भुरळ घालणारा व्याघ्र प्रकल्प

सचिन शिंदे, कऱ्हाड 
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणीनंतर पर्यटनाचे बाळकडू सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात वाढत आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे येथे येणाऱ्या देशभरातील पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. राज्यातल्या महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो. वास्तविक त्या मागे त्या भागातील नैसर्गिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पाटणसह कऱ्हाड तालुक्‍यातील पर्यटन विकासाला गती मिळाली आहे. पर्वत रांगा, कृष्णा व कोयनेच्या वाहणाऱ्या नद्यांचा खळखळणारा प्रवाह. त्याबरोबर हिरव्यागार वनराईमुळे पश्‍चिम घाटाचे क्षेत्र नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे.  

जागतिक नैसर्गिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या क्षेत्राला सर्वांगसुंदर निसर्ग लाभला आहे. याच निसर्गाच्या कुशीत चांदोली व कोयना अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. परिसर वाघांच्या अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदिर, जंगली भ्रमंती वाटा या राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत आहेत. पर्यटकांसह निसर्गप्रेमींसाठी व्याघ्र प्रकल्पातील सुविधा त्या भागातील नैसर्गिक सुविधांचा आनंद लुटण्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला नैसर्गिक देणगी लाभलेला सह्याद्री म्हणजे पर्वतरांगांचा प्रदेश. तेथेच कोयना राष्ट्रीय व चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. दोन्हीमध्ये सह्यादी व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. चांदोली नॅशनल पार्क व कोयना अभयारण्याला एकत्र करून सह्यादी व्याघ्र प्रकल्प अशी रचना झाली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा या भागात ओघ वाढला आहे. चांदोली आणि कोयनाचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाल्यामुळे अधिक संरक्षित आहे. सह्याद्री म्हणजे विदर्भाबाहेरील मान्यता मिळालेला राज्यातील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट, ताडोबा, अंधारी-पेंच प्रकल्पांनंतरचा सह्याद्री चौथा प्रकल्प आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्याचे एकत्रीकरण करून सुमारे ७५० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होतो आहे. या भागातील वाघांची संख्या लक्षात घेऊन तेथे व्याघ्र प्रकल्प झाला आहे. त्यासाठी शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरालाही सामावून घेतले आहे. वाघांबरोबरच तेथे असणाऱ्या गवा, चितळ, सांबर व हरिण प्राण्यांनाही संरक्षण मिळाले आहे. २००७ च्या वन्यप्राण्यांच्या गणनेत कोल्हापूर विभागातील कोयनेत दोन, चांदोलीत तीन, तर राधानगरी परिसरात चार असे एकूण नऊ वाघ आहेत. व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या चाळीसवर होती, ती आता वाढत जाऊन ७५ पर्यंत पोचल्याची नोंद आहे. जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. जंगलात असलेल्या अन्न साखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम होते. त्यामुळे येथे पर्यटनासही चांगला वाव मिळाला आहे. पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच निरोगी श्वासही मिळतो. व्याघ्र प्रकल्पात मोठी जैवविविधता आहे. दुर्गम, उतार असलेले डोंगराळ भाग आणि घनदाट जंगल असे व्याघ्र प्रकल्पाचे स्वरूप आहे. जंगलात जवळपास ४५०० प्रजातींच्या वनस्पती असल्याचा अंदाज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणलोट क्षेत्र आहेत. झरे, धबधबे आहेत. नद्यांचा उगम येथूनच आहे. नद्यांवर धरणाची निर्मिती याच भागात आहे. 

चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौरस किलोमीटर व कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौरस किलोमीटरचे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित आहे. वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरिण, बिबटे प्राणीही येथे आहेत. त्यातील अनेक प्राणी दिसतातही. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांत कपारींमध्ये दुर्मीळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. कोयना प्रकल्पासह आठ मध्यम पाटबंधारे प्रकल्प, आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनऊर्जा व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कऱ्हाड व पाटणच्या पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे. व्याघ्र प्रकल्पाबरोबरच पवनऊर्जा प्रकल्पाने पाटण तालुक्‍याला जगाच्या नकाशावर नेले. वनकुसवडे, सडावाघापूर व वाल्मीक पठारावर जेथे कुसळही उगवत नव्हते अशा जांभ्या पठारावर देश-विदेशातील १३८ कंपन्यांनी कोट्यावधींची गुंतवणूक करून एक हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रकल्पाने दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे पोचले व ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळाली. त्याचाही पर्यटनासाठी विशेष उपयोग झाला आहे. 

व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर बाजूला प्रतापगड व दक्षिण टोकाला आंबा म्हणजेच विशाळगड आहे. दोन्ही ऐतिहासिक किल्ल्यांच्या मधे साकारणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला निसर्गाची मोठी देणगीच मिळालेली आहे. त्याचा विचार करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्या भागाची जागतिक वारसास्थळ म्हणून घोषणा झाल्यामुळे या भागातील पर्यटन विकासाला गती आली. व्याघ्र प्रकल्पातील धबधब्यापासून किल्ल्यांवरील पर्यटनास चालना देणाऱ्या अनेक गोष्टी येथे विकसित होत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील डोंगरावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अभ्यासकांची गर्दी असते. पठारावरील जैवविविधतेचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तेथे नेहमीच येतात. इतर वेळी मृतप्राय झालेली पठारे पावसाळ्यात जिवंत होतात, हेच भागाचे वैशिष्ट्य आहे. पवनचक्‍क्‍यांचा तालुका म्हणूनही परिसराची ख्याती सर्वदूर आहे. त्यामुळे पवनचक्‍क्‍यांचे स्थळ असलेल्या वनकुसवडे पठारावरही पर्यटकांची विशेष गर्दी असते. तो भागही पर्यटनाच्या सुविधेत आणला गेला आहे. त्याशिवाय खासगी कंपन्यांकडूनही येथे सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाणेल येथे टेंटमध्ये राहण्याची व्यवस्था खासगी संस्थेकडून केली आहे. 

मणदूर-जाधववाडी येथे चांदोलीचे रिसॉर्ट आहेत. व्याघ्र प्रकल्पात कोयना शिवसागर जलाशय व चांदोली, वसंत सागर महत्त्वाची दोन धरण आहेत. त्याच्या जलाशयात बोटिंगची सुविधा करणार आहेत. ते काम सुरत यंत्रणेच्या परवानगीनंतर सुरू होणार आहे. 

व्याघ्र प्रकल्पात काय पहाल 
किल्ले : महिमागड (रघुवीर घाटात), वासोटा, पालीचा किल्ला, जंगली जयगड, भैरवगड, प्रचितीगड. 
डोंगरावरील मंदिरे : उत्तरेश्वर, पर्वत, चकदेव, नागेश्वर, उदगीर 
धबधबे : ओझर्डे धबधबा, कंदार डोह 
जंगल भ्रमंती वाटा : मेट इंदोली ते वासोटा, नवजा ते जंगली जयगड, कोठावळे ते भैरवनगड, पानेरी ते पांढरपाणी, झोळंबीचा सडा, खुंदलापूर ते झोळंबी, चांदोली ते धरण निवळे. 

कोयना धरणाविषयी महत्त्वाचे 
कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प १९६२ मध्ये पूर्णत्वास आला. १०५ टीएमसी पाणीसाठा क्षमता व १९२० मेगावॅट वीजनिर्मितीबरोबर सिंचनाची जबाबदारी आहे. कोयना नदीवर कोयनानगर येथे हे धरण उभारलेले आहे. त्या भागातील सरासरी वार्षिक पाऊस ५,००० मिलिमीटरचा आहे. धरणाची लांबी ८०७.७२ मीटर आहे. उंची १०३.०२ मीटर आहे. त्याचे बांधकाम १९५४ ते १९६७ या कालावधीत झाले आहे. सुमारे हजारो हेक्‍टरचे क्षेत्र ओलिताखाली आहे. कोयनेच्या जलाशयाला शिवसागर जलाशय नावाने संबोधले जाते. 

अन्य धरणे आणि‌ ऐतिहासिक स्थळे 
कोयना धरणाबरोबर पाटण तालुक्‍याच्या विविध भागांत धरणे आहेत. त्यात तारळी, उत्तरमांड, निवकणे, चिटेघर, मोरणा-गुरेघर, बीबी, मराठवाडी व वांगसारखे मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्या दृष्टीने त्या धरणांवरही पर्यटन विकासाला वाव आहे. कोयना प्रकल्पाचे विविध टप्पे, शिवसागर, नेहरू गार्डन, ओझर्डे धबधबा, घाटमाथा पर्यटन स्थळे, येडोबा, नाईकबा, जळव जोतिबा, जानाई, श्रीराम मंदिर, रामघळ, धारेश्वर या धार्मिकसह घेरादातेगड व तेथील तलवारीच्या आकाराची विहीर, भैरवगड, गुणवंतगड, नायकिणीचा वाडा, कोकण खिंड ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आहेत. 

संबंधित बातम्या