जैवविविधतेने नटलेले कास पठार

सूर्यकांत पवार, कास
सोमवार, 27 जानेवारी 2020

सातारा पर्यटन विशेष
'युनिसेफ'ने जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेले कास पठार म्हणजे जैवविविधतेने नटलेले महत्त्वाचे ठिकाण आहे. शेकडो प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती याच पठारावर आढळतात. त्यातही काही वनस्पती या जगाच्या पाठीवर कास पठारावरच येतात. पांढऱ्या कमळांची चादर ओढलेला कुमुदिनी तलाव, छत्रपतींनी वापरलेला राजमार्ग याच कास पठारावर आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांच्या अनियंत्रित लोंढ्यांमुळे या पठारावरील जैवविविधता धोक्‍यात आली आहे. 

'युनिसेफ'ने जुलै २०१२ मध्ये कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. त्यामुळे कास पठाराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. कासच्या व्यवस्थापनासाठी, वनसंवर्धन आणि विकासाकरिता पहिल्यांदा संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. आता कासचे व्यवस्थापन कास पठार कार्यकारी समितीमार्फत पाहिले जाते. या समितीत कास, कासाणी, आटाळी, एकीव, कुसुंबीमुरा व पाटेघर या गावांचा समावेश आहे. या समितीमार्फत स्थानिकांना रोजगार, वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, ग्रामस्थांना सौरदिवे, एलपीजी गॅस वाटप, पर्यटकांसाठी वाहनतळ, माहिती फलक, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, माहिती पुस्तिका, सुरक्षेसाठी बॅरीकेड्‌स इत्यादी सुविधा दिल्या जातात. 

जागतिक वारसा स्थळ म्हणून नावारूपास आलेले कास पठार सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात 'कासा' नावाची वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते. त्यावरून या पठारास कास पठार हे नाव पडले, असे सांगितले जाते. कास पठाराचे एकूण क्षेत्र १९७२.८५ हेक्‍टर राखीव वनक्षेत्राचे आहे. कास पठारालगतच कास हे छोटेसे गाव आहे. गावात कासाई देवीचे मंदिर आहे. कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १२१३ मीटर आहे. येथील पर्जन्यमान हे २५०० ते ३००० मिलिमीटर आहे. कास परिसरात जूनपासून पावसाला सुरुवात होते. ऑक्‍टोबर अखेर पाऊस पडतच असतो. कास पठारालगत कास तलाव व त्याच्या भोवताली घनदाट जंगल असून हा तलाव व आजूबाजूचा भाग सातारा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. हा तलाव व कास पठार सातारा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असून या तलावातूनच सातारा शहराला पाणीपुरवठा होतो. कास पठारावर येण्यासाठी पुणे, मुंबई येथील पर्यटक हल्ली पाचवड-मेढा-कुसुंबी मार्गाचाही वापर करतात. 

कास पठारावर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. त्यामध्ये प्रदेशनिष्ठ (Endemic) व अतिदुर्मीळ (Endangared) वनस्पतींचाही समावेश आहे. रेडडाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठारावर जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात दर १५ ते २० दिवसांनी विविध रंगीबेरंगी फुलझाडांचे आयुष्य प्रगती करत असल्याचे दिसून येते. सातारा शहराचे वैभव म्हणून वायतुरा (Aponogeton sataraensin) ही अतिप्रदेशनिष्ठ व अतिदुर्मीळ वनस्पती फक्त पश्‍चिम घाटातील कास येथेच आढळते, म्हणून तिला Sataraensis हे नाव पडले आहे. कास पठारावर विविध प्रकारची ३२ प्रजातींची फुलपाखरे, १९ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, ३० प्रजातींचे पक्षी व १० प्रजातींचे सस्तन प्राणी अशी जैवविविधता आढळते. कास पठारावर हिरडा, भोमा, जांभूळ, गेळा, कासा, पिसा, उंबर, करवंद, तोरणे, अंजणी या वृक्ष प्रजाती आढळतात, तर ४०० पेक्षा जास्त फुल प्रजाती आढळतात. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती असलेले पुष्प पठार आहे. 

कास पठारापासून जवळच कोयना अभयारण्याची हद्द आहे. कास पठारावर रानडुक्कर, भेकर, सायाळ, खवले मांजर, मुंगूस, बिबट्या, तरस, ससे, गवे, भेकर इत्यादी प्रकारचे वन्यजीव प्रामुख्याने आढळतात. शिक्रा, गरुड, रानवे, धनेश, बुलबूल, कोकीळ आदी ३० प्रकारचे वन्यपक्षी आढळतात. रेड हेलेन, ब्लू टायगर, सिल्व्हरलाइन, सनबीम, पेंटेड, लेडी, ओकलीफ इत्यादी ३२ प्रकारची फुलपाखरे आढळतात. कास पठारालगतच कुमुदिनी तलाव, वजराई धबधबा, कास तलाव, डाक बंगला, घाटाई देवराई, बामणोली बोट क्‍लब, श्री क्षेत्र शेंबडी मठ, यवतेश्वर मंदिर तसेच पश्‍चिमेला सह्याद्रीनगर येथे पवनऊर्जा प्रकल्प आहे. येथूनच राजमार्गावरून महाबळेश्वर या जागतिक पर्यटन स्थळाला जाता येते. 

कास पठारावरील जैवविविधता जूनच्या पहिल्या पावसापासूनच बहरायला सुरुवात होते. काही दुर्मीळ फुले जून, जुलैपासूनच येतात. जुलै, ऑगस्टमध्ये रानहळद (चवर), टूथब्रश, वायतुरा, पंद, आमरीचे विविध प्रकार इत्यादी पांढऱ्या रंगांची फुले येतात. त्यांची संख्या कमी असते. त्यामुळे आच्छादित पठार दिसत नाही. तेरड्याच्या लाल, गुलाबी रंगाने पठारावर रंगांची जादू सुरू होते. त्यात भर घालतात ते चेंडूच्या आकाराचे पांढरे गेंद व कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळख असणारे निळी सीतेची आसव. या वनस्पतीने पठारावर पांढऱ्या व निळ्या-जांभळ्या रंगाचा आभास तयार होतो. शेवटी मिकी माऊस व सोनकीने पिवळ्या रंगाची शाल पांघरली जाते. तेरडा, गेंद, सीतेचा आसव, मिकी माऊस व सोनकी या फुलांचीच उपस्थितीच पठारावर गालिचा तयार करते. बाकी इतर फुले दुर्मीळ व कमी प्रमाणातील असून त्यात कीटकभक्षी इंडिका ड्रासेरा व इंडिका बर्मानी (दवबिंदू), नीलिमा, अबोलिमा, निळी, काळी व पांढरी निसुर्डी, कापरु, भुईशीर्ड, दगडफूल, हालुंदा, मोठी सोनकी, पिंडा, वायतुरा इत्यादी व इतर अनेक फुले पाहता येतात. 

कुमुदिनी तलाव 
कास पठाराचा शिरोमणी असणारा कुमुदिनी तलाव पांढऱ्या वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी बहरतो. या फुलांच्या बहराने तलावावर पांढऱ्या कमळांची चादर चढवल्याचा आभास निर्माण होतो. कुमुदिनी तलाव पठारावरून पश्‍चिमेकडे जाणाऱ्या ऐतिहासिक राजमार्गावर आहे. त्या राजमार्गाला लागूनच सुमारे दोन हेक्‍टर क्षेत्रावर हा तलाव आहे. या तलावाचे पाण्याच्या पृष्ठभागावर कुमुदिनी (निम्फॉईडस इंडिकम) ही वनस्पती, तर पाण्याच्या तळाला खाली रोटाला ही वनस्पती आढळते. ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान कुमुदिनीला पांढरी फुले येण्यास प्रारंभ होतो. या फुलांच्या मंद सुवासाने सर्व परिसर सुगंधित होतो. 

टोपली कार्वी 
बांबूपासून तयार केलेली हिरवीगार टोपली ज्याप्रमाणे उलटी टाकली की दिसते, त्याचप्रमाणे टोपली कार्वी (स्ट्रॉंबीलॅन्थस) गुच्छात येणारी वनस्पती असून सात वर्षांनी ती कासवर मोठ्या प्रमाणावर फुलते. तिला 'खरवर' व 'बक्रा' असेही संबोधले जाते. एका गुच्छात आलेल्या शेकडो निळ्या फुलांनी कास पठार टोपली कार्वी उमललेला भाग निळा-जांभळा दिसतो. टोपली कार्वीची पाने गव्याला जास्त आवडतात. पठाराला कुंपणाचे कवच असल्याने गव्यांसह सर्वच प्राण्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा आल्या आहेत.  

पर्यटकांच्या गर्दीने जैवविविधतेला धोका 
सातारा जिल्ह्याचा मानबिंदू असलेले कास पठार हे सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी अक्षरशः पर्यटकांच्या गर्दीने फुलते. पण हीच अनियंत्रित गर्दी या फुलांच्या मुळावर येत आहे. नियंत्रित पर्यटन ही संकल्पना फक्त दरवर्षी कागदावरच राहत आहे. मानवाच्या अनियंत्रित पर्यटनाने या दुर्मीळ जैवविविधतेला धक्का बसत असल्याचे दिसते.
 

संबंधित बातम्या