जगण्यातलं ‘जग’... 

अमृता देसर्डा
मंगळवार, 20 मार्च 2018

शब्दांची सावली

आपल्याही पलीकडं असणारं जग हे साहित्यातून, वृत्तपत्रांतून, समाज माध्यमातून जाणवत राहतं. साहित्यातून दिसणारं जग हे कल्पना आणि सर्जनतेच्या खांबांवर आधारलेलं दिसतं. त्यातून माणसांचे स्वभाव, भाव-भावना शब्दांच्या माध्यमातून मांडल्या जातात आणि त्यातून मानवी मूल्ये तयार होतात.

आपल्या नजरेच्या टप्प्यात जे काही दिसत राहतं ते म्हणजे आपल्या आजूबाजूचं जग होय. मग त्यात काय काय सामील होईल? त्याला खरंच जग म्हणता येईल का? त्याही पलीकडं असं काही आहे का, जे आपल्याला दिसत नाही, पण ते अस्तित्वात आहे का? की मुळात ते नाही आणि तरीही आपण ते आहे असा समज करून घेतो का? किंवा ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही आणि आपल्या अपरोक्ष घडत असावं... ते आपण जर एकाच ठिकाणी राहिलो तर कदाचित दिसणार नाही. पण त्याची झळ किंवा अनुभव हा थोड्याफार प्रमाणात आपल्याला येतच राहतो. दिसणारं जग हे कधी खूप मोठं वाटतं, तर कधी अगदी मुंगीच्या चालीपेक्षा छोटं! पण म्हणून जे आहे ते आहे आणि जे नाही ते पण आहे.. फक्त आपल्या डोळ्यांना दिसत नाही किंवा आपण ते अनुभवत नाही. स्वतःशी बोलताना या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या जगाविषयी मी जेव्हा बोलत राहते तेव्हा मला त्याला असंख्य प्रश्‍न विचारावेसे वाटतात. 

त्यातले काही प्रश्‍न इथं लिहिते. आपण सगळेजण त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधूयात किंवा मनात तसेच ते प्रश्‍न, उत्तरे न शोधता घोळत ठेवूयात. 

तुम्हाला वाटेल, असे प्रश्‍न घोळवत ठेवले की काय होईल? त्यात काय इतकं अप्रूप आहे? पण तरीही मला त्यात एक गंमत वाटते. कारण प्रश्‍न अनुत्तरित राहिले, की ते आपल्यासोबत आहेत असं वाटतं. त्यांना उत्तरं नसली तरी ते आपली साथ सोडत नाहीत. आपल्याला ते सर्जन बनवतात आणि एका प्रश्‍नातून असंख्य प्रश्‍न तयार होतात. त्यातच मन गुंतून जातं. कधीतरी त्याच प्रश्‍नांतून उत्तरं मिळतात आणि मग कशाचा तरी शोध लागून निर्मितीचा आनंद काही क्षण का होईना मिळत राहतो. असो. 

त्या प्रश्‍नांवरून आपण आपली मतं बनवतो किंवा त्यातून आपण आपली विचारधारा चित्रित करतो. मग ते चित्र रेषांचं होतं किंवा शब्दांचं! ते कसं फुलवायचं हे आपल्या हातात असतं. तर या जगाविषयी मला पडणारे फुटकळ म्हणा किंवा बिनमहत्त्वाचे म्हणा, असे प्रश्‍न कुठले याचा जेव्हा मी विचार करते, तेव्हा समोर जी काही वस्तू असेल त्याच्याशी मी माझा संबंध जोडू पाहते. हा संबंध स्वतःशी, इतरांशी आणि संपूर्ण भवतालाशी आपण जेव्हा लावतो, तेव्हा कुठल्या तरी भूमिकेने आपण ते एकमेकांशी जोडून घेतो. मग हे जग असेच का? असा प्रश्‍न मनात येऊनही आपण ते समजून घ्यायचा आपल्या परीने प्रयत्न करत असतो. 

माझ्या समोर काय काय आहे? आणि त्या सर्वांची सांगड मी कशी घालते? त्यातून जो काही अर्थ मनात तयार करून घेते, तो बरोबर असतो का? म्हणजे आत्ता लिहिताना अनेक वस्तू समोर आहेत, त्यात कागदांची पाने, टेबल, संगणक, विजेचे दिवे, भिंतीवर टांगलेली फ्रेम, घराची रंगवलेली भिंत, त्यावर पडणारा उजेड आणि त्या उजेडावर असंख्य वस्तूंची पडणारी सावली, हवेतला जाणवणारा थंडावा, गार पडलेल्या फरशीचा गारठ स्पर्श, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा अस्पष्ट आवाज, जवळच्या देवळातली मधेच वाजणारी घंटा.. म्हणजे नुसत्या वस्तूच नाहीत, तर असंख्य आवाज, असंख्य स्पर्श जाणवत राहतात. या दिसणाऱ्या जगात मी मश्‍गूल होऊन माझं असणं जगत राहते. याचा अर्थ या सर्व गोष्टींमध्ये जे काही अस्तित्व आहे, जो काही स्थायीभाव आहे तो माझ्या डोळ्यांना दिसतो; मग ती गोष्ट निर्जीव असली काय किंवा जिवंत असली काय! त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे माझ्यासमोर भिंत आहे आणि त्या भिंतीच्या असण्यामुळे घर तयार झालं आहे. ते घर आहे, म्हणून मी त्यात राहत आहे.. म्हणजे अशा असंख्य वस्तू, गोष्टी; मी आहे म्हणून त्या माझ्याभोवती आहेत किंवा त्या आहेत म्हणून मी त्यांच्याभोवती आहे. 

हे सर्व जसं आहे तसं पाहिलं जातं का? जी वस्तू जशी आहे तशी आपण स्वीकारतो का? या सर्व गोष्टी नसत्याच, तर काय झालं असतं? हे सर्व आहे म्हणून हे जग निर्माण झालं आहे असं वाटतं आहे तर मग असं वाटणं बरोबर आहे ना? हे जग कशावर चालतं? अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या हे जग आहे असं आपल्याला जाणवून देतं. मुळात यावर इतका विचार करत राहणं योग्य आहे का? कारण रोजच्या त्याच त्याच गोष्टी करून त्या नेहमीच्या होतात आणि मग त्याकडं आपण कित्येकदा दुर्लक्ष करतो. त्या आपल्याला कधी हव्याशा किंवा कधी नकोशा वाटू लागतात. 

आपल्याही पलीकडं असणारं जग हे साहित्यातून, वृत्तपत्रांतून, समाज माध्यमातून जाणवत राहतं. साहित्यातून दिसणारं जग हे कल्पना आणि सर्जनतेच्या खांबांवर आधारलेलं दिसतं. त्यातून माणसांचे स्वभाव, भाव-भावना शब्दांच्या माध्यमातून मांडल्या जातात आणि त्यातून मानवी मूल्ये तयार होतात. मुख्य म्हणजे ती चिरकाल टिकणारी असतात. तर वृत्तपत्रे घडून गेलेल्या घटनेची बातमी करून आपल्या समोर मांडत असतात आणि समाज कुठल्या प्रकारचे आविष्कार करत आहे ते सांगत राहतात. मग त्यात जागतिक घडामोडी असोत किंवा एखाद्या गावपातळीवरच्या घडामोडी; ज्यात बातमी-मूल्य आहे ते किंवा ज्यात काहीच बातमी-मूल्य नाही, पण अर्थकारण आहे अशा अगणित गोष्टी त्यात मोडत असतात. म्हणजे ही सारी माध्यमे आपल्याला जग नावाची जी काही गोष्ट आहे, ती दाखवत राहतात. जणू काही हे जग त्या आरशात डोकावून स्वतःला पाहत राहतं आणि आपण त्या जगाचा भाग कधी होतो ते आपल्याला कळतपण नाही. 

आपण त्या जगाचा भाग असतो, म्हणजे माणूस म्हणून आपली भूमिका नेमकी काय असते? किंवा असायला हवी? याचा जर आपण विचार केला, तर काय होईल? बहुधा आपण प्रत्येकवेळी बघ्याची भूमिका घेतो किंवा काहीतरी कृती करण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहतो. त्यात कधी यशस्वी होतो, तर कधी अपयशी. कुठल्या न कुठल्या कारणानं आपण एकत्र येत राहतो आणि आपल्या आजूबाजूचं जग आपल्या सोयीनुसार बांधत राहतो. 

हे असं जगाशी स्वतःला बांधून घेणं हे तसं अवघड आहे आणि तसं सोपंही! हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा आणि आकलनाचा प्रश्‍न आहे. तो कसा हाताळायचा हा ज्याने त्याने ठरवायचे असते. म्हणून मुळात मनात प्रश्‍न निर्माण होणे आणि त्या प्रश्‍नांवर विचार करत राहणे ही प्रक्रिया मला महत्त्वाची वाटते. कारण त्या प्रक्रियेतच उत्तरं दडलेली असतात. मग ती उत्तरं पटणारी असतात किंवा न पटणारीसुद्धा... आणि या सर्वांत आपण आपलं जग आकारत असतो. मग ते आपल्याला कधी कधी खूप सुंदर, तर कधी कधी खूप कुरूप वाटतं. 

जेव्हा त्या जगात संघर्ष, वाद निर्माण होतो आणि परस्पर मतभेद वाढून जगण्यातली अनिश्‍चितता, अस्वस्थता वाढायला लागते, माणूस स्वतःच्या अस्मितेला जास्त महत्त्व देऊन दुसऱ्या माणसानं उभं केलेलं जग जर त्याला पटलं नाही, तर हिंसेनं ते उद्‌ध्वस्त करू पाहतो, तेव्हा हे जग एखाद्या अक्राळविक्राळ स्वरूपात आपल्या समोर उभं राहतं. मग त्यात दहशतवाद, माओवाद, नाहीतर आणखीन कुठला वाद असो, त्या संघर्षाची ठिणगी इतकी विकल असते की ती माणसातला चांगुलपणा संपवून टाकून त्याला उजाड करत जाते. मग आपल्या आजूबाजूचा भवताल निमूटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय राहात नाही. 

आजचं जग हे जरी हातांच्या बोटांवर उभं आहे असं वाटत असलं, तरी ते आपल्या मुठीत नाही. आपण त्या जगाला मुठीत सतत ठेवू शकतो का? तर नाही. कारण ते अखंड प्रवाही आहे, त्याला कुठल्याही सीमा नाहीत. ते कुठूनही आणि कसंही उगवू शकतं. वाढू शकतं. त्याला काही कुठली शक्ती निर्माण करावी लागत नाही, ती आपोआप त्याची त्याची बनत असते आणि लोपसुद्धा पावत असते. ते शेतात उगवणाऱ्या काँग्रेसच्या गवतासारखं कधी निरुपयोगी तर कधी सदुपयोगी आहे. या मानवी जगात सगळ्या गोष्टींना स्थान आहे. त्याला नियमांनी जरी बांधून ठेवलं तरी ते प्रत्येकवेळी करकचून बांधता येईलच असं नाही. 

म्हणून आपला भवताल नीट ओळखता आला पाहिजे. त्यातूनच आपल्यालाही या जगाचा भाग होऊन, अगदी सहजपणे त्यात सामील होता आलं पाहिजे. हे जग आपल्या असण्यावर आणि आशेवर चालत जरी असलं, तरी त्यासाठी आपल्यात तशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद आपण स्वतःच निर्माण करायला हवी. काळोखातून उजेडाकडं वाटचाल करत असताना, मधे येणारे असंख्य अडथळे बाजूला सारून, भविष्याचे कवडसे शोधता आले पाहिजेत. ते आपल्या मूठभर ओंजळीत साठवून ठेवता आले पाहिजेत. त्यासाठी हे जग जसं आहे आणि आपण जसे आहोत याचा स्वीकार केला आणि जग समजून घेण्याच्या पुढच्या प्रवासाला आपण लागलो, तर आपण अधिक समृद्ध जगू शकू, असा विचार माझ्या मनात येत असतो. 

अर्थात ही काही माझ्या प्रश्‍नांची उत्तरं नाहीत. ती विचार करून, सापडलेली छोटी छोटी समीकरणं आहेत. एखादं गणित आपण जसं अनेक प्रकारांनी सोडवतो, तसं हेसुद्धा त्यातलं एक समीकरण आहे, असं म्हणायला हरकत नाही. समीकरण आपण कुठल्या पद्धतीनं सोडवत आहोत याला महत्त्व नाही, पण त्याचं उत्तर किमान सापडवायचा प्रयत्न केला तरी हाती काहीतरी शिल्लक राहतं आणि त्यातून आपण एक माणूस म्हणून प्रगल्भ आणि सकस होत जातो, असं तरी वाटत राहतं...

संबंधित बातम्या