अबोल रात्रीची बोलकी गोष्ट... 

अमृता देसर्डा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

शब्दांची सावली
तरुण मुलं कसा विचार करतात, त्यांचं मनोगत.

रात्रीची अडीच ते तीन वाजताची वेळ, थंडीचे दिवस, बस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी , काही गाड्या आराम करत होत्या. माणसं स्थानकाच्या मोकळ्या जागेवर दिसेल त्या जागेवर आडवी पडली होती, काही माणसं खुर्चीवर बसून पेंगत होती. रात्र उलटून पहाट होत होती, आणि त्या मध्य काळात काही माणसं साखर झोपेत असायचं सोडून चक्क जागी होती. काही माणसं नुकतीच प्रवासाहून, गाढ झोपेतून उठून आपापल्या घरी जात होती. 

मी नुकतीच औरंगाबादवरून पुण्याच्या स्थानकावर आले होते. आमची गाडी आली, आम्ही सगळे प्रवासी गाडीतून उतरलो. झोप इतकी अनावर होत होती, म्हणून कधी एकदा घरी जातेय आणि बिछान्यावर अंग टाकून पडतेय असं मला झालं होतं, पण स्टेशनपासून घर लांब, आणि इतक्‍या रात्री उशिरा बस मिळणं मुश्‍कील. म्हणून मी स्थानकाचा एक सुरक्षित कोपरा पकडला आणि एका रिकाम्या खुर्चीवर बसले. 

त्या पेंगुळलेल्या गर्दीत एक म्हातारी बसल्या बसल्याच झोपत होती, ती संपूर्ण मळलेली होती, तिचे केस विसकटलेले होते. अंगावरचे कपडे फाटलेले होते, छोट्या छोट्या ओढण्या तिनं साडीसारख्या गुंडाळून स्वतःला त्यात  झाकून ठेवलं होतं. ती बाई मळकी जरी असली तरी नाकी डोळी नीटस दिसत होती. बराच वेळ झाला, स्टेशनवर पोचून. आधी मला वाटत होतं, की उबर किंवा ओला बुक करावी. पण एकटीनं इतक्‍या रात्री त्यातून प्रवास करायला सुरक्षित नाही.

एकदा असाच एक वाईट अनुभव आला. मी आणि माझा मित्र असेच प्रवास करून एकदा मध्यरात्री पोचलो, आणि मी उत्साहानं माझ्या मोबाईलवर गाडी बुक केली. गाडी लोकेशननुसार आमच्या ठिकाणाहून फक्त तीनच मिनिटांच्या अंतरावर होती, तरी गाडी चालक येत नव्हता. जवळजवळ वीस मिनिटांनी तो आला. आम्ही दोनदा फोन केला तरी त्याने उचलला नाही. इतक्‍या रात्री त्याच्याशी वाद नको म्हणून आम्ही काही बोललो नाही, पण त्याने तोंडात गुटख्याचा तोबरा भरला होता. आणि तो बाहेर पचपच थुंकत होता. तो स्वतःहून आम्हाला म्हणाला, ’’ रात्रीचा मला चहा लागतो, म्हणून मी पीत बसलो, आणि उशीर झाला.’’ मला त्याचा रागच आला. एक तर आम्ही दोघेच गाडीत होतो. मित्र मला खुणेनेच काही बोलू नको म्हणून सांगू लागला. आम्ही आमच्या इच्छित स्थळी उतरलो आणि त्याने बिल चक्क तिप्पट सांगितले.. पण माझ्या मोबाईलवर मला ॲप जेवढे बिल दाखवत होते तेवढेच त्याला पण दाखवत होते, पण तो ते मान्य करायला तयार नव्हता. त्याने स्क्रीनवर भलतेच बिल दाखवले. उलट तो म्हणाला, ’’ मावशी मी अर्धा तास इथेच थांबतो, तुम्ही कुणालाही फोन लावून द्या, माझी तक्रार करा.’’ मला तो मावशी म्हणाला याचा खूपच राग आला. एकतर तो गाडीत व्यसन करत होता. मी त्याच्याशी हुज्जत घातली थोडी. पण इतक्‍या रात्री त्याच्याशी वाद घालायला नको असा मित्राने पवित्रा घेतला आणि तिप्पट पैसे दिले. म्हणजे मी भरले प्रत्यक्षात जास्त पैसे, पण मोबाईलच्या ॲपवर मात्र मला आधी जेवढे पैसे देणे अपेक्षित होते तितकेच पैसे मी दिले असे दाखवले होते. आम्ही तो विषय तिथेच थांबवला. माझा मित्र मला म्हणाला, ’’अशा कठीण प्रसंगी चार पैसे गेले तरी चालतील, पण हुज्जत घालायची नाही, त्या माणसापासून आपली सुटका करून घ्यायची. कारण तो काही आपण सांगून ऐकणार नाही, त्या वेळेस तो जे म्हणेल ते ऐकून घ्यायचं आणि विषय सोडून द्यायचा.’’

मला हे काही पूर्ण पटलं नाही. पण माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरू झालं. मी त्या चालकाची तक्रार देखील केली, त्याला त्याची सर्व्हिस चांगली नाही असा शेरापण दिला. पण कुणीच माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. मी जर त्या प्रसंगी एकटीच असते तर? तो इतक्‍या उशिरा का आला? त्याने एवढे पैसे का घेतले? तो नशेत असेल का? ऐनवेळी जर काही झाले तर इतक्‍या रात्री मी काय केले असते? या प्रश्‍नांनी माझी तेव्हा झोप उडाली. तो प्रसंग आजही आठवला तरी चीड येते. यातून मला एकच कळले इतक्‍या रात्री जेव्हा एखादी स्त्री प्रवास करते तेव्हा तिच्याकडे प्रत्येकवेळी माणूस म्हणून पाहिलं जाईलच असं नाही. किंबहुना ती एक बाई आहे आणि तिनं असा रात्री अपरात्री प्रवास करू नये असंच वातावरण आपल्याला आजूबाजूला दिसेल. मग ते पुणे, मुंबई, लखनौ, दिल्लीसारखी शहरे असोत. त्यातल्यात्यात मुंबई आणि पुणे फार सेफ आहे असे बऱ्याच लोकांना वाटतं. आता हे विधान किती सत्य आहे याची शहानिशा करायला हरकत नाही.

म्हणून जर मी रात्री प्रवास करत असेल, आणि विशेषकरून जर एकटी असेल तर स्थानकावरच थांबून, आराम करते, आणि जेव्हा सार्वजनिक वाहतूक सुरू होते तेव्हाच तिथून निघते. कारण रिक्षा काय किंवा डिजिटल पद्धतीने बुक केलेल्या भाडोत्री गाड्या काय, त्यांचा काही भरवसा देता येत नाही. एकतर रात्रीचा प्रवास टाळून आपण आपली सुरक्षितता किमान अबाधित ठेवू शकतो. पण अशा कितीतरी बायका, वृद्ध स्त्रिया या रस्त्यावर राहतात, त्यांच्या अनेक रात्री या अशा एखाद्या स्टेशनवर, किंवा रेल्वेच्या स्थानकांवर जात असतील. त्या मुळात बेघर असतात. त्यांच्या माणसांनी त्यांना सोडून दिलेलं असेल किंवा त्याच घर सोडून आल्याही असतील.

मी रात्री खुर्चीत जरी बसून होते, माझ्या अंगावर चार- चौघांसारखे सभ्य कपडे होते, तरीही मनात एक प्रकारची धागधुग होतीच. आजूबाजूची माणसं मला अनोळखी होती. जरी बरीच माणसं झोपाळलेली होती तरी त्यांच्या शेजारी मी आहे याची जाणीव त्यांना होती. पण तरीही मला फार असुरक्षित वाटत नव्हतं. कारण मला जर काही कुणी केलं तर मी पळू शकत होते, किंवा आरडाओरड करू शकत होते. म्हणून मला इतक्‍या रात्री रिक्षानं किंवा चारचाकी गाडीनं प्रवास करण्यापेक्षा हे स्थानक आपलं वाटत होतं. 

विचार करत असतानाच मला त्या खुर्चीतच डोळा लागला, माझी ब्याग माझ्याच मांडीवर ठेवून, मी त्यावर माझं डोकं टाकून झोपले. कितीवेळ झाला माहीत नाही. पण कुणीतरी प्रेमानं माझ्या डोक्‍यावर हात फिरवत आहे असं मला क्षणभर वाटलं. मी झोपेत होते. आजूबाजूची गजबज ऐकू येत होती, पण ती माझ्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हती. एस.टी, शिवनेरी, अश्वमेध यांसारख्या गाड्यांची वर्दळ वाढली होती. फेरीवाले येत जात होते, स्वतःचा माल विकावा म्हणून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मार्केटिंग करत होते. सगळे आवाज एकमेकांत मिसळले होते. आणि मी मात्र त्या आवाजांत शांत झोपले होते. 

पण तो थंड आणि खरबुडा स्पर्श माझ्या केसांवरून फिरत होता. मला त्याची जाणीव होत होती. मी माझ्या हातांच्या मुटकुळ्या करून चेहरा झाकून ब्यागेवर अंग झोकून दिलं होतं. हवेत पहाटेचा प्रसन्न गारवा होता. माणसाच्या गर्दीतही पक्षी किलबिलाट करत होते. त्या स्पर्शाने मला जाग आली, मी उठले आणि पाहते तर काय, माझ्या समोर ती वयस्कर पण मळकट दिसणारी बाई उभी होती. जिच्याबद्दल मी रात्री विचार करत होते, तिला पाहत बसले होते. मी तिला माझ्या जवळ पाहून दचकले. मला खूप भीती वाटली. तीच माझ्या डोक्‍यावरून हात फिरवीत होती. 

मला क्षणभर काय करावे कळलं नाही. ती माझा भ्यायलेला अवतार पाहून बाजूला झाली. मी अंग चोरून उभी राहिले. ती इतकी मळलेली होती, की मला कसनुसं झालं. पण तिच्या बाबतीत आपण असा तिरस्कार करतोय हे जाणून मला माझीच थोडी लाज वाटली. कारण रात्री मी त्या बाईबद्दल चांगला विचार करत होते. ती कुठून आली असेल, आधी काय करत असेल, तिला कुणी मुलगा किंवा मुलगी असेल का? असा विचार करत असताना मला झोप लागली होती, आणि आत्ता ती माझ्या जवळ उभी राहिली आणि माझी भीतीने गाळण उडाली. माझ्याच विचारांत किती तफावत आहे हे मला त्या क्षणी जाणवलं. पण तरीही शंकेखोर मन शांत बसत नव्हतं. ती वेडी असेल का? तिने माझ्या ब्यागेतून काही घेतलं तर नसेल? ती माझ्याकडे पाहून का हसत आहे? पण तिचं हसू वेडसर वाटत नव्हतं, ती जरी घाणेरडी होती तरी ती वेडी वाटत नव्हती. मी तिच्याकडे पाहू लागले. थोडीशी रागानं आणि संभ्रमाने. मी घड्याळात पाहिलं, पहाटेचे सहा वाजून गेले होते. थंडीचे दिवस होते म्हणून पूर्ण उजेड अजून पडला नव्हता. आता घरी जायला हरकत नाही. लोकल बस सुरू झाल्या होत्या. म्हणून मी त्या बाईकडे असणारं माझं लक्ष दूर केलं आणि जायला निघाले. 

ती बाई माझ्यामागे आली आणि मला हळूच म्हणाली, ’’पोरी तू माह्या पोरीवानी दिसतीस. म्हणून हात फिरिवला. वंगाळ वाटून घिऊ नगस.’’  मी तिला काहीच बोलले नाही. मला रडायलाच यायला लागलं. पण तरी मी चेहऱ्यावर हसू आणलं आणि तिचा थकलेला आणि खरबुडा झालेला हात हळूच हातात घेतला.आणि तिच्याकडे काहीच न बोलता, एकदा पाहून बाजूला सरकले.

तिच्याकडे पाठ केली आणि तरातरा तिथून निघाले. माझ्या मनात एकाच वेळी खूप भीती, खूप कीव, आणि सहानुभूती दाटून आली. मला बस मिळाली, मी बसले, आणि रडू लागले. तिचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मला माझ्या मम्मीची आठवण आली आणि मी एक पाऊण तासात घरी येते आहे, असा तिला फोन केला. माझा रडवेला आवाज ऐकून तिनं मला बरी आहेस ना तू असंही विचारलं. पण मी घरी येते मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला कर असं सांगून मी फोन ठेवून दिला. 

बसने स्थानक सोडले. आणि मी वळून रात्र जिथे काढली त्या स्थानकाकडे पाहू लागले. तर त्या वयस्कर बाई माझ्या गाडीच्या दिशेने पाहत होत्या. त्यांना मी काहीच प्रतिसाद दिला नाही याची थोडी खंत मला वाटली. त्यांना माझ्याबद्दल काय वाटलं असेल? मी का घाबरले त्यांना? त्या घाणेरड्या दिसत होत्या म्हणून? की त्या रस्त्यावर राहत होत्या म्हणून? मी इतकी असंवेदनशील कशी काय झाले? पण मी काय करणार होते? तिच्याशी मी बोलायला हवं होतं, कदाचित ती मला नंतर भेटेल किंवा न भेटेल? हे विचार मनात येऊनही मी माझ्या घराची वाट पकडली होती...

संबंधित बातम्या