पर्यटनाला साद साताऱ्याची! 

सुनील शेडगे, नागठाणे
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष
 

पर्यटन म्हटलं, की हमखास साताऱ्याची आठवण आल्यावाचून राहात नाही. सातारा म्हणजेच ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरं, धार्मिक स्थळं, भुरळ घालणारा निसर्ग असंच समीकरण झालं आहे. त्यामुळंच पर्यटकांचा राबता साताऱ्याच्या अवतीभवती कायमच दिसतो. 

सातारा हे शहर मध्यबिंदू मानून त्याच्या परिघात असणारी कित्येक स्थळं इथं आहेत. उल्लेखनीय म्हणजे साताऱ्यातून चारी दिशांचा विचार करता ६० ते ७० किलोमीटर अंतरावर ही स्थळं आहेत. त्यामुळंच एका दिवसात अनेक ठिकाणी पर्यटकांना जाणं शक्‍य होतं. 

सातारा शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. मराठ्यांच्या राजधानीचं हे ठिकाण. त्यामुळं शहरातच राजवाडा, चार भिंती, फाशीचा वड, कमानी हौद, मंगळवार तळं, विविध मंदिरं अशी कितीतरी ऐतिहासिक ठिकाणं आहेत. शहरालगतच अजिंक्‍यतारा हा किल्ला आहे. साताऱ्याच्या पश्‍चिमेस तासाभराच्या अंतरावर कासचं जगप्रसिद्ध फुलांचं पठार आहे. तिथून नजीकच भांबवली- वजराईचा धबधबा आहे. आशिया खंडातील सर्वाधिक उंचीचा धबधबा ही त्याची ओळख. याच परिसरातील एकीव, केळवली गावालगतचे धबधबे, उरमोडी धरण, सज्जनगडचा ऐतिहासिक किल्ला, ठोसेघरचा धबधबा, चाळकेवाडीचं पवनचक्‍क्‍यांचं पठार पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारे आहेत. 

कासपासून काही अंतरावरच शिवसागराचा विहंगम जलाशय आहे. जलविहारासाठी पसंतीचं हे ठिकाण. तापोळा, बामणोली ही ठिकाणं त्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसागरापलीकडचा वासोटा किल्ला, चकदेवच्या प्रसिद्ध शिड्या अन्‌ रघुवीर घाट साहसवेड्यांना साद घालतात. 

तापोळ्यातून महाबळेश्‍वरला जाणारा रस्ताही आहे. महाबळेश्‍वरचा निसर्ग ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांना खुणावतो. विविध प्रेक्षणीय स्थळांसह, क्षेत्र महाबळेश्‍वर, वेण्णा लेक पर्यटकांच्या गर्दीनं सदैव फुललेले दिसतात. महाबळेश्‍वरपासून काही अंतरावरच ऐतिहासिक प्रतापगड हा किल्ला आहे. पाचगणीचं टेबललॅंड हे भव्य, विस्तृत पठार आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्धी पावलेलं भिलार हे ‘पुस्तकांचं गाव’ वाटेवरच आहे. 

भिलार, पाचगणी पाहून थेट वाईत पोचता येतं. वाईला दक्षिण काशी म्हणूनही संबोधतात. वाईभोवताली अनेक पर्यटनस्थळं आहेत. वाईला कृष्णा नदीची सोबत लाभली आहे. इथं असलेला नदीवरचा घाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाईच्या पश्‍चिमेस काही अंतरावरच मेणवली हे ठिकाण आहे. पेशवाईतील धुरंधर नाना फडणीस यांचा वाडा इथं आहे. वाडा आजही सुस्थितीत आहे. इथं मेणेश्‍वराचं मंदिर आहे. इथली प्रचंड आकाराची घंटाही लक्षवेधक आहे. बाजीराव पेशव्यांचे पराक्रमी बंधू चिमाजी आप्पा यांनी वसईच्या रणसंग्रामात ती पोर्तुगिजांकडून हस्तगत केली होती. 

मेणवलीतून पुढं काही अंतरावरच धोम धरणाचा परिसर आहे. प्राचीन काळी धौम्य ऋषींचं वास्तव्य परिसरात असल्याचं सांगितलं जातं. इथं नरसिंह मंदिर आहे. वाईतून भोरला जायला रस्ता आहे. तिथं वाटेत मांढरदेव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. तिथं काळूबाईचं मंदिर आहे. वाई तालुक्‍यातच कमळगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड, चंदनगड हे किल्ले आहेत. तालुक्‍यातील किकली हे गाव वीरगळीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तिथलं भैरवनाथाचं हेमाडपंथी मंदिर प्रेक्षणीय ठरतं. भुईंज इथं भृगू ऋषींचं मंदिर आहे. 

साताऱ्याच्या पूर्वेलाही वर्धनगड, महिमानगड, वारुगड, संतोषगड, चंदन-वंदन असे किल्ले आहेत. औंधचं जागतिक दर्जाचं वस्तुसंग्रहालय आहे. पुसेगाव, गोंदवले, शिखर शिंगणापूर अशी प्रसिद्ध मंदिरं आहेत. वाठार निंबाळकर, फलटण इथं जुन्या काळचे वाडे आहेत. 

पाटण तालुक्‍यातील कोयनानगर, कोयना धरणाचा परिसर, नेहरू उद्यान ही स्थळंही पर्यटकांनी गजबजलेली दिसतात. कऱ्हाड परिसरात कृष्णा-कोयना नदीचा प्रीतिसंगम, यशवंतराव चव्हाण परिसर, नांदलापूरची प्राचीन लेणी, वसंतगड, सदाशिवगड हे किल्ले, तळबीडमधील महाराणी ताराबाई, हंबीरराव मोहिते यांची स्मारकस्थळं इत्यादी ठिकाणं पर्यटकांना साद घालतात.  

चित्रीकरणासाठीही आघाडीवर 
जिल्ह्याचा भोवताल निसर्गसमृद्ध आहे. त्यामुळंच सिनेसृष्टीत चित्रीकरणासाठी परिसराला प्राधान्य दिलं जातं. स्वदेश, मृत्युदंड, गंगाजल, मंगल पांडे, दबंग, बोल बच्चन, जिस देशमें गंगा रहता है इत्यादी चित्रपटांचं चित्रीकरण वाई, मेणवली परिसरात झालं आहे. अलीकडच्या काळात शंभरहून अधिक मराठी, हिंदी, भोजपुरी चित्रपट तसंच मालिका, जाहिरातींच्या चित्रीकरणात हा परिसर झळकला आहे. अमीर खानची सॅमसंगची जाहिरात असो वा ‘लागिर झालं जी’ या बहुचर्चित मालिकेचं चित्रीकरण, वाईचा भोवताल त्यात केंद्रस्थानी ठरला आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी, तापोळा परिसरातही सातत्यानं चित्रीकरण सुरू असतं.

एका दृष्टिक्षेपात सातारा
गड-किल्ले 
अजिंक्‍यतारा, सज्जनगड, प्रतापगड, वासोटा, महिमंडणगड, मकरंदगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कल्याणगड, वर्धनगड, महिमानगड वारुगड, संतोषगड, भूषणगड, वसंतगड, सदाशिवगड, सुंदरगड, गुणवंतगड, भैरवगड.

धार्मिक स्थळे... 
पाटेश्वर, कोटेश्वर, कुरणेश्वर, यवतेश्वर, पेटेश्वर, जरंडेश्वर, चवणेश्वर, शनैश्वर, मेरुलिंग, धारेश्वर, रुद्रेश्वर, बहुलेश्वर शिवमंदिर (उरुल), मेणेश्वर, धौमेश्वर. 

मंदिरे... 
कृष्णधाम, नटराज मंदिर, संगम माहुली, क्षेत्र माहुली, धावडशी, वर्णे आबापुरी, अंगापूर, त्रिपुटी, रंगनाथस्वामी निगडी, किन्हई, बोरबन, पुसेगाव, गोंदवले, शिंगणापूर, म्हसवड, मलवडी, औंध, वाई, मांढरदेव, पार, क्षेत्र महाबळेश्वर, चाफळ, जळव, नाईकबा, येडोबा.

धबधबे... 
ठोसेघर, भांबवली-वजराई, केळवली-सांडवली, एकीव, लिंगमळा, ओझर्डे, सडा वाघापूरचा रिव्हर्स पॉइंट. 

धरण परिसर... 
कोयना, तारळी, उरमोडी, कण्हेर, धोम-बलकवडी. 

पठार... 
कास, चाळकेवाडी, परमाळे, वाल्मीकी, पाचगणी 

ऐतिहासिक घळी... 
मोरघळ, मंडपघळ , रामघळ, कुबडीतीर्थ 

संबंधित बातम्या