झेंडे स्वतःच्या अस्मितेचे... 

 अमृता देसर्डा  
गुरुवार, 22 मार्च 2018

शब्दांची सावली      

रात्रीचा एक वाजून गेला होता. रस्ता आराम करत होता. तरी एखाद - दुसरी गाडी येत जात होती. पण रस्ता शांत होता आणि अचानक बाहेरून खूप गाड्यांचा, त्यांच्या एकत्र हॉर्नचा आवाज ऐकू आला, मी झोपले नव्हते, वाचत बसले होते. उकाडा वाढला म्हणून घराची खिडकी थोडी उघडी ठेवली होती. इतक्‍या रात्री एवढा आवाज कसला म्हणून मी उठून खिडकीतून डोकावून पाहू लागले तर बाइकस्वार खूप सारे एकत्र चालले होते.. आणि घोषणा देत होते. नुकतीच दुसऱ्यांदा शिवजयंती सुरू झाली होती. जवळजवळ पंचवीस ते तीस बाइक होत्या. त्यात फटफटी होत्या, मोपेड होत्या. रात्रीची शांतता त्यांनी एकदम भंग करून टाकली. सगळेजण अगदी जोशात होते. काहींच्या हातात झेंडे होते, काठ्या होत्या आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा चालू होता. सगळेजण वीस ते तीसच्या स्पीडने असतील. त्यांचा आवाज लांबपर्यंत येत होता. मी खिडकीतून जेवढे पाहता येईल तेवढे पाहिले आणि परत माझ्या बिछान्यावर येऊन आडवी झाले. पण तो आवाज, त्या लोकांचा उत्साह आणि जोश माझ्या कानात घुमत होता. 

मी विचार करू लागले. का बरे इतक्‍या रात्री त्यांना असे समूहाने एकत्र यावेसे वाटले? एवढ्या रात्री त्यांना परवानगी कुणी दिली? म्हणजे अशा अवेळी ते रात्रीच्या शांततेचा भंग करत आहेत, तर मग पोलिस त्यांना का अडवत नाहीत. उगाच माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि माझी झोप उडाली. साधारण पाऊण-एक तासाने पुन्हा ती रॅली आली. आता तर काहीजण घोड्यावर होते. घोड्यांच्या टापांचे टपटप आवाज येत होते. त्यात भरीस भर म्हणजे सायलेन्सर काढलेल्या दुचाकी गाड्यांची! रस्ता त्यांच्या आवाजाने, जाण्याने एकदम काहीक्षण का होईना गजबजून गेला. रात्रीचे अडीच वाजून गेले होते. त्या संपूर्ण रॅलीत जास्त करून विशी-पंचविशीतली मुले होती. एकही मुलगी त्यात नव्हती. इतक्‍या रात्री मुलींचे काय काम? पण तरी मला प्रश्‍न पडला. जर एखादी मुलगी त्यात असेल तर? असो. 

अशा रॅली काढून आपण काय मिळवतो? जागोजागी चौकात शेड उभ्या करायच्या. फ्लेक्‍स लावायचे. तात्पुरते स्टेज उभे करायचे. महान माणसांचे, समाजसुधारकांचे पुतळे त्या स्टेजवर ठेवून दिवसभर मोठ्या आवाजात गाणी लावायची. मग त्या पुतळ्यांची आरती करायची, त्यांना हारफुल घालायचे, त्यांची पूजा करायची आणि त्यांच्या स्मरणात तो दिवस साजरा करायचा. या गोष्टींनी खरेच आपण त्या मोठ्या होऊन गेलेल्या माणसांचे विचार आत्मसात करणार आहोत? की त्यांचा विचार पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार आहोत? या अशा गोष्टींनी आपण खरेच त्यांचा विचार आत्मसात करू शकू? 

माझी पिढी जेव्हा या जुन्या पिढ्यांच्या लोकांचे नसणे, असणे साजरे करते तेव्हा खरेच काय होते? आमची पिढी हे सगळे का करते आहे? आत्ता ही मोठी माणसे जाऊन खूप वर्षे झाली. त्यांच्यानंतर कित्येक पिढ्या आल्या, जगल्या आणि गेल्या. पण नवीन पिढ्या त्यांना स्मरून त्यांच्यासाठी एक दिवस देते आहे. एकत्र येते आहे. याचे कौतुक करायचे की दुःख? किंवा आम्ही जे वागतो आहोत त्याने काही फायदा होणार आहे का? की आम्हाला फक्त आमचा दबाव गट निर्माण करून आमच्या अस्मितांना जागा करून द्यायची आहे? हे काही उमगत नाही. 

मी जेव्हा विचार करते, की आमची पिढी असे का वागते किंवा प्रत्येक गोष्ट, घटना किंवा प्रसंग साजरे करण्याचे निमित्त का शोधते? या मागचे कारण काय? आणि हे असे पुढे किती काळ टिकणार? आम्हाला खरेच यातून काय मिळते? आमच्यातल्या ऊर्जेला आम्ही त्यातून जागा करून देतो का? मी एक माझ्या पिढीची प्रतिनिधी म्हणून का काही करत नाही? मला भीती का वाटते? मी त्या झुंडीत सहभागी होत नाही आणि विरोधही करत नाही. पण माझ्यासारखे असे कितीजण असतील जे फक्त पाहत असतील? किंवा असे कितीजण असतील त्यात हिरिरीने भाग घेत असतील? आपण आपल्या समूहांच्या अस्मिता जपायचा प्रयत्न करत आहोत का? की ही आपली टोकदार अस्मिता आहे, आणि त्यासाठी काहीही करायची आमची तयारी आहे? 

असे अनेक प्रसंग आहेत. मागच्या महिन्यात एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे हजारो प्रेक्षक होते. कार्यक्रम सुरू झाला आणि एक माणूस उठून मोठ्या आवाजात घोषणा देऊ लागला. स्टेजवर बसलेले मान्यवर, हजारो प्रेक्षक एकदम शांत झाले. आम्हाला क्षणभर काय करावे हे कळले नाही. पण तो माणूस घोषणा देत होता, आणि आम्ही ऐकत होतो. त्याची घोषणा पूर्ण झाली आणि मग सूत्रसंचालक पुन्हा शांतपणे बोलू लागले. प्रेक्षकही काही घडले नाही असे दाखवून कार्यक्रम ऐकू लागले. भर कार्यक्रमात त्या माणसाला असे का वागावेसे वाटले? कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. पण त्या माणसाची घोषणा, त्याचा आवाज माझ्या मनात राहिला. आपण वेळ, काळ, प्रसंग, परिस्थिती पाहून का वागत नाही? आपल्याला असे दुसऱ्यांचे लक्ष वेधून काय करायचे असते? यातून काय साध्य होणार आहे? माझ्या पिढीला असे स्वतःला व्यक्त होण्यासाठी का वागावे लागते? 

आणखी एक प्रसंग. अगदी दोन - तीन दिवसांपूर्वीची गोष्ट. अजून एक कार्यक्रम पाहायला गेले होते. तिथे खूप तरुण मुले मुली होती. प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरगच्च भरला होता. कार्यक्रमात भाषणे चालली होती. अनुभवी, वयस्कर मंडळी मनापासून बोलत होती. आणि प्रेक्षकांमधली काही तरुण मुले मोबाईलवर गेम खेळत होती, काहीजण सेल्फी काढत होते. समोर बसलेली माणसे काय बोलत आहेत याचे त्यांना काही घेणे देणे नव्हते. ती मुले त्यांच्या विश्‍वात रममाण होती. नंतर कळले, की ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्याच कुटुंबातील ती मुले होती. त्यांचे त्या कार्यक्रमात अजिबात लक्ष नव्हते. त्यांना पाहून मला वाटले, मी त्यांच्या जागी असते तर असे केले असते? किंवा माझ्याच घरातल्या लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केला म्हणून मी त्यात हिरिरीने भाग घेतला असता? की त्या मुलांसारखी अगदी बिनधास्त आणि कॅज्युअल ॲप्रोच ठेवून वागले असते? ती तरुण मुले होती. कार्यक्रम गंभीर होता. म्हणूनही कदाचित त्यांना बोअर होत असेल. त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबरच असतील. पण का कुणास ठाऊक मला त्यांचे असे इतके कॅज्युअल वागणे अस्वस्थ करून गेले. 

एकदा मध्यरात्री काही तरुण मुले त्यांच्यातल्याच एका मुलाला चक्क केक फासत होती. त्यांनी इतकी केकची क्रीम त्या मुलाला फासली की तो संपूर्ण क्रीममध्ये लोळून आला आहे असे वाटत होते. त्याचे सगळे मित्र जोरजोरात किंचाळत त्याचा वाढदिवस साजरा करत होते. मी तिथून जात होते, तर ते माझ्याकडे पाहून विचित्र हसत - खिदळत होते आणि कमेंट्‌स पास करत होते. 

आपण नेहमी म्हणतो आत्ताची पिढी, मागची पिढी आणि पुढची पिढी यांच्यात खूप अंतर आहे. हे अंतर सतत वाढत जाणार. आमच्या पिढीला आणि इथून पुढच्या पिढ्यांना फक्त महोत्सव, सेलिब्रेशन आणि उत्सव यांच्यात रस असेल, त्यांना विचार करण्याची, प्रश्‍न समजून घेण्याची गरज वाटत नाही वगैरे वगैरे. पण खरेच तसे आहे का? आम्ही का बरे मग मागच्या जुन्या पिढींतील मोठ्या लोकांची आठवण ठेवून त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजऱ्या करतो? आम्ही आमची ऊर्जा या सगळ्यात का घालवतो? की जुन्या लोकांना आम्ही त्यांच्यासारखेच वागावे असे वाटते आहे? किंवा काय करायचे हा मोठा प्रश्‍न आमच्यापुढे आहे म्हणून आणि आमच्यातली ऊर्जा, उत्साह याचा कुठेतरी विसर्ग व्हावा म्हणून हे सगळे करत आहोत? इतके असूनही आम्ही आतून तुटलेले का आहोत? आमच्यात असुरक्षितता का आहे? भीती का आहे? आम्ही निर्भय का नाही? किंवा आम्ही निर्भयपणाचे फक्त ढोंग करत आहोत? 

या सर्वांतून आम्हाला आमच्या पिढीला समाजात अशी एक जागा निर्माण करून द्यायची आहे. जेणेकरून सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे जाईल आणि मागच्या पिढीला आमच्या पिढीचे महत्त्व पटेल. पण असे खरेच आहे का? आम्ही अशा पद्धतीने व्यक्त होऊन, काय सांगू पाहत आहोत? गांधीजींच्या काळात ते पायी चालायचे आणि त्यांच्या मागे हजारो लोक चालत असायचे. अशी चित्रे आपण इतिहासात नेहमी पाहतो. आता आम्ही हजारो नाही, पण शे - दोनशे लोक आपापल्या गाड्या घेऊन, आपल्या समूहाच्या अस्मितेचा झेंडा घेऊन रस्त्यावरून हॉर्न वाजवत जातो. फरक इतकाच, की आपण पायांनी चालत न जाता वाहनाने जातो आहोत. आपल्यात गांधीजी प्रत्यक्ष नाहीत. आपल्यातले गांधीजी आपल्याच मनातल्या कोपऱ्यात दडून बसले आहेत. आपल्या मनातले शिवाजी आज घोषणेतून बाहेर येत आहेत आणि रात्री टपटप आवाज करत जाणाऱ्या घोड्याच्या चालीसारखे सूक्ष्म होऊन वाहतुकीने वाहणारा रस्ता अस्वस्थ करत आहेत. भारतीय राज्यघटना डॉल्बीच्या तालावर ठुमके घेते आहे आणि प्रचंड ऊर्जा असलेली आमची पिढी त्या तालात मुग्ध होऊन बेफानपणे गुलाल हातात घेऊन नाचत आहे. सगळ्या पिढ्या एकमेकांना वाकुल्या दाखवून आपले असणे साजरे करत आहे कारण त्यांना सिद्ध करायचे आहे त्यांचे असणे. यांना दाखवून द्यायचे आहे त्यांची ऊर्जा, त्यांना जपायची आहे त्यांच्यातली शक्ती आणि प्रदर्शित करायची आहे न दिसणारी पण मनात ठासून भरून राहिलेली अस्मिता. प्रत्येकाच्या अस्मितेचे झेंडे फडकवून आज माणसांचा समूह झुंडीच्या रूपात एकत्र येतो आहे. त्या त्या काळाचे, समाजाचे, समाजातल्या प्रत्येक घटकांचे प्रतिनिधित्व करतो आहे.

 

आत्ताची पिढी जेव्हा जुन्या पिढ्यांच्या लोकांचे नसणे, असणे साजरे करते तेव्हा खरेच काय होते? आत्ताची पिढी हे सगळे का करते आहे? आता ही मोठी माणसे जाऊन खूप वर्षे झाली. त्यांच्यानंतर कित्येक पिढ्या आल्या, जगल्या आणि गेल्या. पण नवीन पिढ्या त्यांना स्मरून त्यांच्यासाठी एक दिवस देते आहे. एकत्र येते आहे. याचे कौतुक करायचे की दुःख? किंवा आम्ही जे वागतो आहोत त्याने काही फायदा होणार आहे का? की आम्हाला फक्त आमचा दबाव गट निर्माण करून आमच्या अस्मितांना जागा करून द्यायची आहे? हे काही उमगत नाही.

Tags

संबंधित बातम्या