या वस्त्या असे सुंदर निसर्गरम्यदृश्‍य मनाला आनंद देणारे ठरते. स्वामी केवलानंद यांनी वाईत प्राज्ञ पाठशाळेची स्थापना केली. मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य येथून होते. 

वाईच्या दक्षिणेस सह्याद्री पर्वत रांगांमधील डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळेच या डोंगराला सोनजाई डोंगर म्हणतात. डोंगरावर जाण्यासाठी उत्तरेला वाईहून व दक्षिणेला बावधनहून अशा दोन्ही बाजूंनी पायवाट आहे. सोनजाईचे दगडी मंदिर असून, आतमध्ये पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. मंदिरालगतच्या कुंडात वर्षभर पाणी असते. या डोंगरावर नवरात्रात दर्शनासाठी लोक जातात. देवदर्शनाबरोबर गिरिविहार आणि वनभोजनाचा आनंदही या ठिकाणी घेता येतो. 

वाईच्या उत्तरेस शंभू महादेव डोंगररांग पूर्व-पश्‍चिम पसरली आहे. या डोंगर पठारावर मांढरदेव हे गाव आहे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळूबाई देवीचे स्थान येथे आहे. या पठाराची समुद्रसपाटीपासून उंची ४,५१७ फूट आहे. काळूबाईचे मंदिर ३५० वर्षांपूर्वीचे आहे. शाकंभरी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. वाई व भोरमार्गे घाटरस्त्याने या ठिकाणी जाता येते. आल्हाददायक वातावरण अरुंद व वेडीवाकडी वळणे घेत जाताना नयनरम्य निसर्गाचे दर्शन घडते. उत्तरेला नीरा नदीचे खोरे, दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे व वाईचा परिसर दिसतो. मांढरदेवी अलीकडे कोचळेवाडीजवळ आंबाड खिंड आहे. जवळच वेरूळी गावात सोमेश्वर व केदारेश्वर अशी प्राचीन शिवमंदिरे आहेत. येथे पांडवगडाच्या मागच्या बाजूला उभे राहिले असता पश्‍चिमेकडील धोम धरणाचा जलाशय दिसतो. त्यामागे उभा असलेला कमळगड, डावीकडे पाचगणी महाबळेश्वरची पठारे, उजवीकडे रायरेश्वर व केंजळगड दृष्टीस पडतात. मांढरदेवला जाताना शहरापासून दोन किलोमीटरवर बोपर्डीत भीमाशंकर हे महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते. शिवलिंगातून बाराही महिने अखंड पाणी वाहते. सुमारे २०० वर्षांपूर्वी हे मंदिर लक्ष्मण धोंडदेव फडणीस यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो. येथे पांडव गडावरील तळ्यातून पाणी येते, असे म्हणतात. दरवर्षी कार्तिक आणि माघ महिन्यांत एकादशीला यात्रा भरते. 

वाईच्या पश्‍चिमेस तीन किलोमीटर अंतरावर मेणवली गाव आहे. येथे पेशवाईच्या काळात नाना फडणवीस यांनी बांधलेला चौसोपी गढीवजा वाडा आहे. येथील कृष्णा नदीच्या काठावरील चंद्रकोरी आकाराचा घाट व मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर प्रेक्षणीय आहेत. घाटावरील एका छोट्या मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. वसई युद्धातील विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी येथील किल्ल्यावरून पोर्तुगिजांची ही एक क्विंटल वजनाची घंटा येताना विजय चिन्ह म्हणून आणली होती. मेणवलीपासून एक किलोमीटर अंतरावर भोगाव येथे मराठीतील संतकवी वामन पंडित यांची समाधी आहे. भोगावपासून चार किलोमीटर अंतरावर धोम गाव आहे. या ठिकाणी १९७६ मध्ये कृष्णा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. धरणाचा परिसर निसर्गरम्य आहे. या ठिकाणी पसरणी रस्त्याने व्याहळी मार्गेही जाता येते. व्याहळी येथे धोम जलाशयात बोटिंग करण्याची सोय आहे. धोम येथे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले नरसिंह मंदिर आहे. या मंदिरात दंडगोलाकृती उंच चौथऱ्यावर पश्‍चिमाभिमुख नरसिंहाची मूर्ती आहे. शेजारी धोमेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर कुंडाच्या मध्यभागी कमळाच्या आकाराचा चौथरा आहे. त्यावर मंडप व नंदी कोरलेला आहे. अनोखी शिल्पकला पाहायला मिळते. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. रायरेश्वर डोंगरावरील रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसमवेत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. गडावरून वाई व भोरचा परिसर तसेच पश्‍चिमेस कोकण प्रांतातील सावित्री नदीचे खोरे दृष्टीस पडते. वाईच्या पश्‍चिमेला कमळगड हा वैशिष्ट्यपूर्ण गड आहे. खाली निळे पाणी आणि वर निळे आकाश यांच्या पार्श्वभूमीवर कमळगड शोभून दिसतो. याला लगतच नवरा-नवरीचा डोंगर आहे. 

वाईच्या आग्नेय दिशेला सुमारे सहा किलोमीटरवर आसले गाव आहे. वाई-सातारा रस्त्यावरील गोंधळेवाडी नावाची वस्ती आहे. या वस्तीला सध्या भवानीनगर असे म्हणतात. या वस्तीजवळील टेकडीवर भवानीमातेचे मंदिर आहे. गाभाऱ्यात भवानी देवीची काळ्या पाषाणातील महिषासुरमर्दिनी रूपातील स्वयंभू मूर्ती आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. टेकडीच्या मागच्या बाजूने डाव्या डांबरी रस्ता मंदिरापर्यंत जातो. मंदिर परिसरात सुधारणा करण्यात आल्या आहेत. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. 

वाई शहरापासून चार मैलांवर वायव्य दिशेला पांडवगड आहे. चौकोनी आकाराचा माथा असलेला हा गड आहे. पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ. स. १२०० च्या दरम्यान हा किल्ला बांधला. गडावर जाण्यासाठी पहिला डोंगर चढून दुसरा उंच डोंगर चढावा लागतो. वाटेत विहिरी आहेत. पायवाट अरुंद व धोक्‍याची आहे. माथ्यावर पांडजाई देवीचे व दुसरे एक अशी देवीची दोन मंदिरे व पाण्याची अनेक तळी आहेत. वाईच्या वायव्येला सपाट चौकोनी आकाराचा माथा दृष्टीस पडतो तो केंजळगड, हा गड रायरेश्वर व पांडवगड या किल्ल्यांच्या मधोमध आहे. वाईच्या आग्नेय दिशेला आठ किलोमीटर अंतरावर वैराटगड आहे. हा गडही पन्हाळ्याचे शिलाहार राजाने बांधला आहे.  

गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद व कच्चा आहे. गडावरचा सपाट भाग थोडा रुंद आहे. गडावर शंकर दत्त आणि मातंगी देवी यांची मंदिरे आहेत. गडावर काही चोरवाटा आणि चोरघरे आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी दडून राहण्यासाठी याचा वापर केला जात असे. या गडावर वैशिष्ट्यपूर्ण असे एक तळघर आहे. जमिनीच्या आत असलेले हे तळघर अतिशय विस्तृत आहे. २०० फुटापेक्षा जास्त लांब हे भुयार आहे. वाईच्या पूर्वेस सातारा-पुणे रस्त्यावर भुईंज हे गाव वसले आहे. भृगऋषींची समाधी येथे आहे. त्या नावावरून या गावाला भुईंज नाव पडले. मंदिराच्या खाली ऋषींची समाधी व ध्यान धारणेची खोली आहे. 

संबंधित बातम्या