काळाच्या रेघोट्या...

अमृता देसर्डा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

शब्दांची सावली
आत्ताचा काळ मला कसा वाटतो?.. जेव्हा विचार करते, तेव्हा माणसं आणि त्यांच्या भावभावनांचं प्रदर्शन घडत राहतं. प्रत्येक जण स्वतःला कुठल्यातरी काळाशी बांधून ठेवतो... माझ्यासारखी अनेक माणसं मग गोंधळात पडून आपापला मार्ग शोधत स्वतःपाशीच गिरक्‍या घेत राहतात... 
तरुण मुलं कसा विचार करतात, त्यांचं मनोगत. 

दिवस येतो तसा निघून जातो. महिने सरतात, वर्षं संपतात आणि मग काळ पुढं पुढं त्याच्या पद्धतीनं सरकत राहतो. बरेच अनुभवी लोक म्हणत राहतात काळ बदलत राहतो. येणारा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. त्याचप्रमाणं काळपण बदलत राहतो. पण माझ्या मनात मग प्रश्‍न येतो... काळ बदलतो म्हणजे नक्की काय होतं? भविष्याचा वर्तमान होतो की वर्तमानाचा भूतकाळ होतो? नेमकी प्रक्रिया काय होते? दिवस आणि काळाचा काय संबंध? हजारो - लाखो वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात काय फरक आहे? आपल्या रोजच्या दिवस आणि रात्रीच्या मध्ये जो काळ व्यापून राहिलेला आहे त्याला विसरलो आहे का? काळाप्रमाणं गोष्टी बदलत जातात आणि जर त्या बदलतच असतील तर त्याचे पडसाद काय उमटतात? असे अनेक प्रश्‍न मी स्वतःला विचारत राहते. मग दिवस दिवस त्यात विचार करण्यात घालवते. अर्थात माझ्या हाती प्रत्येक वेळी उत्तर येईलच असं नाही. पण मी माझ्या बाजूनं उत्तरं शोधायचा नक्की प्रयत्न करत असते. 

काही दिवसांपूर्वी मी सत्तरी ओलांडलेल्या तीन माणसांबरोबर निवांत गप्पा मारत होते. त्यातले एकजण पंचाहत्तर वर्षांचे होते आणि दोघं त्यांच्या आसपास असतील. आमच्या गप्पांमध्ये त्यांचा भूतकाळ सारखा डोकावत होता. आमच्यावेळी असं होतं, तेव्हा तसं होतं, ही आजकालची पिढी (हे मला उद्देशून होतं), यांचा काळ किती भरभर बदलतो आहे, अगदी सुपरफास्ट झाला आहे, यांनी आमच्यासारखं अभावाचं जगणं अनुभवलं  नाही, आमच्यावेळी टीव्ही तर दुर्मिळच, साधा रेडिओपण ऐकायला मिळायचा नाही, शाळेत चालतच जायला लागायचं वगैरे वगैरे... पण इतकं ते बोलत असूनही तिघांकडं स्मार्ट फोन होता, त्यांची नातवंडं, मुलं परदेशात स्थायिक झाली होती. त्यांची पण अनेकवेळा परदेशवारी झाली होती. त्यांनी आमचा हा जबरी धावणारा काळ कवेत घ्यायचा निश्‍चितच प्रयत्न केला होता. मला काय बोलावं त्यांच्याशी हे कळत नव्हतं किंवा ते तिघंही वयानं खूप मोठे असल्यामुळं मी त्यांना प्रतिवाद केला नाही. पण त्यांचा काळ कसा होता यावर मात्र आमची चर्चा चांगली रंगली. चहा आणि भजी खाऊन आमच्या गप्पा संपल्या, कारण त्यातल्या एका आजोबांना संध्याकाळची साडेसातची टीव्हीवरची मालिका चुकवायची नव्हती. 

या गप्पा आमच्यात झाल्या आणि माझ्या डोक्‍यात परत आत्ताच्या काळाबद्दल विचारचक्र सुरू झालं किंवा आपण त्याला म्हणजे काळाला ‘आत्ताचा जमाना’ असंही म्हणू शकतो. मला प्रश्‍न असा पडला की काळ बदलतो की माणसं? म्हणजे आज मी जे काही जगणं अनुभवलं आहे किंवा अनुभवते आहे त्यानुसार मी माझ्यात बदल घडवत आहे आणि मग मी पुढं जात आहे किंवा थांबत आहे, ते मला कळतं आहे किंवा नाही याबाबत मी जरा साशंक आहे. म्हणजे आता मीच मला सगळ्यात जास्त अवघड प्रश्‍न विचारून गोंधळात घालते आहे आणि तुम्हालासुद्धा! 

त्या तिन्ही आजोबांमध्ये आणि माझ्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास वर्षांचं अंतर. म्हणजे इतक्‍या काळाचं अंतर, पण मी आणि ते सारखे नाही, आमचे विचार वेगळे, ध्येयं वेगळी, राहण्याची पद्धत वेगळी, तरीही आम्ही चौघं या काळात टिकण्यासाठी धडपडतो. ते आजही स्मार्टफोन किंवा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू पाहतात, मी तर मोबाईल, संगणक, इंटरनेट यांना माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं बनवून टाकलं आहे, की आत्तासुद्धा मी वही - पेन हातात न घेता डायरेक्‍ट माझ्या संगणकावर टाइप करते आहे. म्हणजे माझ्यातल्या मला मी किती बदलवलं आहे. मग माझ्यात आणि त्यांच्यात असं किती काळाचं अंतर आहे? आणि जर ते असेल तर ते कसं मोजायचं? मुळात आपण जो आपल्यात बदल करतो तो काळाप्रमाणं करतो का? आणि जर तसं करत असू तर आपण तसं का करतो? 

हे प्रश्‍न मला पडतात कारण मी विचार करते आणि विचार करण्यात जेव्हा खूप कालावधी घालवते आणि माझ्या आजूबाजूला पाहते, तेव्हा मला जे काही जाणवत राहतं ते शब्दात मांडायचा मी प्रयत्न करते. माझ्या आजूबाजूच्या काळाला मी लेखणीत बंदिस्त करू पाहते. 

आत्ताचा काळ मला कसा वाटतो? त्याबद्दल माझं आकलन, चिंतन काय? याचा जेव्हा विचार करते, तेव्हा भवताली माणसांचे आणि त्यांच्या भाव-भावनांचं प्रदर्शन घडत राहतं. प्रत्येक जण स्वतःला कुठल्यातरी काळाशी बांधून ठेवतो, काहीजण प्रिय व्यक्तीच्या जाण्यानं दुःखी होतात आणि आठवणींच्या पिंजऱ्यात स्वतःला अडकवून टाकतात. काहीजण भविष्य पाहण्यात इतकी मश्‍गूल होतात की आत्ता काय घडतं आहे याचं भानच त्यांना राहात नाही. काहीजण काळाच्याही मागं असतात आणि पूर्वीपासून पाळत असलेले जुने विचार आजही पाळत राहतात. माझ्यासारखी अनेक माणसं गोंधळात पडून, चुकलेल्या गरीब गायीसारखी दिसतात आणि मग आपापला मार्ग शोधत स्वतःपाशीच गिरक्‍या घेत राहतात व अस्वस्थ होत राहतात. 

अर्थात अशी गोंधळलेली स्थिती नेहमीच नसते. कधीतरी आनंदाची कारंजी फुलतात, कधीतरी मनातला तळ शांत होतो, कधीतरी हे जग खूपच साधं आणि सरळ आहे असं वाटत राहतं. पण हा ‘कधीतरी’ खूपच दुर्मिळ असतो. कारण काळ कुणाचं ऐकत नाही. तो अविरत धावत असतो. त्याला कसलीही भावना नसते किंवा कुठलाच आकार नसतो किंवा तुम्ही माझ्याबरोबर धावलंच पाहिजे असंही तो आपल्याला म्हणत नाही. कारण काळाला कुठली भाषा नाही. त्याला फक्त गतीच कळते. त्यात एक प्रकारची अजिबात न दिसणारी ऊर्जा असून त्याच्यामध्ये आपण जसं आहोत तसं पुढं जात राहतो आणि स्वतःला घडवत आपल्या काळालाही घडवत असतो असं वाटत राहतं. 

काहीजण म्हणतात, की सध्याचा काळ हा फक्त स्वतःला मिरवण्याचा आहे किंवा फक्त स्वतःची टिमकी वाजवण्याचा आहे. पण जर तसं असेल तर ते बरोबर आहे की चूक हे कोण सांगणार? किंबहुना हे कोण ठरवणार? परत हे सगळं काळच ठरवेल असंही काहीजण बिनधास्त म्हणतील. कारण तुम्ही - आम्ही किंवा आपण हे ठरवणारे कोण? तर आपण फक्त काळाचे म्हणजे त्या त्या कालखंडाचे साक्षीदार. प्रत्येक साक्षीदाराचा जबाब घेतलाच जाईल असं अजिबात नाही. कारण तितका वेळ सध्यातरी कुणाकडं नाही. 

पण खरंच जर आपण आपलं जगणं मिरवणार असू, किंवा त्याचं भांडवल करून काळाला मागं टाकायचा प्रयत्न करणार असू, तर ते आपल्याला जमेल का? तर मला वाटतं, काही अंशी ते जमू शकेल, कारण माणसं बदलली तर काळ आपोआप बदलेल. काळाचं गणित हे माणसांच्या वागणुकीवर अवलंबून आहे असं वाटतं. म्हणजे जर माणूस लाखो वर्षांपूर्वी कुटुंबात राहत नव्हता आणि आत्ता राहतो आहे.. आणि जर कुटुंबात पटलं नाही, तर आता विभक्तदेखील होतो आहे. या बदलत्या काळाचे जर आपण साक्षीदार असू, तर मग काळदेखील आपली दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. मग मानवी जगणं हे नुसतंच स्पर्धेचं, ईर्षेचं किंवा कलहाचं राहणार नाही. 

स्पर्धा, परीक्षा, गुणवत्ता या त्या त्या काळाच्या कसोट्या वाटत राहतात. कदाचित मी जो विचार करते आहे, तसा माझ्यापेक्षा वयानं लहान असणारा किंवा मोठा असणारा माणूस करेलच असं नाही. प्रत्येकाचं आकलन वेगळं असू शकेल. त्याला काही कुठली मर्यादा राहावी असं वाटत नाही. पण आत्ताचा काळ कसा आहे हे मोजण्यासाठी ज्या कसोट्या सध्या उपलब्ध आहेत त्या बदलायला हव्यात. त्या जर बदलल्या तर माणूस स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीनं मांडू शकेल आणि त्याची काळाबरोबर राहण्याची जी धडपड आहे ती किमान मार्गी लागेल. मग सत्तरी ओलांडलेले ते तिघं आणि मी, आमच्यात कुठलीच तुलना होणार नाही किंवा त्यांचा काळ असा होता किंवा आजचा काळ तसा नाही असा गमतीतसुद्धा दोषारोप होणार नाही. मला तर हे सगळं कालसापेक्ष आणि व्यक्तिसापेक्षदेखील वाटतं. असो. 

म्हणूनच, माझ्या संगणकाच्या कीबोर्डवर मी माझे दोन्ही हात फिरवून वर्ड-फाईलवर विचारांच्या रेघोट्या मारून, आजचा काळ शब्दांत मांडायचा वेडा प्रयत्न करते... 

आत्ताच्या काळाचं भान हे सरसर करून जेव्हा माझ्या डोळ्यांपुढं येतं, 
तेव्हा मला काय दिसतं? 

तेव्हा मला एक अंधार दिसतो, जो उजेडातही पिरपिरत असतो, 
तेव्हा मला एक आकृती दिसते, जी असूनही माझ्याजवळ येत नाही, 
तेव्हा मला एक कवडसा दिसतो, जो थेट अंधारात स्वतःला मिरवत राहतो. 
तर, आत्ताचा काळ मला हसून वाकुल्या दाखवतो आणि माझं प्रतिबिंब मला दाखवतो. कारण त्याला मी पुढं जायला सांगते. मग तो गेल्याच्या खुणा मी माझ्या आजूबाजूला शोधत राहून येणाऱ्या काळात स्वतःला मुक्तपणे झोकून देते... 

आपल्या समोर काही गोष्टी घडत असतात, त्या आपण पाहत असतो. आपल्या नजरेआडही बऱ्याच गोष्टी सुरू असतात, त्या आपल्याला कधीही जाणवत नाहीत. पण काळाचं विशेष असं, की आपल्या प्रत्येकाला थेट दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडं काळाचं बारकाईनं लक्ष असतं. त्याच्या नजरेतून एकही गोष्ट लपून राहात नाही. तो आपल्याला जाणवत नाही पण आपल्या अवतीभोवती त्याचा वावर अखंड असतो. 

तर सध्याचा काळ हा भल्यामोठ्या काळाचाच एक तुकडा, या काळावर मी शब्दांच्या रेघोट्या मारून काय साध्य करते आहे हे मला अजूनही उमजत नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या