चलनाच्या विळख्यात... 

अमृता देसर्डा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

शब्दांची सावली
खूप म्हणजे खूप आधी, अगदी हजारो, लाखो वर्षांपूर्वी चलन नावाचा प्रकारच अस्तित्त्वात नव्हता. कदाचित काहीतरी असेलही, मला ते माहीत नाही. पण तेव्हा लोक कसे व्यवहार करत असतील?

पुण्यात अलका थेटरच्या इथे खूप मोठा सिग्नल आहे. खूप फेमस चौक आहे तो. पुण्यातला सगळ्यात वर्दळीचा रस्ता. ते हल्ली सगळेच रस्ते वर्दळीचे आणि वाहतुकीचे झाले आहेत. तर तिथे हमखास खूप मोठा सिग्नल असतो. तिथे काही लहान मुले कापड घेऊन फिरत असतात. त्यांचे वय फार नसते, काहीजण तर दहा वर्षांच्या आतलीच असतात. तिथे सिग्नलला गाड्या थांबल्या तर ती मुले स्वतः येऊन काहींच्या गाड्या पुसतात आणि पैसे मिळण्याच्या आशेने हात पुढे करतात. त्यांचे मळलेले हात, फाटक्‍या कपड्यांतले शरीर, आणि त्याही मळक्‍या चेहऱ्यावर गाडीचे मालक पैसे देतील म्हणून चमक, डोळ्यात वेगळीच अपेक्षा. दोन चाकी गाड्या पुसल्या ,की हात पुढे करून ही मुले पैसे मिळण्याच्या अपेक्षेत. पैसे. अर्थात चलन. ही गोष्ट त्या लहान मुलाला पण कळते. कारण त्याला माहीत असते, ही गोष्ट आपल्या घरच्यांना दिली तर ते आपल्याला खाऊ देतील आपले लाड करतील. 

एकदा एक दीड वर्षांचा लहान मुलगा खेळत होता. त्याच्या हातासमोर कुणीतरी एक साधा कागद घेतला, आणि अजून एका हातात शंभर रुपयांची नोट पुढे केली. विशेष म्हणजे त्या लहान मुलाने हसत हसत शंभराची नोट निवडली. त्याला ती न देता, त्याच्या हातात कागद ठेवला तर ते मूल जोरजोरात रडायला लागले. सगळेजण त्याचे कौतुक करत होते. बघा आत्तापासूनच त्याला पैसे कळतात असे म्हणून त्याचे आई-वडील हसत होते, सगळ्यांना सांगत होते.  हे दोन्ही प्रसंग माझ्या मनात घोळत होते. आज आमच्या पिढीत चलनाला किती महत्त्व आले आहे. मी आधीच्या पिढीच्या खूप माणसांकडून ऐकले, की पूर्वी आत्ता जितकी महागाई आहे तितकी कधीच नव्हती. अगदी शंभर रुपये पगारात पण संपूर्ण कुटुंब सुखात जगायचे. आत्ता सगळे इतके महागडे झाले आहे, की आत्ता कुणाला दहा हजार पगार असेल तरी चार माणसांचे कुटुंब त्यात सुखाने जगू शकणार नाही. केवढी तफावत आहे म्हणज. आज २०१८ मध्ये आणि शंभर वर्षांपूर्वी १९१८ मध्ये जगणारा माणूस कसा असेल? म्हणजे या शंभर वर्षांच्या काळात इतके आमुलाग्र बदल झाले, की माणूस हा फक्त चलन मिळवून स्वतःला कसे जिवंत ठेवता येईल या चक्रात पूर्ण अडकला.  १९१८ ला चलनाला महत्त्व असणारच यात शंका नाहीच, पण आज २०१८ मध्ये जितके चलनाला महत्त्व आहे तितके त्याकाळी निश्‍चितच नसणार. 

आज पैसा खूप मोठा झाला आहे. माणसांच्या गरजा वाढत चालल्या आहेत. त्यांचे राहणीमान, दैनंदिन जीवनाबाबतचे विचार, कपडे, जेवण, शिक्षण, मोबाईल, इंटरनेट या कितीतरी गोष्टी आपल्या जीवनात मूलभूत बनत आहेत. या मूलभूत गोष्टींत आणखीन वाढच होत आहे.  आज मनोरंजन या क्षेत्रात खूप पैसा आणि प्रसिद्धी आहे म्हणून अनुभव नसतानाही अनेकजण या क्षेत्रात येतात आणि पैसे कमावण्याची धडपड करतात. आज कुठलेही क्षेत्र असे नाही ज्यात चलनाला महत्त्व नाही, अगदी छोट्या सेवांपासून ते अगदी दवाखान्यातील प्रत्येक सेवेला आपल्याला पैसे मोजावे लागतात. जर आपल्याला मनासारखा परतावा आपण केलेल्या गुंतवणुकीतून मिळाला नाही तर माणूस असुरक्षित होतो. त्याला जगण्याचे भय वाटते. तो पैशाला घाबरू लागतो. आणि त्यातूनच गैरव्यवहाराला नकळत सुरवात होते. 

 खूप म्हणजे खूप आधी, अगदी हजारो, लाखो वर्षांपूर्वी चलन नावाचा प्रकारच अस्तित्त्वात नव्हता. कदाचित काहीतरी असेल ही, मला ते माहीत नाही. पण तेव्हा लोक कसे व्यवहार करत असतील? तेव्हा म्हणे वस्तूंची देव-घेव माणसे करत. किती वेगळे आयुष्य असेल ना त्यांचे? आत्ता सारखे स्पर्धात्मक, इर्शात्मक वातावरण असेल? लोक एकमेकांना उधार वस्तू देत असतील? जर तेव्हाच्या काळातली परिस्थिती आत्ता उद्भवली तर? बापरे, जर या जगातून चलन पूर्ण गायब झाले तर? माणसे एकमेकांशी कशी वागतील? जर कुठल्याच वस्तूला, पदार्थाला, जमिनीला भावच उरला नाही तर काय होईल? माणसे वागतील का प्रेमाने एकमेकांशी? वागतील का पारदर्शी स्वतःशी आणि इतरांशी? आज वर्तमानात मी असा विचार करते आहे, खरेतर हा पूर्ण मूर्ख विचार आहे. पण तरी कल्पना करायला थोडीच पैसे लागतात. फक्त शब्द लागतात. म्हणून मी थोडा स्वतःशीच या बाबतीत संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि चलनविरहीत जग कसे असेल याचे दिवा स्वप्न पाहायला काय हरकत आहे असा विचार केला.  जर पैसेच संपून गेले जगातले. मग तो डॉलर असो, रुपये असो नाहीतर येन, मोहोरा काहीही असो. तर मग लोक काम करायचे थांबतील का? कारण जगातले बहुतांश लोक काम करतात कारण त्यांना पैसे कमवायचे असतात. त्यांना श्रीमंत व्हायचे असते. बिर्ला, अंबानी तर प्रत्येकजण होत नाही. पण प्रत्येकाला वाटत असते, आपले आयुष्य सुखात, आनंदात आणि समृद्धीत जावे. आणि हे सगळे फक्त पैसे कमवून मिळेल अशीच भावना लोकांच्या मनात असते, आणि मग सुरू होते स्पर्धा, संघर्ष आणि बरच काही. 

चलनविरहीत जगात व्यवहार कसे चालतील? वस्तूच्या बदली वस्तू देतील तर मग कोणती वस्तू किती किंमतीची आणि तिचा भाव किती, दुसऱ्या वस्तूच्या तुलनेत ती वस्तू त्याच तोलामोलाची असेल का? हे प्रश्न उपस्थित राहतील आणि आणखीनच गोंधळ होईल. पण चलन राहिलेच नाही तर माणूस जे पैशांवरून स्वतःच्या जिवाभावाच्या माणसांशी भांडतो, वैर पत्करतो ते खरेच नाहीसे होईल? मुळात चलन नसण्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही, कारण उठता, बसता, खाता- पिता आपण कुठल्यातरी कारणांनी चलनाशी जोडलेले असतो. मग अंगावरच्या कपड्यांची किंमत, ताटातल्या जेवणाची किंमत, राहणाऱ्या घराची किंमत या अनेक प्रकारचे हिशोब दिवसभर आपल्या मन आणि मेंदूत नाचत असतात. आपण सगळेजण पैसा या गोष्टीशी इतके एकरूप झालेलो आहोत, की आपल्याला मानवी मूल्यांची आठवण बहुधा राहिली नसावी. कमी पैसे म्हणजे अभाव. अभाव म्हणजे कमतरता, कमतरता म्हणजे दु:खं, आणि दु:खं म्हणजे वेदना. या चक्रात आपल्याला अडकायचे नसते म्हणून आपण सगळेजण पैसाकेंद्रित होतो आणि आपली मने ही कायम असुरक्षित होतात, पोरकी होऊन जातात. मग मिळेल तसे, मिळेल तेव्हा आपण संचय करत जातो, पैशांचा, वस्तूंचा आणि तीच आपली खरी संपत्ती मानून जगण्यातले न दिसणारे सुख शोधत राहतो. मग त्यातूनच आमच्या पिढीवर कायम शिक्का मारला जातो, की आमची आणि इथून पुढची पिढी ही चंगळवादी आहे. कारण आमच्या पिढीला खूप मोकळे आणि खेळते चलन वापरायला मिळते आहे. पण तरीही आम्ही समाधानी नाही. कुठे थांबायचे हे आम्हाला कळत नाही. कारण आमची अवस्था संभ्रमित झाली आहे. 

नोटाबंदी, जागतिकीकरण, औद्यीगिकिकरण, शेती या उद्योगाचा हळूहळू होत चाललेला ऱ्हास, बदलते सेवा क्षेत्र यांसारख्या अनेक वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर आम्ही वाढत आहोत. आमच्या पोटाची भूक ही मर्यादित नाही. ती सतत बदलते आहे आणि दिवसेंदिवस वाढते आहे. चलनाचा भस्मासुर आमच्या पिढीच्या मानगुटीवर बसला आहे. आणि तो आम्हाला त्याच्या दिशेने कधीच घेऊन चालला आहे. आम्ही पण गांधारी सारखे डोळ्यांना पट्टी लावून आणि डोक्‍यात चलनाची धुंदी घेऊन त्या भस्मासुराबरोबर चाललो आहोत. दमत असलो तरी न दमल्याचे नाटक करत आहोत आणि ढोंगी बनून जगतो आहोत. आपल्याला पैशाने विकत घेतले आहे, आपण त्याचे आंधळे गुलाम झालो आहोत. बापरे, किती भयंकर आहे हे. चलनविरहीत जगणे आता तरी अशक्‍य आहे. ते सध्याचे मानवी मूल्य बनले आहे का? जसे फुलपाखरू पैसे न कमवता जगू शकते, इकडे तिकडे त्याच्या अल्प आयुष्यात बागडू शकते तसे आपण बागडू शकू? घरातले झुरळ बिनदिक्कतपणे संपूर्ण घरावर राज्य करू शकते ते ही एकही रुपया न कमावता. रस्त्यावरचा कुत्रा उकीरड्यावरच्या अन्नावर जगतो. तो थोडीच रोज ऑफिसला जातो? मग माणूसच हा असा प्राणी आहे जो चलनाचा आधार घेतो आणि स्वतःची किंमत त्याच्या जवळच्या असलेल्या चलनाने ठरवतो. 

हल्ली तर खासगी शाळांमध्ये बालवाडीत जरी शिक्षण घ्यायचे ठरवले तरी लाखो रुपये भरावे लागतात. पूर्वी अजिबात तसे नव्हते असे कुठेही गेलो तरी आपल्याला ऐकायला मिळते. सध्या काय चालू आहे हे? का आपण इतके महत्त्व देतो आहोत चलनाला? का घाबरतो आहोत? चलनाशिवाय आपण जगू शकू? त्या बागेतल्या फुलपाखरासारखे कुठलीही काळजी डोक्‍यात न ठेवता जगू शकू? आपल्या कुटुंबाला पैशांचा आधार न देता जर फक्त आपलेपणाचा आधार दिला तर पोट भरू शकेल? माणूस आणि पैसा या दोन्ही घटकांत काय महत्त्वाचे? खरेच माणूस महत्त्वाचा आहे? आणि तो जर असेल तर मग चलनविरहीत काल्पनिक आयुष्य वास्तवात आपण, अर्थात आमची पिढी आणू शकेल? वेगळा विचार करूयात? काय हरकत आहे, नाही का?

संबंधित बातम्या